Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी अंक २०२५ - शितोळेसाहेब - एक अजब रसायन - लेख

स
स्वधर्म
Mon, 10/20/2025 - 20:30
💬 14 प्रतिसाद
शितोळेसाहेब - एक अजब रसायन 1 स्वप्न ते विस्तार या प्रवासात किती टप्पे असतात? शितोळेसाहेबांच्या नजरेतून एक विश्लेषण शितोळेसाहेबांची व माझी ओळख तशी खूप वर्षांपूर्वीची. तेव्हा आम्ही नुकतेच आयआयटी पवईमधून इंडस्ट्रियल डिझाइन शिकून बाहेर पडलो होतो व प्रॉडक्ट डिझाइनचा नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पहिल्या भेटीत काही विशेष वाटले नाही. पण जसजसे आमचे संबंध वाढले, तसतसे त्यांचे व्यक्तिमत्त्व लक्षात येऊ लागले. शितोळेसाहेबांची ओळख झालेला दिवस अजूनही आठवतो. आमच्या नवीन प्रॉस्पेक्ट्सपैकी ते एक. सावळा वर्ण, काहीशी गोलमटोल शरीरयष्टी आणि साधा शर्ट व स्वेटर घालून ते एका टेबलाच्या मागे बसलेले होते. टेबलावर ते बनवत असलेल्या प्रोसेस कंट्रोल उपकरणांचे भाग पडलेले होते. मीटिंगमधले आता फार काही आठवत नाही, पण बऱ्याच प्रपोजल्स, कोटेशन्सनंतर त्यांनी आम्हाला एका उपकरणाचे डिझाइनचे काम दिले. मग दुसऱ्या आणि होता होता त्यांची चाळीसएक उपकरणे आम्ही डिझाइन केली. प्रत्येक वेळी आम्ही केलेल्या डिझाइनची त्यांच्या विश्लेषक पद्धतीने ते अक्षरशः पिसे काढत व शेवटी तावून सुलाखून ते उपकरण फायनल होत असे. आधी आम्हाला त्यांच्या विश्लेषणाचा राग यायचा, पण बहुतेक वेळा त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना व हरकतींना आमच्याकडे उत्तर नसे. परिणामी होणारे डिझाइन रोबस्ट होत असे. त्यांच्याकडे भरपूर उद्योजक मित्र येत असत. त्यातल्या प्रत्येकाशी ते आमची ओळख करून देत आणि त्यांच्या कंपनीच्या सर्वच उपकरणांचे डिझाइन आम्ही केले, असे आवर्जून सांगत. हेतू हा की आमच्या ओळखी वाढाव्यात आणि आम्हाला नवीन ग्राहक मिळावेत. मग त्यांनी रिटेनरशिप देऊन आमचा आठवड्यातला एक दिवसच बुक करून टाकला. प्रत्येक वेळी नकोच ते कोटेशन आणि नकोच ते निगोशिएशन! त्यात आम्हा दोघांचाही बराच वेळ वाचला. एखाद्या वेळी काम नसले, तरी ते काढीव काम काढायचे. एखादी पुस्तिकाच डिझाइन कर, एखाद्या नवीन योजनेचा लोगो, कधी पॅकेजिंग असे काहीबाही. पण कधीच दिवस रद्द करायचे नाहीत आणि आम्हाला उशीर झाला तरी कधी बिलातून कपात करायचे नाहीत. हे होत असताना आम्हाला त्यांच्या तरल बुद्धीतून ज्या वेगवेगळ्या कल्पना निघत असायच्या, त्याचे सतत आश्चर्य वाटे आणि त्याच वेळी त्यांची दीर्घ पल्ल्याचा विचार करण्याची जी क्षमता होती, तिचे आनंददायक दर्शन घडत असे. गावाकडची ओढ त्यांना पहिल्यापासून. गावच्या शाळेत त्यांनी एक अनोखे बक्षीस ठेवले होते. पहिला-दुसरा नंबर काढणारे विद्यार्थी दर वर्षी बक्षीस घेत. प्रत्येक इयत्तेत व विषयात पहिल्या आलेल्या मुलांसाठीच सगळी बक्षिसे होती. त्यांनी मात्र ज्या मुलाने या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा सर्वात जास्त टक्के गुण वाढवलेले आहेत, त्याला बक्षीस ठेवले. भलेही तो वर्गात पहिला आलेला का नसेना! हे असे का? तर म्हणाले, "बघा, जी मुलं चाळीस-पन्नास टक्के गुण मिळवतात, त्यांना मनातून वाटत असतं की मी काही तेवढा हुशार नाही. मग ती मुलं बक्षिसाची अशाच सोडून देतात. पण हे बक्षीस प्रथम येणाऱ्याला नव्हे, तर ज्याने मागील वर्षीच्या गुणात जास्तीत जास्त गुणांची वाढ केली आहे त्याला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच ते मिळण्याची शक्यता तयार होते आणि मग सगळेच प्रोत्साहित होतात. पुढे मी आमच्या गावाकडील शाळेतही ही कल्पना राबवली. अशा काही अफलातून कल्पना काढणे, हळूहळू पण दररोज त्याच्यावर काम करणे, त्या पूर्णत्वाला नेणे आणि श्रेय घ्यायच्या वेळेला हळूच बाजूला होणे, हे सगळे ते सहज करायचे. वेगवेगळे तक्ते, आलेख काढण्याचा त्यांना भारी नाद. सर्वच विद्यार्थ्यांना भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण चेरापुंजी माहीत असते, पण आपल्या तालुक्यात सरासरी किती पाऊस पडतो, हे मात्र शिक्षकांनासुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे पावसाची मोजणी कशी करावी, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्या, तक्ते व आलेख करून आपल्या गावाचे वर्षानुवर्षाचे पर्जन्यमान कसे नोंदवून ठेवावे, हे ज्ञान त्यांनी त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांना शिकवायला सांगितले. शाळेचा एक कोपरा शेतीसाठी ठेवून विद्यार्थ्यांनी तिथे पीक घ्याव, अशा प्रकारच्या प्रयोगाची सुरुवात केली. पुढे त्यांनी पाण्यासाठी बराच विचार केला व पाणी पंचायत या संस्थेत सामील होऊन सक्रिय योगदान दिले. ते नेहमी काहीतरी भन्नाट आकडेमोड करत बसलेले असत. पाण्याच्या बाबतीत जेव्हा बाटलीबंद पाणी नुकतेच बाजारात आले, तेव्हा त्यांनी जर सर्वांनी बाटली विकत घेऊन पाणी प्यायचे ठरवले, तर सर्व नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा खर्च हा आपल्या राष्ट्रीय सकल उत्पन्नापेक्षा कसा जास्त होईल, ही आकडेवारी आम्हाला दाखवल्याचे आठवते. सहज जरी भडंगाचा पुडा घेतला, तरी आपण ज्यात शेंगदाणे जास्त आहेत तो घेतो. आपल्याला वाटते, हा भडंग ‘रिच’ आहे. पण खरे तर दुकानदाराचाच त्यात जास्त फायदा होतो, हे विश्लेषण त्यांनी रस्त्यावरून भडंग खात खात चालताना केले होते. चुरमुरे व शेंगदाणे यांचा तुलनात्मक भाव, पॅकेजिंग, वाहतूक, दुकानातील शेल्फ स्पेसचे भाडे इत्यादीचे ढोबळ गणित करून. कारण शेंगदाणे जास्त घातले, तर त्याच वजनाचा भडंगाचा पुडा कमी आकाराचा होतो त्यामुळे शेंगदाणे जास्त घातले, तर ग्राहकाचा नव्हे, दुकानदाराचाच जास्त फायदा होतो, असे त्यांनी सिद्ध केले होते. दुधाचा आणि शीतपेयाचा भाव एकसारखा कसा? हे असले प्रश्न त्यांना पडायचे आणि त्याचा गणिती पद्धतीने छडा लावावा तो त्यांनीच. खरे तर एक लीटर दूध निर्माण होण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल, सहजासहजी स्केल न होणारी आणि अत्यंत श्रमाधारित. तरीही दुधाला मात्र शीतपेयांच्या मानाने दर मिळत नाही, याची त्यांना खंत वाटे. त्या मानाने बाटलीबंद पाण्याचा भाव आणि दुधाचा भाव यांच्यातसुद्धा इतका कमी फरक कसा, हे ते विचारत आणि त्यावर विचार करत बसत. पुढे त्यांच्या उद्योगाची खूप भरभराट झाली, यात काय नवल? एका जागेपासून चार जागी त्यांची वर्कशॉप्स उभी राहिली. त्यांचे टेबल जाऊन एक ओपन केबिन आली. चहूबाजूंना पुस्तके व वस्तू यांची रास आणि मध्ये ते. दिवसभर त्यांच्याकडे सतत कोणी ना कोणी येत असत, भेटत असत. प्रत्येकाशी आपुलकीने बोलणार. मला आता वेळ नाही असे कधी कुणाला सांगितल्याचे मला आठवत नाही आणि जाताना प्रत्येकाला काही ना काही देऊनच पाठवणार. कधी एखादी पुस्तिका, कधी नवे पेन, कधी शेतातली खायची एखादी वस्तू असे काहीबाही. कोणीही त्यांच्या टेबलावरचे एखादे पुस्तक उत्सुकतेने चाळले, तर लगेच म्हणणार, "वाचायचंय का? घेऊन जा मग. झालं की द्या परत." पण कधीच काही परत मागायचे नाही, हा त्यांचा खाक्या. पुण्यात मूकबधिर मुलांची एक शाळा होती. देणगीवर चालणारी स्वयंसेवी संस्था ती चालवत असे. त्यांना खर्च चालवणे मेटाकुटीचे होत होते. अशा लोकांमध्ये शितोळेसाहेबांचा वावर असायचा. त्यांच्यासाठी त्यांनी एक दत्तक पालक योजना डिझाइन करून दिली. त्यासाठीची सगळी आकडेमोड करून दर वर्षी ठरावीक रक्कम देणगी म्हणून देणारे दत्तक पालक गाठून दिले. त्यामुळे संस्थेच्या खर्चाला व मिळकतीला एक सुरळीतपणा आला. अतिशय मर्मग्रही विचार करण्याची त्यांची क्षमता आम्हाला खूप वेळा दिसत असे. भले भले सुटाबुटातील बँकांचे अधिकारी त्यांच्या उद्योगांकडे कर्ज देण्यासाठी येत, नव्या योजना सांगत असत आणि साहेब आपल्या खास ग्रामीण मराठी बोलीत त्यांच्या योजनांची चिरफाड करून कुठल्याच दिखाऊ योजनेत अडकत नसत. एकदा मी आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्केटिंगची एक मोठी योजना आखली आणि त्यांचे मत काय आहे, हे विचारायला त्यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी सगळे ऐकून घेतल्यावर आम्हाला तुकाराम महाराजांची एक ओळ सांगितली - मुंगीचिया घरा | कोण जाई मुरळ | पाहोनिया गूळ | धाव घेई || थोडक्यात कुठल्याही ब्रँड बिल्डिंग, इंडस्ट्री क्लब, नेटवर्किंग यात फार वेळ व पैसा खर्च करू नका. आपले काम चोख करा, धंदा आपोआप वाढेल. ग्रामीण भागातून आल्यामुळे त्यांना एक उपजत शहाणपण होते. त्यामुळे खर्च वाचवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या ते त्यांच्या कंपनीत सतत करत असत. नवी इमारत बांधली तरी जुनेच फर्निचर कसे त्यात वापरता येईल, जागा कशी अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल याच्या कल्पना लढवत बसत. त्यांच्या लक्षात आले की कंपनीच्या पाच-सात गाड्यांचा मिळून विम्याचा खर्च लाखांच्या पुढे जातोय, पण जेव्हा नुकसान होते, तेव्हा विम्याची रक्कम फारशी मिळत नाही. शिवाय क्लेम करायचा तर चार-आठ दिवस गाडी अडकून राहून व्यवसायाचे तोटा होतो, तो वेगळाच. मग त्यांनी ठरवूनच टाकले की विमा फक्त थर्ड पार्टीचा घ्यायचा. भरपूर पैसे वाचतील आणि नुकसान झाले, तर आपण सहन करू. छोट्या छोट्या तीन कंपन्या चालवत असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमी नोकरी मागायला सर्व प्रकारचे उमेदवार येत असत. त्यांना रिसेप्शनमध्ये बसवून ठेवले जाई आणि मग नंतरची एक तारीख देऊन बोलावले जाई. "नोकरी मागायला येणाऱ्या मुलांना असे का बसवून ठेवता?" असे विचारले. त्यांचे म्हणणे होती की "जर माणसाला खरोखर गरज असेल, तर तो पुन्हा एकदा येईल आणि आमच्यासारख्या छोट्या कंपनीत गरजू माणूसच टिकेल. खूप हुशार माणूस आम्हाला नकोच आहे, ज्याला आम्ही प्रशिक्षण देऊ आणि तो काही महिन्यांतच मोठ्या कंपनीत नोकरीला जाईल." असेच एकदा बसलो असताना त्यांच्याकडे स्थानिक गणपती मंडळाची मुले वर्गणी मागण्यासाठी आली. त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे कंपनीचा अदमास घेऊन वर्गणीची मागणी केली. शितोळेसाहेब लगेच तयार झाले, पण त्यांनी एक अट घातली - "तुम्ही जर गणपतीची आरती न अडखळता म्हणून दाखवली, तर सांगितली तेवढी वर्गणी देईन, नाहीतर मी देईन तेवढी वर्गणी घ्यावी लागेल." अर्थात त्या कार्यकर्त्यांना हे आव्हान काही पेलता आले नाही. बुद्धीच्या जोरावर कटू संघर्ष व मतभेद टाळण्याचे विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे होते. आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला सतत घरमालकांच्या तागाद्यामुळे जागा बदलायला लागायची, म्हणून आमचे स्वतःचे ऑफिस असावे, अशी आम्हाला त्यांनी नुसती प्रेरणा दिली नाही, तर जवळचे एक लाख रुपये बिनव्याजी दिले. ते साल होते १९९९. आमच्यासाठी तेव्हा ती खूपच मोठी रक्कम होती आणि फ्लॅट विकणारे सगळेच लोक त्या वेळेला रोकड मागत असत, जी आमच्याजवळ नव्हती. आमचे गाडे त्यात रुतले होते. तेव्हापासून त्यांनी आम्हाला सतत लागेल तिथे आधार दिला. मग हळूहळू आम्हाला समजले की आपल्यासारख्या शेकडो धडपड्या नवउद्योजकांना त्यांनी अशी मदत केली होती. फक्त आपण मदत करतोय हे मदत घेणाऱ्यालाही कळू नये, अशी त्यांची देण्याची पद्धत होती. लोकांबरोबर हॉटेलमध्ये जरी गेले, तरी ते नेहमी स्वतःच सगळ्यांचे बिल द्यायचे आणि देताना म्हणायचे की "हे छोटं बिल मी देतो, तुंम्ही पुढचं मोठं द्या" जेणेकरून दुसऱ्याला अवघड वाटू नये. अशा पद्धतीने देण्याची ही अद्भुत कला त्यांच्याकडे होती. हॉवर्ड गार्डनर या प्रख्यात मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून आठ प्रकारची असते, असा सिद्धान्त मांडला आहे. शितोळेसाहेबांकडे यापैकी बहुतेक पैलू उच्च पातळीला होते, असे म्हणता येईल. शंभरहून अधिक कर्मचारी असणारा तंत्र‌ज्ञान उद्योग यशस्वीपणे उभारणे हा झाला एक पैलू. पुढे मात्र त्यांचे हृदय आणि दृष्टी दोन्हीही विकसित झाली आणि त्यातून त्यांचा शेती, शेतकरी, जमीन, पाणी, हवा यांच्याबाबतचा दृष्टीकोन विकसित झाला. आयुष्यभर त्यांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला. रासायनिक खते, कीटकनाशके व कृत्रिम संप्रेरके यांच्या उपयोगाला विरोध केला. जमीन, पाणी, झाडे, पिके, फळे नैसर्गिक वाढतील तशीच वाढवली पाहिजेत. पण ते विचार केवळ भाषणात आणि लेखनातच न ठेवता, त्यांनी ते आपल्या प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणले. त्यांचे संघटनकौशल्य वादातीत होते. त्यांनी स्थापन केलेल्या सेंद्रिय शेती अभ्यासगटात मी गेली २० वर्षे जात आहे, पण कधी कटुता, दुभंग जाणवले नाहीत. त्याचे कारण म्हणजे गटाला सिमेंटप्रमाणे धरून ठेवणारे शितोळेसाहेब. अत्यंत सोप्या भाषेत शेतकाऱ्यांशी संवाद साधण्याची कला त्यांना अवगत होती. एका शेतकरी कार्यशाळेतले त्यांचे हे व्याख्यान - https://www.youtube.com/watch?v=car4iJyDdXw&t २०१९मध्ये सांगलीच्या भिलवडी येथे एक मोठा पूर आला. आम्ही आमच्या सेंद्रिय शेती अभ्यासगटात त्यावर विचार केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तिथल्या लोकांच्या समस्या प्रचंड होत्या. कित्येकांची जनावरे वाहून गेली होती. महापुराच्या पाण्यामुळे नदीकाठची सगळी शेती अनेक दिवस पाण्यात राहिली होती. पाणी ओसरल्यावर सगळ्या पिकांवर, चाऱ्यावर मातीचा एक राप (थर) बसला होता. शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या जनावरांना जेव्हा ते हा चारा द्यायचे, तेव्हा या मातीच्या थरामुळे जनावरे आजारी पडत होती. त्यांची पोटे फुगून जनावरे बसूनच राहायची. काही दिवसांनी जनावरांना पोटाला बेड सोअर्स व्हायचे आणि जनावरे दगावायची. ही एक मोठीच समस्या बनली होती. जनावरांमधली रोगराई इतकी वाढली होती की कित्येक गायी बसून राहिल्यामुळे आजारी पडून मृत पावलेल्या होत्या. त्यामुळे बसून राहिलेल्या जनावरांना आधार देऊन दररोज उभे करणे आवश्यक झाले होते. ३५०-४०० किलोच्या गाई-म्हशी जेव्हा बसतात, तेव्हा त्यांना उठवायसाठी चार चार लोक लागतात. गावकरी हे सगळे करून करून मेटकुटीला आले होते. मदत देणाऱ्या सगळ्या संस्था धान्य, कपडे, चारा, चादरी वगैरे द्यायच्या, पण जनावरांसाठी काही कोणी देत नव्हते. त्यासाठी जर काही करता आले, तर बरे होईल, अशी शेतकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली. हे काम आम्ही हातात घेतले आणि गाय उचलण्यासाठी छोटेसे क्रेन डिझाइन आणि मॅन्युफॅक्चर केले. अशी क्रेन, जी कोणत्याही गोठ्यात घालता येईल, ओबडधोबड जमिनीवर हलवता येईल आणि ज्याच्या वापराने फक्त एका माणसाला ३५० ते ४०० किलोची म्हैस उचलता येईल. ते डिझाइन करताना मी जी काय चार-पाच कन्सेप्ट्स काढली होती, त्यातल्या प्रत्येक कन्सेप्टवर शितोळेसाहेबांनी इतक्या अफलातून कमेंट्स दिल्या आणि शेवटी एक इतके सोपे डिझाइन बनले की ज्याचा उपयोग फक्त गाय उचलण्यासाठीच नाही, तर शेतकऱ्याच्या इतर अनेक कामांसाठीही होईल. शेतात विहिरीत पडलेली मोटर काढण्यासाठी, झाडाचा बुंधा हलवण्यासाठी, कुठूनही काहीही खेचण्यासाठी वगैरे. एकट्या माणसाला प्रचंड बल लावता येईल आणि त्याला वीज लागणार नाही असे यंत्र, ज्यात शितोळेसाहेबांच्या कल्पक डोक्यातून आलेल्या अतिशय सोप्या संकल्पना वापरल्या होत्या. https://www.youtube.com/shorts/sVJmyJqAdD8 त्यांना पद्मश्री मिळावी, अशी एकदा त्यांच्या काही मित्रांनी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी एक अर्ज किंवा शिफारस पत्र तयार करावे लागते. ते झाल्यावर सगळ्यांनी त्यांना मीटिंगला बोलावले व आपला बेत सांगितला. त्यावर त्यांनी ताबडतोब नापसंती व्यक्त केली. मित्रमंडळ काही ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी थोडा वेळ मागून घेतला व आम्ही परत भेटलो. त्या वेळी त्यांनी एका कागदावर मला पद्मश्री का देऊ नये व तो विचार तुम्ही का सोडावा, याची एक नाही, दोन नाही, तर तब्बल सतरा कारणे लिहून आणली होती. आजकाल सगळ्या गोष्टींचे पॅकेजिंग करून त्याचे नेमके मार्केटिंग करून उद्योगांचे व वस्तूंचेच नव्हे, तर व्यक्तींचेही ब्रॅंड बिल्डिंग केले जाते. शितोळेसाहेब यात कधी पडले नाहीत. ते शांतपणे काम करत राहिले, वाचत राहिले, अनुभव घेत राहिले, शोध घेत राहिले. त्यांचा जीवनप्रवाह सुरू असतानाच अचानकच २०२३मध्ये शितोळेसाहेब आपल्यातून निघून गेल्याची कटू वार्ता आली. त्यांना तब्येतीचा काही गंभीर त्रास होता, हे आम्हाला माहीतही नव्हते. पण त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्रास उद्भवला, तेव्हा त्यांनी कोणतेही अत्याधुनिक जालिम उपचार घेण्यास नकार दिला व नैसर्गिकपणे झाडावरून पडणाऱ्या फळाप्रमाणे देह सोडून दिला. आशा प्रकारे सेंद्रीय शेतीचा विचार त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळला. आचरणक्षमतेचे याहून मोठे उदाहरण मला माहीत नाही आणि पुन्हा दिसेल असेही वाटत नाही. माझ्या अल्प आयुष्यात काही खूप बुद्धिमान लोक आले, पण ते उदार होते असे म्हणता येणार नाही. खूप सर्जनशील काही भेटले, पण ते स्वत:ची पोझिशन राखायचा प्रयत्न करताना उघडे पडायचे. काही व्रतस्थ, निष्ठावान पण संघटनकौशल्य नसायचे. काही खूप कष्टाळू, पण व्हिजन नाही. शितोळेसाहेबांच्या सहवासात हे गुण असंख्य वेळा विजेसारखे चमकून जायचे. हा माणूस नक्की किती खोल आहे, याचा अंदाज वीस वर्षांपेक्षाही जास्त संबंध असून मला कधीच आला नाही. म्हणून वाटते की शितोळेसाहेब हे परमेश्वराने निर्माण केलेले अजब रसायन मला याची देही याची डोळा पाहायला मिळाले, हे माझे केवढे भाग्य! पांडुरंग शितोळेकाका यांचा जीवनप्रवास https://youtu.be/_0Nzi1bBAbs?si=PsA0kdhOxNRvTRc6

प्रतिक्रिया द्या
3092 वाचन

💬 प्रतिसाद (14)
म
मारवा Mon, 10/20/2025 - 18:30 नवीन
उत्तम प्रेरणादायी लेख. एका मनस्वी संवेदनशील बुद्धिमान व्यक्तीची ओळख तुम्ही ज्या आत्मियतेने करून दिली त्यावरून तुमचे प्रेम दिसून येते. ते आपल्यात आज नाहीत याचे वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
न
निमी Tue, 10/21/2025 - 14:18 नवीन
तुम्ही खरंच भाग्यवान.. ही व्यक्ती तुम्ही अनुभवू शकलात.. आणि थोडीशी त्याची झलक तुमच्या लिखाणा मधून आम्हाला मिळाली. खूप छान लेख झाला आहे. ही खरंच त्यांना आदरांजली ठरेल.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 10/21/2025 - 18:25 नवीन
आता दुर्मिळ होत चालली आहेत. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 10/21/2025 - 23:05 नवीन
मारवा, निमी, अनन्त यात्री. लेख आपल्याला आवडला याचा आनंद आहे. खरे तर, मी शितोळे साहेबांचे व्यक्तीमत्व पूर्णपणे चितारणे हे काम मला खूप अवघड वाटले. त्यांच्या कोणत्या आठवणी आणि विश्लेषणे लेखात घ्यावी आणि कोणती सोडून द्यावी असे झाले होते.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 10/22/2025 - 09:11 नवीन
आपल्याला त्यांचा सहवास लाभला, आपण खरेच भाग्यवान आहात... आजकाल अशी वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्ञान असलेली, उच्च प्रतीचे व्यवहार ज्ञान असलेली, वास्तववादी , व्यवहारवादी व हे सर्व गुण असतानाही इदं न मम असा भाव ठेवून जगणारी माणसे कुठे सापडतात ? आपल्या लेखाच्या निमित्ताने अशा थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 11/21/2025 - 08:30 नवीन
+१ हेच म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
व
विजुभाऊ गुरुवार, 10/23/2025 - 13:09 नवीन
दिवाळी अंकाच्या निमित्ताने एक भन्नाट व्यक्तिमत्वाची ओळख झाली.
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी Fri, 10/24/2025 - 06:40 नवीन
शितोळेसाहेबांची ओळख फार आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/24/2025 - 14:59 नवीन
एका असामान्य व्यक्तिमत्वाच्या ओळखीबद्दल धन्यवाद स्वधर्मसाहेब. हे शितोळे साहेब जसजसे वाचत गेलो तसतसे बारीक निरिक्षण, उपजत सर्जनशीलता आणि आहे त्या साधनातून, आहे त्या परिस्थितीतून जगणे सोपे सुंदर करण्याचा ध्यास जाणवत राहिला. गावाकडच्या काही माणसांचा अभ्यास भले ही कागदोपत्री डिग्र्यांचा, जड जड विचारवंती थाटाचा नसेल पण इतका सूक्ष्म, माणुसकीला आणि निसर्गाला समजून उमजून घेणारा असतो की त्यांच्या ह्या जगण्यासमोर नतमस्तक व्हायला होतं. आमच्या इकडचे कृषीतज्ञ वि. ग. राऊळ काय किंवा दिवंगत मारुती चित्तमपल्ली सर काय, सारीच अशीच उत्तुंग, विलक्षण आणि अवलिया व्यक्तीमत्वे. अशा लेखनाबद्दल पुनः धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Sun, 10/26/2025 - 11:39 नवीन
धन्यवाद तुंम्ही आवर्जून लेख वाचलात व प्रतिसाद दिलात. शितोळे साहेबांसारखी उत्तुंग पण प्रसिध्द नसलेली माणसे खूप प्रेरणा देत राहतात. अजून खूप आहे त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखे आणि त्यांनी लिहिलेले वाचण्यासारखेही. त्यांचे स्नेही मिळून आता त्यांच्या लेखनाचे एक पुस्तक काढत आहोत.
  • Log in or register to post comments
स
सुखी Sat, 11/01/2025 - 18:20 नवीन
एक भन्नाट व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत याबद्दल धन्यवाद. अफाट माणसे.. अचाट कामे __/\__
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 11/24/2025 - 18:39 नवीन
हुरूप आला तुमचा प्रतिसाद वाचून. शितोळे साहेब खरोखरच अफाट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी
अ
असंका Sun, 11/23/2025 - 14:08 नवीन
फारच सुरेख ओळख करून दिलीत. विडिओ देखिल कायम विचार करायला भाग पाडतील असे आहेत. एखादा माणुस इतक्या लोकांच्या जीवनावर इतका खोलवर जाणारा परीणाम करु शकतो, हे खरोखर विस्मयकारक आहे! या सुरेख लेखाबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 11/24/2025 - 18:39 नवीन
धन्यवाद. तुमचा प्रतिसाद मोलाचा आहे. असे लोक आयुष्यात भेटले त्याबद्दल खूप कृतज्ञता वाटते. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा