जे न देखे रवी...

मन चांदण्याचे तळे

Primary tabs

मन अंधाराचा काठ
मन चांदण्यांचे तळे

मन आभाळ उंचसे
मन धुळीची पावले
मन आवर्त फिरते
मन हळवे कोवळे

मन एक सूर्यफूल
त्याला सुखाचाच ध्यास
किती सोसून झळांना
होते शेवटी उदास

मन बेट हे वेळूचे
असे मोत्यांनी भरले
परी मिटते नयन
जसे फुलले फुलले

मन सतारीची तार
मन इवला तुषार
मन कुणाला कळेना
असा मोहक झंकार

इनोबा म्हणे

वाह! खुपच छान.

मन सतारीची तार
मन इवला तुषार
मन कुणाला कळेना
असा मोहक झंकार

या ओळी विशेष आवडल्या.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)

सर्किट (not verified)

वा ! मस्त कविता !

(केशवसुमार हा तुम्हाला इशारा.. येऊ द्या... :-)

- सर्किट

सुवर्णमयी

सर्किट ,केशवसुमारांना कशाला इशारे करताय? आणि करून काही फरक पडेल का?:)
मला तरी आठवत नाही की माझ्या (एका तरी)कवितेचे त्यांनी विडंबन केले आहे( मी हुश्! किंवा अरे रे असे काहीही म्हणत नाहीये)
मी लिहिते ते त्यांच्या पसंतीला उतरले नसावे. :)

केशवसुमार

उत्तम कविता.. मन चांदण्यांचे तळे हे खूप आवडले..
तुम्ही पुण्याच्या का हो.. नाही तुमच्या ह्या प्रतिसादाची नोंद घेतली आहे.. ;)
(पुणेरी)केशवसुमार
अवांतर.. मनोगतावर आपल्या वेळ झाली, शिष्ठाचार या कवितांची नोंद घेतली होती..
(स्मरणशील)केशवसुमार

प्राजु

बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय ची आठवण झाली.
सुंदर..

मन सतारीची तार
मन इवला तुषार
मन कुणाला कळेना
असा मोहक झंकार

हे जास्ती आवडले.

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर

मन आभाळ उंचसे
मन धुळीची पावले
मन आवर्त फिरते
मन हळवे कोवळे

अप्रतिम कविता!!

आपला,
(मनवेल्हाळ) तात्या.

कविवर्य ग्रेस यांची एक कवीता,
मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥

ती सुधीर मोघे यांनी थोडी सोपी केली आहे.

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नांतिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा

आवडली.