आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान!
आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच.
व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या.