जे न देखे रवी...

अथांग सागर

Primary tabs

अथांग सागर येती लाटा

सागराच्या स्पंदनाची
आगळीशी देहबोली
फेनफुले खळाळत
नभाकडे झेपावली

गतीमान जसा जसा
सागराचा श्वास होई
ऊर त्याचा फेसाळत
खाली वर झेप घेई

भावनांच्या आवेगाने
क्षणक्षण उचंबळे
थरथरले वाळूचे
कण कण इवलाले

नभातल्या चंद्रामुळे
खुळी चांदणी जाहली
मिठीमध्ये किनाऱ्याच्या
फेनफुले विसावली

एकामागे एक येते
खळाळत लाट लाट
लपाछपीमध्ये होते
दिनरात नि पहाट

थांग लागेना अजुनी
माणसाला मानसाचा
मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!

विसोबा खेचर

वा! सुरेख कविता...!

नभातल्या चंद्रामुळे
खुळी चांदणी जाहली
मिठीमध्ये किनाऱ्याच्या
फेनफुले विसावली

फेनफुले हा शब्द सुंदर आहे..!

थांग लागेना अजुनी
माणसाला मानसाचा
मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!

क्या बात है,

मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!

या ओळी बाकी क्लासच!

आपला,
(मनाच्या दर्याचा प्रेमी) तात्या.

सुंदर कविता लिहिली आहे.
सागराच्या स्पंदनाची
आगळीशी देहबोली
फेनफुले खळाळत
नभाकडे झेपावली
या ओळी आवडल्या.

फेनफुले हा शब्द सुंदर आहे..! तात्यांशी सहमत.

प्राजु

सागराच्या स्पंदनाची
आगळीशी देहबोली
फेनफुले खळाळत
नभाकडे झेपावली

अप्रतिम... अतिशय सुंदर आहेत याओळी..

- (सर्वव्यापी)प्राजु

सचिन

थांग लागेना अजुनी
माणसाला मानसाचा
मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!
हे बाकी खरंय....!
कविता सुरेख्....आवडली.

फेनफुले शब्द छानच ! तात्यांशी सहमत !!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चित्रदर्शी कविता !

लगागागा लगागागा ही सुंदर लय.. (फक्त शेवटच्या ओळीतले "खळाळणार्‍या" बदलता येईल का ?)

- सर्किट

चतुरंग

"खळाळत्या ह्या लाटांचा!"
चालू शकेल?

चतुरंग

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

छान रंगोबा !!

- सर्किट

(आता ही कविता "कशासाठी पोटासाठी.." ह्या चालीत छान बसते.)

धनंजय

छान कविता.

"खळाळणार्‍या" बदलावे, (अष्टाक्षरीत शक्यतो ५/३ अशी यती देऊ नये असा नियम लक्षात येत आहे...) पण
"खळाळत्या ह्या" नाही पटले - उगीच आठ-अक्षर पूर्ती वाटते. "ह्या" म्हणजे कुठल्या?

सुवर्णमयी

५/३ यतीचा नियम मला माहिती नव्हता. आता लिहितांना आणखी एक बंधनः)
ह्या - मनातल्या लाटांचा म्हणून घेता येईल असे मला वाटले.
अधिक विचार करून यमक साधणारी व अर्थपूर्ण दुसरी ओळही लिहून बघेन.

चतुरंग

'ह्या' म्हणजे सततच्या - कुठल्या एका ठिकाणच्या/क्षणातल्या असे काही नाही, त्या असतातच, तुम्ही पहाल तेव्हा आणि तुम्ही पहाल तिथे!

चतुरंग

सुवर्णमयी

सर्वांचे प्रतिसाद आणि सूचनेकरता आभार.
कवितेत केलेला बदल आवडला.
आता कशासाठी पोटासाठीच्या चालीत म्हणून बघायला हरकत नाही:)
फेनफुले हा शब्द माझा नाही. त्यामुळे त्याचे श्रेयही माझे नाही. हा शब्द खूप वर्षापूर्वी वाचनात आला होता, तेव्हापासून लक्षात होता.. पण कोणाच्या लेखनात वाचला ते आता नेमके आठवत नाही.
सोनाली

बेसनलाडू

मस्त कविता. फार आवडली.

गतीमान जसा जसा
सागराचा श्वास होई
ऊर त्याचा फेसाळत
खाली वर झेप घेई

एकामागे एक येते
खळाळत लाट लाट
लपाछपीमध्ये होते
दिनरात नि पहाट

'फेनफुले', 'मासाला मासाचा' हे फार आवडले. 'मराठी मासं मराठी मासं' हे कुठेशी वाचलेले आठवले :) ;)

(मराठी माणूस)बेसनलाडू

ठणठणपाळ

अभिनंदन

>>ऊर त्याचा फेसाळत
खाली वर झेप घेई
ही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे.

काही शब्दांची द्विरुक्ती खूप परिणामकारक वाटते. उदा., क्षणक्षण, कणकण, जसाजसा, लाटलाट.
खळाळणार्‍या च्याऐवजी खळखळत्या चालेल का?

ठणठणपाळ

आजानुकर्ण

वरील प्रतिक्रियांशी सहमत आहे. सुंदर कविता. अत्यंत आवडली.

(सहमत) आजानुकर्णही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे.

खूळी चांदणी,

फेनफुले तसेच माणसाला मानसाचा शब्दयोजना सुंदरच.

शुभेच्छा

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सागर

सुवर्णमयी,

अतिशय सुंदर कविता आहे. खूपच छान.... अजून येऊ देत...

माझे नाव त्यात आहे त्यामुळे तर अगदीच स्पर्शून गेली ही कविता :)

शेवट खूपच सुंदर केलात.

--------------------
थांग लागेना अजुनी
माणसाला मानसाचा
मन अथांग सागर
खळाळणाऱ्या लाटांचा!
--------------------

माझीही थोडी भर...

सरिता येथे सागरमय होते
सर्वस्व अर्पून प्रेमा करता...
अथांग सागरात काहूर माजते
एकेक दिशा सावरता सावरता....

(अथांग) सागर

उत्खनक

नभातल्या चंद्रामुळे
खुळी चांदणी जाहली
मिठीमध्ये किनाऱ्याच्या
फेनफुले विसावली

फार सुंदर काव्य!