Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निषेध निषेध तीव्र निषेध...

प
प्रशु
Wed, 07/07/2010 - 18:53
🗣 119 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
30851 वाचन

💬 प्रतिसाद (119)
उ
उपास Sat, 07/10/2010 - 00:11 नवीन
अदितीताई, स्थानिक म्हणजे डोमेसाईल असा माझा दृश्टीकोन आहे. मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली म्हटल्यावर, डोमिसाईल व्यक्तीला तिथे पहिल हक्क मिळायलाच हवा. खाली एका प्रतिसादात क्लिंटन यांनी म्हटल्याप्रमाणे 'फ्रेम ऑफ रेफरन्स' नक्कीच महत्त्वाची आहे. भारताचे नागरीक आहोत हे मान्य पण आपण महाराष्ट्रातही राहतोय की. कर दोन्ही ठिकाणी भरतो. माझ्या मते मी एकाच वेळी बाप, मुलगा, नवरा, भाऊ, मित्र आहे. ही सगळी नाती एकमेकांना पूरक कशी राहतील हे बघायला हवे (न की एकच मिरवावे) किमान तसा प्रामाणिक प्रयत्न असायला हवा. तद्वत मी एकाच वेळी भारतीय आहे, महाराष्ट्रीय आहे, मुंबईकर आहे आणि हो एक माणूस (मानवतावाद) आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स प्रमाणे मी कोण हे बदलत राहायलाच हवं. तसच आजही आपण "जय हिंद, जय महाराष्ट" असंच म्हणतो, जय हिंद आधी. भारताविषयी आदर केव्हाही आहेच पण दोन भारतीय असतील तर माझी ओळख मराठी अशीच आवडेल. वैश्विक स्तरावर माझी ओळख मला महाराष्ट्रीय म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून आवडेल आणि मराठी माणसांमध्ये माझी ओळख मुंबईचा अशी आवडेल. माझ्या दृष्टीने एक गोष्ट दुसर्या गोष्टीस मारक ठरत नाही तर पूरक ठरते. उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
क्लिंटन Fri, 07/09/2010 - 11:08 नवीन
स्वतः पोटापाण्यासाठी बाहेरील राज्यातून येऊन, स्थानिकांचा रोजगार हिसकावून
इतर मुद्द्यांचा परामर्श इतरांनी केला आहेच म्हणून इतर मुद्द्यांवर परत न लिहिता या मुद्द्यावर उत्तर देतो. समजा मी रेल्वे स्टेशनवरील पुलावर उभा आहे आणि खाली पूर्ण भरलेली गाडी स्टेशनात आली. ती गाडी मी धावतधावत जाऊन पकडली पण इतर अनेकांना ती पकडता आली नाही. मला गाडीत चढायला मिळाले याचा अर्थ मी जे खाली प्लॅटफॉर्मवरच राहिले त्यांचा हक्क हिसकावून घेतला का? समजा उद्या मी गाडी विकत घेतली तर ज्यांच्याकडे गाडी नाही अशांचा हक्क हिसकावून घेऊन घेतली का? शिव खेरांनी त्यांच्या You can win पुस्तकात म्हटले आहे Life is like a cafeteria. You can get anything as long as you are prepared to pay for it. जे लोक अशी किंमत देऊ शकतात त्यांना पाहिजे ते मिळते. मुंबईत अनेक तथाकथित ’भय्ये’ कष्ट करून आपले पोट भरतात. ते ज्या व्यवसायांत आहेत ते व्यवसाय मराठी माणसाने करू नये असा कोणता कायदा आहे? मराठी माणसाने टॅक्सी चालवू नये किंवा भेळपुरीच्या गाड्या चालविणे, इस्त्रीची दुकाने काढणे अशी कामे करू नये असे कुठे म्हटले आहे?पण अशा कामांसाठी लागणारे कष्ट करायची तयारी नसेल आणि त्या अर्थी आपण गरज लागेल तितकी किंमत मोजायला तयार नसू तर आपल्याला पाहिजे ते कसे मिळणार? मी अमेरिकेत असताना पिझा शॉपमध्ये एका अमेरिकन माणसाशी माझे बोलणे झाले होते. तो म्हणाला "आमच्या तरूण पिढीला नवे उद्योगधंदे काढावेत, किंवा शिकून डॉक्टर, वकिल किंवा तंत्रज्ञ बनावे ही महत्वाकांक्षा नाही. जर सगळ्या तरूणांना बेसबॉल किंवा अमेरिकन फुटबॉल खेळाडू बनायचे असेल तर आमचा देश पुढे जाणार कसा? मग तुमच्यासारखे भारतीय आणि चिनी येऊन कष्ट करून प्रगती करतात आणि आमच्याकडले कट्टर लोक ’बाहेरच्यांना’ नावे ठेवायला मोकळे!" आपल्याकडील परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे का? फक्त संदर्भ थोडे बदलात-- म्हणजे अमेरिकन मुलांना शिकायची महत्वाकांक्षा नाही तशा मराठी मुलांच्या महत्वाकांक्षा किंवा कष्ट घ्यायची तयारी किंवा इतर गुण कुठे कमी पडतात हे संदर्भ बदलतात पण एकूण परिस्थिती सर्वसाधारण सारखीच आहे ना? इथे बांगलादेशी घुसखोरांचे अजिबात समर्थन नाही. माझ्या म्हणण्याची frame of reference भारत देश आहे. विश्वची माझे घर ही परिस्थिती अजून आलेली नाही. तेव्हा बांगलादेशी घुसखोरांना अगदी कठोर कारवाई करून हाकलून द्यावे. काहीही हरकत नाही. झोपडपट्ट्यांचे म्हणाल तर धारावीत १९७२ च्या दुष्काळाच्या वेळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेले कित्येक मराठी लोक आजही आहेत. झोपडपट्ट्यांची वाढ झाली याला सगळेच लोक जबाबदार आहेत-- व्होट बॅंकचे राजकारण करणारे राजकारणी सगळ्यात जास्त. तेव्हा माझा मुद्दा हा की ’बाहेरच्यांनी’ येऊन तुमचे रोजगार हिसकावून घेतले यासारखी आग लावणारी भाषा बोलणे खूप सोपे असते. आणि ज्यांना काही कारणाने नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यांचा तर अशा गोष्टींवर ताबडतोब विश्वास बसतो. यातून राज ठाकऱ्यांसारख्यांच्या मताच्या पेढ्या भरतात आणि सामान्य लोक कोंबड्या झुंजाव्यात तशा या राजकारणाच्या गलिच्छ खेळात राजकारण्यांच्या शब्दाखातर झुंजत राहतात. आणि चांगले शिकले सवरलेले लोक याला पाठिंबा देतात याचेच वाईट वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
उ
उपास Sat, 07/10/2010 - 03:23 नवीन
क्लिंटन, तुम्ही जे गाडी पकडायचे उदाहरण दिले आहेत ना, त्याकडे मी असे बघतो. तुम्ही पुलावरुन धावत येऊन गाडी पकडू पहात आहात, असे असताना तुम्ही प्लॅटफॉर्मवर आधीच असलेल्यांना (अगदी तुमच्यापेक्षा तब्येतीने कमी असलेल्या/ वृद्ध) सगळ्यांना बाजूला ढकलून पुढे जाऊ पहात असाल तर ते बरोबर आहे का? 'survival of the fittes'' चा तो चुकीचा उपयोग ठरेल. पण तुम्ही ही जर इतरांसारखे रांगेत किंवा सलोख्याने वागून, मिळून मिसळूम आलात तर निश्चितच सौहार्दाचे वातावरण होईल. त्याउप्पर केवळ झुंडशाहीच्या बळावर तुम्ही गाडित असलेल्या खाली खेचून किंवा उतरायला प्रव्रूत्त करुन त्याची जागा घेऊ पहात असाल तर ते निंदनीय आहेच. शिवे खेरांचे विचार बरोबर आहेत पण ते भाडवलशाही आयामातच. ते विधान सरसकट लागू होतच नाही. दोन वेगळ्या पातळीवर तर नाहीच नाही. अमेरिकेत एच वन वर काम करणारे सुद्धा एलियनच ठरतात आणि कितीही म्हटले तरी त्यांना कामाच्या समान संधी नाहीतच आणि त्या असाव्यात असे अपेक्शितही नाही. देश असो वा राज्य, स्थानिकांचा विचार करणे क्रमप्राप्त आहेच. भैय्या किंवा इतर कुणी यायला विरोध नाही पण त्यांच्या अरेरावीला . झुंडशाहीला(उदा. अबू आझमी), इथल्या भाषा संस्कृतिला नाकारणार्‍यांना नक्कीच विरोध आहे. राजकारण्यांच्या कोंबडे झुंजवण्याचा, सामान्य जनतेच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याच्या (उदा. राज ठाकरे) वृत्तीवर एकमत आहेच त्यामुळे ते परत सांगण्यात अर्थ नाही पण त्यापलिकडे मराठी म्हणून आपण काय करतो, काय करु शकतो हे महत्त्वाचे. मराठी माणसे, मुले त्यांचे व्यावसायिक दृषटीकोन ह्याबाबतीत परखड आत्मपरिक्षण करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे हे सर्वमान्य आहे. गेल्या काही वर्षात मराठी माणूसही उद्योगाकडे सकारात्मक बघतोय असं दिसतय. मराठी माणूस नालायक आहे म्हणून मुंबईवर त्याला अधिकर नाही ह्या दृष्टीकोनातून बाहेर पडणे हे आधी आवश्यक आहे, तरच सकारात्मक वातावरण तयार होऊन त्याच्या आणि पर्यायाने मुंबईच्या विकासास हातभार लागेल. उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 07/10/2010 - 22:33 नवीन
तुम्ही जे गाडी पकडायचे उदाहरण दिले आहेत ना, त्याकडे मी असे बघतो. तुम्ही पुलावरुन धावत येऊन गाडी पकडू पहात आहात, असे असताना तुम्ही प्लॅटफॉर्मवर आधीच असलेल्यांना (अगदी तुमच्यापेक्षा तब्येतीने कमी असलेल्या/ वृद्ध) सगळ्यांना बाजूला ढकलून पुढे जाऊ पहात असाल तर ते बरोबर आहे का?
तुमच्याकडून अगदी हीच प्रतिक्रिया मला अपेक्षित होती. किंबहुना तुम्ही ही प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त व्हावेत म्हणूनच मी रेल्वे स्टेशनातल्या गाडीचे उदाहरण दिले असे म्हटले तरी चालेल.अन्यथा इतर उदाहरण देता आले असते. स्टेशनवर वृध्द आणि इतरांना मागे ढकलून मी पुढे गेलो तर ते नक्कीच बरोबर नाही. पण हेच सामान्यीकरण समाजाच्या पातळीवर कसे करता येईल?आपल्या म्हणण्याचा अर्थ असा होत नाही का की मुंबईत बाहेरून आलेले भय्ये हे सशक्त आहेत आणि आपण मराठी लोक अशक्त आहोत?असे सरसकट कोणत्या आधारावर म्हणता येईल? मानवी शरीर वृध्दावस्थेकडे झुकल्यावर अशक्त बनते आणि ती प्रक्रिया नैसर्गिक आणि Irreversible (मराठी शब्द?) असते. तसे मराठी समाजाच्या बाबतीत नैसर्गिकरित्या झाले आहे का? आणि ते आपल्याच समाजातील दोषांमुळे--- रिस्क न घेणे, इतरांचे पाय खेचणे, भाऊबंदकी या कारणांनी झाले असेल तर त्याचा दोष इतरांवर कसा? आपल्या समाजात सर्वसाधारणपणे असलेले (प्रत्येक व्यक्तीत नव्हे) हे असेच दोषच मराठी माणूस मागे पडायला कारणीभूत झाले आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही आणि त्याला परिक्षेत कमी मार्क मिळाले तर तो दोष कोणाचा?त्याचा स्वत:चा की परिश्रम घेऊन जास्त मार्क मिळविलेल्याचा? अनेक लोक म्हणतात की रिस्क घेण्यासाठी घरी पैसा पाहिजे. पण विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी असलेले लोक बघितले तर त्यापैकी बहुतांश सामान्य किंवा गरीब परिस्थितीतूनच वर आलेले असतात हे कसे नाकारता येईल? रघुनाथ माशेलकरांसारख्या मोठ्या माणसाने म्हटले आहे की आयुष्यात यशस्वी व्हायला थोडी तरी प्रतिकूल परिस्थिती असणे गरजेचे आहे. कारण आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे ही इर्षा आणि आगच माणसाला यशस्वी बनविते. माशेलकरांनी किंवा त्यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तीने इतरांना दोष देण्यात वेळ घालवला असता तर आज आपल्याला त्यांचे नाव माहिती पण नसते. कारण इतरांना दोष देण्यातच धन्यता मानणारे लोक आयुष्यात काहीही भव्यदिव्य कामगिरी करू शकत नाहीत. इथे जर भय्ये गुंडगिरी करून मराठी माणसाला त्रास देत असतील तर त्याचे अजिबात समर्थन नाही.त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण एखादा पूर्ण समाज हा काही गुंड नसतो. त्यामुळे ’सगळे भय्ये असेच’ असे म्हणता येणार नाही.त्याचप्रमाणे मराठी गुंड नसतात असेही नाही. दस्तुरखुद्द दाऊद इब्राहिम मराठी भाषिक आहे तर आणखी काय बोला? तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे आपण मागे पडत असलो तर त्याची कारणे आत्मपरिक्षण करून शोधून काढून ती दूर कशी करता येतील त्यासाठी प्रयत्न करणे हितकारक ठरेल. आणि ते तसे करू न शकणारे लोकच इतरांना दोष देतात.अगदी वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला तेच बघायला मिळते, बरोबर ना?
गेल्या काही वर्षात मराठी माणूसही उद्योगाकडे सकारात्मक बघतोय असं दिसतय.
हो ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.सगळ्यांना व्यवसाय करता येत नाही हे मान्य.पण नोकरीतही डायरेक्टर आणि तत्सम पदांवर मोठ्या प्रमाणावर मराठी लोक पोहोचले तरी त्याचा मराठी समाजाला मिळणाऱ्या मानात नक्कीच वाढ होणार आहे. आणि बऱ्याच प्रमाणात ते आज होत आहे ही गोष्ट चांगलीच आहे.
मराठी माणूस नालायक आहे म्हणून मुंबईवर त्याला अधिकर नाही ह्या दृष्टीकोनातून बाहेर पडणे हे आधी आवश्यक आहे,
माझा आक्षेप आहे मुंबई फक्त आमची असा व्यर्थ अभिमान बाळगण्यावर. माझ्या मते मुंबईच नव्हे तर सगळा भारत देश सगळ्या भारतीयांचा आहे. मराठी माणूस सुध्दा भारतीयांमध्येच मोडतो आणि मुंबई पण भारतातच येते. त्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे पण तसाच अधिकार इतरांचाही आहे. त्याचप्रमाणे भारतात कुठेही जाऊन स्थायिक व्हायला मराठी माणसाला पण अधिकार असला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
उ
उपास Sun, 07/11/2010 - 05:45 नवीन
क्लिंटन साहेब, मला मात्र तुमच्याकडून अशा प्रतिक्रीयेची अपेक्षा नव्हती.. :) प्लॆटफॊर्म वरच्या वृद्धांचा, अशक्तांचा उल्लेख स्वीकारलात पण गाडीतल्या लोकांना हुसकावून बाहेर काढत असाल तर काय हा मुद्दा (सोयीस्करपणे?) डावललात. मला मराठी माणूस अशक्त आहे असे मुळीच म्हणायचे नाही पण राजकारणी आणि परिस्थितीमुळे तो पिचला आहे हे नक्की, आणि जेव्हा गळ्याला नख लागेल तेव्हा तो एकत्र येईल हे निश्चित. मराठी समाज वृद्धत्वाकडे झुकला नसून त्याला मराठीपणाची, स्वाभिमानाची ग्लानी आली आहे असे म्हणण्यास हरकत नसावी आणि ती मरगळ दूर कशी करता येईल हे बघायला हवे. मुलाच्या अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर रेल्वेतील भय्यांच्या भरतीचे उदाहरण सर्वद्न्यात आहे, जिकडे परिक्षा कधी होतात हेच कळत नाही (कारण जाहिराती इथल्या पेपरमध्ये नाहीच) तर पुढे काय? उलट अभ्यास न करणाया मुलास अभ्यासास कसे प्रवृत्त करता येईल हे बघायला नको? स्थानिकांना काही हक्क असतात (या उदाहरणात, जरी रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असली तरीही) हेच जर मान्य नसेल तर बोलणेच खुंटले, गुंड प्रवृत्तीच उदाहरण इथे अस्थायी आहे. गुंडास जात, धर्म, भाषा, स्थानिक, बाहेरचा असं काही नाही. त्यामुळे तो आपला गुंड आणि हा बाहेरचा ह्याला त्या चौकटीत काहीही अर्थ नाही. माशेलकरांसारखी मराठीतली अधिक उदाहरणे देता येतील पण एकट्या माशेलकर, नरेंद्र जाधवांमुळे अखिल मराठी जनतेची पर्यायाने मुंबईची प्रगती झाली का? एका माणसाच्या यशात पूर्ण राज्य मापता येईल का? अर्थात नाहीच. त्यामुळे त्यांनी केलेल्या श्रमाचे फळ त्यांना मिळाले इतकेच म्हणता येईल. पण सामान्य, पिचलेल्या, सर्वसामान्य स्थानिकांचे काय हा प्रश्न येतोच. सगळेच माशेलकरांसारखे मार्ग काढू शकत नाहीत ना, मग त्यांच्या घटनात्मक हक्कांचे काय? इतरांना दोष देऊ नये हे केव्हाही मान्य, आणि म्हणूनच महाराष्ट्रासाठी काहीतरी विधायक करणे आवश्यक वाटते. पुन्हा एकदा नमूद करतो, भैय्ये वा इतर कोणी मुंबईत यायला ना नाही पण इथले होऊन त्यांनी राहाणे अपेक्षित आहे. पारशी समाजातील गोद्रेज. टाटांनी इतकी प्रगती केली मुंबईत, गुजराथ्यांनी केली, मारवड्यांनी केली. स्थानके, अग्यार्या बांधून आपापल्या समाजाला पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते इथली भाषा. संस्कृती शिकले. माझ्या कित्येक गुजराथी मित्रांच्या घरी गणपती येतो, कित्येक वाणी चांगलं मराठी बोलतात, तसा प्रामाणिक प्रयत्न करतात. वीस वर्श मुंबईत राहून, टॆक्सी चालवून ’हमको मराठी नही आता..’ अशी मस्ती दाखवणायांवर आक्षेप आहे. असं होऊ लागलं की संघर्ष होणाराच. सगळ्या भारतीयांचा भारत देश आहे हे अमान्य कोणीच करत नाहीये पण तुम्ही जिथे जाल तिथे सलोख्याने, मिळून मिसळून वागायलाच हवं. स्थानिकांना आदराच स्थान, हक्क सगळं मिळायलाच हवं. मुंबई मराठी माणसाला द्वैभाषिक राज्याच्या निर्णयाविरुद्ध लढून, झगडून मिळालेय तिथे अशा मागच्या दाराने कोणी हक्क सांगू पाहील तर ते कधीही योग्य ठरणार नाही. मुंबईची ओळख ही आधी महाराष्ट्राची पर्यायाने मराठी माणसाच्या राज्याची राजधानी ही आहे आणि तशी असायलाच हवी. हे स्वीकारूनच मराठी म्हणून मुंबईसाठी काय करता येईल असा विचार व्हायला हवा. उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सुनील Wed, 07/07/2010 - 19:57 नवीन
बातमी वाचली. केन्द्राने "जैसे थे" च्या रोखाने आपले प्रतिज्ञापत्र दिले आहे. ह्यात वेगळे काहीही नाही. हे अपेक्षितच आहे. केंद्रात वा राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी, केंद्राने हेच प्रतिज्ञापत्र दिले असते. ह्यात आकाशपाताळ एक करण्याचे प्रयोजन समजले नाही. खटला अद्याप सुरू व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देत आहे, ते पाहू. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 07/07/2010 - 20:04 नवीन
सुनीलरावांशी सहमत. हा काही कोर्टाचा फायनल निकाल नाही. ही केवळ केंद्राची बाजु आहे, केंद्र ह्या खटल्यात 'प्रतिवादी' असल्याने त्यांना काहितरी स्टेटमेंट देणे गरजेचे होते व ते त्यांनी दिले. हे केंद्र सरकारचे खटल्यापुर्वीचे "प्रतिज्ञापत्रक" आहे. ते काय असणार होते हे सगळ्यांना माहित होते, आज फक्त ते "ऑफिशियली" कळाले. आदळाआपट करण्यात अर्थ नाही, हा काही निकाल नाही ! आता महाराष्ट्रसरकार काय मुद्दे मांडते आणि त्याचा काय फरक पडतो हे पाहणे महत्वाचे. बाकी चालु द्यात ! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
श
शुचि Wed, 07/07/2010 - 21:11 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Belgaum_district#Border_dispute तीन चतुरथांश लोक मराठी भाषीक आहेत. मग केंद्र सरकार नी महाराष्टास द्यायला पाहीजे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/07/2010 - 21:16 नवीन
काही युपी-बिहारी पण आहेत तिथे ... मग बिहार युपी ला द्यायला पाहिजे .. =)) काय फरक पडणारे राव आपल्याला काय वाटतंय त्यामुळं ? बाकी शुची शी बाडिस :) शुचे लढ तु .. मी आहे सपोर्ट ला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ऋ
ऋषिकेश Wed, 07/07/2010 - 21:30 नवीन
निषेध काय करायचाय त्यात? बेळगाव सध्या कर्नाटकातच आहे आणि हेच केंद्राने प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. आता त्यात निषेध का बरे करायचा? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/08/2010 - 03:53 नवीन
>>>निषेध काय करायचाय त्यात ? बेळगाव सध्या कर्नाटकातच आहे भाषेच्या मुद्यावर राज्यांचे विभाजन झाले होते हे केंद्रालाही मान्य होते पण तेच केंद्र आता भाषा हा निकष असला तरी तो एकच निकष होऊ शकत नाही असे म्हणत आहे. पुनर्रचना आयोगाने जी कोणती आखणी केली होती त्यानुसार बेळगाव हे कर्नाटकाचेच आहे हे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. महाराष्ट्र असे म्हणत होते की, बेळगाव चुकुन महाराष्ट्रात गेले या दाव्याला काही अर्थ नाही असेही केंद्राचे म्हणने दिसते... सारांश महाराष्ट्राला आपला बेळगाव आणि इतर गावांवरील दावा सोडावा लागणार असे दिसते. त्याहीपेक्षा असे प्रकरण भिजत ठेवल्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दंड देण्याची शिफारस केली आहे. असो, या सर्व गोष्टी मला निषेधार्ह वाटतात. मीही केंद्राच्या भुमिकेचा निषेध करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 07/08/2010 - 07:14 नवीन
या खटल्यात केंद्र सरकारला महाराष्ट्राने "प्रतिवादी" केले आहे. केंद्र सरकार न्यायाधिश अथवा तटस्थ साक्षीदार नव्हे. तेव्हा त्यांच्याकडून मुळात महाराष्ट्राच्या भुमिकेशी सुसंगत भुमिका ठेवण्याची अपेक्षा करणेच मुळात चुक आहे. एखाद्याला वाद घालताना आपल्या विरोधात बसवायचे आणि त्याचे मत आपल्यासारखे नाहि म्हणून निषेध करायचा यात काय हशील? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पाषाणभेद गुरुवार, 07/08/2010 - 04:49 नवीन
परत एकदा रक्त खवळू देणारी चर्चा. अन तेच मराठीद्वेशी बोलणे अन प्रतिक्रिया. अरे मग भाषिक राज्य हा निकषच कशाला लावलात? आख्खा भारत एकच आहे ना मग. कशाला राज्य राज्य करतात? अगदीच विचार केला तर मानव जात एकच आहे. एकच भुमी, एकच पीक, एकच पाणी सगळीकडे असता कशाला देश देश करतात. पाकिस्थान म्हणेल महाराष्ट्र त्यांचेच, गोवा त्यांचेच, मणीपूर त्यांचेच राज्य आहे. देवून टाकू आपण. उदारमतवादी. कर्नाटक राज्य तयार करतांनाची स्थिती अन (त्याच वेळेच्या) मराठी जनसंख्येचा विचार करणार की नाही? मला काय त्याचे हा मराठी पण परत एकदा दिसून येतो आहे. असो. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
प
पंगा गुरुवार, 07/08/2010 - 06:56 नवीन
परत एकदा रक्त खवळू देणारी चर्चा. अन तेच मराठीद्वेशी बोलणे अन प्रतिक्रिया.
असे वाटत नाही. मराठीद्वेष वगैरे काहीही नाही. पण मराठी माणसाने सदैव कशाला ना कशाला तरी अस्मितेचा मुद्दा करून कोणाशी ना कोणाशी तरी भांडत राहिलेच पाहिजे, हेही पटत नाही, एवढेच. बेळगावातल्या मराठी जनतेने आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढून ते मिळवणे याला कोणाचाच आक्षेप असेलसे वाटत नाही. परंतु त्यासाठी महाराष्ट्राने आपला दावा ठेवून लढवत राहण्याची काही गरज आहेच, हेही पटत नाही. बेळगावची मराठी जनता कर्नाटकात राहूनही आपले न्याय्य हक्क भारतीय घटनेच्या कक्षेत मिळवू शकते, आणि बर्‍या बोलाने ते हक्क नाही मिळाले तर त्याकरिता लढा देऊ शकते, आंदोलन करू शकते. अशा लढ्यास विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण त्याकरिता बेळगाव महाराष्ट्रात येण्याची आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राने त्याकरिता दावे लढवत बसण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. त्यातून याचा भावनिक प्रश्न बनवून तो चिघळत ठेवून त्याच्या भांडवलावर (बहुधा इतर काहीही न करता) मते मिळवू पाहणार्‍या राजकारण्यांखेरीज (आणि गुंडांखेरीज) इतर कोणाचाही काहीही फायदा होतो, असे वाटत नाही. (कदाचित वर्तमानपत्रांचा आणि माध्यमांचा होत असल्यास कल्पना नाही.) बाकी रक्ताचे म्हणाल, तर खवळू द्यावे तसे खवळते. ज्यांचे यातून फावते ते खवळू द्यायला टपलेले असतातच. खवळू द्यायचे की नाही, ते आपण ठरवायचे. खवळू देऊन नुकसान आपलेच होते, समझे गुरु? हँय?
अरे मग भाषिक राज्य हा निकषच कशाला लावलात?
तो निकष चुकीचा होता, हेच तर म्हणणे आहे! भाषावार प्रांतरचनेच्या अगोदर मराठीभाषक जनता विविध प्रांतांत विखुरलेली होती. त्या स्थितीत मराठीजनांचे नेमके काही बिघडत होते असे वाटत नाही. (हेच इतर भाषिक गटांबाबत.) उलट हा असला निकष लावल्याने हे नको ते भांडण उपटले. पण आता भाषिक राज्ये झालेलीच आहेत, तर आता त्यांची वेगळ्या तत्त्वावर पुनर्रचना करण्यात काही हशील नाही. पण सीमावर्ती भागांत कोठे ना कोठे अलीकडे-पलीकडे व्हायचेच, त्यासाठी एवढे कशाला लढत बसायचे?
आख्खा भारत एकच आहे ना मग. कशाला राज्य राज्य करतात?
प्रशासनाच्या सोयीसाठी एवढ्या मोठ्या देशाचे लहानलहान भाग करणे प्राप्त आहे. म्हणून राज्ये हवीत. पण त्यातून मारामार्‍या निर्माण करण्याची गरज नाही.
...कशाला देश देश करतात. पाकिस्थान म्हणेल महाराष्ट्र त्यांचेच, गोवा त्यांचेच, मणीपूर त्यांचेच राज्य आहे. देवून टाकू आपण.
देऊन कशाला टाकायचे? पाकिस्तानने समजा म्हटले की महाराष्ट्र त्यांचेच. म्हणूद्यात. आम्हीही म्हणतो पाकिस्तान आमचेच. आदर्श परिस्थितीत ते योग्यही आहे. आता तशी आदर्श परिस्थिती तूर्तास अस्तित्वात नाही हे आम्हालाही कळते. ती पुढेमागे येऊ शकली तर उत्तमच. (युरोपात नाही, कालपरवापर्यंत एकमेकांशी युद्ध करणारे देश एकत्र आले?) पण आज तशी परिस्थिती नाही तरी नुसते म्हणायला काय बिघडते? आहे तीच परिस्थिती कायम राहिली पाहिजे काय? त्यातून नेमका कोणाचा फायदा होतो?
कर्नाटक राज्य तयार करतांनाची स्थिती अन (त्याच वेळेच्या) मराठी जनसंख्येचा विचार करणार की नाही?
त्या वेळची स्थिती आज नेमकी कशी लागू होऊ शकते? आणि अशा किती जुन्या भूतकाळापर्यंतचा विचार करत राहायचा? आणि असे भूतकाळात मागेमागे जात राहिले, तर परिस्थिती महाराष्ट्राच्या फायद्याचीच राहील, असेही काही सांगता येत नाही. असो. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/08/2010 - 07:10 नवीन
पंगांचे प्रतिसाद पटले. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 07:18 नवीन
आगे की सोच! समझे गुरु? हँय? मिपाच्या फुटबॉल टिममधे पंगाजी आमच्या टिममधे सेंटर बॅक डिफेंडर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सविता गुरुवार, 07/08/2010 - 07:54 नवीन
पटलंच बघा... सविता. ------------ आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा...... जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पाषाणभेद गुरुवार, 07/08/2010 - 08:02 नवीन
एखाद्या गावाचे समजू शकते पण एखादा मोठा प्रांत अशा भाषिक कचाट्यात सापडतो तेव्हा संघर्ष अटळ असतो. जेव्हा बेळगाव कारावार महाराष्ट्रात येण्याचे पहिले आंदोलन झाले त्या वेळची लोकसंख्या विचारात घेतली पाहीजे. कारणा कारणाने मराठी टक्का कमी कमी होत गेलेला आहे. आणि कोणता सिमावर्ती भाग कोणत्या भागात (मग तो ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, अथवा राज्य, राष्ट्र असो) हवा हे लोकशाही मार्गाने ठरवायचे असल्यास मतदानाचाच कौल घ्यावा लागतो. अशा स्थितीत आता मतदान केले गेल्यास बेळ्गाव कोठे जाईल? असाच प्रश्न चिघळत ठेवला तर येत्या २५ वर्षांनंतर बेळगाव कोठे जाईल हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही आमचा सिमावर्ती भाग द्या मग भले त्या बदल्यात लहान लहान काही भाग तुमचा असेल तर तो मतदानाने घ्या (सोलापूर सोडून. मागे ते मागत होत. ) . होवून जावू द्याना. अन अहवा डांग सारखा नैसर्गीक समृद्ध प्रदेश गुजराथला आपण दान दिला हे तर आपण विसरतोच. बाकी पंगा अन त्यांच्या समविचारींचा केवळ विरोधासाठी विरोध करणे हे धोरण अवलंबले जात आहे. (विरोधी पक्षासारखे) मराठी सीमाभागाचा प्रश्न हा मराठी अस्मितेचाही प्रश्न आहे. त्याला भावनीक पदरपण आहे. >>>> बाकी रक्ताचे म्हणाल, तर खवळू द्यावे तसे खवळते. ज्यांचे यातून फावते ते खवळू द्यायला टपलेले असतातच. खवळू द्यायचे की नाही, ते आपण ठरवायचे. खवळू देऊन नुकसान आपलेच होते, समझे गुरु? हँय? महाराष्ट्राच्या चांगल्या कारणासाठी माझे रक्त खवळत असेल तर मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्या अंगात हत्ती/ डायनासोर इतके रक्त येवू दे अन ते खवळून काहितरी चांगलेच होवू दे, भले ते रक्त सांडले तरी हरकत नाही. जय महाराष्ट्र! Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/08/2010 - 08:09 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/08/2010 - 08:08 नवीन
पंगा चा दंगा एकदम पटेश. बाकी मराठी अस्मिता म्हणजे काय हो पाभे? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
श
शिल्पा ब गुरुवार, 07/08/2010 - 18:48 नवीन
तुमच्याकडे नाही वाटतं? नाही...विचारताय म्हणून म्हटलं *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 07/08/2010 - 10:34 नवीन
आणि कोणता सिमावर्ती भाग कोणत्या भागात (मग तो ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, अथवा राज्य, राष्ट्र असो) हवा हे लोकशाही मार्गाने ठरवायचे असल्यास मतदानाचाच कौल घ्यावा लागतो.
काय सांगता! ठिक आहे चला नागालँडमधे, मिझोरममधे, काश्मिरच्या खोर्‍यात असे मतदान घेऊ. त्यांना स्वातंत्र्य हवे असेल/भारतात रहायचे असेल/नसेल त्याप्रमाणे वागु. काय बरोबर का? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
अ
अभिरत भिरभि-या Fri, 07/09/2010 - 20:09 नवीन
काय सांगता! ठिक आहे चला नागालँडमधे, मिझोरममधे, काश्मिरच्या खोर्‍यात असे मतदान घेऊ. त्यांना स्वातंत्र्य हवे असेल/भारतात रहायचे असेल/नसेल त्याप्रमाणे वागु. काय बरोबर का?
मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून विचार करता हरकत काय आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अभिरत भिरभि-या Fri, 07/09/2010 - 20:38 नवीन
बेळगावातल्या मराठी जनतेने आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढून ते मिळवणे याला कोणाचाच आक्षेप असेलसे वाटत नाही. परंतु त्यासाठी महाराष्ट्राने आपला दावा ठेवून लढवत राहण्याची काही गरज आहेच, हेही पटत नाही. बेळगावची मराठी जनता कर्नाटकात राहूनही आपले न्याय्य हक्क भारतीय घटनेच्या कक्षेत मिळवू शकते, आणि बर्‍या बोलाने ते हक्क नाही मिळाले तर त्याकरिता लढा देऊ शकते, आंदोलन करू शकते. अशा लढ्यास विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण त्याकरिता बेळगाव महाराष्ट्रात येण्याची आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राने त्याकरिता दावे लढवत बसण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. त्यातून याचा भावनिक प्रश्न बनवून तो चिघळत ठेवून त्याच्या भांडवलावर (बहुधा इतर काहीही न करता) मते मिळवू पाहणार्‍या राजकारण्यांखेरीज (आणि गुंडांखेरीज) इतर कोणाचाही काहीही फायदा होतो, असे वाटत नाही. (कदाचित वर्तमानपत्रांचा आणि माध्यमांचा होत असल्यास कल्पना नाही.)
हेच तर्कशास्त्र थोडे पुढे चालवले तर ऑस्ट्रेलिया/फिजी आदी ठिकाणी भारतीयांवर होणार्‍या अत्याचारांसाठी आपला आपण आवाज उठवावा; भारत सरकारने नाक खूपसू नये असे म्हणता येईल. आपल्याशी नाते सांगणारा एक लोकसमूह झगडतोय आणि आपण नुसती त्यांची गंमत बघावी हे तर्कशास्त्र मलातरी नैतिक व व्यावहारिकदृष्ट्या समर्थनीय वाटत नाही. बेळगावाच्या तापल्या तव्यावर कानडी मराठी राजकारण्यांची पोटे चालतात ते खरे आहे. पण त्याचा अर्थ बेळगाव विलिनिकरणाची मागणी चुकीची होते असा होत नाही.
तो निकष चुकीचा होता, हेच तर म्हणणे आहे
भाषिक निकष सरसकट चुकीचा होता असे मला वाटत नाही. एक महत्वाचा फ्याक्टर जरूर होता व आहे. मुंबईच्या द्वैभाषिक मंत्रिमंडळातही गुजराती मराठी मंत्र्याचे फारसे सख्य नव्हते. बांगलादेशासारखा एक देश भाषिक आंदोलनाच्या पायावर बनला. आज गोरखालॅण्डसारख्या भाग प.बंगाल पासून वेगळे स्थान मागतो त्यात काय भाषेचा अजिबात संबंध नाही ??? हे बघता मला तरी तो निकष चुकीचा होता असे बिल्कुल वाटत नाही.
कर्नाटक राज्य तयार करतांनाची स्थिती आज नेमकी कशी लागू होऊ शकते? आणि अशा किती जुन्या भूतकाळापर्यंतचा विचार करत राहायचा? आणि असे भूतकाळात मागेमागे जात राहिले, तर परिस्थिती महाराष्ट्राच्या फायद्याचीच राहील, असेही काही सांगता येत नाही.
अरे कोण म्हणते जुन्या भूतकाळाचा विचार करा ??? एकिकरण समितीने राज्य तयार करते वेळची स्थिती बघायला सांगितली होती. इतिहासात नाही जायचे ना तुम्हाला - मग बेळगाव पालिकेच्या १९५६ ते आजतागायत (तुरळक अपवाद वगळता)निवडणूका मराठी मराठी करणार्‍या म.एकिकरण समितीने जिंकल्या याकडे सरळ डोळेझाक करता ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
D
Dipankar गुरुवार, 07/08/2010 - 07:23 नवीन
कर्नाटकात सरकार कुठल्याही पक्षाचे असो ते कानडी हीत पहातात, या उलट परिस्थिती महाराष्ट्रात आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/08/2010 - 07:25 नवीन
कसं काय? महाराष्ट्रातली सगळी सरकारंही कन्नडा-कन्नडीगा हित पहातात? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
म
मितभाषी गुरुवार, 07/08/2010 - 08:09 नवीन
हि बातमी बेळगाव-गुलबर्गा ही मराठी भाषिक शहरे व सीमाभागातील ८१४ मराठी भाषिक गावे केवळ ती मराठी आहेत म्हणून महाराष्ट्रात सामील करता येणार नाहीत हे केंद सरकारचे म्हणणे धक्कादायक तर आहेच; पण भाषावार प्रांतरचनेच्या संकल्पनेवर आघात करणारे आहे. हा प्रदेश महाराष्ट्रात सामील करावा अशी मागणी करणारा अर्ज महाराष्ट्र सरकारने सवोर्च्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर आपले प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद सरकारने हे तारे तोडले आहेत. एवढ्यावरच केंद सरकार थांबलेले नाही तर त्याने न्यायालयाला महाराष्ट्राचा अर्ज फेटाळण्याचा व या खटल्याचा खर्च महाराष्ट्र सरकारकडून वसूल करण्याचा अनाठायी सल्ला दिला आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. गेली अनेक वषेर् बेळगावातील मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे हा खरे तर निव्वळ कायद्याचा प्रश्ान् नाही, तर भावनिक व सांस्कृतिक प्रश्ान् आहे. यापूवीर् महाजन आयोगानेही बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी अशीच फेटाळली होती. त्यामुळे कायदेशीर लढ्यात महाराष्ट्राला विजय मिळणे अवघडच होते. पण नुसती आंदोलने करण्यापेक्षा कायदेशीर मार्ग चोखाळण्याचीही आवश्यकता व्यक्त केली जात होती, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा प्रश्ान् २००४ साली न्यायालयात नेला. न्यायालयाचा निकाल अद्याप लागायचा असला तरी केंद सरकारचे प्रतिज्ञापत्र न्यायालय दृष्टीआड करू शकत नाही. केंद सरकारच्या प्रतिज्ञापत्राची बातमी येताच मराठीवाद्यांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. पण गेल्या ४८ वर्षांत अशा आंदोलनाला यश लाभलेले नाही, ते आता लाभेल असे मानता येणार नाही. बेळगाव महाराष्ट्रात यावे असे उर्वरित महाराष्ट्रातील मराठी जनतेला वाटत असले तरी बदलत्या काळात त्यांना तो आंदोलनाचा विषय वाटत नाही. खुद्द बेळगाव परिसरातही आता यासाठीचे आंदोलन जोमात होत नाही. त्यामुळे यापुढच्या काळात बेळगाव महाराष्ट्रात येवो अथवा न येवो; तेथील मराठी जनतेचे हित सांभाळण्यावर भर द्यायला हवा. हा भाग मराठी बहुसंख्य असला तरी कर्नाटक सरकार तेथील जनतेवर कानडीची सक्ती करते, त्याला कायदेशीर बाबींचा आधार घेऊन विरोध करणे शक्य आहे. तेथील जनतेला मराठी भाषेत शिक्षण घेता येईल अशा सुविधा कर्नाटक सरकारला द्याव्याच लागतील. बेळगाववरील आपला दावा अधिक घट्ट करण्यासाठी आता कर्नाटक विधानसभेचे एक अधिवेशनही तेथे घेण्यात येते. त्याला प्रतिकात्मक विरोध करणे शक्य आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या गाऱ्हाण्याकडे सरकारचे लक्ष वेधता येईल. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी, मराठी संस्कृतीवाद्यांनी आजवर बेळगाव, गुलबर्गा महाराष्ट्रात यावा यासाठी ठराव, धरणे, मोचेर् व आता कोर्टात धाव घेऊन शक्य ते सर्व प्रयत्न केले; पण ते अयशस्वी ठरले. आता ही मान्य न होणारी मागणी पुन: पुन्हा करून काही साध्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे बेळगावात मराठी संस्कृती टिकेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. इतकी वषेर् कर्नाटकात राहूनही बेळगावचा चेहरा आजही लख्ख मराठी आहे. त्याची ही ओळख मिटणार नाही यासाठी बेळगावकरांना सर्व मराठी जनतेने व महाराष्ट्र सरकारने मदत करायला हवी. तेथे मराठी सण, मराठी नाटके, मराठी चित्रपटे, मराठी उत्सव सतत होत राहतील असे पाहिले पाहिजे. त्यामुळे हे सुंदर शहर कर्नाटकात राहिले तरी त्याचे मराठीपण तेथील सरकारला नाकारता येणार नाही. बेळगावकर जनतेने तेथील पालिकेत तसेच विधानसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून देऊन बेळगावचे मराठीपण सिद्ध केलेच आहे. पण केंद सरकार याला मराठीपणाचा पुरावा मानायला तयार नाही. ही शहरे व गावे महाराष्ट्रात का सामील करू नयेत याचे सबळ कारणही केंदाने प्रतिज्ञापत्रात दिलेले नाही. केंदाचे प्रतिज्ञापत्र हे हडेलहप्पी स्वरूपाचे आहे. बेळगाव हे गेली ५० वषेर् कर्नाटकात आहे आणि ते पुन्हा महाराष्ट्रात सामील करणे प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या शक्य नाही असे केंदाने म्हटले असते तर केंदाची अडचण समजून घेता आली असती. पण केंदाने प्रतिज्ञापत्र सादर करतानाही महाराष्ट्राविषयी आकस व्यक्त करण्याची परंपरा राखली. खरे तर कोणत्याही अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला हक्क आहे. पण महाराष्ट्राच्या या सुसंस्कृतपणाबद्दल त्याला दंड लावण्याची मागणी केंदाने केलेली दिसते. आंध्रमध्ये तेलंगण राज्यासाठी अत्यंत हिंसक आंदोलन झाले, तेव्हा त्याची भरपाई वसूल करण्याची भाषा केली गेली असती तर केंदीय नेत्यांना तेलंगणात तेथील जनतेने पाय ठेवू दिला नसता. या खटल्याच्या खर्चाची वसुली करण्याचे सुचवून या गृहखात्याने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. केंदातील मराठी मंत्री तसेच मराठी खासदारांनी याबद्दल केंदीय गृहखात्याकडे जोरदार निषेधनोंदविणे आवश्यक आहे. >>>>>> म्हणुन बहुधा त्यांनी तीन वेळा तीव्र निषेध नोंदवला असेल. (अवांतरः दोन ओळीचे पिल्लु सोडुन हे प्रवर्त्क कुठे गायब होतात ते कळत नाही. )
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/08/2010 - 10:44 नवीन
इतकी वषेर् कर्नाटकात राहूनही बेळगावचा चेहरा आजही लख्ख मराठी आहे.
म्हणजे नक्की काय? तुम्ही बेळगाव, निपाणी इ.इ. भागांत रहाता का? इतकी वर्ष महाराष्ट्रात आणि मराठीबहुल शहर असूनही मुंबईचा चेहेरा लख्ख सामावून घेणारा आहे. बेळगाव (+इतर भाग) महाराष्ट्रात आलं तर तिथल्या लोकांना काय, किती आणि कसा फरक पडणार आहे? उदा: बेळगावात सध्या किती लोडशेडींग असतं, आणि महाराष्ट्रात आले तर किती होईल? रोजगार, रस्ते, पाणी, शाळा, इत्यादी मूलभूत सुविधांवर काय आणि कसा परिणाम होईल? बेळगावातल्या मराठी लोकांनाही खरंच महाराष्ट्रात यायचं आहे का आहे ती परिस्थितीच त्यांना मान्य आहे? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
क
क्लिंटन गुरुवार, 07/08/2010 - 11:51 नवीन
मला पण बेळगावातल्या मराठी लोकांना खरोखरच महाराष्ट्रात यायचे आहे का हा प्रश्न पडला होता. काही वर्षांपूर्वी मी या विषयी माझ्या बेळगावच्या एका मराठी मित्राच्या वडिलांशी बोललो. ते शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. म्हणजेच माझे याविषयीचे बोलणे एका जबाबदार व्यक्तीशीच झाले होते. त्यांचे स्वत:चे मत होते ’महाराष्ट्र काय आणि कर्नाटक काय आम्हाला काहीही फरक पडत नाही’. त्यांनी पुढे जे सांगितले ते मात्र धक्कादायक होते. ते म्हणाले की याविषयी प्रत्येकाचे मत वेगळे असू शकेल पण महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना मात्र बेळगाव कधीच महाराष्ट्रात सामील होऊ नये असे वाटते.याचे कारण म्हणजे हा प्रश्न तापता ठेऊन त्यांना नगरसेवक, आमदार अशा निवडणुका जिंकणे सोपे जाते. समजा उद्या बेळगाव महाराष्ट्रात सामील झाले तर त्यांचा हक्काचा मुद्दा हिरावून घेतला जाईल आणि त्यांना निवडणुका जिंकणे सोपे जाणार नाही. अर्थात हे मत माझ्या मित्राच्या वडिलांचे झाले. ते कितपत प्रातिनिधिक आहे याची कल्पना नाही. पण ते सत्य असेल तर राजकारणी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी किती घाणेरडे खेळ खेळू शकतात याचे ते एक आणखी एक उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रशु गुरुवार, 07/08/2010 - 20:16 नवीन
मी काहि पिल्लु सोडलेले नाही. फक्त 'काय फरक पडतो' छाप प्रतिक्रिया ते सुद्धा मराठी माणसांच्या, हे पाहुन व्यथीत झालोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
स
समंजस गुरुवार, 07/08/2010 - 08:15 नवीन
वा छान!मस्त!! :) बाकी फरक पडत नाही किंवा काय फरक पडतोय या वक्तव्यांशी एकदम सहमत. आपण जन्मलो म्हणून काय फरक पडला? लाखो जन्मतात. आपल्या घरात मुल जन्मलं तर काय फरक पडला? लाखोंच्या घरात जन्मतात. आपल्या घरात कोणी अकाली मरण पावलं तर काय फरक पडला? लाखो असे मरण पावतात. राम/कृष्ण ही आले-गेले काय फरक पडला? ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाले काय फरक पडला? कोणास फरक पडला? ब्रिटीश येण्यापुर्वी वेगवेगळी राज्ये होती, वेगवेगळे राज्यकर्ते होते, ब्रिटीशांच्या काळात सगळी राज्ये एक झाली काय फरक पडला? ब्रिटीशांपासून सत्तांतर झाले, परत राज्ये वेगवेगळी झाली काय फरक पडला? भारत देश म्हणजे आहे तरी काय? वेगवेगळ्या राज्यांचा समूहचं नं? तसा तो शेकडो वर्षांआधी सुद्धा होता आणि आता सुद्धा आहे मग काय फरक पडला? आम्हा जनतेला काय फरक पडतो की आम्ही कुठल्या नावाच्या राज्यात आहोत, कुठल्या नावाच्या देशात आहोत. आम्हाला आमच्या वैयक्तीक किंवा झालंच तर कौटूंबीक गरजा भागवता आल्यात म्हणजे पावलं. 'अवघे विश्वचि माझे घर' असं आम्ही मानतो मग आमचे घर कोणत्या राज्यात, कोणत्या देशात आहे याने काय फरक पडणार? आपल्याला काय, रोजीरोटी/पैसे कमवायचे, त्यातील थोडं-फार जो कोणी राज्यकर्ता असेल त्याच्या तिजोरीत कर या नावाखाली जमा करायचे बास्स! कशाला जास्त विचार करून आजार वाढवायचेत :) [काही काळापासून तत्कालीन राज्यकर्ते आम्हा मुंबईकरांना एक आश्वासन देत आहेत की मुंबईला सिंगापूर करणार, शांघाई करणार वै.वै. त्यांची कार्य पद्धत बघता मुंबईचं असं काही व्हायला बरेच दशकं लागतील किंवा कदाचीत होणारच नाही त्यामुळे या राज्यकर्त्यांना एक फुकटचा सल्ला मुंबईला सिंगापूरशी किवा शांघाईशी जोडण्यात आले आहे अशी घोषणा करून टाकावी म्हणजे आपसूकच उद्देश पुर्ण होईल. आम्हा जनतेला, भारतात असू देत की चीन मधे काय फरक पडणार? कदाचीत मुंबईचं शांघाई झालं हा आनंदच व्हायचा आणि भारत असू देत की चीन शेवटी लोकं येथून तेथून सारखीच]
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील गुरुवार, 07/08/2010 - 09:22 नवीन
समंजस राव/तैं शी बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
म
मी_ओंकार गुरुवार, 07/08/2010 - 11:26 नवीन
काय फरक पडतो? जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत कुठेही असेना. या आणि अशा वाक्यांची आणि विधाने करणार्‍यांची कीव आली. बेळगावमध्ये (यात निपाणी वगैरेही भाग आला) कानडी मध्ये दुकानाच्या पाट्या लावण्याची सक्ती आहे. बेळगावचा महापौर मराठी होता म्हणून महानगरपालिका बरखास्त करण्यात आली. तोंडाला काळे फासले. तिथे भगवा ध्वज लावायला बंदी आहे. (कर्नाटकाचा स्वतःचा झेंडा आहे ही बाब इथे किती जणांना माहीत आहे?). सरकारी कार्यालयात, एस. टी. स्टँडवर, अधिकारी मुद्दाम कानडीतूनच बोलतात. उद्या तिथे मराठी शाळा चालवायलाही बंदी येउ शकते. थोडक्यात कर्नाटकचे सरकार बेळगावातला मराठी माणूस संपावा आणि त्याचा बेळगाव वरचा दावा मोडून काढावा याच्या कायम तयारीत असते. बाकी आता बेळगाव महाराष्ट्रात येण्याची शक्यता शून्य टक्केच आहे. पण वर म. टा. च्या अग्रलेखात म्ह्टल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने बेळगावमधील जनतेवर असे अन्याय होउ नयेत इतके जरी पाहिले तरी पुरे. पण इथे फरक कुणाला पडतो? जाता जाता: उद्या पुणे हिंदीभाषिक राज्याला जोडले किंवा केंद्रशासित केले आणि सगळीकडे सरकारी भाषा हिंदी केली तर फरक पडेल का? - ओंकार.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/08/2010 - 13:37 नवीन
>>> काय फरक पडतो? जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत कुठेही असेना. या आणि अशा वाक्यांची आणि विधाने करणार्‍यांची कीव आली. अगदी सहमत आहे. येथील प्रतिसाद वाचून खरच आपण मराठी संस्थळावर आहे का तो प्रश्न पडला. तथाकथीत कन्नडीगांची भुमीका ८०% प्रतिसादकर्त्यांनी मान्य केलीय ती त्यांनाच लखलाभ होवो. जे कोणी मराठी ही मातृभाषा नसूनही हा धागा वाचत असतील ते हसत असतील. त्यांना एकच सांगणे आहे की येथे जी महाराष्ट्र विरोधी मते मांडली गेली ती पुर्ण महाराष्ट्राची मते आहेत असे समजू नये. एक वेगळाच मुद्दा लक्षात येतो. येथे येणारे बहूतेक आयटी क्षेत्रातले आहेत. बरेचसे जण बंगलोर स्थित कंपन्यात कामे करतात. महाराष्ट्राने असली सीमाभागासाठी केलेली चळवळ पाहून त्यांच्या नोकर्‍यांना (काही प्रमाणात)(पुढेमागे) ते मराठी आहेत म्हणून इजा होईल असे त्यांना वाटते अन त्या मुळे असले प्रतिसाद येतात का? तुमचे मत असो की माझे मत आपले दोघांचेही मते या वादात खिजगणतीतही धरल्या जाणार नाही. जे व्हायचे ते होईलच. तरीही केवळ मराठी आहे म्हणून एकदम "काय फरक पडतो? जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत कुठेही असेना." या आणि अशा वाक्यांची आणि विधाने करणार्‍यांची कीव आली. माझे विधान कोणीही वैयक्तिक घेवू नये. महाराष्ट्राच्या प्रेमापोटी मी बोललो आहे.बाकी चर्चा भरकटलेली आहेच. हा माझा शेवटचा प्रतिसाद अन शेवटचे धागावाचन. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/08/2010 - 13:46 नवीन
"नोकर्‍यांसाठी इथे 'अशी' विधानं लोकं करत आहे का?" यासारखा हास्यास्पद प्रश्न मी आत्तापर्यंत वाचलेला नाही. बंगळूरू (बंगलोर नव्हे!) स्थित आस्थापनांमधे नोकरी देताना "तुमची बेळगाव, निपाणी इ. सीमाभागाबद्दल मतं काय?" असा प्रश्न नक्की विचारत नसणार. बाकी कीव करण्याबद्दल धन्यवाद ... ही प्रक्रिया रेसिप्रोकेटीव्ह नाही याची मला खात्री आहे. आपल्यालाच काय तो मराठी, महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रेम, आणि वेगळा विचार करणारे मातृभाषा/राज्यद्रोही, इत्यादी चष्मे बदलण्याचा विचार करावा अशी एक विनंती आहे. कोणी बेळगाव, निपाणी, इ. भागांतले लोकं मिपावर असतील तर त्यांची मतं वाचायला आवडतील, जसं एक मत क्लिंटन यांच्या ओळखीतून आलेलं आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
म
मी_ओंकार गुरुवार, 07/08/2010 - 15:22 नवीन
माझ्यासाठी मुद्दा अभिमानाचा नाही तर परिस्थितीची माहिती नसताना "फरक काय पडतो?" असे विचारणार्‍यांचा आहे. आपल्याला नसेल काही फरक पडत. म्हणजे जे चालले आहे ते बरे चालले आहे असे नव्हे. बेळगाव, निपाणी इथे राहण्याचा अनुभव नाही. पण बसमधून बेंगलोर कोल्हापूर प्रवास करताना गाडी निपाणी गावात शिरली की गावाचे मराठीपण लगेच डोळ्यात भरते. कानडीत पाट्या लावायची सक्ती असताना सगळ्या दुकानांवर असलेल्या मराठी पाट्या लगेच फरक जाणवून देतात. अनुभव लिहिण्याच्या आवाहनाबद्दल धन्यवाद. जे अशा भागात असतील त्यांनी नक्की लिहा. जालावरचे अनुभव वाचायचे असतील तर हा दुवा इथे म्ह्टल्याप्रमाणे आता एकीकरण समितीमध्ये जोर राहिलेला नाही. सत्तेसाठी राजकारण केले जाते. त्या निराशेतून कदाचित क्लिंटन यांच्या परिचयातील व्यक्तीचे असे मत झाले असेल. - ओंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/08/2010 - 20:14 नवीन
दुव्याबद्दल धन्यवाद. एकूण लेखावरूनतरी असं वाटलं, की आता हा मुद्दा मुद्दा राहिलेलाच नाही. त्यापेक्षा 'सडक-बिजली-पानी'चा विचार केलेला बरा! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
क
क्लिंटन गुरुवार, 07/08/2010 - 11:53 नवीन
आपण मराठी म्हणून बेळगाव न देणाऱ्या कर्नाटकाला आणि केंद्र सरकारला नावे ठेवतो. कावेरी आणि आलमाटी धरण प्रश्नावरून केंद्र अनुक्रमे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची बाजू पण ऐकून घेते म्हणून कानडी लोक केंद्राला नावे ठेवणार! नरसिंह राव पंतप्रधान असताना कर्नाटकात तामिळविरोधी दंगली पण झाल्या होत्या. सतलज यमुना कालव्याचे पाणी पंजाबला देणे आणि चंदिगड पंजाबला देणे या कारणावरून हरियाणामध्ये एकेकाळी असेच वातावरण तापले होते. शीख दहशतवाद्यांचे एका अर्थी समर्थन करणारे सिमरनजीत सिंह मान पंजाबातून लोकसभेवर दोनदा निवडून गेले. त्या शीख दहशतवाद्यांचा अजेंडा काय तर पंजाबात शीख सोडून दुसरे कोणी राहू नये आणि त्यांना त्यांचा ’पंजाबी सुबा’ मिळावा! आसामात बिहारीविरोधी दंगली होतात त्याचप्रमाणे ’भय्याविरोधी भूमिका’ घेणाऱ्या मनसेचे १३ आमदार महाराष्ट्रात निवडून येतात. आपली एकात्मता खरोखरच इतकी खिळखिळी आहे का? वैयक्तिक पातळीवरही आपण मराठी असतो. कोणी ब्राम्हण असते तर कोणी मराठी तर कोणी आणखी कोणी. ब्राम्हणांमध्ये कोणी कोकणस्थ असते तर कोणी देशस्थ. मराठ्यांमध्ये कोणी ९६ कुळी असते तर कोणी ९२ कुळी. अजूनही खालच्या पातळीवर मुंबईत पश्चिम उपनगरात राहणारे ’सेंट्रलवर राहणाऱ्यांपेक्षा’ स्वत:ला श्रेष्ठ समजणार तर ठाण्याला राहणारे डोंबिवली-कल्याणला राहणाऱ्यांपेक्षा आपल्याला श्रेष्ठ समजणार. पुढे अंबरनाथ-बदलापूरला राहणाऱ्यांची तर बातच करू नका.पुढे पुणे विरूध्द मुंबई असा प्रश्न आला की थेट बदलापूरपर्यंतचे सगळे ’मुंबईकर’ पुणेकरांना नावे ठेवणार! तेव्हा आपण दुसऱ्या भारतीयाकडे जात-धर्म-भाषा आणि इतर अनंत रंगीबेरंगी चष्म्यांमधून न बघता एक भारतीय म्हणून कधी बघणार आहोत की नाही? पण काय करणार? आपण सगळेच (माझ्यासकट) थोड्याबहुत प्रमाणावर तेच चष्मे घालतो तेव्हा दोष कोणाला द्यावा आणि कोणत्या तोंडाने?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 07/08/2010 - 15:50 नवीन
ठीक आहे, पण जे योग्य आहे आणि न्याय्य आहे असे आपल्याला वाटते, त्यासाठी भांडण्यात काहीच गैर नाही. बेळगाव प्रश्न काही देशस्थ्-कोकणस्थ किंवा पुणेकर-मुंबईकर वादासारखा फुटकळ किंवा गैरलागू नाही. ही तुलना चुकीची आहे. इथे एका पक्षावर दुसर्‍या पक्षाने अन्याय केलेला आहे. त्या परिसरात राहणार्‍या मराठी भाषिकांचा, त्यांच्या भवितव्याशी निगडीत असा हा प्रश्न आहे. खरे तर बेळगाव महाराष्ट्रात यावे किंवा नाही यावर मराठी लोकांतच दुमत असावे, ही खेदाची आणि आश्चर्याची बाब आहे. आणखी काही वर्षांनी 'असा काही प्रश्न आहे' याचाच लोकांना विसर पडेल. आमची पोटे भरताय ना, मग कोणी कुठे का असेना, काय फरक पडतो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 07/08/2010 - 17:09 नवीन
बेळगाव प्रश्न काही देशस्थ्-कोकणस्थ किंवा पुणेकर-मुंबईकर वादासारखा फुटकळ किंवा गैरलागू नाही. ही तुलना चुकीची आहे. इथे एका पक्षावर दुसर्‍या पक्षाने अन्याय केलेला आहे. त्या परिसरात राहणार्‍या मराठी भाषिकांचा, त्यांच्या भवितव्याशी निगडीत असा हा प्रश्न आहे.
पहिल्या परिच्छेदात दिलेले आपण भारतीय लोक एकमेकांशी भांडतो याचे अधिक महत्वाचे मुद्दे दिले आहेत त्याकडे दुर्लक्ष करून केवळ दुसऱ्या परिच्छेदावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोजन कळले नाही. असो. हा प्रश्न मराठी भाषिकांच्या भवितव्याशी निगडीत कसा हे मात्र मला समजले नाही. घरोघरी केवळ कन्नडच बोलावे अशी सक्ती तर कर्नाटक सरकार करू शकत नाही. तुम्हीच म्हणता की निपाणीमध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत आहेत आणि बेळगाव-निपाणी या भागांचा मराठी चेहरा आहे. तिथून मराठी वर्तमानपत्रे निघतातच. ती बंद करायची सक्ती कोणतेही सरकार घटनात्मक दृष्टीने करू शकणार नाही. आता लोकांनीच मराठी वर्तमानपत्रे वाचणे सोडून दिले आणि त्या कारणाने ती वर्तमानपत्रे बंद पडली तर त्याचा दोष इतरांवर ढकलणार का? मराठी शाळांचे बोलाल तर आज नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील किती मुले मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात? मुंबईतील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले तसेच बेळगावमध्येही आज ना उद्या ते कमी होणार आहेच. ते कमी झालेही असेल.मग त्याचा दोष इतरांवर कसा? बेळगाव-निपाणी भागातील मराठी विद्यार्थ्यांना ते केवळ मराठी आहेत या कारणावरून कॉलेजांमध्ये प्रवेश नाकारला जातो का? सध्याच्या काळात सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण कमीच झाले आहे. तेव्हा ’मराठी’ या कारणावरून सरकारी नोकऱ्या डावलल्या तरी त्याचा ३०-४० वर्षांपूर्वी झाला असता तितका परिणाम आज होणार नाही. मराठी असल्याच्या कारणावरून बंगलोरमधील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकऱ्या नाकारल्या जातात का? मुंबई-पुण्याचे कित्येक मराठी तरूण-तरूणी तिथे नोकरीला आहेतच की. मग बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हावे अशी इच्छा जरूर ठेवावी. त्यात वावगे आहे असे वाटत नाही. पण ते तसे झाले नाही तर मात्र मराठी समाजाच्याच अस्तित्वावर घाला येईल अशी बोंबाबोंब का? गेली ५० वर्षे बेळगाव कर्नाटकात आहे. त्या कारणावरून मराठी समाजाच्या अस्तित्वावर घाला आला असता तर आजही बेळगाव शहरात मराठी भाषिक लोक इतक्या प्रमाणावर कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
श
शिल्पा ब गुरुवार, 07/08/2010 - 19:20 नवीन
भाषावार प्रांतरचना होऊनही मराठी बहुल भाग कर्नाटकात कसा? आणि अजूनही केंद्र सरकार जर आंध्रमधून तमिळ भाषिकांसाठी वेगळे राज्य निर्माण करत असेल तर मराठी बहुल भाग महाराष्ट्रात का येऊ देत नाही? हा फक्त आकस आहे...आणि दुर्दैव म्हणजे मराठी लोकच असे होऊ नये यासाठी पानं भरू भरू प्रतिसाद टाकू रहाय्ले .... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पंगा गुरुवार, 07/08/2010 - 19:30 नवीन
आणि अजूनही केंद्र सरकार जर आंध्रमधून तमिळ भाषिकांसाठी वेगळे राज्य निर्माण करत असेल तर...
हं? हे कधी झाले? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/08/2010 - 19:38 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Telangana आंध्रमधून तेलंगणा हे राज्य बनविण्याचा प्रस्ताव आहे...कारण तिथे तेलुगु भाषिक लोक राहतात. आणि जर मराठीबहुल भाग महाराष्ट्रात देणार नसतील तर हा प्रस्तावावर कशाला विचार करायचाय केंद्र सरकारला? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
स
सुनील गुरुवार, 07/08/2010 - 19:51 नवीन
आंध्रमधून तेलंगणा हे राज्य बनविण्याचा प्रस्ताव आहे...कारण तिथे तेलुगु भाषिक लोक राहतात अहो, आंध्रातही तेलगूभाषकच राहतात! फक्त तेलंगणातील काहींना (तेलगूभाषक असूनही) स्वतन्त्र राज्य हवे आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/08/2010 - 19:53 नवीन
का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील गुरुवार, 07/08/2010 - 19:56 नवीन
का काय? आता विदर्भात नाही काहींना (मराठी असूनही) स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
पंगा गुरुवार, 07/08/2010 - 19:55 नवीन
... हा भाषिक वाद नाही, असे वाटते. कारण ज्यापासून फुटून वेगळे राज्य बनवण्याची मागणी आहे, तेथेही तेलुगुभाषकच लोक राहतात. थोडक्यात, दोन तेलुगुभाषक गटांमधला हा वाद आहे, असे वाटते. आणि यात भाषा हा वादाचा मुद्दा नसावा, असे वाटते. कदाचित याची तुलना आपल्याकडच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीशी करता यावी का? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/08/2010 - 20:05 नवीन
सगळीकडेच भांडाभांडी ...कोण कशासाठी भांडतय ते तरी किती लक्षात ठेवायचं ? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
N
Nile गुरुवार, 07/08/2010 - 20:10 नवीन
तुमच्या काही लक्षात नसताना देखील कीती हिरीरीने तुम्ही इथे भांडत आहात हे पाहुन तुमचे कौतुक वाटले. :) यांना कुणीतरी उपक्रमाचा पत्ता द्यारे. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/08/2010 - 20:47 नवीन
आम्ही मराठीसाठी मारू किंवा मारूच...काही लक्षात असो नसो...उगाच मराठीबद्दल काही वाकडं ऐकून घेणार नाही...क्काय? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा