एक सकाळ फळाफुलांची..
Primary tabs
मिपावर माजो पयलो लिखान आसां... सायबानू! ..सांबालून घ्यावा..
------------------------------------------------------------------------------
नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्रिवेदींचं हेल्थकेअर फुड- ज्युस सेंटर, बाहेरून बाकी सामान्यपणे ज्युस सेंटर असतं तसंच..! ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत? .. त्यांतही प्रकार , म्हणजे १) प्लेन नारळाचं दुध २) नारळाचं दुध आणि गुलकंद ३) नारळाचं दुध आणि खजूर ४) नारळाचं दुध आणि चॉकलेट ५) नारळाचं दुध आणि अंजीर.
याशिवाय मुगाच्या आणि मक्याच्या पोह्यांचे चाट आणि वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. येथील ज्युसचं वैशिष्ट्य म्हणजे साखर कशातही घालत नाहीत, त्यामुळे फळाची मूळ चव जीभेवर येते. पार्सल देतांनाही, ग्राहकाला १ तासाच्या आत ज्युस संपवण्याची सूचना त्रिवेदीजींनी दिलेली मी ऐकली. ऑर्डर द्यायला काउंटरवर पोहोचताच, प्रसन्न व हसतमुख अशा धर्मेश त्रिवेदींशी बोलतांना डाव्या हाताला लक्ष गेलं. काउंटरवरच ठेवलेल्या टेराकोटाच्या पसरट भांड्यात बिट्टी व जरबेराच्या फुलांची रांगोळी रेखीवपणे मांडलेली दिसली. ..अक्षरशः खेचला गेलो!
From Khandobachi Tekdi" alt="" />
..समोर साईबाबांच्या प्रतिमेच्या पुढ्यातही वेगळी पुष्परचना मांडलेली होती. भराभर फोटो काढले.
From Khandobachi Tekdi
त्रिवेदीजी आणि त्यांचे मदतनीस गालात हसत माझा हा उद्योग बघत होते. पोटोबा झाल्यानंतर पुन्हा मी फुलांच्या सजावटीकडे वळालो. पण याबाबत काही छेडण्याआधीच त्यांनी छोटासा अल्बमच समोर ठेवला. पूर्वी वेगवेगळ्या रंगांचे धान्य वापरूनही ते विविध रांगोळ्या बनवत असत, पण त्यासाठी लागणारा प्रचंड पेशन्स आणि जाणवू लागलेला पाठीचा त्रास यामुळे धान्यरंगावलीचा छंद कमी केला. व्यवसायानिमित्ताने एकदा पाँडीचेरीला गेले असतांना मदर मेरीच्या समोर विविध पुष्पगुच्छांची केलेली आकर्षक सजावट त्यांच्या मनाला भावून गेली. स्वतःच्या दुकानातही फुलांची अशी काही छोटी सजावट करता येईल असा निर्मितीविचार मनात घेउन रोज नविन काहीतरी वेगळी सजावट करता करता हजारो देखण्या पुष्परंगावल्या साकार झाल्या. सुरूवातीला नुसत्या फुलांची रांगोळी फुले लवकर सुकून जात असल्याने त्यांनी पाण्यावर फुलांची रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि आता ते विविध आकारांची छोटी भांडी वेगवेगळ्या आकारांसाठी वापरतात.
From Khandobachi Tekdi
रानफुले असोत किंवा राजफुले असोत, त्रिवेदीजीं त्यांच्या सजावटीत प्रत्येक पाकळीला न्याय देतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार वेगळा त्यानुसार मांडणीत प्रत्येकाचं स्थानही उठावदार ठरतं.
From Khandobachi Tekdi
त्यांच्या मोबाईलवर शेकडो सजावटींचे फोटो पहायला मिळतात आणि ते उत्साहाने दाखवतातही. त्यापैकी काही रचना...
From Khandobachi Tekdi
From Khandobachi Tekdi
From Khandobachi Tekdi
साधारण २ दिवसांपर्यंत सजावट टिकून रहाते, त्यानंतर मात्र त्यांतील ताजेपणा उणावायला लागतो. मग एवढी मन ओतून केलेली सजावट मोडतांना इमोशनल अत्याचार होत नाही कां? या माझ्या शंकेवर स्मित करत त्यांनी उत्तर दिलं '..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'क्या बात है!
ज्युसमध्ये घालायच्या साखरेचा सर्व गोडवा त्रिवेदीजींच्या जीभेवर पसरला आहे. निघतांना त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितल्यावर पुन्हा साखरेची उधळ्ण झाली - 'आप जैसे मित्रही मेरे व्हिजिटिंग कार्ड है. इसलिये मुझे उसकी जरुरत नही लगती.' एकशे एक टक्के खरं आहे!!!
जन्माचार्य
http://bornphd.blogspot.com
हा छोटेखानी लेख लिहून आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
अतिशय सुरेख ओळख आहे.
फोटो आणि सजावट जीवघेणी.
स्वागत आहे मिपावर, असेच अजुन येऊद्यात !
हेच म्हणतो.
अतिशय सुरेख ओळख आहे.
फोटो आणि सजावट जीवघेणी.
तिसरा फोटो सर्वात मस्त,पण सजावट करण्यासाठी कळ्या का तोडता?
कळ्या तोडु नयेत अस 'श्यामची आई' पण बोलली होती आणि मी स्वःतापण कधीच कळ्या तोडत नाही.
अत्शी फुल पण नाही तोडत पण गावाला असलो की तोडतो.
- उशीरा अक्कल आलेला शान्बा.
स्वागत आहे,इथे मिपावर मजा येते,पण नवीन आहात तेव्हा जरा जपुन............नवख्यांवर जुने तुटुन पडतात.
वॉव एकदम क्लास फोटो.
कधी ही न पाहिलेली अशी सुंदर फुलांची आरास .
खूप खूप मनमोहक!
छान रचना
अतीशय सुंदर आरास...
फोटो मस्त काढले आहेत तुम्ही... :)
खरंच खूप सुंदर. प्रसन्न वाटलं अगदी फोटो पाहूनच!
बादवे, नारळाचं दूध आणि गुलकंद हे अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणजे तृप्ततेची ग्यारंटीच हो!
आचार्यार्यानुं, येवा, स्वागत आसा. तुमका सगले सांबालून घेतंले हां हयसर. तुमी निश्चिंत मनान लिहूक व्हया बास्स... ;)
सुन्दर!!
काय पेशन्स असतील या माणसाचे!
अन शेवटच वाक्य 'जिसका सर्जन हुआ है उसका विसर्जन तो होना ही है' भिडल!
एक्क्क नंबर..लेख पण आणि फोटोपण!!!
फुलांच्या रचना आवडल्या,
स्वाती
पुष्परचना बेस्टच आहे पण वरुन दुसरा फोटो ज्यात देव देवता बुवाबाबा असुनही उपक्रम डोट ऑर्ग वर टाकलात व तिथुन काडीचाही विरोध झाला नाही यावरुन तुमच्या कुंडलीत उच्च कोटीचे अप्रतीम ग्रहतारे आहेत हे सिद्ध केलेत व चमत्कार असेच वर्णन करता येईल अशा एका प्रसंगाची ह्याची देही याची डोळा माआंजावर वाचकांना ओळख करुन दिलीत याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच!
कुंडलीत उच्च कोटीचे अप्रतीम ग्रहतारे..
खरंय
. . मिपावर प्रवेश... उपक्रमातून फोटो बिनविरोध.....
नाडीग्रंथात कुंडली बघायस होयी... :) :-) :smile:
पुढल्यावेळी नाशि़कला गेलो की नक्की भेट देणार...देवळाली कँपमधलं 'भारत कोल्ड्रिंक्स' पण भारी आहे. खरंतर संपूर्ण कँपच मस्त आहे फिरायला. कॉलेजात असतांना लेक्चर्स बंक करुन आम्ही कँपला फिरायलो जायचो. कॅंपमधले ते दोन्ही बाजुला दाट झाडी असलेले रस्ते, आर्मी ऑफीसर्सची ती जुन्या पद्धतीची आणी घरासमोर भलंमोठं अंगण असलेली घरं, खंडोबाची टेकडी, मार्केट...अहाहा! मजा आली आठवुन. :)
त्यांच्या कलेचं कौतूक आहेच
शिवाय त्या विषयी माहिती काढून ती आमच्यार्यंत पोचवल्याबद्दल तुमचंही कौतूक
रांगोळी आयडियाज बद्दल धन्यवाद
जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'
क्या बात है!
खुपच सुंदर आणि आता इथे जायचीही इच्छा झालेय. पत्ता द्या ह्याचा.
व्वा...!! अप्रतिम !! कसल्या सुरेख रचना आहेत !!
लय भारी.. असलं त्रिवेदी हिंदी पण ऐकायला मजा आली..
सुंदर आहेत या सजावटी. फोटो दिल्याबद्दल आभार.
मस्त रे. लोक काय काय भन्नाट असतात ना! :)
अप्रतिम पुष्प सजावट, मेन्यूतील वैशिष्ट्य व वैविध्य आणि प्रसन्न सौहार्दपूर्ण स्वागत असा मेळ जमून आलेला दिसत आहे! छानच! :-)
:)
:-)