'खमंग थालिपीठ' चं भाषांतर...
💬 प्रतिसाद
(61)
ध
धनंजय
गुरुवार, 09/02/2010 - 16:45
नवीन
वेगवेगळ्या भाषांत जे रूढ शब्द आहेत त्यांची व्याप्ती वेगवेगळी आहे. अगदी भावनिक शब्द शोडले, तरी वस्तुनिष्ठ व्याप्तीसुद्धा वेगवेगळी असते.
उदाहरणार्थ : इंग्रजी-"अंकल" याची व्याप्ती मराठी-"काका-मामा-आत्तोबा-मावसोबा" यांच्यापैकी प्रत्येकांपेक्षा वेगळी आहे.
मात्र मराठीतसुद्धा "काका-मामा-आत्तोबा-मावसोबा-यांच्यापैकी-कुठलाही-एक" हा विचार सांगण्यासारखा आहे. मराठीत ही कल्पना सांगणे अशक्य आहे, असे म्हटल्यास भ्रम आहे. त्याच प्रमाणे इंग्रजीत "पॅटर्नल अंकल-मॅटर्नल अंकल-पॅटर्नल अंकलबाय मॅरेज-मॅटर्नल अंकलबाय मॅरेज" असे शब्दप्रयोग मराठी शब्दांशी समसमान व्याप्तीचे होऊ शकतात.
असे दिसते की भौतिक बाबतीत तरी वरील चर्चेतला प्रश्न सौंदर्यशास्त्रातला किंवा शैली-तंत्रातला आहे.
"मामा" हा शब्द मराठीत बोलताना जितका सहज-शैलीचा आणि डौलदार वाटतो, ते बघावे. त्या मानाने "मॅटर्नल अंकल" हा प्रयोग इंग्रजीत बोलताना सहज-शैलीचा वाटत नाही आणि बेडौल वाटतो.
शब्दप्रयोगाचा डौल आणि अर्थानुभूती यांचा विचार वेगवेगळा केला पाहिजे, असे मला वाटते.
अधिक विचार करता भावनिक तपशीलही भाषांतरात सांगता येतात. येथे चर्चाप्रस्तावकाराने "खमंग"चे उदाहरण घेतलेले आहे. तसेच "खरकटे"चे उदाहरण प्रा. अशोक केळकरांनी अनुवादाबद्दलच्या त्यांच्या लेखात विशद केलेले आहे.
भाषांतर करताना भाषेचा डौल हे जर फलित असेल, तर समव्याप्तीचे बेडौल भाषांतर टाळावे लागते. मूळ संदर्भ तपासून बघावे लागते, की त्या शब्दाच्या अर्थाचे जे खूप कंगोरे आहेत, त्यांच्यापैकी काही अप्रधान आहेत काय? उदाहरणार्थ "खरकटे" कधी वस्तुनिष्ठ संदर्भात येते, तिथे ओले-शिजवलेले अन्न मनुष्याच्या अंगाला लागल्याचा संदर्भ असतो. भावनिक संदर्भ नसतो. (माझी आजी मला एकदा समजावत होती "भाकरी खरकटी असते, पण दशमी खरकटी नसते, म्हणून भाकरी सणासुदीला चालत नाही, दशमी चालते...") कधीकधी भावनिक संदर्भ प्रधान असतो, पण वस्तुनिष्ठ व्याख्या अप्रधान असते. उदाहरणार्थ : "स्वयंपाकघरात खरकटी भांडी साचलेली बघून मला शिसारी आली". मग प्रधान अर्थांगाशी भाषांतराची व्याप्ती जुळवून डौलदार शब्द शोधावा, अशी तडजोड करावी लागते. "खरकटे"साठी संदर्भानुसार "नॉट ओके, डर्टी, स्मिअर्ड विथ फूड" असे सहज-इंग्रजी शब्द पुष्कळदा सुयोग्य असतात.
याबाबत अधिक ऊहापोह अ. रा. केळकरांच्या निबंधात वाचावा. "भाषांतर - विज्ञान की कला" असे काहीसे निबंधाचे नाव आहे.
भाषा-भाषांमधील शब्दांची व्याप्ती वेगवेगळी असते, या फरकाला तात्त्विक फरक मानू नये, असे माझे मत आहे. गूगु येमिथिर्र् भाषकांना "मी", "येथे" वगैरे स्वकेंद्री संकल्पना कळतात, आणि गरज असल्यास ते त्या संकल्पना वापरतातही. (येथे पीडीएफ निबंध बघावा.)
- - -
ही "खास मराठी मनाची जाण" वगैरे प्रकार काव्यात्म आहे. सुंदर आहे. पण उगाच त्यांचा तात्त्विक अर्थ शोधत बसू नये.
"मला आणि तुला [दोघांना किंवा अनेकांना] आलेल्या अनुभवाची स्मृती" यासाठी पुष्कळदा एखादा खास लघु-ध्वनी ठरवला जातो.
फक्त दोघांचीच आठवण असलेले लघुशब्दही असतात. उदाहरणार्थ एखादे प्रेमीयुगुल एकमेकांशी बोलताना "माथेरान" म्हणतात, तेव्हा "माथेरान येथे अतिशय गहिरे झालेले प्रेम आणि त्याबरोबर तिथले कुंद वातावरण, मधुचंद्र..." वगैरे हे सगळे अर्थ येतात. (अशा प्रकारचे शब्द "फक्त-मी-आणि-आई-यांच्या-अनुभवाच्या-स्मृतीचा-संकेत" असेसुद्धा आहेत. तुमचेही असे काही संकेत असतील. आठवून बघा.)
म्हणून काय ते प्रेमीयुगुल अन्य लोकांशी बोलत असताना "माथेरान" शब्द तसा वापरतात का? "माथेरान गाडी कुठल्या फलाटावर?" असे रेल्वे कारकुनाला विचारताना काय संदर्भ असतो? "माथेरान" स्थानाबद्दल संदर्भ असतो. प्रेमाची-पूर्णता वगैरेंबद्दल संदर्भ नसतो. कारकून "तुमची माथेरान-गाडी चुकली" म्हणाला तर "आमच्या प्रेमाबद्दल शंका घेतो की काय!" असा रागाने जाब विचारत नाहीत.
"माझ्या-तुझ्या मर्यादेतल्या संकेताचा संदर्भ रेल्वे कारकुनाशी बोलताना नाही", हे जर इतके या प्रेमीयुगुलाला (म्हणजे आपल्याला) इतके सहज समजत असेल, तर मग "ज्यांनी-ज्यांनी थालीपीठ खाल्ले आहे, त्यांच्या मर्यादेतल्या अनुभवाबद्दल संकेताचा संदर्भ थालीपीठ न-खाल्लेल्यांना देता येत नाही" याबद्दल तत्त्वचर्चा करावे इतके कोडे का वाटत असावे? वाक्य लांब आहे, खरे. पण संकल्पना तितकीच सोपी आहे.
पु लंच्या "अण्णू गोगटे झाला" वाक्प्रचारात श्री. अण्णा गोगटे यांच्या निवडणुकीत पडण्याची स्मृती असलेल्या लोकांना संदर्भ लागतो. म्हणजे काय "रत्नागिरीच्या मधल्या आळीतल्या लोकांचे तिथल्या घटनांच्या स्मृतीबद्दल संकेत असतात" याबद्दल तत्त्वचर्चा करायचा प्रसंग यावा? लोकांची कुठलीही मर्यादित संख्या घेतली तर काही स्मृती तिथल्या "लोकल" म्हणून सापडतील. त्यांचा संदर्भ देण्यासाठी काही संकेत शब्द सापडतील. हे तर अपेक्षितच आहे. मग यात कोडे ते काय तेच मला समजलेले नाही.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 09/02/2010 - 17:11
नवीन
मूळ चर्चेचा रोख फक्त भाषांतरावर वा खाद्यानुभवावर नव्हता. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एका संस्कृतीत वाढलेल्या समूहाला भिन्न संस्कृतीच्या समूहाला आपले काही संदर्भ कळणार नाहीत हे जाणवणं अगर माहीत असणं यात खरंच काही विशेष नाहीये. हे निकष वेगळे असतात हे माहीत असूनही एक समूह दुसऱ्या समूहाबद्दल बोलताना 'त्यांच्यात हे असलं (काहीतरी गलिच्छ) करतात, आमच्यात तसं करत नाहीत, आमच्यात असं करतात' या प्रकारची वाक्यं अभिमानाने वापरलेली दिसतात. त्यावेळी 'संदर्भ समजणार नाहीतच', असा समजूतदारपणा कमी दिसतो.
तात्यांनी म्हटलं त्याप्रमाणे, फरक दिसतील, साम्यांविषयी माहीत नाही. पण साम्यंही असतातच. ती साम्यं लक्षात घेतली व संदर्भज्ञानाविषयी मन खुलं ठेवलं तर बरेच वाद नष्ट होतील असं वाटतं.
अनेक चर्चांमध्ये हिंदू वि. मुस्लीम, श्रद्धावान वि. अश्रद्ध, शाकाहारी वि. मांसाहारी असे गट पडलेले दिसतात. त्यांच्यातल्या खडाजंगी चर्चा वाचून प्रश्न पडतो की भिन्न आचार विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे समाज एकाच फॉर्म्युलाने बनलेल्या मेंदूंमधून येतात. मग ती फारकत होते ती कुठच्या पातळीवर? की हे संदर्भ वेगळे असू शकतील हे न समजल्यानेच ती फारकत आहे असं त्या त्या गटातल्या लोकांना वाटतं?
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 09/02/2010 - 16:56
नवीन
एखादी भारतीय गृहिणी घरी आलेल्या पाहुण्याला जेवण वाढताना म्हणेल, "पोटभर जेवा"
तेच एखादी पाश्चिमात्य म्हणेल, "Enjoy your meal"
आता भारतीय गृहिणीला आपल्या पाहुण्याने केवळ उदरभरण करावे, केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ नये असे वाटते आणि पाश्चिमात्य स्त्रीला पाहुण्यांनी फक्त पदार्थांचा आस्वाद घ्याव्या पण पोट भरेपर्यंत खाऊ नये असे वाटते?
आपल्या पाहुण्यांची अगत्याने सरबराई करताना आलेल्या ह्या दोन्ही अनुभुतींमधील साम्य-भेद हा त्यांनी वापरलेल्या शब्दांवरून शोधायचा झाला तर, ह्या दोन्ही संस्कृतींमध्ये खाद्यपदार्थांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात काही साम्य-भेद आहेत का, हे तपासावे लागेल.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/02/2010 - 18:32
नवीन
>>>>वाचून प्रश्न पडतो की भिन्न आचार विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे समाज एकाच फॉर्म्युलाने बनलेल्या मेंदूंमधून येतात. मग ती फारकत होते ती कुठच्या पातळीवर? की हे संदर्भ वेगळे असू शकतील हे न समजल्यानेच ती फारकत आहे असं त्या त्या गटातल्या लोकांना वाटतं?
हा खरा कळीचा मुद्दा आता आला.
एकाच फॉर्म्युलाने बनलेला मेंदू म्हणजे फक्त त्यातला जैविक घटक झाला. त्यावर झालेले संस्कार, घेतलेले अनुभव, ह्यावर तो मेंदू कसा विचार करणार, काय कृती करणार हे बर्याच अंशी ठरते. माझेच उदाहरण घेतो. मी फक्त नगर शहरच बघितले होते तिथेच राहात होतो त्यावेळी लोकांकडे बघायची माझी दृष्टी, त्यानंतर पुण्यात आलो तेव्हा झालेला बदल नंतर राज्य सोडून हैद्राबादला गेलो त्यावेळची स्थिती आणि आता अमेरिकेत असताना ह्या सगळ्याकडे बघायची स्थिती ह्यात अक्षरशः जमीन अस्मानाचे अंतर आहे. आज मी नगरमधे जाऊन तिथेच राहणार्या माझ्या त्यावेळच्या वर्गमित्रांशी आपुलकीने वागू, बोलू शकलो तरी तितकासा जोडून नाही घेऊ शकत कारण अनुभवांची भिन्नता, बदललेला आवाका, त्याच गोष्टींकडे/प्रश्नांकडे बघायची वेगळी नजर हे सगळे संदर्भ येतात. त्यात तेही त्यांच्याजागी बरोबर असतात आणि मीही चूक नसतो! ज्या ठिकाणाहून मी २० वर्षांपूर्वी निघालो तिथेच हे एवढे बदल संभवले तर पूर्ण वेगळ्या संस्कृतीतून आलेले लोक हे अगदी वेगळे वागतील हे नवल नाहीच.
पूर्वसंस्कारातून मनात मूळ धरलेल्या कल्पनांना संपूर्णपणे नवीन अनुभव आला तरच बदलले जाऊ शकते अन्यथा ते अशक्य नसले तरी अतिशय अवघड असते. ते तुम्ही पटवून देऊ शकत नाही. कारण तो अनुभवच यावा लागतो.
शाकाहारी चांगले - मांसाहारी वाईट (किंवा उलट), हिंदू चांगले - मुस्लिम वाईट (किंवा उलट) हे सगळे सापेक्ष असते.
विपरीत अनुभव आला की एकदम विचारात बदल घडतो.
केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार - ही जी काही म्हण आहे त्यात हाच संदर्भ प्रामुख्याने आहे की अनुभवांचे जग विस्तृत करा, संपन्न करा मन बंदिस्त विचारांच्या भिंती आपोआप गळून पडतील.
बरेचसे वाद आपोआप संपुष्टात येण्याची ही पूर्वतयारी असू शकेलही कारण ते वाद बर्याचदा ठिसूळ पायावर आधारलेले असू शकतात.
चतुरंग
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 09/02/2010 - 18:40
नवीन
शीर्षक वाचलं. लेख वाचायला घेतला. न्यूस्पीक वगैरे पाहिलं. थेट खाली प्रतिक्रियांवर नजर मारली. आता जातो मी एक मस्त बिर्याणी खायला. कोण येतंय? :)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 09/02/2010 - 23:14
नवीन
मी! मी!! मी!!!!!
कदाचित बिर्याणी खातांना फोडणीचा भात खाल्ल्याची अनुभूती येईल!!!!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/02/2010 - 23:15
नवीन
नशीब! फोडणीच्या भातावरच थांबलात. दहीभात वगैरे आठवला असता, तर शब्दच संपले असते.
(बिर्याणीप्रेमी)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ए
एक
गुरुवार, 09/02/2010 - 18:49
नवीन
आपुलकी असणारच.. प्रश्न असा आहे कि आपण त्याच्याशी रिलेट करून त्या मागची भावना समजू शकतो का?
शब्दाला शब्द देवून भाषांतर केलं तर तो भाव येणार नाही आणि तशी अपेक्षा करणं नक्कीच अतिरेकी पणाचं आहे. भाषांतर ऐकणारा तो ते त्याच्या कुठल्या पुर्वानुभाशी निगडीत करणार आणि तुमच्या भावना समजून घेणार?
आजीच्या हातच्या टर्कीच्या किंवा कॅम्पींग/फिशींग करत असताना वडिलांनी नुसतं मीठ-मिरी लावून अप्रतीम भाजलेल्या माश्याच्या कहाण्या सांगणारे इथेपण भेटतात. इतकच काय माझा एक कलीग म्हणतो त्याच्या आई इतका सुंदर बखलावा जगात कोणी बनवत नाही..
आता आपल्याला "मीठ-मिरी लावलेला मासा" खाता येणार नाही आणि ख्मंग वगैरे तर वाटणारच नाही.
पण मी जर असं वाक्य लिहिलं तर "बाबांनी डाळ-तांदूळ आणि थोडासा मसाला वापरून रायगडावर जी खिचडी बनवली होती ना तिला तोड नव्हती.." याच्याशी आपण नक्कीच रिलेट करू शकू की नाही?
- Log in or register to post comments
न
नंदन
Fri, 09/03/2010 - 08:21
नवीन
आवडला. चिंतातुरजंतू आणि स्वाती यांचे प्रतिसादही उत्तम.
>>>>वाचून प्रश्न पडतो की भिन्न आचार विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे समाज एकाच फॉर्म्युलाने बनलेल्या मेंदूंमधून येतात. मग ती फारकत होते ती कुठच्या पातळीवर? की हे संदर्भ वेगळे असू शकतील हे न समजल्यानेच ती फारकत आहे असं त्या त्या गटातल्या लोकांना वाटतं?
--- हा जर मूळ चर्चेचा मुद्दा असेल तर इथे एकाच फॉर्म्युलाने बनलेला मेंदू हा भाग समान असला तरी तो या संदर्भात वेगवेगळी सॉफ्टवेअर्स (पक्षी: विशिष्ट परिस्थितीत वाढल्याने होणारे संस्कार) जरी एकाच प्रकारच्या चिपवर (पक्षी: एकाच फॉर्म्युलाने बनलेला मेंदू, समान न्यूरॉन्स इ. इ.) लोड केली असली तरी त्या त्या प्रोग्रॅमिंगप्रमाणे वागतील (माफ करा, फारच अरसिक उदाहरण आहे :)); त्याप्रमाणे असावे. आता हे संदर्भ कसे जुळतात हे अर्थातच त्या त्या संस्कृतीवर/समाजावर अवलंबून. थोडाफार पाव्लोवियन कंडिशनिंग (दुवा) चा संबंध येथे येत असावा.
बाकी एकाच फॉर्म्युलाने बनलेले मेंदू हेही शंभर टक्के खरं नसावं, कारण खाण्या-पिण्याचंच उदाहरण द्यायचं तर द. चीनमध्ये सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी तांदळापासून बनणार्या दारूचा शोध लागला होता. परिणामी स्थानिक लोकसंख्येत अल्कोहोलचे विघटन वेगळ्या रसायनात करणारा जीन कसा विकसित झाला याबद्दल अलीकडेच एक लेख वाचला होता. (दुवा) तेव्हा हे दोन्ही घटक हर एक समाजाच्या निरनिराळ्या प्रतिसादामागे असावेत.
किंचित अवांतर -- हा दुवा किंवा मूळ शोधनिबंधाचा हा दुवाही वाचून पहा. खाद्यसंस्कृती ही माणसांपुरती सीमित नाही हे सांगणारा. [अर्थात इथे आपणच श्रेष्ठ हा अहंगंड (किंवा अहंगंडाच्या आवरणाखाली असलेला न्यूनगंड) इ. गोष्टी प्राण्यांतही आढळतात का, याबद्दल काही लिहिलेले सापडले नाही :).]
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 09/03/2010 - 08:51
नवीन
"(थालिपीठाला, किंवा खमंगला नक्की प्रतिशब्द काय हे तितकंसं महत्त्वाचं नाही)"
श्री.घासकडवी यांनी मूळ धाग्यातच हे स्पष्ट केले असल्यामुळे त्यांच्या नजरेसमोर थेट भाषांतराचा मुद्दा नाही तर त्या अनुषंगाने येणारी संस्कृतीजन्य अनुभती कशी अनुभवावी वा तिचे दूरगामी परिणाम एकूणच परस्परांच्या वैचारिक स्तरावर कशारितीने होत राहतील हे पाहणे जास्त प्राधान्याचे आहे असे म्हणतो. प्रत्येक भाषेचे जसे स्वतःचे असे लेणे असते तसेच दुसर्या भाषेची नेमकी तीच अडचण होऊन बसते ती अशासाठी की पहिल्या भाषेतील हिर्याला (इच्छा असूनही) दुसर्या भाषेत तो थाट येत नाही. याला कारण म्हणजे त्या त्या भाषेतील अगम्यपणा वा शब्दप्रामाण्यता नसून 'नेमके'पणाचा अभाव वा ठसका. मराठा समाजातील जेवणात 'मिरचीचा खर्डा' हे एक झणझणीत तोंडलावणीचे व्यंजन, पण माझी आजी "ठेचा"च जरासा वाढ असे म्हणते. तिने कधीही 'खर्डा' हे नाम घेतलेले नाही. आता इथे एकाच भाषेतील दोन व्यक्तीमध्ये नामावरून हा भेद होत असेल तर भाषांतराच्यावेळी ही अडचण कसले रूप धारण करू शकते याचा अंदाज येतो.
लंडनस्थित एका मराठी गृहिणीने नवर्याच्या युनिटमधील एका ब्रिटीश जोडप्याला खास महाराष्ट्रीयन पदार्थ करून जेवायला बोलाविले. 'भरल्या वांग्या'ला "स्टफ्ड ब्रिंजल" असे नाव दिले आणि ते त्या एल्सी वा लिझाने आवडीने खाल्ले पण तिने 'ब्रिन्जल स्टफ्ड' नसून स्पॉन्जी आहे असा 'रिमार्क' दिला. आता 'भरल्या" शब्दात जो भरलेपणा आहे त्याची प्रतिमा 'स्पॉन्जी' मध्ये येत नाही हे आमच्या बहिणाबाईला पटवून देता आले नाही, मग शेवटी "बरं बाई, तुझीच लाल..." असा खास कोल्हापुरी शेरा मारून ती "स्पॉन्जी आईसक्रीम' खात बसली. (कॉलेजमध्ये वादविवादात ढीगभर ढाली मिळविलेल्या त्या वर्गभगिनीने ई-मेलमधून कळविले, "अरे इन्द्रा, मला बर्यापैकी इंग्रजी बोलता येते रे, पण मुद्दा मांडताना भांडता येत नाही, काय करू?").
समजो वा ना समजो, भाषाभाषातील ही उत्क्रांतता फार आकर्षक आहे, पण अनुवादकाची जबाबदारी त्याच प्रमाणात वाढली आहे. 'खमंग', 'खरपूस', 'खैन्दळ', 'खसकन', 'खुटदिशी, 'खुदकन' या 'ख'कारातील ठसका इंग्रजीत आणणे व तो वाचकांपर्यन्त पोहोचविणे ही अनुवादकाची कसरतच आहे. "खट्याळ" ला 'विट्टी' हा जवळपास जातो, पण 'शी ग्रीन्ड' याचा अर्थ 'ती हसली' असा होत नाही, तर 'तिने तोंड वेंगाडले' असाही अनुवाद अनुवाद्क करू शकत नाही. 'खुदकन हसली' याला जो गोडवा आहे, तो 'क्यूट स्माईल'ला येईल, पण 'खुदकन' मध्ये वाचणारा 'तिचे' लहानपण नेमकेपणे जोखेल, तर 'क्यूट' किंचित रोमँटिककडे झुकते. म्हणजेच भाषांतरकाराला शब्दाला प्रतिशब्दाचा धांडोळा नाही तर, अनुभवाचे स्वर लिखाणात आणणे क्रमप्राप्त होते. सध्या अनुवादित पुस्तकांचा थवा उडालेला दिसतो, तिथे 'चार शब्दा' मध्ये कर्त्याने जाणीवपूर्वक 'भाषांतरा'ऐवजी 'रूपांतर' या शब्दाचे प्रयोजन केलेले आढळते आणि ही बाब स्वीकारणीय मानावी लागेल.
सोनाराची 'तोडफोड' आणि लाकुड्तोड्याची 'तोडफोड' या त्या त्या धंद्यातील मूलभुत गोष्टी असल्या तरी दोघांची अवजारे आणि कृती निश्चितच वेगवेगळ्या आहेत. सोनाराला जरी नजाकतीची कला अवगत असली तरी याचा अर्थ लाकूडफोड्याला आपले कामे रानवटासारखे करून चालणार नाही. पाचर केव्हा आणि कुठे आणि कशी मारता येईल याचे ज्ञान त्याला असले की बंबफोड असो, नाना असो, वा सागवान, तो आपले काम सोनाराच्याच कुशलतेने करणार. भाषांतरकारालादेखील दुसर्या भाषेतील सौंदर्य आपल्या भाषेत आणण्यासाठी त्यातील संस्कृतीला इथला नटवा देण्यासाठी कोणत्या रसायनाचे लिंपण दिले पाहिजे ही कला अवगत असली की, थालिपिठाची 'खमंगता' नेमक्या शब्दासाठी अडून बसणार नाही.
श्री.घासकडवी यांनी पु.लं.च्या भाषांतरातील लिखाणाच्या अडचणींचा रास्त उल्लेख केला आहे. खुद्द पु.लं.नी हेमिंग्वेच्या "ओल्ड मॅन अॅण्ड दि सी' कादंबरीचा अनुवाद करताना शीर्षक बदलण्यापासून सुरुवात केली. मूळ इंग्रजीचा "म्हातारा माणूस आणि समुद्र" असा अंकलिपी धाटणीचा अनुवाद कुणाच्या पचनी पडणे शक्य नव्हते म्हणून इथल्या मातीसाठी त्या जगप्रसिद्ध कादंबरीचे "एका कोळीयाने..." हे नामाधिमान झाले. इंग्रजीतून मराठीत भाषांतराचा जो ओघ सातत्याने राहिला आहे, त्याला कारण म्हणजे भाषांतरकार प्रथम "मराठी" त पारंगत आहे आणि एखाद्या इंग्रजी शब्दाला (उदा. "Chandelier, silhouette, gaunt") ला नेमका मराठी शब्द मिळाला नाही तरी त्याचा प्रभाव जाणवण्याइतपतचा अन्य शब्द तो शोधून काढू शकतो. मात्र 'फ्रॉम मराठी टू इंग्लिश' ही सर्कस अजून म्हणावी तशी यशस्वी झालेली नाही. कारण परत तेच....दोन्ही भाषातील "खमंग" पणा ज्ञात असलेली व्यक्ती सापडत नाही. कोणत्याही भाषेची ईडियम रक्तात भिनावी लागते. शास्त्रीय वा टीकात्मक लेखनात शैलीचा उपद्रव जास्त जाणवत नाही, पण ललित साहित्यात तिला सुटका नसते.
शिवाय आपल्या लिखाणाबाबत पाश्चात्यांचा एक कायमचा आक्षेप आहेच आहे ~ "भारतीय लोक फार व्याकरणशुद्ध इंग्रजी लिहितात."
असो. खूप चांगला (आणि "खमंग") विषय चर्चेला मांडल्याबद्दल श्री.घासकडवी यांचे अभिनंदन.
इन्द्रा
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sat, 09/04/2010 - 03:55
नवीन
लेख आवडला. अनेक शक्यतांचे पदर असलेले लिखाण.
एखादा समूह वापरत असलेली भाषा व तद्जन्य अनुभूती हे कितपत जोडलेले असतात?... व्यापक दृष्टीने एखाद्या समाजाची संस्कृती (भाषा हे केवळ एक अंग झालं) ही त्या समाजाच्या, त्यातील सर्वसाधारण व्यक्तीच्या अनुभूतींना घडवते का?
मानसशास्त्रामधे ही संकल्पना "आर्कीटाईप्स" या संकल्पनेमधे मांडली गेली आहे. दुवा : http://en.wikipedia.org/wiki/Archetype
म्हण्टले तर आर्कीटाईपचा शब्दशः अर्थ कुठल्याही गोष्टीचे आदर्शरूप असा साधासुधा घेता येईल. ( म्हणजे बहुदा : हत्तीचा आर्कीटाईप ऐरावत. किंवा घोड्याचा आर्कीटाईप पेगासस ) परंतु इथे युंग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो : कलेक्टीव्ह अनकॉन्शस. दुवा : http://en.wikipedia.org/wiki/Collective_unconscious
"collective unconscious collects and organizes those personal experiences in a similar way with each member of a particular species" . थालिपीठाचे खमंगपण, खमंग या शब्दाने प्रतीत होणारी अनुभूती , या भावनांचे मराठीपण या सार्याची संगती वर उल्लेखलेल्या संकल्पनांमुळे एक प्रकारे लावता येईल असे मला वाटते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2