एखादी कलाकृती मग ती कविता असो , चित्रकाराने रेखाटलेले चित्र , गायकाने गायलेले गाणे वा एखादा लेख रसिक मनाला आवडला की त्या रचनाकाराला दाद ही मिळतेच.कधी ती टाळ्यांच्या स्वरुपात तर कधी बोलुन . आज या लेखनप्रपंचाचा उद्देशदेखील हाच. आयुष्यावर बोलु काही ( प्रयोग ५०० ) या सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी .
तुमच्यापैकी बर्याचजणांना ही गाणी माहित असतील , आवडत असतील. मला मात्र जरा उशिराच का होइना पण या महफिलीचा आनंद लुटायला मिळाला.
त्याला कारणही तसेच घडले. बर्याच दिवसांनी जरा दोन दिवस सवड काढून मी हॉस्टेलच्या मैत्रिणीला भेटायला आले होते. तब्बल तीन वर्षांनी आम्ही भेटणार होतो. निमित्त दुसरे काही नाही , फक्त भेटायचे व मनसोक्त गप्पा मारायच्या. गेल्या वर्षातील गप्पांचा बॅकलॉग भरुन काढायचा हा अजेंडा आधिच ठरवलेला.
सुरुवातीला हाय - हलो झाले. तीच्या लहान मुलाशी ओळख झाल्यावर कळले की त्याचा फक्त एकच हट्ट .एकतर त्याचाशी खेळा किंवा त्याच्यासोबतच बोला ( तुम्हाला भाषा कळली नाही तरी :) ) दुसर्या दिवशी मात्र तीचा नवरा ऑफिसमध्ये व मुलगा झोपेत बिझी असल्याने आम्हाला गप्पा मारण्याची संधी मिळाली. हॉस्टेलच्या जुन्या कडू- गोड आठवणी , आत्ताचं बदलेलं रुटीन , काही मागे पडलेले छंद तर काही अजुनही जपलेल्या आवडी असे बरेचकाही निघाले बोलण्याच्या नादात. बोलता बोलता विषय निघाला कॉलेजच्या ऑर्केस्ट्राचा व आवडणार्या मराठी गाण्यांचा आणि तीला आठवले की तीच्याकडे "आयुष्यावर बोलू काही " या कार्यक्रमाची व्ही सी डी आहे आणि मग वाट कोण बघतंय लगेच या सुरेल महफिलीला सुरुवात झाली.
" जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! "
या शब्दांनी हळुवार आपल्याशी मैत्री करत , हे दोघे गात असतात. काहीतरी मनाला भिडणारं , पटणारं...
बरं आयुष्यावर बोलायचं म्हणजे काही फक्त गंभीर चर्चा वा गंभीर अर्थाची गाणी असं नाही तर अनेक मुड व्यक्त करणार्या गाण्यांनी ही महफिल सजलेली आहे.
पाउस म्हटला की कोणी वर्तमानकाळात रोमँटीक योजना आखणार तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देणार. अश्याच काहीश्या भावना ' सरीवर सरी ' व ' पाउस असा रुणझूणता पैंजणे सखीची वाजती' या गाण्यातुन व्यक्त होतात. गायनासोबत हे दोघं मधुनमधुन प्रेक्षकांशी गप्पा मारतात , संदीप खरेचे कविता वाचन ( त्याच्या खास स्टाईलने ) यामुळे ही महफिल आपल्या घरीच सुरु आहे असे वाटते.
मोठ्यांबरोबर लहानांना देखील आवडतील , ते त्यांच्यापरीने दाद देतील अशी काही गाणीदेखील आहेत. आजकालच्या मुलांना मोबाईलचं आकर्षण असतं. तो त्यांच्या हातात पडला की त्यावरचे प्रत्येक बटण दाबणे हा खेळ सुरु होतो . अशामुळे कधितरी कुणाला चुकुन फोन लागतो. हा अनुभव बहुतेकांना आला असेल. याच विषयावर असलेले " मी पप्पांचा ढापुन फोन..." हे गाणे मोठ्यांनादेखील आवडते. सुरुवातीला गमतीदार वाटणारे पण शेवटच्या कडव्यातील
" मी ढगातुन बोलतोय बाप्पा ,
बाप्पा बोलतोय तर मग थांब , सगळ्यात आधी एवढ सांग,
कालच सांगत होता पप्पा , तिकडे आहेत आमचे अप्पा ,
अप्पांना तु धाडून दे , नाहीतर फोन जोडून दे ,
तुला सांगतो अगदीच स्पष्ट , अर्धीच राह्यलीए आमची गोष्ट "
हे बोल ऐकून मात्र आपणदेखील हळवे होतो व लहानपणी बाप्पाशी मनातच केलेल्या चर्चा आठवतो.
"दूर देशी गेला बाबा , गेली कामावर आई " हे गाणे सध्या बहुतांश घरात असणार्या परिस्थीतीचे चित्रण आहे. पण त्याचबरोबर आईप्रमाणेच बाळामध्ये जीव गुंतलेल्या पण कामाच्या व्यापातुन वेळ न काढु शकणार्या बाबांचे मनोगत " दमलेल्या बाबांची कहाणी " या गाण्यातुन कळते.आज आपण वेळ देऊ शकत नाही त्यामुळे उद्या मोठे झाल्यावर आपले हे लेकरु आपल्यामध्ये असेच गुंतलेले असेल का हा प्रश्न हा हळवा झालेला बाबा विचारतो -
" तुझ्या जगातुन बाबा हरवेल का गं , मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं ,
सासुरला जाता जाता उंबरठ्यामध्ये , बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये "
या शब्दांनी नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात व दाद देण्यासाठीदेखील शब्द बाहेर पडत नाहीत. अश्रु हीच काय ती पावती.
कधी रडवणारी , कधी विचार करायला लावणारी तर कधी हसवणारी अशी गाणि ऐकत हा कार्यक्रम बहरत असतो.
पहिल्या प्रेमाचे वर्णन करणारी कविता वाचतांना प्रेयसी किती नाजूक हे वर्णन करतांना संदीप अनेक उपमा देतो मात्र शेवट केवळ अप्रतिम -
" ईतकी नाजूक की आतातर स्मरणाचेही भय वाटे ,
नकोत रुताया फुलास असल्या , माझ्या जगण्यातील काटे ".
तसेच अव्यक्त प्रेमाचे वर्णन करणारे " हे भलते अवघड असते " हे गाणे -
" गाडी सुटली रुमाल हलला , क्षणात डोळे टचकन ओले ,
गाडी सुटली पडले चेहरे , क्षण साधाया हसरे झाले ."
खरंच अवघंड . असो..
यात बेला शेंडे व अंजली कुलकर्णी यांनीदेखील १-२ गाणि गायली आहेत. बेलाने गायलेले " रुणझूण नाचत पैंजण " हे प्रियकराला भेटायला आतुर झालेल्या प्रेयसीची मनस्थिती सांगणारे अतिशय सुंदर गाणे-
" या तिरावर जरी अंगावर पाश मला छळणारे,
त्या तिरावर दिसते लाघव निळसर मोहवणारे
एका स्पर्शी शतजन्माची तहान शांतवणारे,
एकदा येउ दे कानी ती मुरली ,
या स्थळी , या तिरी ना जरी माझी मी उरली.."
व्वा ! क्या बात है !
नुसतीच फुलपाखरी नाही तर मानवी स्वभावाच्या अनेक पैलू दाखवणारी गाणी आहेत. मग ते सो कॉल्ड सरळमार्गी , बहुतांशी बधीर लोकांचे वर्णन करणारे " मी मोर्चा नेला नाही " हे गाणे असो वा " जपत किनारा शिड सोडणे नामंजूर, अन वार्याची वाट पाहणे नामंजूर , मी ठरवणार दिशा वाहत्या पाण्याची , येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर " हे गाणे असो. प्रत्येक गाणे आवडले तरी एखादे गाणे मात्रं जास्तंच जवळीक साधतं , जणू आपलंच असल्यागंत ...
" बाश्शं ! " असा ओरडा व पाठीत एक गुद्दा पडल्यावर जाणवले की त्या लहानग्याची झोप पुर्ण झाली होती व तो आम्हाला टि व्ही बंद करण्याबाबत सांगत होता . त्यामुळे गाण्याच्या महफिलीतुन आमचा मोर्चा आम्हाला बोबड्या भाशेतील घरातल्या वेगळ्या कार्यक्रमाकडे वळवावा लागला. त्यातदेखील तेवढाच गोडवा आहे हे ही खरेच .
ट्रूली सलील - संदीप रॉक !
Comments
खरच ............
१०० % मान्य
हम्म ...
संदीप,सलील ची गाणी, त्यांची
मस्त
सांग सख्या रे !
यांचा शो हौशेने बर्याच दा
गोडवा....घरचा .. !
संदीप च्या कवितेतला प्रत्येक
गाणी सगळीच चांगली
गाणि चांगली आहेत काही
नशीब तीन चार वेळा ऐकल्यावर
".................पण बहुतेक
आय टी आणी कोथरूडचा काय संबंध?
वाद नको!
आता कार्यक्रमाविषयी वैयक्तिक
विषय निघालाच आहे म्हणून
संदीपदाच्या
मस्त. संदीप आणि सलील दोघांची
संदीपने 'विद्युत
@ तुषार घवी
सलीलने वैद्यकीय पदवी घेतलीय
@भडकमकर मास्तर
कमाल आहे! हि डॉक्टर लोक पेशंट
मेडिकलची एक शीट पण वाया