Welcome to misalpav.com
लेखक: हरिप्रिया_ | प्रसिद्ध:
क्रिकेटचे सुरु झालेले महासंग्राम आणि त्या निमित्ताने मिपाने दिलेल व्यासपीठ..त्या निमित्ताने माझ्याकडून हा प्रयत्न... आम्ही BE ला असतानाची ही गोष्ट. आमच्या D.Y.Patil College Of Engg,कोल्हापूरला २५ वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने कॉलेज मध्ये अनेक नवीन गोष्टी सुरु होत्या. २५ वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वगैरे दणक्यात साजरा करून झाल होत. आणि त्यावर्षी पासून नव्याने जशी मुलांची जी.सी.(सार्वत्रिक विजेतेपद) असायची तशी मुलींसाठी पण सार्वत्रिक विजेतेपद सुरु करण्यात आली होती.मुलींसाठी नेहमीच्या कॅरेम,बुद्धिबळ,badminton अश्या सगळ्या खेळांबरोबर क्रिकेटपण खेळल जाणार होत. आम्हा मुलींसाठी क्रिकेटचे नवीन नियम करणार होते. ६ मुलींच्या संघाने खेळले जाणारे आमचे हाफ पीच क्रिकेट.( ६च मुलींचं कारण म्हणजे mechanical आणि production सारख्या पुरुषबहुल वर्गांमधून पण असतील नसतील तेवढ्या मुलीना गोळा करण्यात आल्या होत्या. ) ६ षटकांची आमची लढत. त्यात MCC चे अनेक नियम बदलून खास DYP चे नियम काढण्यात आले होते. उदा. खांद्या खालूनच बॉल टाकणे, पायचीतचा प्रश्नच नाही,एकाच बॉलरला दोन ओव्हर टाकायची संधी वगैरे वगैरे.. चार वर्षात कधी कॉलेज मधल्या क्रीडा विभागकडे न वळलेल्या आम्ही मुली, "मज्जा करायची , शेवटचे वर्ष आहे" अस म्हणत क्रिकेटकडे वळलो. (त्या वर्षी अभ्यास सोडून सगळे उद्योग केले आम्ही...) खर तर आमच्या पैकी कुणीच फारस क्रिकेट खेळलेल नव्हत. आमची मजल लहानपणी गल्लीत, सदनिकेच्या आवारात कधीतरी लिंबूटिंबू म्हणून खेळलेल्या एखाद दुसऱ्या ओव्हर पुरतीच मर्यादित होती. क्रिकेट पाहायला आवडणाऱ्या अश्या काहीजणी सोडल्या तर बाकीच्यांना युवराज आणि इरफान असले चिकणे खेळाडू आणि भारताची शान असलेला सचिन सोडून काही माहित नव्हते. साध्या सोप्या नियमां पासून सगळे सुरु करायचे होते. खेळण्यास जे कोणी इच्छुक आहे त्यांनी दुपारी मैदानात भेटावे असा निरोप आम्ही S.E. आणि T.E. च्या वर्गातून देऊन आलो. मग सर आणि म्याडम लोकांचे हल्ले चुकवत आम्ही किती महत्त्वाच काम करत आहोत हे त्यांना पटवून देत मैदान गाठल. ठरवलेल्या वेळेपर्यंत सगळ्या मुलीच नव्हे तर मूल पण त्या मैदानवर हजर झाली होती. मुलीना आपण खेळू शकू का ही उत्सुकता होती तर मुलांना आपल्या वर्गातल्या मुली काय दिवे लावणार ह्याची उत्सुकता होती. आम्ही आमच्या क्रीडा प्रमुखाला विनंती केली होती की तूच आमचा कोच म्हणून ये. खर त्याने त्या ऐवजी दुसऱ्या एक मित्राला आमचा कोच म्हणून नेमला.(त्या पदासाठी खूप रस्सीखेच झाली होती अस नंतर कळल, कारण अर्थातच स्पष्ट होत...) पण ह्या हौशेन कोच झालेल्या मित्राला आमचे क्रिकेट बघून नंतर काही दिवस जो पश्चाताप झाला तो शब्दात सांगणे अवघड आहे.. आमची प्रक्टिस सुरु होण्या आधीच आम्ही जी.सी.जिंकायला हवी अस अपेक्षेच ओझ आमच्यावर लादण्यात आल. आम्हाला कधी नव्हे ती वर्गातली मुले मदत करू लागली.त्यांनीच आमच्यासाठी हलक्या बॅट शोधून आणल्या. त्यांचेच स्टम्प, बॉल सगळ तयार झाल. आणि आमची तयारी सुरु झाली. आधी आमच्यातच ४ टीम तयार होतील एवढ्या पोरी गोळा झाल्या होत्या. त्यातल्या अनावश्यक मुली झेल घेणे, क्षेत्ररक्षण करणे अशी तयारी करता करताच "खेळता येईना रंग काळा" अस म्हणत गायब झाल्या. आणि निवड करायचा कटू प्रसंग आमच्या कोच आणि कप्तानावर आला नाही..७ जणीच टीम मध्ये उरल्या होत्या..ज्यांना खरीच क्रिकेटची आवड होती,किंवा ज्या थोड्या फार तरी खेळू शकत होत्या..६ + १ राखीव खेळाडू... आमच्यातले सचिन-सेहवाग, जॉन्ती ह्रोड्स, ब्रेट ली कोण ते सापडायला लागल.. छोट्याश्या चणीची श्रद्धा पहिलाच बॉल षटकारात बदलणारी ठरली तर पल्ली आमची ब्रेट ली झाली..चुकून माकून मधल्या फळी साठी नेहमी विश्वासाने फलंदाजी करणाऱ्या लल्ली आणि जस्सी सापडल्या... खऱ्या खेळात खेळाडूची परीक्षा पाहणारा ऑफ चा शॉट आम्हा सर्वांचाच आवडता झाला होता आणि ऑन ची बाजू मात्र ऑफ झाली होती..प्रयत्न पूर्वक सरळ फटका मारायचा आम्हाला शिकवलं गेल. सगळ्यात जास्त दुर्गती होती ती क्षेत्ररक्षणाची..बॉल लागेल म्हणून त्याच्या लांबून लांबूनच पळणार्या आम्ही..आणि कॅच घेताना बॉल आत घेण्यासाठी उघडलेला हातच बंड करायला विसरणार्या...त्यामुळे टप्पा खाऊन सीमापार जाणारा चेंडू...काही विचारायची सोय नव्हती. खेळाडूना नाव ठेवण्यात पटाईत झालेलो आम्ही आता वास्तव बघत होतो..तरी पण आमची तयारी जेमतेमच सुरु होती... त्या दरम्यानच आमच्या शाखेची मुलांची टीम मात्र अंतिम लढतीत हरली, आमचे खेळाचे गुरुजीच त्या टीमचा कप्तान होते .आणि मग त्या हरण्याच सगळ दुःख त्याने आमच्या जिंकण्याने भरून काढायचं ठरवलं. मग मात्र आमच्या कबीर खानने आमची कसून तयारी करून घ्याची ठरवली. सकाळी लवकर सगळ्यांना गोळा करणे, आणि दिवस दिवस भर प्रक्टिस करवून घेणे अस सत्र चालू झाल.(आम्हा सगळ्यांचाच रंग त्याने त्याच्या सारखा काळा करायचा निश्चय केलाय अस आम्ही म्हणू लागलो होतो..) आमच्या गुप्तहेरांनी कोणत्या संघात कोण छान खेळत,कोणाची कोणती बाजू कमकुवत आहे हे शोधून आणल. कोणती टीम म्हणजे सगळ्यात मोठ्ठा शत्रू ठरू शकते हे पाहून झाल. आमची जलद गोलंदाजी आणि सुरवातीचे फलंदाज हे आमचे बलस्थान होते. हे सगळ लक्षात ठेवून प्रतेक संघाविरूद्धचे डावपेच आखले गेले. आमच्याच असलेल्या जी.एस.ने आमच्यासाठी सोप्पा draw काढायची खेळी खेळली.. अश्या प्रकारे खेळाडू सोडून सगळे तय्यार झाले होते. आणि क्रिकेट पेक्षा मोठ्ठ ध्येय होत सा.वि.जिंकण. आणि बाकी सगळ्या क्रीडा प्रकारांचे मिळून जेमतेमच गुण होत होते.त्यामुळे क्रिकेट जिंकण अत्यावश्यक होत.होता होता पहिल्या सामन्याचा दिवस उगवला. आज जास्त दमू नका अस सगळ्यांनी सांगितलं होत त्यामुळे सकाळी थोडाच वेळ खेळलो. त्यानंतर शुभसूचक भारद्वाज पक्षी दिसला आणि आम्ही जिंकणारच अस वाटू लागल. खेळाच्या गुरुजींनी आम्ही धडपडलो तर म्हणून..बरच समान आणून ठेवल. वर्गात कधी न बोलणार्या पण सगळ्यांनी शुभचिंतन केल. सामने कॉलेजच्या मध्यभागी असणार्या हिरवळीवर होणार होते. कॉलेजच्या कोणत्याही कोपर्यातून सहज दिसणारे होते आमचे छोटेसे मैदान. आणि भारत-पाक सामन्याला होईल तेवढी गर्दी झाली होती मुलींचे सामने बघायला. ग्यालरी,लायब्ररी, कॉरीडोर्स जिथून शक्य आहे तिथून खेळ पहायला सगळे जमले होते.आपल्या खेळाडूना जाणवणारे दडपण आम्हाला पण जाणवून गेले. मुलांच्या हुल्लडबाजीचेच खूप टेन्शन आले. मी राखीव खेळाडू असूनही माझे हातपाय थंड पडले होते, हृदयाचे ठोके पण वाढले होते. मी मनोमन सचिनला साष्टांग दंडवत घातला होता.."बाबा कसा रे एवढ्या दडपणात खेळतोस ?" आमचाच सामना पाहिला होता. I.T. विरुद्ध Production. तसा तर Productionचा संघ जेमतेमच होता कारण मुळीच कमी असल्याने संघ निवड वगैरे प्रश्न नव्हता आणि त्यामुळे तो संघ तुलनेने कमकुवतच होता. आम्ही नाणेफेक हरलो आणि त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारावे लागले. आमच्या ब्रेट ली पुढे कोणी टिकणे शक्य नव्हतेच. तिच्या दुसर्याच चेंडूवर मधला स्टंप उडून पडला आणि आम्ही एकच जल्लोष केला. तो पण थेट भारतीय संघ जसा साजरा करायचा त्या स्टाइलीत...पुढच्याच षटकात मग नेहमी झेल सोडणाऱ्या मैत्रिणीने एक अवघड झेल पकडला आणि त्या नंतर लगेचच गोंधळून एक जण धावचीत झाली. पूर्ण ६ षटकांच्या आतच त्यांचा संघ २३ धावांवर सर्व बाद झाला. हे सोप्प आव्हान आम्ही ३ षटकातच एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केल. पाहिला सामना आम्ही सहज जिंकला आणि अपेक्षेच ओझ पण वाढल. दुसरा सामना (म्हणजेच उपांत्य सामना कारण खेळणारे संघच ७ होते.) होता chemical सोबत. मागच्या अनुभवामुळे ह्यावेळी नाणेफेक जिंकून पण आम्ही गोलंदाजी स्वीकारली. पण आधीच्या विजयाच्या उन्मादाने म्हणा ह्यावेळी गोलंदाजी नीट झाली नाही. म्हणजे ठराविक अंतराने बळी मिळत गेले तरी धावा जास्त दिल्या गेल्या आणि अवांतर धावा पण आमच्या चुकांमुळे मिळाल्या. त्यांनी आमच्या समोर ४० धावांचे लक्ष्य ठेवले. तरी पण आम्हाला ते जास्त वाटले नाही,कारण सराव सामन्यात आम्ही सहज अर्धशतक गाठायचो. आमचे सलामीचे फलंदाज मैदानात उतरले. श्रद्धाने नेहमी प्रमाणे पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आम्हा सगळ्यांचेच मनोबल वाढले. मात्र पुढच्याच चेंडूवर तिने एक सोप्पा झेल दिला. मग पळून धावा काढायच्या लक्षात नाही आणि चेंडू पकडला गेल्यावर पळायला सुरवात केल्याने अजून एक गडी धावचीत झाला. आता विजेतेपद सोडा अंतिम सामना तरी खेळणार का असा प्रश्न पडला आम्हाला. एका बाजूने आमची कप्तान लल्ली खेळत होती. पण समोरची व्यक्ती मात्र बदलत होती. काही झाल तरी स्ट्राईक लल्ली कडे ठेवायचा असा प्रयत्न सुरु होता. लल्ली मात्र खरच कप्तान पदाला साजेशी खेळत होती. २ षटकात १७ धावा अश्या परिस्थितीत तिने सलग २ षटकार ठोकून पुन्हा आम्हाला सामन्यात परत आणल. हुश्श.. तो सामना आम्ही कसाबसा जिंकलो आणि अंतिम सामन्यात प्रवेश करते झालो.(हा सामना आठवला की मला आपण विश्वचषक जिंकलेलो तेव्हाच्या झिम्बोम्बे विरुद्धच्या सामन्याची आठवण येते.. ) आमच्या सामन्यानंतर लगेच दुसरा उपांत्य सामना खेळला गेला आणि आमच्या समोर आमचे पारंपारिक शत्रू संगणक विभाग येणार हे स्पष्ट झाल. त्यांचा संघ पण आमच्या सारखच तरबेज होता. दोन तुल्यबळ संघ समोर समोर येणार होते. त्यांचे गोलंदाज तर आमच्या पेक्षा भन्नाट होते. त्यांनी आता पर्यन्त एका पण संघाला पूर्ण ६ षटक खेळू दिल नव्हत. ४ षटक म्हणजे खूप झाल. सोबत क्षेत्ररक्षण पण आमच्या पेक्षा उच्च दर्ज्याचे होते. पण आम्ही आता जास्त सतर्क होतो. आमचे नियोजन पण तय्यार होते. एक बिल्लोराणी होती त्या संघात,सगळ्यात जलद गोलंदाज त्या संघाची. प्रत्येक चेंडू यॉकर तिचा. तिचे चेंडू फक्त तटवून काढा. बाकीच्यांना तुम्ही फोडून काढू शकाल असे आमच्या खेळाच्या गुरुजींनी सांगितलं होत. आम्ही नाणेफेक हरलो आणि पहिल्यांदा फलंदाजी सोपवली गेली. त्यांना विश्वासच होता त्यांच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा सलामीचे फलंदाज उतरले. आणि 'बिल्लो राणीच्या' गोलंदाजीला न जुमानता 'श्रदधीने' पुन्हा चौकार लगावला. त्या षटकात नंतर मात्र एकही धाव मिळाली नाही आणि नशीब म्हणजे एकही गडी बाद झाला नाही. ती खतरनाक ओव्हर खेळून झाली होती. पुढच्या षटकात अजून फटकेबाजी झाली मात्र विकेट्स पण गेल्या. एक बाजू आमच्या सलामीच्या फलंदाजाने 'जस्सीने' लावून धरली आणि आमची युवराज असलेली 'तुप्पीने' तिला बहुमोल साथ दिली.समोरच्या संघाने कधीच पूर्ण ६ षटक खेळली नवती त्यामुळे त्यांना "एकाच बॉलरला दोन ओव्हर" हा नियम माहित नव्हता आणि त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा बिल्लो राणीला २ षटक टाकायची संधी मिळाली नाही. दुसर्याच एका मुलीने आधीच दोन षटक टाकली होती म्हणून बचावलो. तसेच ह्या नियमामुळे एका कधीच सराव न केलेल्या मुलीला गोलंदाजी करावी लागली. तिचे अनेक चेंडू वाईड,डेड,आणि नोबॉल गेले आणि आम्हाला चिक्कार अवांतर धावा मिळाल्या. आम्ही ७१ धावांचा डोंगर उभा केला. उरलेलं काम आमच्या गोलंदाजांनी बिनचूक पार पाडलं आणि आम्ही २७ धावांनी जिंकलो..पाहिला मुलींचा सा.वि.आमच्या नावावर नोंदला गेला. नंतरचा संपूर्ण कॉलेजात केलेला दंगा, आमच्या वर्गातल्या मुलांनी केलेलं कौतुक, कबीर खानने दिलेली पार्टी सगळ शब्दां पलीकडचे...


Comments

हा हा ... चार वर्षात कधी कॉलेज मधल्या क्रीडा विभागकडे न वळलेल्या आम्ही मुली, "मज्जा करायची , शेवटचे वर्ष आहे" अस म्हणत क्रिकेटकडे वळलो. >>> आम्ही शेवटच्या वर्षात(वर्षात ? का महिन्यात रे ;) ) अभ्यास विभागाकडे वळलो .. बाकी अभिनंदन !!

चैला, भारी!! मस्त आणि प्रामाणिक वर्णन! प्रामाणिक एव्हढ्यासाठीच की मुलींना कालीजात क्रिकेट खेळताना पाहून स्वत: सचिनला देखील झीट आली असती!! हँड-आय को-ऑर्डीनेशन म्हणजे नाहीच! हे लक्षात घेता तुमच्या संघाने सहा षटकात ७१ धावा केल्या म्हणजे खरोखर कमाल आहे. आमच्या हापिसातल्या टीममध्ये एक मुलगी असण्याचा नियम होता. तेव्हा एका मॅचमध्ये आमच्या मैत्रीणीने मॅचच्या पहिल्याच षटकात समोरच्या टीमचा अव्वल बॅट्समन आऊट केला होता, त्यानंतर आम्ही तिला शरणच जायचे बाकी राहीलो होतो!!! ;-) --असुर

बेश... लईईच भारी.... श्रदधी, जस्सी, तुप्पी आणी हॅरी या सर्वांच कप जिंकल्याबद्दल भिणंदण... धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड.... कबीर खाण तुम ग्रेट हो...

मस्त. एकदम 'दिलसे' लेखन आवडले. स्टेडियमवरती आमच्या नेटच्या बाजूलाच मुलीदेखील प्रॅक्टिस करायच्या त्याची आठवण झाली. त्यांच्या बरोबर १/२ मॅचेस देखील खेळल्या होत्या. त्या मॅचेस मध्ये अमच्या टिममधल्या पेस बॉलर्सना देखील स्पिन टाकावी लागली होती =))

लै भारी हो, अगदि माझे कॉलेजचे दिवस आठवले, कारण दिवसाच कॉलेजात जायचो ना, म्हणुन. बर मग या विजयाबद्दल अभिनंदन आणि पार्टि कधि व कुठे ते कळवा. तुमच्या टिमच्या सगळ्या खेळाडुंना बोलवा म्हणजे तुमचं युनिय्न होउन जाईल आणि आम्हाला पार्टि. , काय म्हणताय.