Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?

च
चिंतातुर जंतू यांनी
Fri, 02/25/2011 - 20:13  ·  लेख
लेख
एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा गटाच्या (उदा: मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं: ;-) ह. घ्या. बरंका!) विषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही. उदा: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जपान्यांविरुद्ध चीड होती, पण जपानी लोकांबद्दल विनोद मात्र निर्माण झाले नाहीत. किंवा आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत. अनेकदा असे विशिष्ट जमाती/समाजांविषयीचे विनोद सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून किंवा अभिरुचीहीन असल्याचे मानले जातात आणि म्हणून संपादित होतात. बहुतेक संकेतस्थळांच्या धोरणातच असा उल्लेख केलेला असतो. आणि तरीही असे विनोद अस्तित्वात रहातातच. व्य.नि, खरडी अशा स्वरुपात ते फिरत रहातात. ते जनसंस्कृतीचा एक सच्चा (आणि इरसाल) अविष्कार असतात, म्हणूनच त्यांचं अस्तित्व मुळापासून नष्ट करणं अशक्यप्राय असतं. आणि तरीही, (अगदी इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारेसुद्धा) अनेक लोक अशा विनोदांच्या अभिव्यक्तीत अडथळे आणताना दिसतात. विनोदाचं लक्ष्य असणाऱ्या व्यक्ती/समूहावर विनोदांतून एक प्रकारे हल्लाच केला जातो असं मानणारे हे लोक असतात. पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच. त्यांना अभिव्यक्त होण्यापासून रोखण्यानं काही हशील होत असेल, तर ते एवढंच की ही अभिव्यक्ती रोखणाऱ्याची दमनशक्ती आणि नियंत्रणपिपासू (कंट्रोल फ्रीक) वृत्ती यांचं त्यातून प्रदर्शन होतं. त्यांचे त्या दमनाच्या समर्थनार्थ दिले जाणारे सर्व युक्तिवाद हे अंतिमत: खोटे आणि काहीसे बावळटदेखील ठरतात. पण म्हणजे विनोद हे अगदी बिनमहत्त्वाचे असतात का? तर अगदी तसंही म्हणता येणार नाही. तो लोकांनी लोकांसाठी आणि लोकांविषयी बनवलेला असा म्हणजेच एक निर्मम लोकशाहीवादी अविष्कार असतो. शब्दांशी, संकल्पनांशी खेळण्याचं लोकांना उपलब्ध असं ते एक साधंसोपं खेळणं आहे. आपल्याकडे गोष्टी सांगण्याची एक फार मोठी मौखिक परंपरा पूर्वीपासून होती. आजच्या डेली सोपच्या गदारोळात ती नष्ट झालेली आहे. पण तरीही ही विनोद पसरवण्याची परंपरा मात्र अजूनही चांगलीच जिवंत आहे. किंबहुना आधुनिक तंत्रज्ञान तिला पोषकच ठरलेलं आहे. जगाच्या एका कोपऱ्यात (उदा: इजिप्त किंवा पुणे) चाललेल्या राजकीय घडामोडींबद्दलचा एखादा विनोद जगाच्या दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यात (उदा: सिंगापूर) बसलेला कुणीतरी जगाच्या तिसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या (उदा: डीसी) कुणालातरी पाठवतो, आणि मग चेहरापुस्तक, व्य.नि. वगैरेंद्वारे तो असाच पुढे पसरत जातो. विनोदांमधून मिळणाऱ्या आनंदामुळे हे सर्व होऊ शकतं. थोडक्यात, विनोद तितकाही बिनमहत्त्वाचा नसतो. पण तरीही, शब्दांचा वापर करणाऱ्या साधनांचा विचार केला असता खरं तर जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य अशांचा राजकीय परिणाम विनोदांहून अधिक घातक असतो. हजरजबाबीपणा किंवा विनोद हे त्या मानानं शस्त्र म्हणून कमी प्रभावी आहेत. पण मग विनोदांमुळे लोक इतके का चिडतात? आणि त्यांना सेन्सॉर करण्यात इतकी उर्जा आणि वेळ का घालवतात? हुकुमशाही राजवटींत किंवा दमनशाही राजवटींत कुजबुजलेला एखादा विनोदसुद्धा तुमच्या छळाचं कारण का ठरू शकतो? ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांच्या आणि पर्यायानं लोकांच्या अभिव्यक्तीच्या दोऱ्या असतात, अशांना अर्थात विनोदाचे बळी व्हावं लागतं, कारण ज्या सामाजिक वातावरणात विनोद फोफावतो असं वातावरण बनू देणं न देणं त्यांच्याच हातात असतं. उदा. शीतयुद्धाच्या काळातला हा विनोद पहा: स्टालिन, क्रुश्चेव आणि ब्रेझ्नेव एकदा आगगाडीनं जात असतात. गाडी अचानक थांबते. स्टालिन म्हणतो, “मी गाडीची हालहवाल बघतो.” तो खाली उतरतो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला गोळी घालायचा आदेश देऊन आलोय.” पण काहीच होत नाही. मग क्रुश्चेव जातो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला रि-हॅबिलीटेट करून आलोय.” तरीही काहीच होत नाही. मग ब्रेझ्नेव उभा राहतो. खिडक्यांवरचे काळे पडदे तो ओढून घेतो. डबा पूर्ण अंधारात जातो. “पहा,” तो म्हणतो, “गाडी चालू झाली आहे.” (टीप: या तीन नेत्यांच्या कम्युनिस्ट राजवटी ज्यांनी भोगल्या किंवा दुरून पाहिल्या आहेत त्यांना या विनोदाची धार लक्षात येईल. बाकीच्यांना त्या काळाची किमान माहिती असावी लागेल (उदा: http://en.wikipedia.org/wiki/Rehabilitation_%28Soviet%29 हे पहा). नाहीतर, हेटाळणी करायला लायक वाटणार्‍या आपापल्या फेवरिट संकेतस्थळांवरच्या वेगवेगळ्या व्हिलनना इथं कल्पून, आणि गोळ्या घालण्याऐवजी प्रतिसाद उडवणं, खातं गोठवणं वगैरे कल्पना करून थोडी मजा घेता येईल.) किंवा हे पहा: कम्युनिस्ट पार्टी मुख्यालयातून फोन येतो: “काय? या वर्षी पीकपाणी कसं काय आहे?” शेतकरी: “उत्तम आहे साहेब. बटाटे इतके आले आहेत की त्यांची एकच रास रचली तर ती पार देवाच्या पायांपाशी पोहोचेल.” पार्टी मुख्यालय: “पण देव तर अस्तित्वातच नाही.” शेतकरी: “मग बटाटे तरी कुठे आहेत, साहेब?” हे विनोद सार्वजानिक ठिकाणी सांगतासुद्धा येत नसत. मग ते छापील साहित्यात सापडणं तर अशक्यच होतं. आणि तरीही ते सगळ्यांना माहीत असायचे आणि ते हिरीरीनं एकमेकांना सांगितले जायचे. अगदी त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात हे माहीत असूनही. आणि तरीही प्रत्यक्षात सोव्हिएत साम्राज्य कोसळून पाडण्यात या विनोदांचा हातभार शून्य होता. साम्राज्य कोसळण्याच्या पहिल्या दहा कारणांमध्ये कुणीही या विनोदांचा समावेश करणार नाही. विनोद सांगणं हा काही विद्रोह नव्हता. साम्राज्यात सर्वत्र पसरलेल्या परात्मभावाचा (एलिअनेशन) मात्र ते आरसा होते. ते सांगण्यात मजा होती. ते प्रतिबंधित होते यामुळे ती मजा अधिक होती. बाकीच्या कंटाळवाण्या वातावरणात सामान्य माणसाचा तो एक विरंगुळा होता. प्रचंड सत्ता थोड्याच लोकांच्या हातात असण्याच्या परिस्थितीत जनसामान्यांसाठीची ती एक मौज होती. मौजमजेच्या इतर साधनांप्रमाणेच यातही असलेला धोका हा त्या मौजेत भर घालत असे. लोकांचे विचार किंवा भावना यांवर जेव्हा पोलिसी कारवाईचा बडगा असतो, तेव्हा विनोद सांगणाऱ्यांना अधिक चेव येतो. किंवा अगदी बौद्धिक, सांस्कृतिक उच्चभ्रूपणाच्या बेगडी वातावरणातही जो दंभ असतो, तो देखील अशा चेव येण्यासाठीचं पुरेसं कारण असू शकतो. उदा: कम्युनिस्ट राजवटीत आस्तिकांच्या मूर्खपणाविषयी विनोद करायला परवानगी असे आणि हा एक उच्चभ्रूपणा आहे असा त्यात अंतर्भूत दंभ असे. ज्या भावना किंवा विचार अधिकृत (state sponsored) असत ते तुमच्यावर सतत आदळत असत. त्यांच्या या कर्णकर्कश साखळदंडांपासून तात्पुरती सुटका मिळवण्याचा विनोद हा एक मार्ग होता. पण अगदी प्रगल्भ लोकशाहीसुद्धा अशा दमनप्रक्रियेतून मुक्त असेलच असं नाही. काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन विद्यापीठात घडलेली गोष्ट आहे. ‘गे प्राईड’ दरम्यान एका विद्यार्थ्यानं गंमत म्हणून एक भित्तिचित्र विद्यापीठात डकवलं. त्यावर ‘पशुगमन प्राईड आठवडा’ ('Bestiality Pride Week' – पहा: http://en.wikipedia.org/wiki/Bestiality) असं लिहिलं होतं. समलिंगी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्या मुलाची विद्यापीठातून हकालपट्टी झाली. आता गंमत म्हणजे ‘गे प्राईड’ दरम्यान निघणाऱ्या परेडमध्ये पुष्कळ विनोदी गोष्टी घडत असतात. उदा: ननच्या पोशाखातले पुरुष स्वत:ला ‘Sisters of Perpetual Indulgence’ म्हणवून घेत परेडमध्ये सहभागी होतात. किंवा S&M लेस्बिअन्स (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Sadomasochism) ‘काळं-निळं सुंदर असतं’ अशा घोषवाक्यासहित त्यात सहभागी होतात. (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Black_is_beautiful 'ब्लॅक इज ब्यूटिफुल' या वंशभेदविरोधी घोषवाक्यावरची ही कोटी आहे.) आता ज्या संस्कृतीत या गोष्टींची चेष्टा होते तीत या विद्यार्थ्याला होमोफोबिक म्हणून हाकलून देणं ही एक प्रकारची गळचेपी आहे. थोडक्यात, ज्यांना इतरांवर प्रच्छन्न टीका करायची असते त्यांना ती स्वत:वर झालेली मूग गिळून सहन करून घ्यावी लागते; त्याची तयारी ठेवायला लागते. ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांचं नियंत्रण असतं ते नेहमीच विनोदांच्या तथाकथित ताकदीबद्दल नको तितके गैरसमज बाळगून असतात आणि समाजाच्या नैतिकतेचे आपणच तारणहार असल्याचा उगाचच गैरसमज करून असतात. उदा: १९४८मध्ये बी.बी.सी. मध्ये खालील विषयांवरच्या विनोदांना बंदी होती: मुताऱ्या, स्त्रैण पुरुष, अंजीर-पानं (Fig-leaves पहा http://en.wikipedia.org/wiki/Fig_leaf), स्त्रियांची अंतर्वस्त्रं... तर १९४९मध्ये या यादीत समाविष्ट झालेले विषय पहा: रंगांचा संदर्भ (पिवळा, निगर, काळा), भारतीय योगी (पण फकीराबद्दलचे विनोद चालतील!) इतकंच काय, काही काळ ‘काळा बाजार’ या विषयावरसुद्धा विनोद करता येत नसे (काय करता, रंग पडला नं!). दुसऱ्या महायुद्धादरम्यान मार्शल गोअरिंगच्या लठ्ठपणावर विनोद केलेला चालेल का, यावर बी.बी.सी. मध्ये गरमागरम चर्चा झाल्या! एकंदरीत, ज्यांच्यापाशी अभिव्यक्ती सेन्सॉर करण्याची सत्ता असते ते आपली नैतिकता हीच समाजाची नैतिकता आहे असा दिखावा करत ती इतरांवर लादतात, तर त्या निर्बंधांना न जुमानणारे किंवा अधिकृत नैतिकतेहून वेगळी नैतिकता असणारे आपल्याला उपलब्ध फटींतून त्या लादलेल्या नैतिकतेवर विनोद करत राहतात, आणि अर्थात संपादित होण्याचा धोका पत्करतात. ज्यांच्यापाशी सत्ता असते त्यांचे विनोद जर इतरांना दुखावत असतील तर त्याची फिकीर सत्ताधारी कधीच करत नाहीत. उलट त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात. आपण प्रच्छन्न सत्ता उपभोगतो आहोत हे या सत्ताधाऱ्यांना कधीच मान्य होत नाही. अनिर्बंध हुकुमशाहीचं ते एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. मग कधीतरी याचा कडेलोट होतो आणि लोक म्हणतात, ‘आता बास! आम्हाला जे विनोद करायचे आहेत ते आम्ही करणारच. मग ते तुम्हाला आवडोत न आवडोत, आम्हाला त्याची पर्वा नाही. आमचे मार्ग आम्ही शोधून काढू! गर्जा जयजयकार विनोदाचा आणि विनोद करायच्या हक्काचा!!!’ टीप: कोणत्याही मराठी/अमराठी संकेतस्थळावर घडलेल्या ताज्या/शिळ्या घटनांचा किंवा त्यांच्याशी संबंधित युनिक/डुप्लीकेट आय.डींचा या धाग्याशी सुतराम संबंध नाही. तशी शंका आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

प्रतिक्रिया द्या
38662 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Sun, 02/27/2011 - 04:31 नवीन
सत्ताधार्‍यांच्या लक्षात या लेखाचा अर्थ आलाच नव्हता. :) टीपः मी सत्ताधारी नाही. गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Sun, 02/27/2011 - 07:04 नवीन
>>सत्ताधार्‍यांच्या लक्षात या लेखाचा अर्थ आलाच नव्हता. हे खरं मानावं तर तुम्ही सत्ताधारी आहात अशी कबुली दिसते. >>टीपः मी सत्ताधारी नाही. गैरसमज नसावा. पण मग हे खरं मानाव तर अजुन गडबड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ज
ज्ञानेश... Sun, 02/27/2011 - 04:42 नवीन
बहुत बढिया लेख आणि प्रतिसाद. तबियत खुश झाली. (वुडहाऊसला मीसुद्धा शोधत होतो लेखात.)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 02/27/2011 - 04:43 नवीन
या वाक्याने सगळेच समजले. ;) (म्हणजे पुढचा लेख वाचला नाही असे नव्हे. लेख वाचला. लेख आणि प्रतिक्रीयासुद्धा छान आहेत)
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Sun, 02/27/2011 - 08:12 नवीन
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची स्वतंत्र अमेरिकेतही कशी गळचेपी होते हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न आहे
हे होतं हे मान्यच आहे. याचं उदाहरण तर मूळ लेखातच दिलेलं आहे. पण अगदी राष्ट्राध्यक्षांविषयीची प्रच्छन्न टिंगल तिथे जाहीर करता येते. त्यामुळे शासनव्यवस्था दुर्बळ होते असं दिसत नाही. याउलट -
राजा उंदराची गोष्ट ही बोधकथा आहे. त्यात सत्यांश असला तरी पूर्णतः सत्यकथा नव्हे. राजाने उंदराकडे लक्ष देऊ नये हे खरे असले तरी अनेक उंदिर एकत्र येऊन रोज राजाची फजिती करू लागणे किंवा एकच उंदिर रोज येऊन राजाची फजिती करू लागणे याची शक्यता नाकारता येत नाही.
बोधकथा आहे हे बरोबरच आहे. नक्की कोणत्या गोष्टींमुळे शासनव्यवस्था दुर्बळ होते याविषयी सारासार विचार करून नक्की कशाचं दमन करायचं आणि कशाकडे क्षुल्लक मानून दुर्लक्ष करायचं याविषयी शासनकर्ते वेळोवेळी निर्णय घेत असतात. त्या निर्णयांवरून शासनकर्त्यांचा वास्तवावर कितपत ताबा आहे हे जनसामान्यांना दिसत असतं. किरकोळ गोष्टींचं दमन होऊ लागतं, तेव्हा शासनकर्त्यांचा वास्तवावर ताबा सुटत चाललेला आहे याचं ते एक निदर्शक लक्षण बनतं. राजा-उंदीर गोष्टीत हेच दिसतं. हा एक प्रकारचा पॅरानोईआ असतो. प्रत्येक क्षुल्लक गोष्टीत स्वतःच्या (किंवा स्वतःच्या सत्तेच्या) नाशाची बीजं दिसू लागणं हे म्हणून धोक्याचं ठरतं. 'शासनकर्त्यांचा पॅरानोईआ' याची इतिहासात पुष्कळ उदाहरणं दिसतात.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 02/28/2011 - 00:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Mon, 02/28/2011 - 07:17 नवीन
नक्की हुकूमशहांना वावडे असते असे काही त्या लेखातील उदाहरणावरून स्पष्ट होत नाही, असे मला वाटले. किंबहूना मला वाटते प्राडॉं.नी दिलेल्या उदाहरणात क्रुश्चेव अथवा मी दिलेल्या उदाहरणातील बाळासाहेब (जे हुकूमशाहीचे समर्थक आहेत) हे दोघेही स्वतःवर विनोद केला तरी हसताना दिसतात.
क्रुश्चेवच्या किश्श्याची सत्यासत्यता मला माहीत नाही, पण दिलेल्या उदाहरणांत हसणार्‍या व्यक्ती खाजगीत हसत आहेत ही कळीची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कम्युनिस्ट शासनकर्त्यांबद्दलचे विनोद त्यांच्या कारकीर्दीत एखाद्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ शकत नव्हते. खाजगी अवकाश आणि सार्वजनिक अवकाश यांत मोठा फरक आहे. इतकंच काय, कम्युनिस्ट राजवटीत तुमचा जोडीदार किंवा पालक/पाल्य अशी एखादी तुमच्या जवळची व्यक्ती खबर्‍या असू शकत असे. त्यामुळे अगदी खाजगी अवकाशही संकुचित होता. उद्या जर तुमचे व्य.नि. कुणी वाचत आहे आणि त्यांतल्या शासनकर्त्यांविषयीच्या टिप्पणीवरून तुमचं खातं उडवलं जाऊ शकतं अशी परिस्थिती आली तर कसं वाटेल? तसंच काहीसं हे आहे. लेखातला या विषयीचा मजकूर खाली पुन्हा दिलेला आहे:
त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/28/2011 - 08:02 नवीन
माहितीपूर्ण लेख विचार करण्यास प्रवृत्त करणारा असा आहे. काही मतं संपूर्णपणे पटलीच असं नाही, उदा: विनोदामधे सत्तापालट करण्याची शक्ती नसते. विनोद हे एक प्रकारे स्वतःला व्यक्त करणं आहे. विचार विनोदी पद्धतीनेही मांडले जाऊ शकतात आणि विचार बदल घडवून आणण्यात कारणीभूत होऊ शकतात. एखाद्याची चूक दाखवताना योग्य तरीही विनोदी पद्धतीने मांडली तर ती चूक मान्य करणं सोपं जातं, होऊ शकतं. अर्थात कम्युनिस्ट राजवटींना हे कितपत लागू पडेल याबद्दल मला शंका आहे. स्वतःवर विनोदी पद्धतीने भाष्य करून दुसर्‍याची चुक हसताहसता दाखवता येते.
  • Log in or register to post comments
प
पंगा Mon, 02/28/2011 - 08:17 नवीन
काही मतं संपूर्णपणे पटलीच असं नाही, उदा: विनोदामधे सत्तापालट करण्याची शक्ती नसते.
याबद्दल काही विवेचन करू शकाल काय? काही उदाहरणे वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/01/2011 - 09:47 नवीन
पण विनोद हे एक प्रकारचं वक्तव्य, अभिव्यक्ती आहे. एखादा विचार गंभीरपणे मांडता येतो तसाच विनोदी पद्धतीनेही मांडता येतो. एखादी गोष्ट आवडत नाही* हे सांगण्यासाठी गंभीर निबंध लिहीता येतो नाहीतर त्या गोष्टीचं विडंबनही करता येतं. माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही. *उदा: पूर्वी मिपावरच्या खादाडीत ज्या प्रकारची चित्रं दिसायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Tue, 03/01/2011 - 18:46 नवीन
एखादी गोष्ट आवडत नाही* हे सांगण्यासाठी गंभीर निबंध लिहीता येतो नाहीतर त्या गोष्टीचं विडंबनही करता येतं. माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही. *उदा: पूर्वी मिपावरच्या खादाडीत ज्या प्रकारची चित्रं दिसायची.
मतपरिवर्तन... कदाचित. पण सत्तापालट? "Imitation, though often not the sincerest form of flattery, is certainly the cheapest." © 2011.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चिंतातुर जंतू Tue, 03/01/2011 - 13:28 नवीन
माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही.
मुळात अभिव्यक्ती आणि प्रत्यक्ष कृती यांमध्ये मूलभूत फरक आहे आणि तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादेविषयी कळीचा मुद्दा ठरतो. एखाद्याला थोबाडीत मारणं आणि त्याच्याविषयी अद्वातद्वा बोलणं यांत फरक केला जातो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांविषयी विनोद करणं कायदेशीर असेल, पण त्याला थोबाडीत मारणं किंवा त्याच्या खुनाची धमकी देणं मात्र तसं ठरणार नाही. विनोद, खुनाची धमकी आणि थोबाडीत मारणं या उतरंडीत विनोद सगळ्यात मवाळ ठरेल असं वाटतं. अवांतरः अगदी स्वामित्वहक्क कायद्यांमध्येही स्वामित्वहक्क असणार्‍या एखाद्या कृतीचा पॅरडीसाठीचा वापर (उद्धृत करणं वगैरे) मान्य होऊ शकतो. आता मूळ लेखातल्या हुकुमशाहीच्या विशिष्ट मुद्द्याकडे वळायचं म्हटलं तर असं सांगता येईल, की कम्युनिस्ट देश असोत किंवा अगदी आताची इजिप्तमधली परिस्थिती असो, निव्वळ विनोदानं (किंवा अभिव्यक्तीनं देखील) सत्ताबदल होत नाही. त्यासाठी लोक रस्त्यावर उतरणं, मोर्चे, धरणं, संप अशा अहिंसक कृती किंवा हिंसक क्रांतिकारी कारवाया अशा सरकारविरोधी कृतींची गरज भासते. म्हणून विनोद आपोआप सत्ताबदल करत नाही. या बाबतीत अभिव्यक्ती आणि विनोद दोन्ही अपुरे मानता येतील.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Tue, 08/30/2011 - 16:52 नवीन
विनोदावरचं एक चांगलं वैचारीक म्हणून वाचायला मिळालं म्हणून लेख वरती काढतोय
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 08/30/2011 - 17:14 नवीन
सहा महिन्यांपूर्वी हा लेख वाचलेला होता. तेव्हाही आवडला होता, आणि पुनर्वाचनातही तितकाच आवडला. हा लेख म्हणजे वैचारिक लेखन कसं करावं याचा आदर्श नमुना आहे. नवीन लेखकांना मार्गदर्शनाविषयी चर्चा चालू आहे. त्यातल्या मुद्द्यांत भर घालून, ज्यांना आपलं लेखन सुधारायचं असेल त्यांनी अशा आदर्शांचा अभ्यास करावा असं सुचवतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/30/2011 - 21:19 नवीन
आचार्य अत्र्यांनी विनोदानेच विरोधकांची काय भयंकर हालत केली होती याची साक्ष मिळण्यासाठी त्यांची पुस्तकेच पुरेशी आहेत... उदा- हशा आणी टाळ्या, वाघनखं ...
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 08/30/2011 - 21:25 नवीन
लेख आणि अधलेमधले विनोद छान आहेत.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 09/01/2011 - 00:35 नवीन
'सॅटॅनिक व्हर्सेस' मधला कवी बाल आठवला. खरे तर सगळे पुस्तकच आठवले.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 09/01/2011 - 06:11 नवीन
<<<हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं? काय सांगता!! बाळासाहेब ठाकरे तर मस्त विनोद करतात, व्यंगचित्रे काढतात आणि मिपाचे तात्या सुद्धा मला विनोद आवडणारेच वाटले. माझं आपलं निरीक्षण बाकी कै नै.
  • Log in or register to post comments
म
मन१ Fri, 11/25/2011 - 07:39 नवीन
अजून एक बुकमार्क मिळाला. तांत्रिक टीमला एक हात जोडून विनंती:- मायबाप इथून पुधं जर तांत्रिक बदल करायचे असतील तर आधी पूर्व कल्पना द्यावी. लाख लाख उपकार होतील. आम्ही आमच्या आवडत्या लेखांच्या लिंका कुठे अजून साठवून ठेवू. फार फार वेळ जातो हो एक एक चांगला धागा शोधायला. आपला उपकाराभिलाषी
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 01/09/2015 - 16:43 नवीन
चांगला धागा. फ्रान्समधे घडलेल्या घटनेने परत या धाग्याची आठवण झाली म्हणून वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 01/09/2015 - 16:55 नवीन
माझा मिपा वर चा सगळ्यात आवडता धागा आहे हा.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 01/09/2015 - 18:57 नवीन
अतिरेकी मेले त्याचं वाईट वाटलं. कुठल्याही पोलिसाला या अतिरेक्यांना दररोज अगदी आराSSSमात टॉर्चर करण्यात जो आनंद मिळाला असता त्याला ते मुकले असं वाटतं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा