Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फायनान्सची तोंडओळख (भाग ४): घसारा, कॉस्टिंग आणि ब्रेक इव्हन पॉईंट

क
क्लिंटन यांनी
Sat, 02/26/2011 - 07:31  ·  लेख
लेख
फायनान्सची तोंडओळख (भाग ४): घसारा, कॉस्टिंग आणि ब्रेक इव्हन पॉईंट या भागाची काठिण्यपातळी: सोपी यापूर्वीचे लेखन फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या फायनान्सची तोंडओळख (भाग १): व्याजाचे दर आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी फायनान्सची तोंडओळख (भाग २): Annuity फायनान्सची तोंडओळख (भाग ३): एफिशिएंट मार्केट आणि फायदा-तोटा पहिल्या भागात आपण बघितले की जादूगार राम कुमारने १ जानेवारी २०११ रोजी आपल्याकडील जादुच्या छड्या विकल्या. अंदाजाप्रमाणे एकूण २०० छड्या प्रत्येकी १५०० रुपयांना विकल्या गेल्या (कारण गुंतवणुकदारांनी मागितलेला व्याजाचा दर ४% पेक्षा जास्त होता). या व्यवहारात आपल्याला नक्की किती फायदा झाला याचा हिशोब तो करू लागला. छड्या विकून एकूण प्राप्ती झाली १५०० गुणिले २०० = ३,००,००० म्हणजे ३ लाख रुपये. आणि त्यासाठी रामला किती खर्च आला? तो पुढीलप्रमाणे: १. रामला प्रत्येक छडी तयार करण्यासाठी लाकडे आणि विविध रसायने हा कच्चा माल लागे. या कच्च्या मालाची किंमत प्रत्येक छडीमागे प्रत्येकी ९०० रुपये होती. म्हणजे २०० छड्या तयार करायला लागणारा कच्च्या मालाचा खर्च ९०० गुणिले २०० बरोबर १,८०,००० म्हणजे १ लाख ८० हजार रुपये. २. पेपरात पानभर जाहिरात द्यायला लागलेला खर्च: १०,००० (दहा हजार) रुपये. ३. रामने छड्या विकण्यासाठी एक हॉल भाड्याने घेतला. त्या हॉलचे भाडे अर्थातच त्याला द्यावे लागले. तसेच त्याला त्या हॉलमध्ये वीजेचा खर्च आणि इतर काही खर्च झाले. या सगळ्याचा खर्च: ४०,००० (चाळीस हजार) रुपये. म्हणजे एकूण खर्च आला २ लाख ३० हजार रुपये आणि प्राप्ती झाली ३ लाखाची. म्हणजे एकूण फायदा झाला ७० हजाराचा. फायद्याची रक्कम बघून राममधील ’बिझनेसमन’ जागा झाला आणि त्याने पूर्णवेळ छड्यांच्या बिझनेसमध्ये राहायचे ठरविले. त्याने ताबडतोब ’कुमार एंटरप्रायझेस’ या नव्या Sole Proprietership ची सुरवात केली आणि नव्या बिझनेसचा जन्म १ जानेवारी २०११ रोजी झाला. त्याने १० लाख रुपये नव्या बिझनेसमध्ये स्वत:चे भांडवल म्हणून टाकले. अर्थातच या उद्योगाचा मालक एकटा रामच होता. या उद्योगाचे पोटेंशियल लक्षात घेऊन रामपूर नागरी सहकारी बॅंकेने त्याला १० लाखांचे कर्ज दसादशे १०% अशा सवलतीच्या दराने दिले. रामपूरमध्ये सर्व कामे पटापट होत असल्यामुळे १ जानेवारी २०११ रोजी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून नवा बिझनेस सुरू झाला. कुमार एंटरप्रायझेसने सर्वप्रथम गावात १० लाखांना एक चांगले ऑफिस घेतले.अकाऊंटिंगच्या परिभाषेत या ऑफिसला "Asset" म्हणतात.याचे कारण म्हणजे ऑफिस हे बिझनेससाठी कॅश फ्लो बनविण्यासाठी वापरले जाणार आहे. हे ऑफिस १० वर्षे वापरले जाणे अपेक्षित होते (त्यानंतर नवीन जागेत स्थलांतर करायचा बेत होता). अजून १० वर्षांनी ऑफिसच्या जागेला काहीही किंमत येणार नाही असे गृहित धरू.म्हणजे ऑफिसची जाग घ्यायला आज दहा लाख रूपये खर्च केला असला तरी ती जागा आणखी दहा वर्षे वापरली जाणार आहे.म्हणूनच ऑफिस विकत घ्यायला आलेला १० लाख खर्च पूर्णपणे याच वर्षी दाखविता येत नाही.तर तो खर्च दहा वर्षांपर्यंत विभागून दाखवायचा म्हणजेच १० लाखांची Asset १० वर्षांच्या कालावधीत depreciate करायची आणि दरवर्षी १ लाख रूपये घसारा होतो. परत एकदा-- ऑफिस जरी या वर्षी घेतले असले तरी ते अजून १० वर्षे वापरले जाणार असल्यामुळे त्यासाठीचा खर्च एकाच वर्षी न धरता १० वर्षांच्या कालावधीत विभागायचा! तो खर्च दरवर्षी १ लाख रुपये येतो. (प्रत्यक्षात घसारा दरवर्षी सारखा म्हणजे १ लाख नसतो. त्याविषयी नंतरच्या कुठच्यातरी भागात. सध्यापुरते दरवर्षी १ लाख रूपये घसारा समजू) रामने पुढे दाखविल्याप्रमाणे आपले व्हिजिटिंग कार्ड बनवून घेतले. तसेच रामने कामासाठी सेक्रेटरी आणि इतर स्टाफ नेमला. सुमंत कुमार हा त्याचा फायनान्स मॅनेजर होता. सुमंत आणि इतर स्टाफच्या पगारावर त्याला दरवर्षी ५ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित होते. तसेच ऑफिससाठी लागणारी स्टेशनेरी, वीज आणि पाण्याचे बील याचा खर्च दरवर्षी १ लाख रूपये येणार होता.बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज दरवर्षी १ लाख रूपये येणार होते. म्हणजे हा एकूण खर्च ७ लाख रूपये होता. घसारा धरून हा खर्च ८ लाख रुपये प्रतिवर्षी येणार! याचाच अर्थ त्याने दरवर्षी एक छडी विकली काय किंवा १० हजार छड्या विकल्या काय हा एकूण ८ लाख रूपये खर्च स्थिरच होता. या खर्चाला Fixed Cost म्हणतात. याचे कारण हा खर्च किती छड्या विकल्या यावर अवलंबून नसतो आणि तर तो खर्च स्थिर असतो. तर छड्या बनवायला लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च किती छड्या बनविल्या त्याच्यावर अवलंबून असतो.म्हणजे एकच छडी बनविली तर त्याला ९०० रूपये खर्च येईल आणि १० हजार छड्या बनविल्या तर एकूण ९०० गुणिले १० हजार = ९० लाख रूपये खर्च येईल. या प्रकारच्या खर्चाला Variable Cost म्हणतात कारण हा खर्च किती छड्या बनविल्या त्यावर अवलंबून असतो. म्हणजेच कुमार एंटरप्रायझेसला होणारा एकूण खर्च: Fixed Cost + Variable Cost एवढा असेल. समजा एका वर्षात ’क्ष’ इतक्या छड्या विकल्या तर Fixed Cost असेल ८ लाख रुपये आणि Variable Cost असेल ९०० क्ष. म्हणजेच एकूण खर्च झाला ८ लाख + ९०० क्ष. समजा वर्षभरात छड्यांचा दर सारखाच राहिला (१५०० रूपये) तर त्याला ’क्ष छड्यांपासून १५०० क्ष रुपये मिळतील. म्हणजेच: एकूण प्राप्ती: १५०० क्ष एकूण खर्च: ८ लाख + ९०० क्ष. समजा राम वर्षात केवळ १००० छड्या विकण्यात यशस्वी झाला तर त्याचे एकूण उत्पन: १५०० गुणिले १००० = १५ लाख असेल. आणि एकूण खर्च ८ लाख + ९०० गुणिले १००० = १७ लाख. याचाच अर्थ कुमार एन्टरप्रायझेसला २ लाखाचा तोटा होईल. याउलट वर्षात ५००० छड्या विकल्या गेल्या तर एकूण प्राप्ती असेल: १५०० गुणिले ५००० = ७५ लाख रुपये. आणि एकूण खर्च ८ लाख + ९०० गुणिले ५००० = ५३ लाख. याचाच अर्थ कुमार एन्टरप्रायझेसला २२ लाखाचा फायदा होईल. छड्यांच्या संख्येबरोबर एकूण प्राप्ती आणि खर्च कसे बदलतील हे पुढील आकृतीत दाखवले आहे. याचाच अर्थ ना-नफा ना-तोटा परिस्थितीसाठी एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च सारखे असले पाहिजेत. म्हणजेच ना-नफा ना-तोटा परिस्थितीसाठी १५०० क्ष = ८ लाख + ९०० क्ष. समिकरण सोडवून ’क्ष’ ची किंमत मिळते १३३३.३३, म्हणजे समजा १३३४. याचाच अर्थ ना-नफा ना-तोटा परिस्थितीसाठी त्याला दरवर्षी १३३४ छड्या विकाव्या लागतील. त्यापेक्षा कमी छड्या विकल्यास बिझनेसला तोटा होईल तर त्यापेक्षा जास्त छड्या विकल्या गेल्यास बिझनेसला फायदा होईल. यातील १३३४ या ना-नफा ना तोटा बिंदूला 'Break-even point' म्हणतात. कोणत्याही व्यवसायाची Profitability बघण्यासाठी हा Break-even point खूप महत्वाचा असतो.उद्योगाने आपला Break-even Point अलीकडे आणला तर ना-नफा ना-तोटा परिस्थिती लवकर येईल (कमी वस्तूंचे उत्पादन करून) आणि त्यानंतर फायदा वाढेल. तेव्हा या भागात बघितलेले महत्वाच्या संकल्पना पुढीलप्रमाणे: १. घसारा (Depreciation) २. Fixed cost ३. Variable cost ४. Break-even point

Book traversal links for फायनान्सची तोंडओळख (भाग ४): घसारा, कॉस्टिंग आणि ब्रेक इव्हन पॉईंट

  • ‹ फायनान्सची तोंडओळख (भाग ३): एफिशिएंट मार्केट आणि फायदा-तोटा
  • Up
  • फायनान्सची तोंडओळख (भाग ५): बॅलन्स शीट ›

प्रतिक्रिया द्या
3597 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/26/2011 - 08:46 नवीन
'छडी' ऐवजी 'नाडी' असा हिशोब केला तर विश्लेषण कसे होईल?
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/26/2011 - 13:25 नवीन
तुम्हाला सध्या जळीकाष्ठी, काष्ठी, पाषाणी 'नाडीच दिसते का ? की ओकांनी तुम्हाला 'पाखंडी' म्हटल्यामुळे राग आला आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 02/27/2011 - 11:32 नवीन
क्लिंटन कष्ट घेऊन इतके छान लेख लिहित आहेत. इथे अवांतर वाद होऊ नयेत असे मनापासून वाटते. नाडीवर गोंधळ घालायला किमान ५० नवे-जुने धागे जालावर आहेत. कमी वाटत असतील तर आपण ४ नवीन पण काढू. पण कृपया इथे नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मोहन Sat, 02/26/2011 - 09:57 नवीन
सुंदर व अतिशय सोपे करून सांगीतले धन्यवाद. पु.भा.अ.
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sat, 02/26/2011 - 10:26 नवीन
अतिशय उपयुक्त माहिती. नविन प्रॉड्क्ट बाजारात उतरवताना एवढ सगळ गणित़ कधी केल नाही . अर्थात माझ्या प्रॉड्क्टसची गणितही उलटी पालटी आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 02/26/2011 - 12:24 नवीन
हा भागही आवडला.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/26/2011 - 13:26 नवीन
हाही भाग आवडला कारण आता जरा समजु लागले आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 02/26/2011 - 20:18 नवीन
मूळ गोष्ट फुलवत नेऊन तिच्या आधारे संकल्पना सांगितल्यामुळे समजण्यामागचे दरलेखी, दरडोई 'ओव्हरहेड्स' कमी झाले आहेत. हेच थोडं पुढे नेऊन इकॉनॉमी ऑफ स्केलविषयीही सांगावं. म्हणजे एकच छडी बनवायची तर कदाचित ९०० ऐवजी १५०० रुपये लागू शकतील कारण तिथेही काही फिक्स्ड कॉस्ट्स असतात.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 02/27/2011 - 06:35 नवीन
असेच म्हणतो. >>एकच छडी बनवायची तर कदाचित ९०० ऐवजी १५०० रुपये लागू शकतील कारण तिथेही काही फिक्स्ड कॉस्ट्स असतात. त्याचबरोबर ट्रेड डिस्काउंट वगैरेही येऊदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा