मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग
बस. नीट लिहूयात ह्यावर म्हणून कित्येक दिवस थांबलो. पण तशी बांधणी/रचना करताच येत नाहीये.
जी काही रोचक माहिती मी मिळवलिये तीही विस्कळित. आता पुन्हा त्याचं कंपायलेशन करण्यापेक्षा जसं आहे तसच तुमच्यासमोर ठेवतोय. प्लीईईईज गोड मानून घ्या. आणि जमेल तशी भर घाला.
हे मी का लिहितोय?
ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे तीन धर्म ह्या तीन संस्कृती पूर्णतः वेगळ्या नव्हेत. एका बद्दल वाचताना सहजच त्याचं दुसऱ्याबद्दलचं साम्य डोकावून जायचं. ह्याचं कारण त्यांच्या (जवळ जवळ) एक समान मूलभूत श्रद्धा (कट्टर एकेश्वरवाद वगैरे), त्यांची प्राचीन घटना वर्णने, त्यांच्या वेशभूषा वगैरे. मराठ्यांचा , आमच्या शिवरायांचा इतिहास वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की हे
परकीय सुलतान आले कुठुन? एखादी मूर्ती, मंदीर दिसताच ह्यांच्यातले बहुतांश असे पिसाळल्यासारखे तोड्-फोड का करत सुटायचे? नक्की त्यांना ह्यापासुन काय प्रॉब्लेम होता? औरंगजेब संगीत द्वेष्टा का होता? का त्यानं जझिया लावला?
मराठ्यांना विरोध केवळ राजकिय कारणाकरता न राहता त्याला धार्मिक रंग कसा चढला?
किंवा उदा:- Ten Commandments चित्रपट बघताना बऱ्याचदा यहुद्यांच्या नेत्यांचे कपडे बघून आजच्या अरब पोषाखाची आठवण होई.
इब्राहिम-अब्राहम, दाउद-डेविड, सोलोमन-सुलेमान ही नावे पुनः पुनः त्यांच्या mythology मध्ये, धर्मग्रंथात येत.
म्हणजेच हे तीनही पूर्णतः वेगळे नव्हेत आणि अगदीच समानही नाहीत.
ते एकाच तत्त्वज्ञानाचा वारसा मात्र जरुर सांगतात -- वारसा अब्राहमाचा, वारसा मूसा(मोझेस), इसा(येशू) आणि प्रेषित महंमदाचा.
अब्राहम-इब्राहिम, दाउद-डेविड, सोलोमन-सुलेमान ह्या त्यांच्या पुराणपुरुषांच्या लोककथा थोड्याफार फरकानं तीनही धर्मात येतात.
O.O.P.S. च्या भाषेत Islam inherits Christian principles, Christanity inherits Jewish principles.
यहुदी धर्माचं extension आहे christanity आणि ख्रिश्चनांचं extension आहे इस्लाम.
हे आहेत Abrahamic धर्म. (आपण "इब्राहिमी " म्हणूयात. )
तर, कुतूहलापोटी एकातून दुसरी दुसरीतून तिसरी अशी लिंक लागत गेली आणि आता आहे ती माहिती मांडावीशी वाटतेय, विस्कळित का असेना. मराठी जालावर ह्याबद्दल फारसं काही दिसलं नाही. निदान माझी ही खर्डेघाशी काही जाणकारांना लिहायला उद्युक्त करेल, उचकावेल आणि प्रतिसादातून अधिक माहिती येत राहिल अशी आशा आहे.
१. मध्य पूर्व म्हणजे नक्की कुठे आहे बुवा? --मध्यपूर्वेचा भूगोल.
--जगाचा नकाशा तुमच्यासमोर आहे असं समजून सांगायचं म्हटलं तर भारताच्या...... पश्चिमेकडून बघत गेल्यास( थोडीशी उत्तर बाजूही पकडून ) हे देश दिसतात-
पाकिस्तान (पूर्वीचा वैदिककालीन आणि वैदिकपूर्व सप्त सिंधूचा प्रदेश ) त्याच्या पश्चिम-उत्तरेला अफगाण( पूर्वीचा "शकुनी"चा गांधार आणि आर्य प्रभावाखालील प्रथम अनार्य "पुश्तू" जमातीचा ), पाकच्या दक्षिण पश्चिमेला इराण ( आधीचा पर्शिया, आपले पारशी बांधव इस्लामिक आक्रमणानंतर इथूनच भारतात आश्रय घेते झाले. ), इराण च्या पश्चिमेला इराक आणि पर्शियन/अरेबिक खाडी, खाडी ओलांडताच आकारानं छोटेसे कुवैत, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि त्यांना लागूनच आकारानं भला मोठा इस्लामची जन्म भूमी सौदी अरब.
ह्या सौदी च्या दक्षिणेला आहे ओमान आणि यमन हे देश आणि अरबी समुद्राची किनारपट्टी. हाच अरबी समुद्र ओलांडून अरब व्यापारी पश्चिम भारतच्या बंदरांवर येत(बहुदा सूरत, कालिकत वगैरे) आणि देबल बंदर( आजचं पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची) तर आख्ख्या आशियातलं महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं.
तर ह्या सौदीच्या पश्चिमेला थेट आफ्रिका खंडाचं उत्तर टोकच येतं. म्हणजे एका लायनीत(पूर्वेकडून पश्चिमेकडे) सौदी, इजिप्त, लिबिया, अल्जिरिया, मोरोक्को हे उत्तर आफ्रिकन देश येतात.
ह्यापैकी सौदी आणि इजिप्त हे एकमेकाला लागून असले तरी त्यांची भूसीमा अत्यल्प आहे.
त्या दोघांच्या मध्ये आहे तांबडा समुद्र.
ह्या दोन्ही देशांच्यावर(नकाशात) आहेत चिमुकले पण धगधगते देशः-
इस्त्राईल, पॅलेस्टाइन, जॉर्डन, लेबानॉन.
ह्या देशांच्या वर(उत्तरेला) आहे इतिहासप्रसिद्ध, ज्यावर अतिप्राचीन काळापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक भीषण लढाया लढल्या गेल्या तो Meditterian sea किंवा भूमध्य समुद्र.
२. असं काय खास आहे बुवा ह्या समुद्राच्या जागेत? ह्याच्या तर जवळ जवळ सर्वच बाजूनं जमीन आहे.
--म्हणून तर तो खास आहे. ह्या समुद्राच्या प्रत्येक काठावर जुन्या काळापासून अनेक विध संस्कृती नांदल्या आहेत.
भांडल्या आहेत. आणि बहुतांश नामशेष झाल्या आहेत. अहो जागतिक जल-मार्ग व्यापार जरा आठवून बघा म्हणजे ह्याचं माहात्म्य लक्षात येईल. ह्याच्या वरती/उत्तरेला युरोपिअन देश आहेत(पूर्वीचे ग्रीको-रोमन साम्राज्य (स्पेन, पोर्तुगाल, इटाली, ग्रीस वगैरे प्रमुख. ) ख्रिश्चनबहुल ), ह्याच्या दक्षिणेला आफ्रिकन देश आहेत (इजिप्त, लिबिया, अल्जिरिया, मोरोक्को-- मुस्लिम बहुल). ह्याच्या पूर्वेला आशियाई देश आहेत इस्राइल, पॅलेस्टाइन, टर्की/तुर्कस्थान (टर्की ह्या trans-continental देशाचा आशियातला भाग)
इथं उल्लेख केलेल्या प्रत्येक देशात स्वतःची अशी एक संस्कृती होती( काहींची आजही आहे), प्रत्येकाची खास अशी पोषाखाची पद्धती होती, खान-पान, भाषा, धार्मिक-संकल्पना ठासून भरल्या होत्या.
अवांतरः- ह्याच समुद्रात क्रीट बेटे आहेत ग्रीस जवळ, जी जिंकण्यासाठी हिटलरने जीवाचा आटापिटा केला आणि ती लढाई त्याला नंतर महागात पडली.
३. संस्कृती होती म्हणताय, मग कुठकुठल्या होत्या बरं ह्या संस्कृती?
४. ह्यांचा धर्मग्रंथ कुठला?
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
६. कुठल्या मोठ्या लढाया/घटना झाल्या मध्यपूर्वेत?
प्रश्न ३ ते ६ आपण पाहू पुढल्या भागात.
टीपः- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे मध्य-पूर्वेत येतात की नाही नक्की सांगता येत नाही.
पाकिस्तान सरकारला मात्र ते स्वतः मध्य-पूर्वेतील महत्त्वाचे राष्ट्र आहे असं दाखवलेलं आवडतं. जुन्या संदर्भ ग्रंथात मात्र पाक-अफगाणचा उल्लेख मध्य-पूर्व म्हणून क्वचितच येतो.
क्रमशः.....
प्रतिक्रिया