रंगताना रंगामध्ये
रंगताना रंगामध्ये
यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी
दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी
पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला
घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी
सोडीयेली धार कशी? सररररर
रंगताना राधा बोले अररररर
बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे
तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे
मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे
रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे
आतातरी थांब ना रे.....!
कान्हा, आतातरी थांब ना रे.....!
अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,
रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II
माळ तुटली कशी? मोती गळले कसे?
कंकण टिचकून हातात रुतले कसे?
कसे ना मला आज कोडे सुटे?
ऐसेकैसे तरंग मनाशी उठे?
मनाशी उठे! मनाशी उठे!!
अरे सांग गिरिधारी केली काय जादूगिरी?
रंगामध्ये न्हाऊनिया का हसतो मुरारी? ...II१II
हातून सुटली कशी? घागर पडली कशी?
खोल पाण्यात जाऊनी बुडली कशी?
डोईवरचा पदर खांदी आला कसा?
रंगी रंगताना रंगात रंगला कसा?
रंगला कसा! रंगला कसा!!
अरे सांग गिरिधारी केली काय चमत्कारी?
रंगामध्ये भिजवली साडी चोळी सारी ...II२II
रासलीला कशा? तुझे रंग कसे?
सार्या गोकुळी आमुचे झाले हसे
रोज येते अभय पाणी भरण्यामिषे
तुझ्याप्रितीचे अजब बुलावे कसे?
बुलावे कसे? बुलावे कसे?
अरे थांब गिरिधारी झाली पुरी प्रितखोरी
रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी ...II३II
गंगाधर मुटे
.......................................................
💬 प्रतिसाद
(2)
न
निनाव
Fri, 03/18/2011 - 21:10
नवीन
अहाहा...वाह... मुटे जी - शत शत शि.सा. न. ... !!!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sat, 03/19/2011 - 00:19
नवीन
वाह वाह!! सुरेख!! गवळण आवडली.
- Log in or register to post comments