जे न देखे रवी...

संगणक उद् बोध

Primary tabs

श्री गणेशायः नमः

नारद म्हणे नर्ड मुनीवर
शंका अजाणांच्या करा दूर
सोपे करून सांगा सत्वर
संगणकाचे गूढ

नारदा भक्तीभावे श्रवण कर
संगणक महान अवतार
आला कराया जगाचा उद्धार
नर्ड म्हणे सांगी जनास रे

वसतो साता समुद्रापार
बाल फाटक ऋषी थोर
उघडली विश्वात घरोघर
सुक्षमृदू गवाक्षे

संगणकी गवाक्षामधून
घडते विश्वाचे दर्शन
शोधुन काढी महाज्ञान
गुगल ऋषींच्या कृपेने

उघडी गवाक्षे एकामागे एक
वेगळे रूप धरी प्रत्येक
करी कामे झणी कित्येक
मानव जणू बहुमेंदूंचा

जे मूढ आधाशी होती
अमाप खिडक्या उघडती
खचीत संगणका लोळवती
कोसती फाटक ऋषीला फुका

जगी पसरले संगणक जाल
जोडून महामार्ग विशाल
ज्ञानसरीता वाहे खळखळ
माहीतीचा महापूर

जालात वेचीता ज्ञानकणांते
भेट देता अनोळखी स्थळाते
राही सदैव सावधान चित्ते
विषाणू कवच घालोनी

जालात माजले विषकांड
किडे विषाणू अंदाधुंद
करीती संगणका जेरबंद
कवचास छेद पाडोनी

जरी कधी विषाणू अघोर
संगणका करीती बेजार
विषाणू मारक मात्रा तत्पर
तव मेंदूत भरावी

नारद म्हणे नर्ड मुनीवर
ऐकोनी संगणक विचार
प्रश्न छळती मजला फार
संगणकाचे गूढ कैसे?

नर्डमुनी करीती विवेचन
संगणक तर्कशक्ती महान
आत्मा करी तार्कीक विवेचन
अब्ज अब्ज कार्ये पळभरी

स्मरणकेंद्रे सक्षम फार
तर्ककेंद्रा पुरविती तत्पर
माहितीचा प्रवाह घनघोर
विसरती ना कधी

चक्र फिरे संगणक अंतरी
लिहीलेले तयाच्या कायेवरी
वाचती अंगुली झरझरी
महाज्ञान साचवले

विचार मांडतो पटलावर
वाचितो मुद्रीते भरभर
पाहतो टंकलिखीत अक्षर
उंदराने चुचकारीता :))

मिसळपाव भक्षीती
आपसात वाटीती
कोणा मिरच्याही झोंबीती
जालात चरता चरता

ऐसा संगणक महाज्ञानी
कथीयले नारदा नर्ड मुनी
विश्वक्रांती आणि घडवुनी
समजोनी घे रहस्य पै

ॐ शांती: शांती: शांती:

गणपा

अरुणराव,
उद् बोध जबरा.....
मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव.

--गणपा.

वरदा

आवडली...
पाहतो टंकलिखीत अक्षर
उंदराने चुचकारीता

सहीच

मदनबाण

जरी कधी विषाणू अघोर
संगणका करीती बेजार
विषाणू मारक मात्रा तत्पर
तव मेंदूत भरावी
> हे मस्तच.....

(योग्य विषाणू मारक मात्रा वापरणारा)
मदनबाण.....

वेताळ

वाचताना खुप मज्जा आली. मस्त लिहिले आहे राव तुम्ही.
वेताळ

विसोबा खेचर

वा मनोहरराव!

संगणक आख्यान आवडले! :)

'फाटक ऋषी' आणि 'विषाणू कवच' हे शब्द क्लासच! :)

तात्या.

मनस्वी

जे मूढ आधाशी होती
अमाप खिडक्या उघडती
खचीत संगणका लोळवती
कोसती फाटक ऋषीला फुका

छान लिहिले आहे अरुणकाका.

आनंदयात्री

१० हजार वर्षानी येणार्‍या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :))

कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.

चतुरंग

(स्वगत - भाषांतरित करुन बाळ फाटकाला पाठवून द्यावी की काय? :W )

चतुरंग

अरुण मनोहर

लेखकाला लिहीते ठेवण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन सर्व प्रतिसाद देणार्‍या वाचकांनी दिले. त्यासाठी मनःपुर्वक आभार.
अरुण मनोहर

प्राजु

विचार मांडतो पटलावर
वाचितो मुद्रीते भरभर
पाहतो टंकलिखीत अक्षर
उंदराने चुचकारीता :D

मस्तच....

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/