पाककृती
मटण बिर्याणी
Primary tabs
लागणारा वेळ:
५ तास
लागणारे जिन्नस:
दोन ते अडीच पाउंड मटण
वाटण क्रमांक १
-६-७ पाकळ्या ( अमेरिकेत मिळणार्या , जाड्या पाकळ्या ) लसूण + इंचभर आले एकत्र वाटून
-३ टेबलस्पून दही
-अर्धा टी स्पून हळद
-२ टीस्पून मीठ
वाटण २
-१५-१६ सुक्या मिरच्या -मी ब्याडगी मिरच्या वापरते - या फारशा तिखट नसतात
-८ काळे मिरे , ८ लवंगा
-अर्धा मध्यम कांदा
-६-७ पाकळ्या लसूण
-१ इंच आले
-१टेबलस्पून खसखस
-१ छोटा तुकडा दगडफूल
-चिमूटभर शहाजिरे
-एक टेबलस्पून धणे
-एक टीस्पून जिरे
-चण्या एवढा जायफळाचा तुकडा
-१ तेजपान
-२ इंचाचा दालचिनिचा तुकडा
-६ हिरव्या वेलची
-असल्यास ४-६ तुकडे जावित्री.
चार मध्यम कांदे बारीक चिरून
२-३ प्लम टॉमेटो बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरुन अर्धा कप ( किंवा एक वाटी )
तीन मध्यम कांदे उभे पातळ चिरून.
पुदिन्याची पाने - जुलिएन करून अर्धा कप
दहा बारा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, बिया काढून परत एकदम बारीक जुलिएन्स करून
आल्याचे दीड इंचाचे दोन तकडे, साले काढून , जुलिएन करुन
तेल्,बटर , तूप
दोन -तीन चिमटी केशर मावे मधून १० सेकंद गरम करुन चुरडून मग दोन टेस्पून दुधात भिजवून
अर्धा वाटी काजू तुपात तळून
भातासाठी
तासभर आधी ६ कप बासमती तांदूळ धुवून निथळून ठेवलेला
बटर १-२ टेबलस्पून
मीठ
६ वेलची , ६ लवंगा, दोन -तीन दालचिनीचे तुकडे - इंचभराचे, ६ मिरे, दोन तेजपानं
क्रमवार पाककृती:
मटणाचे तुकडे स्वच्छ धूउन, त्याला वाटण क्रमांक १ लावून फ्रिज बाहेर तासभर किंवा फ्रीजमधे १०-१२ तास पर्यंत ठेवावे ( बिर्याणी करते वेळी बाकी तयारी सुरु करताना फ्रीजमधून काढून ठेवावे. परतून घ्यायच्यावेळेस मटण रुम टेम्प ला असावे शक्यतो. )
वाटण क्रमांक दोन मधले पदार्थ एकत्र बारीक वाटावे. थोडे थोडेच पाणी घालावे. अगदी पातळ वाटण होऊ नये.
सहा कप तांदळात ९ कप पाणी घालून राइस कूकरमधे भात केल्यास पूर्ण शिजायच्या दोन डिग्री अलिकडेच राइस कूकर बंद होतो. राइस कूकर नसल्यास तुमच्या आवडत्या पद्धतीने भात ७५-८०% शिजवून घ्या . शिजतानाच साबुत गरम मसाला, बटर व मीठ घाला. शिजलेला भात एका पसरट भांड्यात / परातीत मोकळा करून ठेवा.
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा प्रेशर पॅन मधे (सढळ हाताने घातलेले ) तेल गरम करुन त्यात एक तेजपान, २-३ लवंगा, एक तुकडा दालचिनी घालून बारीक चिरलेले तीन कांदे घालून परतून घ्या . कांदा गुलाबी झाला की त्यावर मॅरिनेट केलेल्या मटणातले तुकडे घालून प्रखर आचेवर परतून घ्या.( सगळे मॅरिनेड भर्र्कन ओतू नका. तुकडे नीट सगळीकडून ब्राउन झाले पाहिजेत. मॅरिनेड घातले तर तुकडे ब्राउन होणार नाहीत. दह्याचे पाणी पाणी सुटते त्यात ते तुकडे उकळले जातील )
तुकडे नीट ब्राउन झाले की वाटण क्रमांक दोनचा मसाला घालून ४-५ मिनिटे परता. मग उरलेले मॅरिनेड घालून मिनिटभर परता. मग वाटी भर गरम पाणी घालून प्रेशर पॅन च्या तीन शिट्या व अजून ५ मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्या. जाड बुडाचे पातेले असेल तर झाकण ठेवून मध्यम आचेवर ४० एक मिनिटे लागतिल. मधून मधून लागेल तसे गरम पाणी घालत रहा.
मटण शिजले ( किंवा पॅनचे प्रेशर उतरले ) की त्यात बारीक चिरलेले टॉमेटो, अर्धी कोथिंबीर घालून मध्यम आचेवर शिजू द्या.
कढईत तेल + तूप गरम करुन त्यात ३ बारीक उभे चिरलेले कांदे डार्क ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या . तेलात अर्धा चमचा साखर घातल्यास सुरेख कॅरमेल रंग येतो .
आता ओव्हन २०० -२५० डिग्री प्रीहीट करत ठेवा.
फॉइल ट्रे किंवा ओव्हन सेफ भांड्यामधे तळाला थोडे बटरचे तुकडे घाला.
त्यावर तळलेला कांदा घाला, त्यावर मटणाचे तुकडे व रस्सा पसरून घाला. त्यावर परत थोडा तळलेला कांदा, आलं, मिरची, पुदिनाचे जुलिएन पसरून घ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यावर एक भाताचा थर घाला. थोडे बटरचे तुकडे घाला. परत थोडा कांदा, उरलेले मटण, पुदिना-मिरची-आले- कोथिंबीर घाला . उरलेला भात घाला. शेवटी तळलेला कांदा घाला . ( पाहिजे असल्यास तुपात त़ळलेले काजू घाला ) . केशराचे दूध सगळीकडे व्यवस्थित शिंपडा.
फॉईलने घट्ट झाकून ओव्हन मधे ६०-७० मिनिटे, २०० डिग्रीवर शिजवल्यावर बिर्याणी तयार!
वाढणी/प्रमाण:
६-८ जणांसाठी
अधिक टिपा:
भरपूर वेळखाऊ रेसिपी आहे.
लसूण पाकळ्या इथे ( अमेरिकेत ) जाडजूड असतात. भारतातल्या पाकळ्या बहुतेक एकास तीन लागतील.
मी इथले लाल कांदे वापरते -ते पण बर्यापैकी मोठे असतात .
ओव्हनची क्षमता वेगवेगळी असू शकते त्यानुसार टेम्परेचर अन वेळ अॅडजस्ट करावी. ६०-७० मिनिटांनतर फॉइल अलगद उचलून चेक करू शकता.
एवढं सगळं झाल्यावर करणारीला अन खाणार्यालाही फोटो काढायची आठवण/ फुरसत नसते. पण परत केले तेंव्हा फोटो टाकेन .
वा.... मस्त... खुपच छान.... नक्की try करते.. :)
पा.क्रु. छान पण ताई १०-१२ तास मॅरिनेड केल्यावर एवढ्या ३ शीट्ट्या दिल्या तर मटण जास्त शिजत नाहि का??
बिर्याणी करता तुकडे थोडे मोठे असतात रश्श्या पेक्षा त्यामुळे असेल कदाचित. करुन पहा एकदा अन कसे लागतात ते सांगा .
फोटु नाहि ...प्रतिक्रिया नाहि