पाककृती

प्लम केक (प्रकार १)

Primary tabs


प्लम केक अनेक प्रकारांनी करतात, त्यापैकी त्सेंटाआजीची मैत्रिण गेर्टी आजी हिची ही एक पध्दत:-
साहित्य-
बेसकरता:
२५० ग्राम मैदा, १५० ग्राम बटर,१०० ग्राम साखर,२ चमचे वॅनिला अर्क, १ अंडे, १ चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ
टॉपिंग करता:
६०० ते ८०० ग्राम प्लम्स, २ चमचे दालचिनी पावडर, २ चमचे साखर
कृती-
बेसकरताचे सर्व साहित्य एकत्र करणे व चांगले मळणे, हा गोळा फ्रिजमध्ये ३० ते ४० मिनिटे ठेवणे.
प्लम्स टिनमधील असतील तर चाळणीवर घालून पाक निथळून घेणे. नंतर त्यात साखर + दालचिनी पावडर घालणे.
फ्रेश प्लम्स असतील तर एकसारख्या फोडी करुन घेणे व त्यात साखर + दालचिनी पावडर घालणे.
फ्रेश प्लम असतील तर २ ते ३ चमचे साखर जास्त घालणे. (त्यांच्या आंबटपणावर साखर कमी जास्त करणे.)
केकपॅनला बटर लावून घेणे. फ्रिजमधील गोळा बाहेर काढून तो केकच्या भांड्यात पसरणे. फक्त तळाशी न पसरता कडांपर्यंत जाऊ देणे.
म्हणजे केकच्या मोल्डच्या आत एक मैद्याचा मोल्ड तयार होईल.
प्लमच्या फोडी त्यावर लावणे.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से वर ४५ ते ५० मिनिटे बेक करणे.
बेस नीट बेक झाला आहे की नाही हे सुरी किवा विणायच्या सुईने चेक करणे. अवन मध्ये केक अजून ५ मिनिटे राहू देणे.
नंतर बाहेर काढणे, जरा गार झाला की जाळीवर काढणे.
व्हिप्ड क्रिम बरोबर खाणे.

स्मिता.

खूप दिवसांनी स्वातीताईंच्या केकची पाकृ आली.
हा वेगळाच प्लम केक कधी पाहिला नव्हता, मस्त दिसतोय. प्लमच्या फोडी काय मस्त रचल्या आहेत!

गणपा

खपलो....................................................

स्वातीतै चे नाव आता केकतै ठेवले पाहिजे.
अगदी सहमत! केकताई दिनेश!!
पाकक्रिया-मलिका शिरोमणीच आहेत ह्या पण!!;)

बाकी केकताई, प्लमचा केक आवडला...
फ्रेश प्लम धाडून देतो बॉक्सभर!!
(केक करून त्याच बॉक्सातून परत पाठवा!!!:))

-सुलेशबाबू

सहज

वेगळीच पद्धत!!! वेगळाच लुक!!!

आंबोळी

केकतै,
खुपच छान दिसतोय केक....
पराशेठना अनुमोदन!

५० फक्त

लई भारी, डायेटिंग अजुन एक वर्ष पुढे ढकलले आहे, उगा मन मारण्यात काय हशिल नाही.

आत्मशून्य

.

प्यारे१

स्वातीतै अका(अक्का नै हो) केकतै (सौजन्य- प्रा.परा) यांना या नोटिसीद्वारे सक्त ताकिद देण्यात येत आहे.

५० फक्त यांनी आता जगण्यासाठी अपरिहार्य झालेला डाएट प्रोग्रॅम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे व नुसताच ईट-एट-एट प्रोग्रॅम सुरु ठेवलेला आहे.
पराने खतरनाक असे भयंकर भीषण विशेषण लावून आपली भीती व्यक्त केली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणपा आणि प्रभो यांनी प्राणत्याग केलेला आहे केकास्त्रानेच असे घडले का याबाबत पुरावे गोळा करण्याचे काम विशेष पथक करीत आहे.
मिपावरील बरेच लोक हे सुदृढ बालक स्पर्धेतील विजेते सातत्याने ठरलेले आहेत. आपल्या पाकृंद्वारे त्याना आणखी सुदृढ बनवण्याची अजिबात गरज नाही.
अशा अत्यंत कठिण परिस्थितीत आपण आपले केकचे प्रयोग किमान ४ आठवड्यासाठी बंद करावेत अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

ही नोटिस दिली.

दिनांक- २३/०६/२०११

केशवसुमार

आमच्या नरडी खाली उतरला नसल्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देणास असमर्थ आहोत!! :)
(मधुमेही)केशवसुमार

चित्रा

मस्तच.

हे थोडेसे 'पाय' सारखेच झाले. नाही का?

रेवती

आईग्ग्ग!
फोटू ग्रेट आलाय!
बघताना केक अवघड वाटला पण कृती वाचून करता येइल असे वाटते आहे.

प्राजु

कस्लं खत्तरनाक दिसतोय गं केक. आई ग!!

सुरवातीला मला ''मेलेल्या झुरळांचं चायनीज लोणचं'' आहे की काय?असा फील आला होता....बाकी पा.क्रु.वगैरे झकास आहे हो...

नंदन

जबरदस्त पाकृ! 'पाईन कोन' सारखा आकार सुरेख जमला आहे.