Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिथुनायण भाग २ - आग ही आग

आ
आदिजोशी
Tue, 08/23/2011 - 04:51
💬 74 प्रतिसाद
साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी फोन करते. हिचं नाव डायना. तो हिम्मतवान व्यापारी तिला उत्तर देतो "तुम डायना हो या डायन, लेकीन मेरा खून नहीं चूस सकोगी". काही वेळातच त्या माणसाला त्याच्या बाणेदारपणाचं फळ मिळतं. त्याला त्याच्या घराच्या पार्कींग लॉट मधेच गोळी घालून ठार करण्यात येतं. मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो. डायना टायगर गँग नावाच्या एका खुँखार गँगची मेंबर असते. त्यांच्यासोबत भ्रष्ट पोलिस अधिकारी, एक मंत्री, अशी पिलावळही असते. आता, टायगर गँग मुलाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्या विधवेकडून खंडणी मागते. नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे. ती खंडणी देणार इतक्यात तिथे असलेल्या सगळ्या गुंडांना एक बंदुकधारी हात धडाधड गोळ्या घालून ठार करतो. तो हात असतो अर्थातच मिथुनदांचा. ह्या सिनेमात त्यांच्या अवताराचं नाव आहे 'इन्स्पेक्टर अजय'. ह्या मारामारीच्यावेळी तिथे एक पिकनिकला आलेलं जोडपं आणि एक फोटोग्राफरही असते. ह्या खुनखर्‍याब्याबद्दल मंत्री कमिशनरकडे जाऊन त्याला अजयला थांबवायला सांगतो. (आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.) त्यावेळी तिथे अजय पोचतो आणि मंत्र्याची कानउघाडणी करतो "अरे तू तो वो सियासी दलाल है जो मुर्दे का कफन छीनकर अपनी खाल पर ओढ लेता है". कमिशनर पुढे मंत्र्याला ऐकवतो "मगरमछ के आंसू, कुत्ते का भोंकना, लोमडी की चालाकी ये सारी चीजें लेकर तू पैदा हुवा है गोपाल भारती". इतकं सुंदर व्यक्तीचित्रण पु.लं. ना तरी जमलं असतं का? कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो "तू हमारी बदली करवाएगा? अरे तीन साल में तू पांच पार्टीयां ऐसे बदल चुका है जैसे बेघर बंदर जिंदगीभर डालींया बदलता रहता है". ह्या सिनेमान आपला लक्ष्या सुद्धा आहे. त्याच्या जोडीला आहे जॉनी लिव्हरचा डुप्लीकेट. ते दोघे जासूद असतात आणि टायगरला शोधत असतात. "मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" असं लक्ष्या स्वतःच वर्णन करतो. आता बोला. मधे मधे सिनेमात जॅकी श्रॉफही दर्शन देत असतो. ते कशासाठी हे अर्धा सिनेमा होईपर्यंत कळत नही. कमिशनर आता अजयला सरकारी ट्रेझरीच्या संरक्षणाची जबाबदारी देतो. इकडे टायगर गँग ही ट्रेझरी लुटायचा प्लॅन बनवत असते. तितक्यात तिथे कमिशनर पोचतो. सगळे पळू लागतात इतक्यात कमिशनर त्यांना थांबवतो "ओ बेवकूफी के अंडों से निकले कबुतरों, मैं कमिशनर नहीं टागर हुं". टायगर जेंव्हा जवळ येतो तेव्हा कळतं की तो कमिशनरचा विद्रुप हमशकल आहे. ह्या टेझरी मधे २५० कोटींचे हीरे असतात. एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात. ह्या सिनेमातला अजयचा दुखरा कोपरा म्हणजे त्याची स्वयंघोषीत प्रेयसी. ही दुर्दैवाने त्याच्या स्वर्गवासी बायकोसारखीच दिसत असते. मिथुनदा आणि त्याच्या सुखी कुटुंबाची वाताहात होण्याआधीच्या त्यांच्या संसाराची ओळख आपल्याला करून दिली जाते. "जो तेरा इश्क मिला, प्लॅटिनम डिस्क मिला" अशा मधुर शब्दांतून आपल्या भूतकाळात चक्कर मारून आणली जाते. मिथुनच्या बायकोचा गुंडांनी बलात्कार करून खून केलेला असतो. मिथुनदा शेवटी नव्या मैत्रीणीच्या प्रेमात पडतोच. टायगर, डायना, मंत्री आणि त्यांची पिलावळ मिथुनदांना लगाम घालण्यासाठी त्यांना विधवेच्या खुनाच्या आरोपाखाली जेल मधे टाकते. इथे कळतं जॅकी दादा म्हणजे मिथुनदाला खबरा पुरवणारा खबरीलाल. कमिशनरचं अपहरण करून त्याच्या जागी टायगर जातो. मिथुनदा आणि जॅकी बाबा ह्या नव्या कमिशनरला घोडा लाऊन जेल मधून सुटतात आणि एकेका गुंडाचा खात्मा करायला सुरुवात करतात. सिनेमाचा मुख्य व्हिलन "टायगर" आहे. पण त्याला घाबरायचं की त्याच्यावर हसायचं हेच कळत नाही. कारण डायना, मंत्री आणि गँगमधले अजून १-२ मेंबर्स टायगरला सिनेमाभर येता जाता हिडीस फिडीस करत असतात. त्याला "देख लुंगा टायगर के बच्चे" अशा धमक्याही देतात. हे कमी की काय म्हणून त्याला ब्लॅकमेलही करतात. धन्य आहे. सिनेमाच्या मधेच कधी तरी आपल्याला टायटल साँग ऐकवण्यात येतं "क्या क्या संभालोगी जवानी में, आग ही आग है पानी में". आश्चर्य म्हणजे ह्या गाण्यात डायना, मिथुनदांची प्रेयसी आणि एजून एक अशीच आयटम ह्या मिळून मिसळून नाचतात. ह्या गाण्यात प्रेक्षकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात - लटके संभालू के झटके संभालूं? झुमका संभालूं के ठुमका संभालू? दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी? आजु संभालूं के बाजू संभालूं? चुम्मा संभालूं के जुम्मा संभालूं, या अपने दिलका कबुतर संभालूं? प्रेक्षकांना प्रश्नात टाकून सिनेमा पुढे सरकतो. यथावकाश हिरे लुटले जातात. मिथुनदांची प्रेयसी मिथुनदांवर नाराज असते. तिचा असा समज झालेला असतो की मिथुनदांनीच विधवेचा खून केला आहे हिरेही पळवले आहेत. पण त्यांच्यातला गैरसमज लवकरच दून होतो आणि आपल्याला अजून एक सुंदर गाणे ऐकवले जाते "जब मिले दो जवानी, बने एक प्रेम कहानी, बजते हैं दिल के तार". हळू हळू सगळ्यांना कळतं की हा कमिशनर तोतया आहे आणि तोच टायगर आहे. व्हिलन गँग पैकी एक मिथुनदांच्या प्रेयसीचा मामा असतो. तो टायगरला चुना लाऊन हिरे भाचीच्या घरात लपवतो. हिर्‍यांच्या मोहापाई आता मिथुनदांची प्रेयसी, आधीची उगाच आयटम ह्यांना कमिशनरसोबत बांधलं जातं. इतके दिवस बंदीवासात असूनही कमिशनर त्याच वर्दीतल्या कडक इस्त्रीच्या शर्ट मधेच असतो. हिरे घेऊन टायगर पळणार इतक्यात मिथुनदा अड्ड्यावर पोचतात. शेवटची हाणामारी होते, मिथुनदा आणि जॅकी बाबा आपल्या अक्षय बंदुकांनी गुंडांचा खात्मा करतात, सगळीकडे आनंदी आनंद होतो. सिनेमातले निवडक यादगार संवाद: १. चोट खाते खाते फौलाद भी चिखने लगता है, तो तू क्या चीज है. २. जो हमारी बात मानता है वो हसता है, जो नहीं मानता वो खून के आंसू रोता है. ३. मौत कभी ठोकर खा कर वापस नहीं जाती टायगर, आती है तो जान लेकर ही जाती है. ४. मेरा सबसे बडा खजाना मेरी बेटी है. ५. हम कानून को जिंदा रखने के लिया कानून का गैर कानूनी ऑपरेशन करते हैं. ६. जब कभी मैं जुर्म का जुआं खेलता हुं तो जोकर हमेशा अपनी जेब में रखता हुं. ७. टाईम कम है. सोचना शुरू करदे अब उपर वाले को क्या जवाब देना हैं. ८. मेरे लिये किसी की जान लेना उतनाही आसान है जितना टेलिफोन पे बात करने के लिये रिसिव्हर उठाना. शेवटची हाणामारी झाल्यावर "आग ही आग है पानी में" ह्या सुमधुर गाण्याने सिनेमाची सांगता होते. इथे आपल्याला कळतं की ही आग इंतेकामची नसून इश्काची आहे. किंवा "आग ही आग" मधली एक आग इंतेकामची आणि दुसरी आग इश्काची असंही असू शकतं. मधला "ही" म्हणजे अर्थातच मिथुनदा हे वेगळं सांगायला नकोच. पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः

Book traversal links for मिथुनायण भाग २ - आग ही आग

  • ‹ मिथुनदांचा 'जस्टीस चौधरी' - म्हणजेच ओरिजिनल सरकार
  • Up
  • मिथुनायण भाग ३ - शेरा ›

प्रतिक्रिया द्या
14959 वाचन

💬 प्रतिसाद (74)
स
स्वाती दिनेश Tue, 08/23/2011 - 15:13 नवीन
धमाल आली! वाचताना साक्षात मिथुनदा डोळ्यासमोर दिसायला लागला आणि म्हणू लागला.. क्या बात, क्या बात, क्या बात! स्वाती
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 08/23/2011 - 15:31 नवीन
खी खी खी
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/23/2011 - 15:38 नवीन
मस्त रे आदि! मिथुनचे पिक्चर कसे पण असोत, अपुन मिथुन की फ्यान है! या पिक्चर्समधल्या दिव्यांगना हीरविणी, बहुतेक वेळा कानठळ्या बसवणारी बेसूर आणि भेसूर शब्द असलेली गाणी, त्यांचं संगीत बहुधा बाप्पीदाचं असे. आणि बाप्पीदांच्या आवाजात ते "डॅन्स डॅन्स" वगैरे ऐकणं म्हणजे केवळ अवर्णनीय!!! त्यातून पुढच्या रांगात बसलेले प्रेक्षक ड्वायलॉकच्या बरोबरीने टाळ्या शिट्ट्या आणि कॉमेंट्सचा जो काय गोंधळ घालायचे तोही न विसरण्यासारखा. :D पण मैत्रिणी आणि भावंडांच्या बरोबर रत्नागिरीच्या लता टॉकीजमध्ये १ रुपयाचं तिकीट घेऊन बघितलेल्या या सिनेमांनी जी गंमत यायची ती आता आयनॉक्समधे येत नाही. :( चांगला दिग्दर्शक मिळाल्यावर ३ राष्ट्रीय पारितोषकं घेणारा हा गरिबांचा अमिताभ या पिक्चर्समधे असली कामं कशी काय करायचा हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे! :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/23/2011 - 15:44 नवीन
चांगला दिग्दर्शक मिळाल्यावर ३ राष्ट्रीय पारितोषकं घेणारा हा गरिबांचा अमिताभ या पिक्चर्समधे असली कामं कशी काय करायचा हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे!
मोठा पाइंटाचा मुद्दा मांडलास गो बाय! जोक्स अपार्ट, पण मिथुनने साकारलेले 'रामकृष्ण परमहंस' केवळ लईईई भारी! पण हाच मनुक्ष इतर सिनेमे असा गंडल्यासारखा का करतो असा प्रश्न पडतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/23/2011 - 16:20 नवीन
मिथुनभायचे प्याकेज डील असायचे. त्याला हीरो म्हणून घेतले की त्याच्या ऊटीच्या हॉटेलात सगळी सोय व्हायची युनिटची, तिथेच चित्रीकरण करायचे. हिरॉइन वगैरे फारशी महत्वाची नसायचीच. बरेचसे सिनेमे (विशेषतः नंतरचे) त्यानेच प्रोड्युस केलेले असायचे. सगळा घरचाच मामला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ध
धमाल मुलगा Tue, 08/23/2011 - 16:26 नवीन
हे सगळं मान्य. पण च्यायला, कथा-पटकथा-संगीत-गीत वगैरे भानगडीसुध्दा गरजेच्या असतात सिनेमा काढायला. त्याचं काय>?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रभो Tue, 08/23/2011 - 16:29 नवीन
>>कथा-पटकथा-संगीत-गीत वगैरे भानगडीसुध्दा गरजेच्या असतात सिनेमा काढायला. त्याचं काय> मग जाऊन एखादा यश चोप्रा(संगीत-गीत साठी) पिच्चर किंवा एखादी आर्ट फिल्म पहावी(कथा-पटकथा).. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रेवती Tue, 08/23/2011 - 21:24 नवीन
चित्रीकरणंही त्याच्या चहाच्या मळ्यात, बागात, झाडं, टेकड्या जे जे काय विकत घेतलय त्यात व्हायची. खर्च असा फारसा नसायचा. एखाद्या शिनेमात जर फक्त चहाच्या मळ्यात गाणी असतील तर त्यावेळी तेवढेच लोकेशन अ‍ॅव्हेलेबल आहे असे समजावे. एखाद्या शिनेमात झाडातून पळण्याचे गाणे चित्रित होत असताना दुसर्‍या चित्रपटात झाडात होत असलेल्या मारामारीचे धपाटे गाण्याचं शुटींगवाल्या हिरो हिरविनीलाही बसले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सोत्रि Tue, 08/23/2011 - 23:35 नवीन
दहा लक्ष वेळा सहमत. - (परम मिथुनभक्त) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रावण मोडक Tue, 08/23/2011 - 15:43 नवीन
आ व रा !!!
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 08/23/2011 - 15:52 नवीन
भारी रे!!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 08/23/2011 - 18:15 नवीन
नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे.
असल्या वाक्यांनी बहार आली. मस्त...
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 08/24/2011 - 02:56 नवीन
अर्थात महान भारतीय संस्कृतीरक्षक मिठून्दा यांनी गुप्त संदेश नव्हे तर 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते' हेच ऐतीहासीक सत्य पुन्हा एकदा उधृत केले आहे हे निदर्शनास आणुन देउ इच्छीतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
क
कुळाचा_दीप Tue, 08/23/2011 - 18:49 नवीन
च्या मारी ..टांगा पलटी घोडे फरार ... बुंगाट परीक्षण !!! बाकी, मिथुन्दांच्या सिनेमासाठी डायलॉग लिहिणारे ते अज्ञात डायलॉग लेखक जर कुठे भेटले तर त्यांना ...भर दिवसा लकडी पुलावर साष्टांग दंडवत घालीन.
  • Log in or register to post comments
म
मराठे Tue, 08/23/2011 - 18:55 नवीन
बहुतेक वेळेला ड्वायलाक म्हणून 'कादर खान' चं नाव वाचलं आहे. " टमाटर और कुवांरी लडकी जादा दिन घर में नही रख्खा करते। "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुळाचा_दीप
प
प्रचेतस Tue, 08/23/2011 - 19:05 नवीन
आताच कौन बनेगा करोडपती बघत असताना मिथुनचा एक महान ड्वायलाक ऐकला. "जिनके घर शीशेके होते है वोह बेसमेंट मेंही कपडे बदलते है.-गोलमाल ३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
श
श्रीरंग Wed, 08/24/2011 - 17:24 नवीन
बहुतेक मिथुनपट "बशीर बब्बर" यांच्या समर्थ लेखणीतून उतरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
श
शुचि Wed, 08/24/2011 - 02:11 नवीन
>>आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.>> =)) =)) =)) खरच भयानक आहेत कोणाला असले संवाद सुचतात ? :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 08/24/2011 - 03:51 नवीन
झकास. दोन्ही परिक्षणे आवडलि. पुढचे भाग लवकर येउ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/24/2011 - 05:09 नवीन
<=०()8=<
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 08/24/2011 - 05:45 नवीन
आदि रॉक्स.... णेहमीप्रमाणे. ८० च्या दशकातले स्वतःचे चित्रपट, त्याची कथानके, संवाद, अतर्क्य स्टंट्स, अतरंगी पोशाख आणि केशरचना पाहून स्वतः कलाकारच एकतर 'धाय मोकलून' हसत तरी असतील नाहीतर स्वतःची कीव तरी करत असतील. कादरखानने इतरांसाठी लिहिलेल्या संवादांपेक्षा स्वतः भूमिका करताना म्हणत असलेले त्याचेच संवाद हे कधी कधी त्याला स्वतःला तरी कळत असतील का असा प्रश्न पडावा इतके लांब आणि रुपकात्मक असायचे. (कादरखान सारखंच मोठं वाक्य झालं. नाममाहात्म्य. दुसरं काय?) बाकी त्या काळातल्या चित्रपटातील सगळे गुंड आपापली कॉर्पोरेट किंवा गेला बाजार युनियन तरी सांभाळत असावेत. आपल्या गँग मधल्या प्रत्येकाला व्यवस्थित दिलेला गणवेश अगदी 'युनिफॉर्म' असायचा. शेवटच्या हाणामारीत 'शिवील' ड्रेस वाले रंगीबेरंगी (बहुतेकदा बेरंगीच) हिरो त्या गणवेशधारी गुंडांमध्ये अगदी 'उठून' दिसत असत. (गुंड धराशायी झाल्याने 'उभे' फक्त हिरोच) कॉर्पोरेट म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे हे सगळे लोक बॉसने सांगितल्याशिवाय काहीच करत नसत. 'अरे देख क्या रहे हो, पकडो उन कमिनोंको' म्हटल्याशिवाय 'स्टार्ट घ्यायचा'च नाही असे सगळे ठरवून तंतोतंत चालू असे....! और भी आन दो..!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/24/2011 - 17:49 नवीन
हा हा हा. अगदी खरं. गुंडांना युनिफॉर्म असणे ही भयानक कल्पना आहे. असा एकेक शिनेमा घेऊन जर चिरफाड झाली तर आपण यापेक्षा कैकपटीनं बरे शिनेमे बनवू शकू असा आत्मविश्वास येईल.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 08/25/2011 - 09:08 नवीन
<<साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत>> हा म्हणजे बहुधा असा काहीतरी असणार http://3.bp.blogspot.com/_IVmjStWmaow/SoN-1yDmcuI/AAAAAAAACHE/Ox4-2dQb41A/s1600-h/ModestSwimwear.jpg
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी गुरुवार, 08/25/2011 - 12:00 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा