पाककृती
डुबुकवड्यांची आमटी
Primary tabs
मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
घरची गरम मसाला पावडर आवडत असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती:
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.
आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.
फोटो मोबाईलवर काढल्याने क्लॅरीटी नसेल. तरी समजुन घ्या लोक्स!
आमच्याकडे व्हेजवाल्यांसाठी रविवारी हा पदार्थ असतो. पटकन होण्यासारखा कारण नॉनव्हेजींसाठी वाटलेला मसाला तयार असतो.
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
अधिक टिपा:
डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे
रंग बघून जीव गेला.. आम्ही काहीही शिजवलं तरी कावीळ झाल्यागत पिवळंच तयार होतं.. असं चमकदार लाल होत नाही.
एकदम जबर्या दिसतोय हा प्रकार. ते पाटवड्या म्हणतात ते असलेच काय असते काय ?
बाकी गंमत म्हणजे मी आधी चुकून 'बेडूकवड्यांची आमटी' असे वाचले आणि खो खो हसलो. पण एकूण ही पाकृ बघून मनातल्या विचारांसाठी जाहिर माफी.
हे प्रमाण एकदम नवे आणि अनोखे.
चला, आता इकडे चक्रफुल शोधणे आले.
आमटीचा रंग आणि आमटीवर आलेला तवंग मस्त दिसतोय. पण खायची हिम्मत होणार नाही.
करु करु एकदा करु कधीतरी. भारी दिसतोय प्रकार.
वाचून आणि फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं :)
डुबुकवड्यांची आमटी १-२ वेळाच खाल्लीये पण मस्तच लागते. या विकांतात करून बघेन.
लाल तिखट आणि गरम मसाला घेत असल्याने ८-१० मिरे जरा जास्त नाही का होणार? अर्थात त्याने आमटीही मस्त झणझणीत, मसालेदार होत असणार.
आमटीची रेसिपी छानच, पण ती ताटातली पोळी नीट शेकल्यासारखी दिसत नाही. ही रेसिपी म्हणजे गोळ्यांच्या आमटीच्या जवळपासचा प्रकार वाटतोय.
ही रेसिपी म्हणजे गोळ्यांच्या आमटीच्या जवळपासचा प्रकार वाटतोय.<<<<<<त्याहीपेक्षा सोप्पा आहे..........आवडली
ही रेसिपी म्हणजे गोळ्यांच्या आमटीच्या जवळपासचा प्रकार वाटतोय.<<<<<<त्याहीपेक्षा सोप्पा आहे..........आवडली
मस्त ....डुबुक वडे..ढकल वांगे नावे मस्त वाटतात
नाव भारी आवडलं. आमटी छान दिसतेय.
हाय हाय... क्या खत्री दिख रहा है...! येकदम करंट बसल खाल्यावर...!
आमच्याकडेही वरचेवर ही आमटी होत असते. एकदम खंग्री प्रकार असतो तो. हाताच्या मसाल्याचा वास तर जेवण झाल्यावरदेखील येत असतो. आहा.
अन त्या पाटवड्या वेगळ्या असता हो परीकथेतील राजकुमारा! कुणीतरी टाकेलच की त्याची पाकृ.
मला वाटते, ह्याला गोळ्याची आमटी असेही नाव आहे.
गेल्या विकांताला थोडीफार अशीच आमटी करून त्यात चार अंडी फोडून घातली होती (बेसनाच्या गोळ्यांऐवजी). झक्कास झाली होती.
लहानपणी गावाला खाल्ले होते डुबुकवडे आम्टी... :) छान लागते. ह्याला चुमुकवडे असेही म्हणतात कुठेतरी. :)
पण तुमचे डुबुकवडे गोल गोल नाही दिसत ? :(
का सकाळी सकाळी भुका चाळवायला टपले आहेत एक एक जण?
बघा बघा! कोण बोलतंय बघा....!
हे म्हणजे आपलं ते हे झालं.. शंभर उंदरं 'खाऊन' का काय ते!
गणपा रेशिपी टाक की रे एखादी... :(
व्वा झक्कास आमटी !!!
आमच्याकडे होते नेहमी मस्त झण्झणीत लागते :)
आम्ही विदर्भात ह्याला चुपुकवड्याची आमटी म्हणतो. करून पाहील वीकांताला !!
डुबुकवडे , चुमुकवडे , चुपूकवडे जे काय आहे ते झनझनित आहे
मिपावरच्या सुगरणिंचा कळप वाढत चाललाय. :)
मस्त आहे पाकृ शाकाहारी.
आमच्याकडे हीच आमटी डुबूकवड्यांऐवजी डुबूक अंड्यांची करतात.
सर्व कृती सेम. फक्त बेसन पिठाऐवजी अंडी फोडून उकळत्या आमटीत्सोडायची अन ५ मिनिटे उकळायचे.
डुबुक अंडा करी तय्यार !
क्या बात है!
म् स्त.......
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. असे पहिल्यांदाच ऐकले. करून पाहिले पाहिजे.
ही आमटी जबरीच आहे येक्दम जबरी.
वर उल्लेख आलाच आहे तसे पाटवड्यांच्या काहीशी जवळ जाणारी आहे...