पाककृती

मूळ्याचे पराठे

Primary tabs

मूळा सहसा कोणाला आवडत नाही. मला पण त्याच्या उग्र वासामुळे तो विशेष आवडत नसे. पण एकदा मूळ्याचे पराठे खाल्ले आणि तेव्हापासून मूळ्याचे पराठे माझे फेवरेट झाले. साहित्यः किसलेला मूळा, मीठ, साखर, तिखट, डाळीचे पीठ, कढिलिंब, तेल, जिरे-मोहरी, हिंग, हळद, कणकेचे (गव्हाचे) पीठ कृती : १) रोजच्या पोळीला लागते त्यापेक्षा थोडी सैल कणिक मळून घ्या. मळलेली कणिक झाकून ठेवा. एका सालकाढणीने मूळ्याचं बाहेरचा भाग स्वच्छ करून घ्या. मग मूळा खिसून घ्या. Image removed. २) एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग, हळद, कढिलिंब टाकावे. त्यात किसलेला मूळा टाकून मूळा चांगला परतून घ्या. ४-५ मिनिटं मध्यम आचेवर मूळा परतून घ्या. ३) मग १-२ मिनिटे झाकण ठेवून मूळा चांगला शिजू द्या. (मूळ्यात पाण्याचा खूप अंश असतो. त्यामुळे शिजताना वरून पाणी घालावे लागत नाही.) ४) आता त्यात चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी साखर घालून परता. (साखरेमूळे मूळ्याचा उग्रपणा कमी होतो.) या मिश्रणाला दाटसरपणा येण्यासाठी त्यात २-३ चमचे डाळीचे पीठ घालून २-३ मिनिटं परतून घ्या. मग हे मिश्रण एका ताटलीत काढून गार होऊ द्या. मूळ्याच्या पराठ्याचं सारण तयार. Image removed. ५) कणकेच्या छोट्या गोळ्यामध्ये हे सारण भरा. आणि मग त्याचा पराठा लाटा. हा पराठा तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. हिरवी/खोबर्‍याची/शेंगदाण्याची/लसूणाची चटणी आणि दही/बटर/तूप बरोबर खा. Image removed. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ ( http://tivalyabavalya.wordpress.com वर पूर्वप्रकाशित )
रेवती

छान पाकृ आणि फोटो.
यात बेसनाऐवजी मूगडाळ भिजवून मुळ्याबरोबर परतल्यासही चालते.
बेसनाने सारण जास्त खमंग लागते का ते प्रयोग करून पहायला हवे.

मराठमोळा

मस्तच..
इथले मुळे काही चवदार नाहीत बुवा. त्यामुळे फोटु पाहुनच समाधान मानतो. :)

एमी

छानच दिसतायत पराठे.
माझ्या एका सिँधी मैत्रिणीने मुळा किसल्यावर हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकले आणि न शिजवता तसेच पराठे केले. पाणी टाकुन देण्याऐवजी त्याच पाण्यात कणिक भिजवता येईल. गोबी गाजर पण कच्चा भरुन केलेले पराठे चांगले लागतात.

स्वैर परी

असेच म्हणते. मूळा किसुन त्यातले पाणी काढून तेच पाणी कणीक भिजवायला घेतल्यास ते जास्त चांगले लागेल.

पियुशा

बेश्ट !!! ग तै ,पण हे काय तु डाएटवर वैग्रे आहेस का ,इतक कमी तुप / बटर /लोणी का लावलेयस परठ्याला ;)

मुळा, मुळातच, मुळी आवडतच नाही मला ,पण तुझ्यासारखे मुली के पराठे बनवुन घरच्यांना खाउ घालेन ह नक्की :)

गणपा

वाह !!! मुलीके प्राठें.
मुळा शिजवुन त्याचे पराठे कधी खाल्ले नाहीत. हा प्रयोग करुन पहायला हरकत नाही.

छानच दिसत आहेत पराठे :)
मला ही मुळा आवडत नाही पण त्याचे पराठे मात्र खुप आवडतात.

शुचि

काय अफलातून दिसताहेत पराठे. यमी!!!

स्मिता.

छानच दिसत आहेत पराठे! महत्त्वाचं म्हणजे शेवडच्या फोटोत मुळ्याचे तंतू कणकेचं आवरण फोडून बाहेर आलेले नाहीत.

मी मूळा न स्जिवता त्यातलं पाणी काढून घेते आणी त्यात तिखट- मीठ-मसाला घालून करते. त्यामुळे भाजून वास जातो पण थोडी मुळ्याची चव राहते.

Pearl

धन्यवाद.
सर्वांचे खूप आभार.

>>छानच दिसत आहेत पराठे! महत्त्वाचं म्हणजे शेवडच्या फोटोत मुळ्याचे तंतू कणकेचं आवरण फोडून बाहेर आलेले नाहीत.>>

धन्यवाद स्मिता. त्याची एक ट्रिक आहे ती म्हणजे कोणताही स्ट्फ्ड पराठा बनवताना, म्हणजेच कणकेमध्ये सारण भरताना, मोदकामध्ये सारण भरतो तशा प्रकारे पारी बनवून सारण भरून, मोदक बंद करतो तसा गोळा बंद करायचा. आणि हा गोळा हळूवार लाटायचा. असं केल्यान स्टफिंग/सारण पराठ्याच्या बाहेर येत नाही.