Skip to main content

रवा इडली

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 27/07/2012 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम सोपी, अगदी आयत्या वेळी ठरवून करता येण्यासारखी ही रवा इडली: साहित्य- २ वाट्या रवा, १ वाटी दही, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा कृती- तेलावर रवा हलका भाजून घ्या, रंग बदलू देऊ नका. दही घुसळून घ्या. रवा कोमट झाला की त्यात दही व मीठ घाला ,पाणी घाला. रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी घालताना थोडे जास्त राहू द्या. हे मिश्रण कालवून साधारण अर्धा तास ठेवा. इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्या. रव्यात सोडा घालून चांगले ढवळा व इडलीपात्रात घाला. १२ ते १५ मिनिटे वाफवा. आणि चटणी किवा सांबाराबरोबर किवा दोन्हीबरोबर खा. चटणी- १ वाटी खवलेला नारळ,अर्धी वाटी डाळं, ४-५ हिरव्या मिरच्या, पेरभर आल्याचा तुकडा, २ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर हे सगळे थोडे पाणी घालून वाटणे. दही किवा ताक घालून सरसरीत कालवणे. हवी असल्यास वरुन तेल, मोहरी, उडीदडाळ, कढिपत्ता यांची फोडणी घालणे.

वाचने 11764
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

व्वा.... माझी आई असेच नाष्ट्यासाठी झटपट डोसे/धिरडे/उत्तपम करते... छान टोमॅटो, हि.मिरची, कांदा वगैरे घालुन ..खुप अवडतात मला ... रवाळ रवाळ असल्यामुळे मज्जा येते खातांना.... तुमच्या ईडल्या बाकी खूपच 'स्पाँजी' झाल्यात असं दिसतय... :) आणि त्याचा रंगही किती स्वच्छ दिसतोय... नक्कीच करुन पाहीन :)

हा रवा कशाचा? म्हणजे गव्हाचा की तांदळाचा? कारण बाजारात तांदलाचा रवाच इडली रवा म्हणुन मिळतो त्यासाठी विचारले.

In reply to by सन्जयखान्डेकर

इडली रवा नाही, साधा गव्हाचा रवा- ज्याचा शिरा, उपमा करतो तो रवा..

कहर फटू आहे हा. मी इडली खाणारच ! व्हेअर इज मिस्टर बिका ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

काय शिंची कटकट आहे.... असले धागे मी उघडत देखिल नाही... तर हाका मारून मारून बोलावतात **चे! बोला काय म्हणणं आहे? का आठवण काढलीत?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी सध्या फक्त बिकांच्या पैशाने इडल्या खाण्याचे व्रत घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या नावानी कोंबलत* होतो. *कोकलत + बोंबलत

In reply to by परिकथेतील राजकुमार

थांब. लवकरच आपल्या भेटीचा योग येत आहे. कॉल करतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

व्हेअर इज मिस्टर बिका ?
अरेच्चा! बिका आता इडल्या बनवून खाऊ घालायला लागले की काय? मी पण येते तुझ्यासोबत, फक्त इडल्यांचं निरिक्षण करायला.... स्वातीताई, झटपट इडल्यांची पाकृ आवडली. नक्की करून बघेन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्याला नाही आवडल ईडली. त्याला आवडते पाव्-भाजी. हो ना रे बिका...

In reply to by सहज

सहजरावांशी बाडिस! फोटो मस्त आलाय. पाकृ सोपी वाटते आहे, कधीतरी नक्कीच करून पाहीन (असं आता तरी म्हणतो :))

हायला... ही तर इडलीचटणीची स्मायली तयार झाली की...! लै येक नंबर दिसतीये राव...! खावांतर-फोटूच्या अपरिहार्य, विना-परवाना वापरा बद्दल अगाऊ क्षमस्व. ;-)

मस्त! अगदी हलकी झालेली दिसत आहे. 'झटपट इडली' या नावातच झटपट असल्याने फक्त चटणी असल्यास चालावे. सांबार करण्याचा कंटाळा कधितरी चालू शकतो. :)

१. इडल्या मस्त दिसतायत! २. चटणीची पाकृ पण अतिशय आवडली. ३. ज्यांना झटपट सांबार पाहिजे असेल त्यांनी रात्रीच्या डाळीच्या आमटीत तयार सांबार मसाला घाला. काय असतील त्या भाज्यांचे तुकडे घाला. जास्त नखरे नकोत. ३. ज्यांच्याकडे सोडा नसेल त्यांनी इनो घ्या. :D ३. "पेरभर आल्याचा तुकडा" हे बर्‍याच वर्षांनी ऐकायला मिळालं, त्यासाठी धन्यवाद! पेरभर, चिमूटभर, उगीच एवढंसं, अशी मापं सांगणारी पट्टीची सुगरण आहे हे सांगणं गरजेचं नाही. स्वयंपाकघरात एक इंच आलं मोजायला फूटपट्ट्या कोण ठेवतो? :D

स्वातीतै, भन्नाट आलाय फोटू!! अशा वाफाळत्या इडल्या मला चटणीसोबत तर आवडतातच शिवाय भरपूर साजूक तूप सोडून मेतकुटाबरोबरही खतरा लागतात! :) (इडलीप्रेमी)रंगा

आहा.. सकाळीच इडली-सांबार खाऊन आल्याने जळजळ झालेली नाही.. बाकी ह्या इडल्या झटपट बनतील आणि झटपट संपतील पण..

मी केल्या होत्या पण तुझ्यासारख्या टम्म नव्हत्या फुगल्या. काय सुरेख दिसताहेत. अगदी अश्श्याच उचलुन खाव्या!

सक्काळी सक्काळी आत्ताच गरमा गरम ईडली सांबार खाउन आलोय बघ आणि भरीस भर मस्तपैकी म्येंदू वडा ही होताच हो... काय पण फोटू आलाय १ नंबर आवडेश :)

लय भारी! घरीच इडली ग्राईंडर असल्याने साग्रसंगीत इडल्या घरी अनेकदा होतात.. हे झटपट वर्जन करून पाहिले पाहिजे

या प्रकाराने इडली मस्त झाली. तू केलेली फारच शुभ्र पांढरी दिसतिये पण यावेळी माझ्याकडे असलेला रवा किंचित पिवळ्या रंगाचा होता म्हणून इडल्याही तश्या झाल्या. वरील साहित्यात पंधरा मध्यम आकाराच्या इडल्या झाल्या. सानिकेनं सांगितल्याप्रमाणे पोडी करून त्याबरोबर खाल्ल्या. एकदम भारी!

स्वातीताई, काल ह्या इडल्या करुन पाहिल्या. मस्त जमल्या. :) सोपा, सुटसुटीत प्रकार दिल्याबद्दल धन्यवाद!