Skip to main content

मुर्ग माखनी (बटर चिकन)

लेखक गणपा यांनी रविवार, 28/10/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.

.

साहित्य : मॅरिनेशन : . २ मोठे चमचे ताजं घट्ट दही. २ चमचे आलं लसुण वाटण. १ चमचा टॉमेटो पेस्ट. १ मोठा चमचा गरम मसाला. १ लहान चमचा लाल काश्मिरी तिखट. एका लिंबाचा रस. मीठ चवी नुसार. . १/२ ते ३/४ किलो चिकन. ग्रेव्हीसाठी : . दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले. १०-१२ काजू आणि बदाम भिजवून सोललेले. १ मोठा चमचा गरम मसाला. १ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट. १ चमचा आलं-लसुण वाटण. बटर / लोणी. क्रिम. कृती : . . चिकनचे एक-दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे. स्वच्छ धुऊन मग त्यात मॅरिनेशनचे पदार्थ टाकुन किमान २ तास फ्रीज मध्ये मुरत ठेवावं. . . एका कढईत थोड्या बटर वर कांदा आलं लसुण परतुन घ्यावं. कांदा परतल्यावर त्यात गरम मसाला लाल तिखट आणि चवी नुसार मीठ घालुन बाजुने तेल सुटे पर्यंत लहान आचेवर परतुन घ्यावं . मसाला गार झाल्यावर तो बदाम आणि काजू सोबत मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा. . . चिकनचे काही तुकडे स्क्युअरमध्ये ओवून तव्यावर/ग्रीलवर वा ओव्हनमध्ये शि़जवून घ्यावे. . उरलेले चिकनचे तुकडे कढईत थोड्या बटरवर (मध्यम आचेवर) शिजवून घ्यावे. . . अंदाजे १०-१५ मिनीटांनी चिकन शिजले की त्यात वर वाटलेला मसाला टाकुन गरज लागल्यास थोडं पाणी टाकावं. झाकण ठेऊन मध्यम आचेवर एक वाफ काढावी. . गरमा-गरम नान / रोटी / पराठ्यासोबत वाढताना वरून थोडं क्रिम टाकुन बटरचा छोटा गोळा सोडावा. आणि हा तोंडी लावायला चि़कन टीक्का. :) (3D फोटुचा उलुसा प्रयत्न.) .

वाचने 25425
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

In reply to by एस

मास्यांच डिपार्ट्मेंट जागुतैकडे आहे. अट्टल मासे खाऊ असलो तरी माझ्याइथे फार लिमिटेड मासे मिळतात, गोड्या पाण्याचे तर नाहीच.

In reply to by गणपा

जागुतै, वाचताय ना ? :) रच्याकने, लहानपणी खूप हादडलेत नदीचे मासे. गेले ते दिवस, गेले ते मासे... राहिले ते प्रदूषण...

अश्या पाकृ देत राहिलास तर मी चिकनाहारी होईन. फोटू, पाकृ भारी. ही पाकृ चिकन न घालता करता येईल का?

In reply to by रेवती

फटू,क्लासच रे.. रेवती, चिकन ऐवजी पनीर किवा बटन मशरुम्स घाल. ग्रेव्ही मसाला तोच ठेव.

In reply to by स्वाती दिनेश

रेवती, चिकन ऐवजी पनीर किवा बटन मशरुम्स घाल. ग्रेव्ही मसाला तोच ठेव.
ऐसाईच बोल्ताय.

भारीच शिस्तप्रिय बुवा कांद्याच्या चकत्या तुमच्या.तुपात सोडल्यावर सुद्धा कशा निमूटपणे एकामागे एक निपचित पडून राहिल्यात.(की बटर गरम करून थोडेसे थंड झाल्यावर ओळीने रचून ठेवल्या? की आधी रचून ठेवून नंतर लोणी गरम केले? ) पाकृ आणि प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच. म्हणजे मस्तच. जा.जा.- चिकन श्रेड नाही करायचं का?

In reply to by राही

काही ठिकाणी चिकन श्रेड केलेलं असतं खरं. पण मी नाही केलं. आपल्या आवडी नुसार बदल केलत तरी चालतील. :) (हॉटेल मध्ये ग्रेव्ही आणि चिकन वेग वेगळ शिजवतात. ऑर्डर आली की मग एकत्र गरम करुन देतात त्यामुळे चिकनला मसाला नीट लागावा म्हणुन चिकन श्रेड करतात. घरी करताना चिकन ग्रेव्हीतच शिजवल्याने चिकनला मसाला बर्‍यापैकी लागला आणि श्रेड कराय्ची गरज वाटली नाही.) जा.जा. आधी बटर कढईत सोडलं, मग त्यात आलं-लसणाची पेस्ट टाकली आणी मग कापलेला कांदा जसाच्या तसा उचलुन (परतायच्या आत) फटु काढला. :)

पाकॄ पाहून शाकाहार्-व्रताचा अंत पाहिला जात आहे. बाकी सादरीकरणात दिसून आलेली टापटीप अन सुबक नेटकेपणा आम्हा गृहिणींनाही लाजवणारा आहे !

मस्तं पाककृती. हॉटेलच्या पाककृतीत रश्श्यात टोमॅटोचे प्रमाण अधिक असते. तसेच तळलेल्या कांद्याची पेस्ट वापरतात. टोमॅटो प्यूरे शिजल्यावर क्रिम टाकतात. बटरवर परतुन शिजवलेल्या चिकनला बटर चिकन म्हणतात तर चिकनचे तुकडे सळईवर लावून भाजून शिजवल्यावर त्याला चिकिन टिक्का मसाला म्हणतात्.चिकन टिक्का मसाल्यात कसूरी मेथी सुद्धा वापरतात. बटर चिकिनची चव क्रिमी असते आणि चिकन टिक्का मसालाची चव जरा मसालेदार असते.

हं! दिल बटर बटर हो गया। अगर कोई इतनी खुबसुरती से पकाये, तो कोंबडी तो मनसे पकेगी । गणपाभाऽऽय रास्तेसे जपके चलो, मुर्गीया पिच्छु पड जायेगी, हमे भी पकाव करके ।

येती दिवाळी संपेपर्यंत श्री.श्री.श्री.१००८-२००९ बल्ल्वाचार्य ग.ण.पा. यांना मिपावर एक अक्षरही लिहीण्यास बंदी घालण्यात येत आहे. सुचनेचे पालन व्हावे. व अशा खतरनाक, तोंडाला आणी तोंदाला भरती आणणारे धागे बंद करावेत. अन्यथा रोज निषेध व्यक्त करुन फेकुन मारला जाईल.

पहिली होती. तिकडे तंदुरी कोंबडी बघायला गेलो होतो. गम्पाभाऊ धन्यवाद! तुमच्या पाकृने आम्हीच काय आमचे दोस्तही लय खुश झाले. थोडे पेयपान झालेले असल्याने लकडी पुलावर तुम्हाला जाहीर आमंत्रण देण्यापर्यंतही काही दोस्त गेले. आता पुढच्या विकांताला त्यांना मुर्ग माखनी खिलवल्यावर होणार्या परिणामांना तयार राहा इतकेच लिहितो :)

अशक्य टेम्टिंग दिसतंय बटर चिकन. शेव्टचे फोटो बघून खरंच समोर ठेवल्यासारखं वाटतंय. मात्र मला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो म्हणजे कापलेल्या कांद्याचा!

एक कोडं आहे. फटु काढताना कसले -बसले हात क्यामेर्‍याला न लावता फटु काढायला कसे काय जमते ब्वॉ!

आहाहा.. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या पुढच्या भारतभेटीत तो कांदा कापण्याचा क्लास तुझ्याकडे लावायचा आहे. लाजवाब. आणि पाककृतीविषयी तो क्या केहने.. सिर्फ शेफ का नाम काफी है..

या पदार्थात कोंब्डीऐवजी पनीरफिनीर किंवा मश्रूमफिश्रूम घालण्याची कल्पनाही सहन होत नाही. ;)

खूप दिवसां पासून शोधत होतो हि रेसिपी. इतक्या सहज पणे आणि सोप्पी करून सांगितलेली हि पाक कृती आवडली. पुण्यात बाणेर मध्ये शीतल पॅलेस मध्ये एकदम झक्कास मिळते बटर चिकन. गेली ८ वर्षे टेस्ट बदलेली नाहीये.

गणप्या........शेवटी केलंच तू शिकवलेलं चिकन. फेसबुकावर फोटु सुद्धा टाकलाय. अर्थात तुझ्या चिकन सारखा रंग मात्र आला नाही. तहे दिल से शुक्रिया :)

चिकन बटर कॉलेजात आमच्या प्रयोगशाळेत मी बिर्याणी असो किंवा एखादा केक करायचा असो, मी टिवल्या बावल्या करत वेळ काढायचो , टेस्टिंग साठी आलेल्या आमच्या वर्ग शिक्षिकेला शेजारच्या बाकावरील मित्राची रेसिपी बिनदिक्कत द्यायचो. आता ही सचित्र पाककृती पहिली ( म्हणजे काही दिवस गणपा च्या पाककृती पाहत होती ) आणि आता इतक्या वर्षानंतर कधी नव्हे ते पाऊले धरती , किचन ची वाट अशी अवस्था झाली आहे.