पाककृती

ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार.

Primary tabs

ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार.

साहित्य: १ वाटी दही (अमुलचे तयार दही असल्यास उत्तम),
१ वाटी दुध, १ वाटी रवा (नेहमीचा गव्हाचा रवा. आपण सांजा/शि-यासाठी वापरतो तो.),
ईनो फ़्रुट सॉल्ट्चा १ पाउच (१ ते दीड चमचा) , अर्धा ईंच आल्याची पेस्ट,
१ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट. मीठ. फ़ोडणीचे साहित्य.

सर्वप्रथम ढोकळा वाफ़वण्यासाठी कुकर मधे पाण्याला उकळी येउ देणे.
ज्या पात्रात ढोकळा वाफ़वायचा असेल त्याला आतून तेलाचा हात लावून तयारे ठेवणे
व नंतर उर्वरीत कृति करावयास घ्यावी.

एका दुस-या भांड्यात रवा घ्यावा. दही छान मोडुन घ्यावे पाणी घालू नये.
त्या रव्यात हे मोडलेले दही घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत घोटावे
आता त्यात दुध घालावे आल व मिर्चीची पेस्ट व मिठ घालून पुन्हा थोडे
घोटावे. आता ईनो फ़्रूट सॉल्टचा पाउच कापून एका हातात तयार ठेवावा.
वरील मिश्रणात तो घालून लगेच हलवावे. सॉल्ट घालताच मिश्रण फ़सफ़सेल.
तसेच ते लगेच वाफ़वावयास ठेवावे. सॉल्ट मिश्रणात घातल्यापासून
काही सेकंदातच वाफ़ेला पडले पाहिजे उशीर होऊन चालत नाही.
तसेच मिश्रणात पाणी आजीबात घालू नये. पंधरा ते वीस मिनीटे शिटी न
लावता वाफ़ द्यावी.

हा ढोकळा अगदी स्पंजासारखा फ़ुगून येतो. थोडे थंड होताच वड्या कापाव्या.
वरून हिंग मोहरीची फ़ोडणी द्यावी. गरमच सर्व्ह करावा. या बरोबर चिंचेची आंबटगोड
चटणी द्यावी.

बहुगुणी

फक्त ते टायमिंग साधणं महत्वाचं असावं (ते वेळेत वाफवायला ठेवलं नाही तर काय घडेल ते सांगितलं नाहीत? (प्रयोग फसल्यावर आपोआप कळेलच म्हणा! :-))

धन्यवाद!

आगो ते सांगायचे काय. वेळेत वाफ़वायला ठेवल नाही तर गाताना सम चुकली तर जशी गाणा-याची
फ़जिती होते ना तशी होईल हो. बरोबर आहे ग. ते टायमिंग अगदी महत्वाचे.

पैसा

सफेत ढोकळा! तांदुळाच्या रव्याचा माहित होता. हा पण चांगला लागेल. दिसतोय छान!

कुसुमिता१

दही मोडून घ्यावे म्हणजे?? फेटून घ्यायचे का?? पाककृती छान आहे!

दही मोडायचे म्हणजे रवीने थोडे घुसळायचे पण अगदी ताक नाही करायच.
दह्याच्या कवड्या मोडल्या पाहिजेत.

तिमा

चांगली आहे. करुन बघायला पाहिजे.
पण अहो, ज्यांना दही मोडायचे माहित नाही त्यांना दह्याच्या 'कवड्या' कशा माहित असणार ? 'अदमोरं वगैरे शब्द कसे कळणार ?

तिरशिंग आजोबा

सूड

बरा दिसतोय पांढरा ढोकळा, चव कशी ती आता करुन बघितल्यावरच कळेल!!

सस्नेह

फोटू टाकलात हे ब्येष्ट केलेत, गोवेकरीन मावशी !

विनटूविन

मावशी हळद घातल्यास नेहमीच्या ढोकळ्यासारखाच दिसेल काय?
हा पण मस्त आहे. ज्याना बेसन चालत नाही, लो क्यालरी हवा त्याना तर बेस्टच!!

जयवी

अरे वा.... हा झटपट ढोकळा करुन बघायला पाहिजे :)
फोटू एकदम मस्त :)

पिंगू

झटपटच दिसतोय ढोकळा. कधी तरी सामान जमवून करेन.

- पिंगू

सोत्रि

माझाही असाच ऑ झाला पिंगूचा प्रतिसाद वाचून :O :O :O अस्स्सा
पण बहुतेक त्याने सामान ह्या शब्दावर श्लेष शाधला असावा ;)

- (काहीही झटपट न करणारा) सोकाजी

रेवती

दुसर्‍या कोणी कशाला जमवायला पाहिजे. तुझं सामान तू जमव्....तेही शोधून!
नाहीतर माझ्या ववसूमं मध्ये नाव नोंदव. तुझ्यासारखा शेलीब्रिटी आहे म्हटल्यावर लगेच लग्ने जमतील्.....बाकीच्यांची! ;)

आम्ही ज्यांना गुळाची पोळी आणि ढोकळा बनवता येतो अशाच काकुंच्या ववसूमं नाव नोंदवायचे नक्की केले आहे.

राही

बहुधा खमण आणि ढोकळा असे दोन प्रकार असावेत. किंवा एक खमण ढोकळा आणि एक नुसताच ढोकळा असे असावे. आपल्याकडच्या पोळ्या आणि पुरण पोळ्यांप्रमाणे. चण्याच्या पिठाचा तो खमण (हाच कुसकरून त्यावर बारीक शेव घातली की ते अमीरी खमण)आणि तांदुळाचा तो ढोकळा असे असावे.चूभूदेघे.

रेवती

ही स्वातीताईची कृती. http://www.misalpav.com/node/21980
तांदळाचा जेंव्हा (थोडी उडदाची डाळ) दही घालून उबदार हवेत ठेवून ढोकळा करतात त्याला खट्टा ढोकळा म्हणताना ऐकले आहे.

गणपा

पाककृती चांगली आहे.
पण पुढल्यावेळी छायाचित्रं स्वतः केलेल्या पदार्थाचं द्या. वा जालावरुन उचललेलं * असल्यास तसं सांगा. :)

* वरून दुसरा फटू.

बहुगुणी

Just to clarify: मी केवळ गोवेकरांच्या धाग्याच्या विषयाला दृष्य मदत व्हावी या सद्हेतूने त्यांनीच दिलेला image source code इथे धाग्यात फक्त embed केला आहे इतकंच. त्यांनी स्वतः ते चित्र कुठून घेतलं त्याची मला अर्थातच कल्पना नाही. (कुणास ठाऊक, कदाचित स्पॅन फूड्सवाल्यांनी गोवेकरांच्या पांढर्‍या ढोकळ्याचा फोटो घेतला असेल :-) - गोवेकर काकू: गंमत करतो आहे, हलकेच घ्या ही विनंती!)

गणपा

हा हा हा. काका तुम्ही केली तशी मदत मी ही करणार होतो.(धाग्यातच तो फोटु चढवून.) पण थोडं गुगलल्यावर कळलं की हा फटु जालावरुन उचललेला आहे. (आता त्या स्पॅन फूड्सवाल्यांनी गोवेकरांच्या पांढर्‍या ढोकळ्याचा फोटो उचलला असल्यास आम्ही आमचे विधान मागे घेतो. (म्हणुन स्वत:च्या कला कृतीवर एखादा हलकासा वॉटरमार्क टाकावा.) )
असो आज्जीबै खुलासा करतीलच.

आनंदी गोपाळ

अहो,
त्यांणा फटू येत नाहीत काढता ना चढवता. ढोकळा कसा दिसतो यासाठी त्यांच्या नातीने दिलं असेल एकादं जालावरचं चित्रं! तुम्हीपण ना! कित्ति पोटदुखी ;)

गणपा

पोटदुखी?
असो.
ज्याचं क्रेडीट त्याला मिळावं येवढंच म्हणण होतं. त्यास आमची पोटदुखी समजायचे असेल तर समजा. :)

आनंदी गोपाळ

आजकाल उपहासाचा बी उपास घडाया लागलाय. अहो ते र्‍हेटोरिक लिव्लं होतं म्या!

रामदास

खांसाहेब तालीम अगदी खायकीच्या अंगाने घ्यायचे. खमण आणि अमीरी खमण हा फरक अगदी भैरव आणि अहीर भैरवातला फरक समजावून सांगावा तसे सांगायचे.
दही मोडून घेणे म्हणजे अगदी दह्याची आणि रवीची थोडीशी नोमथोम. अगदी अशाच काही शब्दात सांगीतलं असतं.
असो .खांसाहेबांच्या आठवणी बर्‍याच आहेत. एकेक करून सांगीनच.

खेडूत

और ये लगा सिक्सर!! गोलंदाज के डोके के उप्पर से..स्टेडीयम के बाहर!! :)

प्यारे१

विजय चव्हाणनं म्हणे 'मोरुची मावशी' नाटकामध्ये 'स्त्रीपार्टी' फारच सुंदर वठवली.
नंतर आलेल्या बर्‍याच नाटक चित्रपटांमध्ये त्यानं स्त्री भूमिका केली..... पण मोरुच्या मावशीला जे यश मिळालं ते इतरांना नाही मिळालं. असो.

ढोकळा चांगला वठलाय. :)

दीपा माने

छानच. ढोकळ्याचा अगदी सोपा प्रकार वाचून लगेच लिहुन ठेवला.

फोटोबद्द्लचा खुलासा: नात म्हणाली 'आजी आपण करतो अगदी तस्साच दिसणारा फोटो देउ का ग? मी म्हणाले पाह?
... तो पाहिला. अर्थात तो दुस-या कुणी केलेल्याचाच आहे पण अगदी हुबेहुब ह्या पाककृति प्रमाणे केल्यावर जसा होतो तस्साच होता. म्हंणून म्हणाले दे. ईतकेच. नाहितरी ज्योति म्हणाली होतीच की 'पा. कृ चा अंदाज येण्यासाठी फोटो हवा' ह्या फोटोने तो अंदाज येतो आहे. आणि एवढा काथ्याकूट करण्यापेक्षा करून पहा ना एकदा... साहित्य घरी असणारेच आहे. मुद्द्दाम काही जमवाजमव करायला नको. पण 'केला. चांगला होतो' अस मात्र लिहीणार कुणि नाही.

जयवी

आज घरी मुलांची बँड प्रॅक्टीस आहे. काहीतरी खायला करायचं पण तळकट नको म्हणून म्हटलं ही रेसीपी ट्राय करुन बघते. आत्ताज ताजा ताजा तयार झालाय. एकदम झक्कास झालाय.

माझ्याकडे ऑरेंज इनो होतं त्यामुळे त्याचाही एक मस्त फ्लेवर आला. मी मिश्रणात मिर्ची पेस्ट ऐवजी मिर्चीचे अगदी पातळ काप घातले.

गौराबाई ....या झटपट रेसीपीसाठी मनापासून धन्यवाद :)

धन्यवाद मा़झ्यावर विश्वास ठेउन ही रेसीपी ट्राय केल्याबद्दल. अभिनंदन. ती झकास झाल्याबद्दल.