अळी मिळी गुपचिळी
“सगळं होतंय ना मनासारखं
मग झालंय काय चेहेरा पाडायला ?”
प्रश्न तेच पुन्हा पुन्हा...
“सुख बोचतंय..... दुसरं काय...”
उत्तरंही तीच.... त्यांचीच
पण बोलणार नाही मी...!!
का सगळं बोलून दाखवायचं...
का सगळं उघडून दाखवायचं...
मीच माझं कुलूप उघडायचं,
आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं.
मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार
मीच ती गोळा करायची
माझ्यासाठी....... ??
छे; कशाला.....
मी नाहीच बोलणार....
......
नकोय मला बिचारेपण
नकोय सहानुभूती
गोंजारतेय हल्ली व्यथांनाच
जपतेय त्यांची intensity
बरं चाललंय हो आमचं
हल्ली चांगले मित्र मिळणं सुद्धा कठीण झालंय
पण हा दोस्त टिकलाय बराच
बघू किती दिवस देतोय साथ
सध्या तरी रमलेय त्यात
अहो, उसंतच देत नाही तो
बाकी काही करायला
म्हणून तर शिकलेय आजकाल
दु:खालाच गोंजारायला
ट्रेनिंग घेतेय सध्या चेहेरा हसरा ठेवण्याचं.
“प्रॅक्टीस कर... नक्की जमेल” म्हणाला तो
त्यात काय एवढं .....
मी आणखी काही वेदना देतो.
कित्ती सोप्पंय ..!!.
मी सगळं त्याचं अगदी मनापासून ऐकते
मज्जा येतेय....
निघतेय सोलवटून,
रक्ताळलेय...
पण प्रत्येक थेंबाला आस
आणखी नव्या दु:खाची.
बाकी पाश सारे सुटलेत...
तुटलेत...
कधी......
कळलंच नाही
मीच तोडलेत... ????
की तेच घाबरलेत.....
तुझ्या माझ्या यारीला...
बरंच झालं,
आता नाही येणार प्रश्न कुणाचे
नाही द्यावी लागणार उत्तरंही.
आत राज्य तुझंच...
प्रत्येक डाव तुझाच
खेळ तुझी खेळी
माझी फक्त अळी मिळी गुपचिळी !!
जयश्री अंबासकर

💬 प्रतिसाद
(5)
क
कवितानागेश
Sat, 03/09/2013 - 10:37
नवीन
:(
- Log in or register to post comments
अ
अक्षया
Sat, 03/09/2013 - 10:54
नवीन
छान कविता..भावस्पर्शी.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Sun, 03/10/2013 - 09:46
नवीन
वास्तववादी कविता. 'आवडली' असंही म्हणवत नाही!
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 03/10/2013 - 11:34
नवीन
सुरेख कविता आहे .
... पण थोडी दुभंगलेली वाटते आहे. ( मी लावलेला अर्थ बरोबर आहे का नाही हे तुम्हीच सांगा)
पहिल्या भागात तिचा निर्धार दिसतो आहे, कि मला कुणाची सहानुभूती नको, माझे दु:ख मी भोगीन.त्याचं प्रदर्शन करणार नाही.
आणि दुसर्या भागात थोडी आत्मपिडेत समाधान मानणारी अशी वाटते आहे.
जसे--
तुमचे शब्दप्रभूत्व मात्रं खासच !
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 03/10/2013 - 17:58
नवीन
असंच काहीसं..
- Log in or register to post comments