Welcome to misalpav.com
लेखक: विकास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खलनायकाच्या नांवावर चित्रपट चालावा इतका दमदार अभिनेता. प्राणच्या कुठल्याही भूमिकेत भूमिका आणि कलाकार वेगळा नसायचा. त्याच्या अनेक अजरामर भूमिका, त्याची खास स्टाईल, अदाकारी, नजरेतील धाक आणि धग मनाचा थरकाप उडवायची. खलनायकातील 'सुपरस्टार' प्राण आज गेल्याचे कळले आणि फार वाईट वाटले.

शेरखान तर जबरदस्त होताच, शराबी मधला पैसेवाला बाप देखील काय तगडा रंगवला प्राण ने. गुड्डी चित्रपटात प्राणसंदर्भात जे दाखवलं ते तत्कालीन ऑडीयन्सचे प्रातिनिधीक म्हणता येईल असा सच्चा खल माणुस. रेस्ट इन पीस प्राण साहेब. अर्धवटराव

परिचय मधली भूमिका खूप आवडली. वरवर कठोर पण आतून दु:खी, एकुलता एक मुलगा गमावलेला म्हणून, नातवंडे तिरस्कार करत आहेत म्हणून. नंतर जितेंद्रच्या कर्तृत्वामुळे जेव्हा नातवंडे जेव्हा एकदम सरळ होतात आणि आपल्या आजोबांचा स्वीकार करतात तेव्हाचा प्राण. एका प्रसंगात रागाच्या भरात तरातरा तो नातवंडांना जाब विचारायला त्यांच्या खोलीत जातो. सगळी मुले अभ्यास करताना बघून थक्क होतो. नंतर कुणाचे तरी लक्ष जाते आणि सगळे "नमस्ते दादाजी" म्हणतात तेव्हा भावनांचे इंद्रधनुष्य प्राणच्या चेहर्यावर दिसते ते लाजवाब! हा एक खलनायक म्हणून गाजलेला अभिनेता आहे असे खरे वाटणार नाही इतका खानदानी, रुबाबदार, सभ्य माणूस रंगवलाय. हॅटस ऑफ!

चित्रपटात खलनायकाला बघतांना चीड यावी, राग यावा, शिव्याशाप द्याव्यात असे वाटावे इतका जीवंतपणा भूमिकेत असायचा. अशा भूमिकेत प्राण भरणारा एकमेव कलाकार प्राण. निधनाच्या बातमीने वाईट वाटले. कसमे वादे प्यार वफा सब बाते है बातो का क्या.... विनम्र श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

प्राण यांच्या कितीतरी भूमिका आठ्वायला लागल्या... राज को राज रहने दो यातले भाव... किंवा किशोर आणि प्राण यांची ही नटखट अदा. आके सिधी लगी दिलपे जैसे कटरिया... -दिलीप बिरुटे

प्राणसाहेबांना पहिल्यांदा पाहिले ते मधुमती मधे पण प्राण म्हटल की आठवतो तो जंजीर मधला "यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी" म्हणत नाचणारा शेरखान, उपकार मधला मंगल चाचा, जॉनी मेरा नाम मधला मोहन, व्हिक्टोरीया नंबर २०३ मधला राना प्राणसाहेबांना भावपुर्ण श्रध्दांजली.

प्राण साहेब हे हिंदी चित्रपट सृष्टीतील पडद्यावरचा खतरनाक तर पडद्याआडचा सर्वोत्कृष्ट जंटलमन होते. धारदार नाक भेदक नजर ,राखलेली फिगर, विविधांगी मेकप यावर कडी म्हणजे प्रत्येक खलपुरूषाची मॅनरिझम वेगवेगळी ! त्यांच्या ज्यांचा मार खाल्ला पडद्यावर त्या सगळ्यांशी त्यांची खाजगी आयुषयात दोस्ती होती. बाकी त्यांचे सामाजिक कार्य मी काय सांगावे ? प्राण हे अस्सल कलावंत होते यात संदेह नाही.त्याना मस्त रोल देणार्‍या राजकपूर मनोजकुमार ए आर करदार व प्रकाश मेहरा यांचे आपण ऋणी आहोत बुवा ! प्राण साहेबांची स्मृतीस सलाम !

प्राणसाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो. अतिशय प्रामाणिक कलाकार, कलेप्रती त्यांची निष्ठा खरेच वाखाणण्याजोगी आहे. बाकी सारे हिरोगीरीच्या मागुन धावत असताना इतक्या दमदारपणे प्रेक्षकांच्या मनात घृणा निर्माण करणे, ते ही चेहरे वेडेवाकडे न करता, नुसत्या थंडगार नजरेने तुच्छता दाखवणे....बातच और!

'जिस देशमें गंगा बहती है' मधला जहरी, भेदक नजरेचा 'राका' कसदार अभिनयासकट अजूनही लक्षात आहे. काश्मिर की कली मधला निर्लज्ज चेहर्‍याचा खुनशी 'मोहन' सुद्धा अजून आठवतो. परिचय मधल्या रायसाहेबांचं व्यक्तीमत्व इतकं प्राण ओतून खुलवलं होतं कि पडद्यावरच्या रायसाहेबांबरोबर प्रेक्षक काही काळ एकरुप होऊन गेले होते. इतका जिवंत अभिनय. मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं करणारा हा सच्चा कलाकार कायम आठवंत राहील. पद्मभूषण कै.प्राणसाहेबांना सलाम.

परिचय मधला आजोबा मस्त रंगवला होता. प्राण काम करायला लागल्यापासुन कोणीही मुलाचे नाव प्राण ठेवले नाही असं वाचलं होतं. ही त्यांच्या अभिनयाला दिलेली सर्वात मोठी पावती असावी.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेला त्यांच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण - जेव्हा त्यांच्या नातवाचे (मुलीचा मुलगा) नाव अमर-प्राण ठेवले गेले.

>>खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते. सहमत आहे. कुठल्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता खलनायक साकारणारा कलाकार.

प्राण यांच्या अनेक भूमिका आवडल्या. विशेष उल्लेख करावा अशी जुन्या 'अदालत' मधील नर्गिसला छळणार्‍या खलनायकाची भूमिका. चित्रपटाच्या शेवटी, नायक प्रदीपकुमारला कोठीवर मुद्दामहून आणून, त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव छदमीपणे निरखणारा प्राण, कायम लक्षांत रहातो. या थोर अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली.

काय बोलू? प्राण ह्यांनी प्रत्येक भूमिकेत अगदी प्राण ओतलाय... आजवर त्यांचे जे सिनेमे बघितलेत ते सगळे आवडले. शेरखान तर सगळ्यात जास्त आवडला...

प्राण यांचा चित्रपटसृष्टीप्रवेशाची गोष्टही तितकीच गंमतीदार आहे. महाविद्यालयीन जीवनात कँटीन मध्ये प्राण बसले होते.एका चित्रपटसृष्टीचा निर्माता त्यांचे निरिक्षण करत होता. त्याने त्यांना विचरले "की आपका नाम क्या है?" प्राणनेही तितक्याच मस्तीत विचारले कि " आपका काम क्या है?" त्याचा हा जोरकस संवाद ऐकुन त्याने त्याला तेथेच चित्रपटात काम करण्याची मागणी दिली. प्राणसाहेबांना विनम्र श्रद्धांजली.

हिंदी चित्रपटातील कादरखान, शक्ती कपूर इ. मंडळींनी खलनायकाला विदुषकी पात्र बनवण्यापूर्वी नायकाइतकाच महत्त्वाचा खलनायक, सशक्त चरित्र अभिनेता हरपला. प्राणसाहेबांचा खलनायक पण मानवी वाटायचा. त्याची कधी घृणा वाटली नाही. कोणती भूमिका आवडती म्हणून वेगळी काढायची? सच्चा कलाकार, तितकाच उमदा माणूस हरपला. विनम्र श्रद्धांजलि.

हिंदी चित्रपट सृष्टीतील एक तेजस्वी तारा आसमंतात विलीन झाला. प्राणसाहेबांना विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली.