प्रवासी
प्रवासी
जीवन प्रवास गूढ, कोणी कसा केला
कोणी हसत निभावले, रडून कोणी केला ll १ ll
प्रवासी दिसले कोणी, चालता पथात
एकलाच गेला कोणी, हात कोणी केला ll २ ll
साथीदार कोणाचा, सोडूनी मधेच गेला
संपले तिथेच कोणी, मार्गस्थ कोणी झाला ll ३ ll
प्रवास दूरचा, निश्चय निघताना केला
प्रारंभीच कोणी, शेवटी कोणी विसरला ll ४ ll
प्रवास तत्व ठरले, खुणगाठ बांधलेला
मोडले तत्व कोणाचे, प्रवास कुणाचा तुटला ll ५ ll
कधी बिकट कधी सोपी, संमिश्र वाट होती
थकला मधेच कोणी, कोणी खुणा सोडूनी गेला ll ६ ll
प्रवास पूर्ण कोणाचा, हर्षोल्हास कोणा झाला
नि:श्वास सोडला कोणी, साजरा कोणी केला ll ७ ll
प्रवासी अनेक पंथी, दर्जा कोणाचा कसला
विस्मृतीत गेला कोणी, पुतळ्यात कोणी वसला ll ८ ll
संपला प्रवास ज्यांचा, अनुमान हिशोब केला
व्यर्थ; शून्यप्राप्ती कोणा, अर्थपूर्ण कोणाचा झाला ll ९ ll
💬 प्रतिसाद
(1)
ग
गुरुचरण
गुरुवार, 08/22/2013 - 12:38
नवीन
मस्त वर्णन केले आहे
- Log in or register to post comments