विन-विन सिच्युएशन का भ्रष्टाचार?
इथे चाललेल्या चर्चेवरुन परवाचाच एक भष्टाचार आठवला...
शनि-रविवारी गावी गेलो होतो. आईने रयवार सक्काळ्-सक्काळी गादीतून ओढुन काढलं आणी "मुन्शीपाल्टीच्या शाळेत जा आणी आधार कार्ड काढुन घेउन ये. ज्जा." म्हणुन हाकललं. १० वाजता आंघोळही न करता, टी-शर्टवरच मी शाळेत हजर. पाहतो तो काय?? २ टेबलांवर अंदाजे ६०-६५ जणांच्या २ मोठ्या रांगा लागलेत. अर्धा तास रांगेत कंटाळून उभा राहिल्यावर मागच्या माणसाला माझा नंबर धरुन ठेवायला सांगुन पुढे टेबलाजवळ जाउन पाहिले.
'तो' साहेब आणी खेड्यातली 'ती' यांचा संवाद काहीसा असा चालला होता-
तो- बाई नाव काय??
ती- हळक्षज्ञ.
तो- जन्मतारीख?
ती- काय ध्यानात न्हाई ओ. आणी वरीस तर म्हाईत बी न्हाई.
तो- मग ह्यात काय लिहू आता?? बरं, (रेटीना स्कॅनर पुढे करत..) ह्यात बघा
ती- काय दावताइसा ? आज चाळशी आणली न्हाई, :))
तो- (वैतागून..) बाई, बघा म्हटलं की बघायचं. बोटं हितं लावा म्हटलं, की लावायची. मागं रांग बघालैसा न्हवं??
---
च्यायला, या प्रश्नोत्तरांच्या रेटने प्रत्येकी १० मिनीट धरले तरी ६० लोकांना ५ तास. त्यात मधे जेवणाची सुट्टी.
वाटलं रविवार इथंच काढतंय आता.. :( त्याला म्हटलं, "साहेब, काय शॉर्टकट आहे काय?"
तो म्हणाला, "६ ला या".
आम्ही खुश. संध्याकाळी आरामात ६ नंतर गेलो. नो रांग-नो वेटींग. फक्त ५० रुपये त्याच्या खिशात. तेरी भी चूप, मेरी भी चूप.
---------------
घरी आल्यावर बहिणीबरोबर चर्चा-कम-भांडण.
---------------
मी किंवा तो भ्रष्टाचारी झालो काय?
सरकारी वेळ फक्त ६ पर्यंतची होती. ती व्यक्ती त्यानंतर थांबून माझे काम करुन देतो म्हणाली. सरकारी वेळेत नाही. त्याने स्वतः पैशाची मागणी केली नव्हती.
माझ्या त्या ५-६ तास वाचवण्याच्या बदल्यात ५० रुपये द्यायला मी तयार झालो.
या आमच्या सौद्यामुळे कुणाचेच (म्हणजे रांगेतले इतर लोक, सरकार, मी, तो साहेब) नुकसान झाले नाही. उलट सर्वांचा (?) फायदाच झाला.
पण सरकारने अशी काही जादा फी घेणे किंवा व्हॅल्यु/प्लस/प्रो कस्टमर असा भेदभाव केलेला नाही. जर तसे असते तर हे ५० रुपये देणं नैतिक ठरेल काय?
---------------
तुम्हाला काय वाटते??
---------------
.
प्रतिक्रिया