डे चे फंडे
भारतातील जनतेने पाश्चात्य संस्कृतीतल्या नेमक्या चुकीच्या गोष्टीच उचलल्यात, आत्मसात केल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.
पेहराव, खाण्या-पिण्याच्या सवयी, आपल्या संस्कृतीशी विसंगत पण मनाला भावणारे असे अनेक आदर्श, सण, त्यांच्या साजरीकरणाच्या पद्धती या आणि अशा अनेक गोष्टी आपण आनंदाने, नाईलाजाने, किंवा मग केवळ समाजाशी आपली नाळ तुटू नये या भावनेने, आत्मसात केलेल्या आहेत. यात एक मोठ्या प्रमाणावर आपलीशी झालेली गोष्ट म्हणजे निरनिराळे ‘डे’ज. जन्मदिवसाच्या झालेल्या बर्थ-‘डे’, पासून ते वादग्रस्त आणि वैचारिक काथ्याकूटांचे कारक ठरलेले फ़्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे असे अनेक डे’ज भारतभर साजरे होतात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक गट यांना विरोध करतात, तरुणाई त्या विरोधाला न जुमानता ते साजरे करते, त्यांचा आनंद घेते, आणि मागील पिढी, वडीलधारी पिढी याबाबात फक्त मौन पाळणं पसंत करते.
२०१४ चा व्हॅलेंटाईन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणा-या या ’डे’ विषयी बोलताना अनेक जण ’हा निव्वळ मूर्खपणा आहे’ असं म्हणतात. प्रेमाचं प्रदर्शन करण्याचा, त्या भावनेची विटंबना करण्याचा हा एक बहाणा आहे असं म्हटलं जातं. आज देशात प्रेमातून होणा-या हत्या, हल्ले यांची संख्या वाढती आहे. बलात्कारासारखे भयानक गुन्हे सर्रास घडतायत. असं असताना, व्हॅलेंटाईन डे ला विरोध होणं स्वाभाविक आहे. आणि त्याला कारणं आहेत. जिथे प्रकटीकरण अपेक्षित असतं तिथे प्रदर्शन करायची आपल्या समाजाची एक जुनी खोड आहे. व्हॅलेंटाईन डे च्या नावाखालीही प्रेमभावनेचा जो विपर्यास केला जातो, कुठलीही लज्जा न जुमानता जे प्रेमाचं सार्वजनिक प्रदर्शन केलं जातं ते नक्कीच चुकीचं असतं.
एक मोठा गट असं म्हणणा-यांचा असतो की प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कशाला हवा?... ते रोज आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त झालं पाहिजे. आणि हाच नियम मग मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे सगळ्यांना लागतो.. ते सगळे ’डे’ सुद्धा चुकीचे किंवा अनावश्यक आहेत असं मत पुढे येतं. ते काही अंशी खरं जरी असलं तरी ते दोन संस्कृतीतला दुवा होऊ शकत नाही.
काल माझ्या एका सहकर्मचा-यांशी सहज याविषयी बोलत असताना त्यांचाही विचार वर मांडल्याप्रमाणेच दिसला; की केवळ ’हा’ दिवसच कशाला... इत्यादी. मला मात्र याबद्दल असं वाटतं की, जसं गणपती समोर आपण रोजच हात जोडतो, तरीही गणेश चतुर्थी चं महत्व वेगळं असतं, विठठलाचं नाव नेहमी मुखात असलं तरीही आषाढी - कार्तिकी ची ओढ आगळी असते, तसंच काहीसं या ’डे’ज बद्दल आहे. प्रेम ही भावना रोज कृतीतून व्यक्त झाली तरी एक दिवस ती भावना नेहमीपेक्षा जास्त दृष्य, आणि श्रुत, स्वरुपात व्यक्त झाली तर बिघडलं कुठे?
मी म्हटलंही त्यांना तसं. अर्थात, व्हॅलेंटाईन किंवा इतर कुठल्याही डे च्या नावाखाली जे गैरप्रकार आणि जी बेदरकार थेरं चालतात, त्याचं मुळीच समर्थन केलं जाऊ नये, किंबहुना त्याला विरोध व्हायलाच हवा. पाश्चात्य संस्कृतीतला जो चुकीचा भाग घेतलाय त्याला विरोध करणं ही एक गोष्ट झाली; पण त्या संस्कृतीला आपल्या परंपरेनुसार वळण देऊन जर त्यातील पटतील ते सण, दिवस, रुचतील तसे साजरे केले, तर हरकत का असावी! जसा व्हॅलेंटाईन्स डे साजरा होतो तशीच गुढीपाडव्याच्या नववर्ष शोभा यात्रेलाही गर्दी जमायला हवी. आणि काही अंशी ती जमतेही. तेंव्हा, जितकी गरज जुन्या पिढीने विचारांचं उदात्तीकरण करण्याची आहे, तितकीच जबाबदारी नवीन पिढीने आपल्या संस्कृतीच्या गाभ्याला धक्का न लागू देण्याची आहे. या दोन्ही गोष्टी जर झाल्या तरच तो दोन संस्कृतींमधला, दोन दृष्टिकोनांमधला दुवा ठरेल आणि मग एक दिवस ’संस्कृती डे’ साजरा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

प्रतिक्रिया