पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे. इंग्रजी डे साजरा करणाऱ्या या लोकांना आपल्या देशातील महापुरुषांच्या जन्मतिथी माहित नसेल, आपल्या घरातील आई - वडिलांची आपल्यासाठी आपल्या आजारपणामध्ये जागलेली कित्येक रात्री मधील एक रात्र माहित नसेल मात्र हा दिवस मात्र त्यांच्या आठवणीमध्ये असेल. आयुष्यातील किती मोठी शोकांतिका ! आपण आपल्यामध्ये असणारा माणुसकीचा झरा जो पीडितांसाठी, गरिबांसाठी, आपुलकीच्या माणसासाठी वाहतोय हेही विसरत चाललो आहे का ?. ज्याच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो तो "व्हेलेण्टाईन" हा तिसऱ्या शतकातील रोम मधील ख्रिश्चन संत होता, जो सैनिकांच्या लग्नावर बंदी असताना त्या देशातील सैनिकांचे चोरून लग्न लावून द्यायचा, आणि हे जेंव्हा त्या राजाला कळले तेव्हा त्याने त्याला बंदी बनवून १४ फेब्रुवारी २६९ ला मारून टाकले. पण त्या अगोदर त्याला राजाकडून धर्मांतर केलेस तर तुला मुक्त करतो असे सांगण्यात आले होते. मात्र त्याने धर्मांतरास नकार दिला. त्याने रोम च्या राजाची आंधळी मुलगी ला त्याच्या दैवी उपचारांनी ठीक केले होतं. मरण्यापूर्वी त्याने त्या मुलीला एक पत्र लिहले आणि त्याखाली त्याने "From your Valentine" असं लिहलं होतं. त्याने धर्मासाठी आपला जीव दिला. प्रेमासाठी त्याने जीव दिला असा साधा उल्लेखही नाही. आपल्या भारतीय संस्कृती मध्येही संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण दिल्याचा उल्लेख आहे. मात्र आपल्या आठवणीमध्ये त्यांचा बलिदान दिवस नाही. हे खरं तर भारतीय इतिहासाचे दुर्दैव म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी लाच (१९२२ साली) असणारी गायनातील स्वर्गीय आनंद पं.भीमसेनजी जोशी यांची जन्मतिथी कुणाच्या आठवणीमध्ये आहे ? आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली. तुम्ही कोणता दिवस तुमचा आनंद म्हणून साजरा करायचा हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार नाही मात्र तो दिवस साजरा करताना आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा.
२५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च करण्यापेक्षा गरीब दुबळ्या अनाथ मुलांना कपडे किंवा अन्न वाटून किंवा दुष्काळात होरपळनाऱ्या, पाण्यासाठी दाहीदिशा टाहो फोडणाऱ्या लोकांसाठी, मुक्या जनावरासाठी पाणी देवून आपल्यामध्ये असणारे सामाजिक भान जपणे गरजेचे आहे, असं मला वाटतं.
ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, त्यांचे विस्मरण हे इंग्रजी डे साजरे करताना होता कामा नये. एवढंच हे इंग्रजी डे साजरं करताना माझं कळकळीचं आणि नम्र सांगणं आहे.
- साजीद पठाण
प्रतिक्रिया
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?भारतियांनी सर्वप्रथम अशी सरसकटीकरणाची मानसिकता सोडली पाहिजे. त्याऐवजी, "कोणाचेही (पाश्च्यात्यांचे किंवा पौर्व्यात्यांचे किंवा अगदी भारतियांचेही) अंधानुकरण कितपत योग्य?" हा प्रश्न जास्त योग्य ठरेल. चांगले-वाईट-पणा हा पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर या दिशांवर अवलंबून नसतो. त्यामुळे जे काही चांगले, हितकारक आणि पुरोगामी आहे ते स्विकारावे, ते तसे नसले तर टाळावे... कुठल्या दिशेने ते येत आहे हे महत्वाचे नाही. आपण अनेकदा मोठ्या मोठ्या गोष्टींच्या गप्पा मारतो, जुन्या काळाचे मोठे दाखले देतो आणि स्वतः मात्र 'सिस्टीम'ला दोष देऊन बेलाशक त्याविरुद्ध वागतो असे खूपदा दिसते. त्याविरुद्ध पाश्च्यांत्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या भारतियांनी उचलणे अत्यंत आवश्यक आहे... हे वरील "कल्पक" यांच्या प्रतिसादातील काही उदाहरणांवरून सहज ध्यानात येईल. पाश्च्यांत्यांची 'दुसर्यांच्या चांगल्या गोष्टी शास्त्रिय आणि सारासारविवेक बुद्धीवर तोलून त्या स्विकारण्याच्या' सवयीचे भारतियांनी अनुकरण करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच भारतियांनी केवळ स्वार्थासाठी सत्य, विवेक आणि सामाजिक फायदा धाब्यावर बसवून दिशाभूल करणारे "राजकारणी" वागणे-बोलणे (जे सर्व विकसित देशांतील बहुसंख्य नागरीक त्याज्य समजतात आणि बर्याचदा ते कायद्याने दंडनीयही असते *) सोडणे अत्यंत आवश्यक आहे. * : हा एक देश / समाज विकसित असण्याचा मानदंड समजला जातो.