Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहेर

स
सुबोध खरे यांनी
Wed, 02/26/2014 - 08:58  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/6840#new या धाग्यावर मी काही विचार लिहिले होते पण धाग्याचा कात्रज होऊ नये यासाठी हा वेगळा धागा काढीत आहे. वेगवेगळ्या लोकांचे विचार ऐकायला मला आवडेल . परवा मी माझ्या बायकोला एक वेगळा विचार बोलून दाखविला. तिने या विचाराला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे.( मुलांचा पाठींबा हळू हळू तयार करण्यात येत आहे )आपल्या मुलांच्या लग्नात (याला अजून चार ते पाच वर्षे आहेत) तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय. सर्व आमन्त्रीताना त्यांच्या इच्छा आणि क्रयशक्तीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या संस्थेला. तिथल्या तिथे देणगी देण्याचे आवाहन करायचे. हि गोष्ट आमंत्रण पत्रिकात सुद्धा लिहून आवाहन करायचे कि अहेर किंवा पुष्प गुच्छ आणण्या ऐवजी तेच पैसे या संस्थाना देणगी म्हणून द्यावेत. जेवढी देणगी लोकांकडून येईल तितकीच देणगी माझ्या खिशातून. जेवण अतिशय साधे आणि फक्त सायंकाळी. उगाच लोकांना रजा घ्यायला लावून मनुष्य तास फुकट आणि लोकांची मनातून नाराजी. लोकांना आगाऊ सूचना किंवा आवाहन आमंत्रण पत्रिकेतून केले (आहेर/ भेटवस्तू ऐवजी आपण रोख व चेक घेऊन यावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे वरील संस्थाना दान द्यावे आणि वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत) तर लोकांची मानसिक तयारी राहते शिवाय वरील संस्थांची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रत्यक्ष कार्य लोकांना माहित असल्याने त्याबद्दल शंका राहत नाही. आपण बहुसंख्य लोक सामाजिक कार्याला मदत करायची आहे अशा मनोवृत्तीचे असतो पण आळशी पणामुळे( यात मी स्वतः येतोच) प्रत्यक्ष काम होत नाही म्हणून हा सुचवलेला एक पर्याय आहे. यात जाता जाता काही समाजकार्य होईल असा विचार आहे. मुळ हे सर्व का आले याची काही कारणे. माझे लग्न १९९२ साली झाले त्या सुमारास माझ्या मित्राचे लग्न झाले तेंव्हा त्याच्या लग्नात आहेर म्हणून १२ भिंतीवरची घड्याळे आली . त्याकाळात शंभर रुपयात येणारे आणि मोठा अहेर दिसेल अशी ती एक वस्तु होती. आम्ही काही जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात अहेर म्हणून रेमंडचा शर्ट आणि पैन्ट पीस दिला (साल १९८५) तोच आम्हाला परत आहेर म्हणून(नजरचुकीने) आला. यात परत अहेर देताना त्याच माणसाला त्यानेच दिलेला अहेर परत करू नये हि साधी गोष्ट कार्यबाहुल्यामुळे त्यांना लक्षात आली नसावी. पण हा एक आमच्यासाठी डोळे उघडणारा अनुभव ठरला. यानंतर आमच्या आईवडिलांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला कि कोणाच्या हि लग्नात अहेर म्हणून फक्त रोख पैसे द्यायचे आणि आपल्या मुलांच्या लग्नात अहेर देणे घेणे काहीही नाही. यानंतर अनेक लग्नांमध्ये मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली कि बायका एकमेकीना साड्या घेतात. त्या त्यांच्या स्वतःच्या पसंतीच्या असतात नेसणार्या बाई च्या पसंतीच्या नव्हे. आता जवळच्या नातेवाईकाने साडी दिली तर ती आवडली नाही तरी ती कोणालाही देत येत नाही आणि आवडली नाही म्हणून नेसता येत नाही. म्हणजे परत एक असून अडचण आणि नसून खोळंबा. ( बर्याच वेळेला स्वतः च्या आईने घेतलेली साडी सुद्धा स्त्रियांना आवडत नाही पण तिचे मन दुखवू नये म्हणून ती एक दोनदा तिच्या समाधानासाठी साडी नेसून मग तो कपाटाच्या कोपर्यात जाऊन पडून राहते. हीच गोष्ट जवळच्या नातेवाइकान्च्या बाबतीत हि घडते अशा अनेक साड्या माझ्या बायकोला आमचे लग्न झाल्यावर आल्या ( आमचा साखरपुडा, लग्न नंतर तिच्या भावाचा साखरपुडा लग्न नंतर दोन्हीकडे डोहाळे जेवण बारसे इ इ.मुळे तिला इतक्या भारीपैकी साड्या आल्या कि पुढच्या दहा वर्षात माझ्या बायकोला आपल्या पसंतीची साडी घेता आली नाही. अगोदरच्या डझनावारी साड्या ब्लाउज शिवायचा राहिल्यामुळे कपाटात पडून होत्या आणि हि गोष्ट मी आमच्या आई वडिलांना सांगितली तेंव्हा त्यांना ती पटली आणि ते जेंव्हा आमच्या घरात समारंभासाठी साडी घेण्याची वेळ येते तेंव्हा आपले बजेट सांगतात( किंवा तेवढे पैसे सरळ पाकिटात घालून देतात) आपल्याला त्या बजेट मध्ये साडी आली तर ठीक अन्यथा वर काही पैसे भर घालून त्या व्यक्तीला आपल्या पसंतीची साडी घेणे शक्य होते. हें असे करायचे असते किंवा हि काय पद्धत झाली का किंवा लोकांना कसे दिसेल या विचाराने बहुसंख्य लोक गतानुगतीकाप्रमाणे चालत असतात. बर्याच वेळेला असे काही करायचे धैर्य नाही म्हणूनही लोक धोपट मार्गाने चालत राहतात. आज साधारण मध्यम वर्गीय स्त्रीच्या कपाटात पन्धरा ते पन्नास ( काही वेळा अजून खूप जास्त) न आवडणाऱ्या साड्या पडून असतात. किंवा फार तर वर्षात किंवा दोन वर्षात एकदा नेसली जाते. हा एक अनुत्पादक खर्च आहे त्यामुळे याला कुठे तरी काट बसावी असेही वाटते. मी यात फार मोठा सामाजिक बदल घडावा अशी अपेक्षा करतो आहे असे नाही पण जर दहा कुटुंबांनी जरी साड्या न्बद्दल असा विचार केला तर पंचवीस पन्नास हजार रुपये सामाजिक कार्याला उपलब्ध होतील. शिवाय त्या स्त्री ला आपल्या आवडीची साडी विकत घेत येईल. या सर्व गोष्टींचा विचार करताना मला वर उल्लेखलेली गोष्ट जाणवली कि लग्नात महागडा शो पीस आहेर म्हणून दिला जातो जो त्या जोडप्याच्या आवडीचा असतोच असे नाही. मग तो देताही येत नाही आणि ठेवताही येत नाही. देणार्याच्या भावना अनमोल असतात पण खर्च वायफळच होतो. हीच गोष्ट पुष्पगुच्छाची. कोणत्याही लग्नाला डझनावारी पुष्पगुच्छ येतात ज्यांची किंमत आजमितीला प्रत्येकी दोनशे ते एक हजार पर्यंत आहे. हे कुठे ठेवावे हा प्रश्न असतो. टाकताही येत नाही आणि ठेवायला जागा नाही. मग हा पण खर्च वायफळच आहे. असे अनेक खर्च आहेत जे आपण सत्कार्याला खर्च करू शकतो. असे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे आपण आवाहन करून लोकांना सामाजिक कार्यासाठी दान देण्याबद्दल विनवू शकतो. हि माझी कल्पना आहे यावर मला लोकांची मते जणू घेणे आवडेल. यात मी काही नवीन जगावेगळी कल्पना मांडतो आहे असा माझा मुळीच दावा नाही. अशी कल्पना इतर अनेक लोकाना सुचली असेलच किंवा यावर काथ्याकुट झाला असेलही जर तसे असेल तर त्याचा दुवा येथे मांडावा अशी विनंती आहे लग्नात किती लोकांना बोलवायचे, सजावटीवर किती खर्च करायचा आणि जेवणावर किती खर्च करायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.

प्रतिक्रिया द्या
21551 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/26/2014 - 16:06 नवीन
तुमचा प्रतिसाद बहुतेक परोपकारी / धर्मदाय संस्था (चॅरिटी) म्हणजे दान केलेली रक्कम केवळ गरिबांचे पोट भरणे अथवा त्यांच्या नेहमीच्या इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी करण्यासाठी वापरणार्‍या संस्था अशा (दुर्दैवाने सर्वसामान्यपणे मानल्या जाणार्‍या) समजेवर आधारीत असावा असे वाटते. दानाची रक्कम मुख्यतः समाजातील दुर्बल घटकांना सबल करण्यासाठी आवश्यक (शिक्षण, व्यवसाय, मार्गदर्शन, इ) काम करणार्‍या संस्थाही आहेतच. "लोकांना मासे पकडूण देण्यापेक्षा ते कसे पकडायचे हे शिकवा." या तत्वावर चालवल्या जाणार्‍या संस्था माझ्या यादीत वर असतात. अर्थात त्यामुळे गरिबांच्या निकडीच्या गरजा पुरवणार्‍या कामांचे (अन्न, वस्त्र, वैद्यकीय सेवा, इ) महत्व कमी होत नाही. पण तेथेच थांबणार्‍या संस्था समाजाची मदत करत नाहीत तर समाजाला पांगळे बनवण्यासाठी मदत करतात असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कंजूस Wed, 02/26/2014 - 13:57 नवीन
फारच चांगली चर्चा इथे घडत आहे .सर्वाँचेच बरोबर वाटते आहे . १)अहेराचा राक्षस विक्राळ रूप धारण करतो ज्यावेळी पाहूण्यांची संख्या फार असते . २)ज्यांना अनावश्यक अहेराचा मुद्दा पटला आहे ते त्यांच्या योजनेनुसार काही ठोस निर्णय घेण्याच्या स्थितीत आहेत का ? यानंतर दोन पर्यायांचा विचार करता येतो . अ)अहेर न घेणे , अथवा ब)या नदीचा प्रवाह नियंत्रित करून योग्य ठिकाणी वळवणे . माझी स्वत:ची उदा:हरणे नंतर .
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 02/26/2014 - 14:15 नवीन
आहेर जर रोखीने दिला तर दिलेली कॅश ही यजमानाच्या संपत्तीचाच हिस्सा बनून जाते. यजमानाने नंतर भले जरी एखादी चांगली वस्तु त्या पैशाने विकत घेतली तरीही ती अमुक अमुक रकमेची वस्तु अशीच तिची ओळ्ख राह्ते. पण तोच आहेर जर तुम्ही एखादी चांगली ( वा तुमच्या दृष्टीने चांगली पण यजमानाला आवडली नाही अशीही ) अशी भेटवस्तु ह्या स्वरूपात दिला तर जेव्हा जेव्हा ती वस्तु यजमानाच्या नजरेसमोर राह्ते तेव्हा तेव्हा तो तुमची आठवण हमखास काढेलच.(बर्याच स्त्रियांना लग्नात अमुक अमुक भेटवस्तु कोणाकडुन आली होती ह्याचे स्मरणरंजन करणे आवडते अगदी समोर न आवडल्याने कधीही न घातलेली साडी जरी आली तरीही ती दिलेल्या व्यक्तिची आठवण निघतेच.)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 02/26/2014 - 15:44 नवीन
लेखन आवडले. १०० टक्के पटले नसले तरी चूक काढण्यासारखेही काही नाही. एकंदरीतच जुन्या नव्याचा संगम असला की ते मागल्या आणि चालू (चांगल्या अर्थी) पिढीला स्विकारण्याजोगे वाटते.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/26/2014 - 16:28 नवीन
इतरत्र दिलेला प्रतिसाद चिकटवत आहे... हा चांगला उपक्रम आहे... माझ्या सभोवतालच्या इथल्या अनेक अनिवासी भारतीयांमधे हे करणे आता खूप कॉमन झाले आहे. पद्धती वेगवेगळ्या वापरल्या जातात. म्हणजे लहानपणी मुलांचे वाढदिवस साजरे करताना भेटवस्तू न देता एखाद्या भारतात काम करणार्‍या सेवाभावी संस्थेस (अथवा अमेरीकेतील देखील) देणगी गोळा करतात. हल्ली अरंगेत्रम (भरतनाट्यम शिक्षणाचे गॅज्युएशन) हे एक मोठ्ठे प्रस्थ झाले आहे तसेच ग्रॅज्युएशन पार्ट्या पण होतात. पण यात विशेष करून संघाची पूर्वपिठीका असलेल्या कुटूंबांकडून स्वतःच्या खिशातून निधी एखाद्या सामाजीक कार्यास देण्याची पद्धत मी पाहीली आहे. तेच लग्न समारंभात देखील पाहीले आहे. अनुचीत होईल म्हणून नावे घेण्याचे टाळतो: पण दोन मोठी उदाहरणे माहीत आहेत. एका उदाहरणात अमेरीकेत जन्मलेल्या मुलाचेच लग्न होते. तो गुंतवणूक क्षेत्रातला असल्याने आमंत्रितही तसेच होते. सगळ्यांना फक्त समाजनिधीसाठी देयचे असले तर पैसे देण्यास सांगण्यात आले आणि गोळा झालेले जवळपास $७५,००० जसेच्या तसे भारतात कुठल्याशा कार्याला दिले. एक भारतीय वंशाचा मुलगा, इथल्या मनोरंजन क्षेत्रात यशस्वी झालेला आहे. त्याच्या संदर्भात आत्ताच ऐकले. भारतात रीक्षा ओढत नेणारी माणसे प्रत्यक्ष पाहीली. नंतर नजीकच्या काळात लग्न होते. स्वतःच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतो म्हणून देवाकडे आभार मानण्यासाठी म्हणून त्याने पन्नास रिक्षेवाल्यांना मोटराईझ्ड रीक्षा दिल्या... पण हे मोठे सोडून द्या अगदी अमेरीकन सुखवस्तू असलेले पण अमेरीकन स्टाईल अतिश्रीमंत नसलेले भारतीय देखील असे दान देताना पाहीले आहेत. _______________ प्रश्न केवळ आहेरापुरताच मर्यादीत नाही. अमेरीकेत मृत्यूनंतर शव हे फ्युनरल होम मधे ठेवावे लागते जेथे अत्यंदर्शन घेतले जाते आणि तिथून ते अंत्यसंस्कारास जाते. अमेरीकन (ख्रिश्चन) पद्धतीत त्या वेळेस मोठमोठाले (आणि महागडे) फुलांचे गुच्छ अथवा परड्या घेऊन तेथे ठेवण्यात येतात. आता अनेक जण मृतासंबंधातील बातमी जाहीर करताना आणि अत्यंदर्शनाची वेळ सांगताना, हे देखील स्पष्ट करतात की अशी फुले न आणता ते पैसे त्यांनी सुचवलेल्या संस्थेस द्यावेत. अनेक वेळेस ज्यामुळे मृत्यू आलेला असतो - अशा रोगांच्यावर संशोधन करणार्‍या अथवा त्यासंदर्भातील सेवाभावी संस्थांना मृताच्या नावाने देणगी देणे सुचवलेले असते. अनेक भारतीय देखील (सर्वत्रच) आता पक्ष-श्राध्द करण्याऐवजी ते पैसे सेवाभावी संस्थांना देतात, जे योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Wed, 02/26/2014 - 16:45 नवीन
असे दान हे सत्पात्री होईलच याची खात्री देता येईल काय? अनुभव असा आहे कि यातले बरेचसे पैसे वायफळ खर्च होतात. बर्‍याचश्या अश्या ना नफा ना तोटा संस्थातले व्यवस्थापक/कर्मचारी इतका पगार घेत असतात कि नक्की किती पैश्याचे समाजोपयोगी काम करत असतील असा प्रश्न पडावा. दोन स्वानुभव १. एका संस्थेला काही रक्कम दान दिली होती. नंतर त्यांनी एवढ्या जाहीराती/पत्रे पाठवली (परत पैसे द्या म्हणून) की मी दिलेली देणगी त्या खर्चापुढे काहीच नव्हे. २. एका वॄद्धाश्रमात दिवाळीचा फराळ नेऊन दिला होता (रोख पैश्याचा अपहार होतो म्हणून). नंतर बाहेरून समजले की तो फराळ लोकांपर्यंत पोचलाच नाही. व्यवस्थापकांनी तो परस्पर विकून टाकला. ३. एका वस्तीतील काही मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे आमच्या आस्थापनेतील काही जणांनी मिळून ठरवले होते. पैसे जमले. शाळा ठरली. आणि एक दिवस त्या मुलांचे पालक दारात येऊन उभे राहीले. "तुम्हि आमच्या मुलांना घेऊन जात आहात. आम्हाला एवढे पैसे द्या." अर्थात योजना बारगळली हे वेगळे सांगायला नकोच. आता "असे" दान करण्यापेक्षा पैसे स्वतःच्या मौजमजेवरच खर्च करतो आणि त्यात काही गैर करतोय असे वाटत नाही. पण अजूनही हौस भागलेली नसल्याने पुढेमागे एखाद्या गरजू मुलाला शैक्षणिक मदत करण्याचा विचार आहे पण तो मुलगा/मुलगी डोळ्यासमोर/ओळखीचा असेल आणि शिक्षणाची मनापासून आवड असलेला असेल. असो...
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Wed, 02/26/2014 - 18:31 नवीन
डॉक्टर साहेबांनी फारच चांगल्या संकल्पनेला जन्म दिला आहे. मला सुद्धा हा लग्नमधला खर्च बघता खूप त्रास होत असे. पूर्वी फक्त आईला अशा साड्या यायच्या आता माझ्या लग्नानंतर बायकोलाही येऊ लागल्या आहेत. मनातून सत्पात्री दान करायची खूप इच्छा आहे. परंतु रस्त्यावरील भिकार्यांचे वागणे, त्यांना चालवणारे कंपू यांच्याबद्दलहि खरी माहिती कळल्याने त्यांना पैसे न देण्याचा निर्णय तर लगेच करून टाकला. त्यामुळे रामपुरी यांच्या प्रश्नाशी मी सहमत आहे. पण मला वाटते कि खरे साहेबांनी तो प्रश्न अगोदरच सोडवला आहे. दान सत्पात्री राहावे यासाठी खरे साहेबांनी (माझ्या माहितीप्रमाणे) बरोबर संस्थांची निवड केलेली आहे. १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय यापैकी मला आनंदवन माहिती आहे. मध्ये आनंदवनाबद्दल एक धागा वाचला तेव्हा आनंदवनाचे व्हिडीओ आणि वेब साईट यांना भेटी देऊन थोडी माहितीही मिळवली. त्यांच्या कार्यामध्ये ते समाजाला पांगळे बनवायचे काम नक्कीच करत नाही आहेत याला सर्व जण मान्यता देतील. उलट पांगळ्या लोकांना मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला मदत करत आहेत. बाकी वनवासी कल्याण आश्रम बद्दल मला फारशी माहिती नाही. आणि टाटा कर्करोग रुग्णालयाचे कामकाज कसे चालते (म्हणजे चॅरिटी कि कसे आणि मग त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार वगैरे) याची मलाही माहिती नाही. पण आनंदवनाला द्यावयास माझी हरकत नसावी. मग ते लग्न खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या परम शत्रूचे का असेना. रामपुरी - शैक्षणिक दत्तक घेण्याचा तुमचा अनुभव थोडा विस्तारित करून सांगितलात तर थोडी माहितीत भर पडेल.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/26/2014 - 19:50 नवीन
सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन नवीन स्वतंत्र धागा काढल्याबद्द्ल डॉ. खरे यांना धन्यवाद. डॉक्टरसाहेब तुमची कल्पना अगदी स्तुत्य आहे. भरमसाठ खर्च करण्यापेक्षा सेवाभावी संस्थांना मदत करण्याचं आवाहन करणं कधीही चांगलंच. तुम्ही केलेली संस्थांची निवडही उत्तम आहे. ज्या तरूण-तरूणींना आपल्या स्वतःच्या लग्नात ही संकल्पना राबवायची असेल तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही... माझी किंचित असहमती ह्या गोष्टीला आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नात हे राबवायचं असं म्हणताय. त्यांचं मन वळवायचं असं म्हणताय. का? तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे. तो कसा साजरा व्हावा याबद्दल त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे महत्वाचं आहे. इट इज अबाउट देम, नॉट द पेरेन्ट्स!!! वधुवरांना कदाचित ही कल्पना आवडेल, कदाचित आवडणार नाही. आवडली तरी त्यांच्या पसंतीच्या संस्था वेगळ्या असू शकतील. कदाचित त्यांची अशी भूमिका असू शकेल की उरलेल्या सर्व आयुष्यात मी सामाजिक मदत करीन पण फक्त आजच्या एका दिवशी मला आणि माझ्या जोडीदाराला जर मिरवावंसं वाटलं तर त्याला आईबापांचा विरोध का? तुम्ही मन वळवायला गेलांत तर कदाचित आई-बापांच्या कौटूंबिक प्रेशरखाली ते तयार होतीलही पण, त्यांनी बोलून दाखवलं नाही तरी एक दीर्घजीवी कडवटपणा निर्माण होण्याची विनाकारण शक्यता आहे तेंव्हा जरा सावधान! म्हणून म्हंटलं की इथल्या उपवर मिपाकरांसाठी हा ऑप्शन जरूर आहे पण तुमच्या-आमच्यासाठी द शिप हॅज सेल्ड ऑल्रेडी!! चूभूद्या घ्या...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/27/2014 - 06:46 नवीन
पि डा साहेब, माझ्या स्वतः च्या लग्नात मला हि कल्पना सुचलीच नव्हती अन्यथा मी तेथे ती कदाचित राबविली अस्ति. मुलांच्या लग्नात त्यांनी जरूर मिरवावे उलटपक्षी लग्न हा मुलीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा दिवस असतो जेंव्हा ती समारंभाचा केंद्रबिंदू असते. आणि आपली नटण्या मुरडण्याची हौस तीला पुरवून घेता येते. येथे मला माझ्या माहितीतील दोन बहिणींच्या लग्नाची गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. दोघी बहिणींचे लग्न तीन दिवसांच्या अंतराने होते त्यात मोठ्या बहिणीने रजिस्टर करायचे म्हणून ठामपणे सांगितले होते म्हणून तिच्या लग्नाच्या दिवशी सगळे जण ठाण्याहून बांद्र्याला रजिस्ट्रार च्या ऑफिस मध्ये गेले लग्न रजिस्टर केले हार तुरे घातले. झाले संपले. सगळे लोक घरी आले. आणि यानंतर दुसर्या मुलीच्या लग्नासाठी मेंदी लावणे पासून सर्व विधी सुरु झाले. नातेवाईक होतेच. पुढच्या दोन तीन दिवसात दुसर्या मुलीची सर्व हौस मौज साड्या नेसणे बदलणे ग्रहमख सीमांतपूजन इ इ ( आई वडिलांनी आपली सुद्धा हौस पुरवून घेतली) शेवटी लग्न लागून स्वागत समारंभाच्या अगोदर मोठी बहिण रडकुंडीला आली. तेंव्हा तिच्या काकूने तिला जवळ घेऊन विचारले. त्यावर तीच म्हणाली कि मीसुद्धा नवी नवरीच आहे मला कोणी विचारत नाही. काकूने तिची समजूत काढली पण तरीही तिला आयुष्यभर रुखरुख लागून राहिली कि रजिस्टर लग्न तिने का केले ? म्हणून मुलीच्या दृष्टीने आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग असा सरकारी ऑफिस मध्ये घालवणे मला अंगावर कट आणणारे वाटते. राहिली गोष्ट मुलांच्या बाबतीत. त्यांनी लग्न कसे करावे हे त्यांची मर्जी. दोन्ही मुलांनी आपले करियर कोणते घ्यावे इथपासून पुढे काय करायचे आहे हे त्यांना स्वातंत्र्य आम्ही दिलेआहे तेंव्हा इतक्या छोट्या गोष्टीत ते आमच्या दबावाखाली येतील हि शक्यता जवळजवळ नाहीच. मी वैद्य्क्शस्त्रकदे जाऊ नये असे माझ्या आई वडिलांचे मत होते तरीही मी डॉक्टरच झालो त्यामुळे अशी गोष्ट मुलांच्या मनाविरुद्ध होईल असे वाटत नाही. मुळात हि गोष्ट मी त्यांना दोन दिवसापूर्वी सांगितली तेंव्हा त्यांना पण ती एकदम आवडली. सध्या मुलांची वये १९ आणि १७ आहेत. लग्नाच्या हाल च्या बाहेरच्या गैलरीत जर असे स्वयंसेवक बसवले तर कोणालाही आपण किती देणगी दिली हे सांगण्याची किंवा देणगी दिली कि नाही हे लोकांना दाखवण्याची गरज पडत नाही. असे आम्ही आमच्या घरच्या समारंभात करीत आलो आहोत. त्यामुळे त्यात माच्या इतर नातेवाईकांनी किती देणगी दिली दिली कि नाही हे कधीच कुणाला कळत नाही. हा धागा काढण्याचा मुल हेतू हाच आहे कि याचे चांगले किंवा वाईट परिणाम काय होऊ शकतील याचा विचार व्हावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/27/2014 - 03:16 नवीन
हे म्हणजे परदेशात निवडणुकीसाठी किंवा एखाद्या समाजकार्यासाठी फंड रेसिंग साठी डिनर विथ कॉकटेल आयोजित करतात त्याची भारतीय आवृत्ती वाटते. त्या पेक्ष्या पत्रिकेत आहेर आणू नये असे लिहिणे योग्य वाटते. उद्या एकाद्या व्यक्तीला समजा सामाजिक संस्थांना दान करायचे नसेल तर तुमच्याकडे लग्नाला आल्यावर त्याला आहेर देता न आल्याने नाईलाजाने रोख पैसे त्या संस्थांना द्यावे लागतील. एखाद्याला त्यांच्या मर्जी विरुद्ध रोख पैसे सामाजिक संस्थांना लोकांच्या समोर आपली पत जपण्यासाठी द्यायला लागता कामा नये. माझ्यामते आहेर हे प्रकरण वेगळे ठेवावे , एकतर ओ घेऊच नये , ह्या उपर तुमच्या योजनेत एक बदल सुचवतो , लग्न लागल्यावर तुम्ही माईक वरून तुम्हाला एखाद्या सामाजिक संस्थेला दान द्यायचे असेल तर चांगली रक्कम दान करा व मग ज्याला आपल्या खुशीने समाजसेवी संस्थेला दान करायचे असेल त्याला मंडपात त्या संस्थेच्या पावती पुस्तक घेऊन बसलेल्या प्रतिनिधीकडे पैसे जमा करावयास सांगावे , म्हणजे दान करणे किंवा करायचे नसेल तर न करण्याचा पर्याय लोकांच्या पुढे असतो. त्यांच्यावर आहेराच्या एवजी रोख रुपये अशी सक्ती नसावी. मुळात लग्न पत्रिकेत कृपया आहेर आणू नये तुमचे आशीर्वाद हा आमचा आहेर असे लिहिणे केव्हाही चांगले , आणि माझ्यामते ज्याला लग्न दणक्यात करायचे त्याने आपल्या ऐपती नुसार खुशाल दणक्यात करावे , आपल्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो , पर्यायाने अर्थ व्यवस्थेला चालना मिळते. मुळात लग्न व दान ह्यांची सरमिसळ करू नये लग्नात कन्यादान होणे तेवढे महत्वाचे सेवाभावी संस्थांना वर्षातून नियमितपणे प्रत्येकाने ठराविक रक्कम किंवा आपला वेळ दिला तरी पुरे आहे ,
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/27/2014 - 14:33 नवीन
आपले म्हणणे कुठेतरी पटते. यास्तव आमच्या वडिलांची पंचाहत्तरी आणि आई वडिलांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी आम्ही कार्यक्रम केले तेंव्हा कोणताही आहेर किंवा भेटवस्तू अनु नका असे आवर्जून सांगितले. आणि दोन्ही वेळा सामाजिक संस्थाना देणग्या दिल्या. पण या दिवशी सुद्धा अनेक लोक पुष्प गुच्छ घेऊन आले होते आणि शेवटी त्या पुष्प गुच्छांचे काय करावे हा प्रश्नच होता. लोकांच्या भावना मौलिक होत्या पण अशा वाया जाणार्या गोष्टींचे काय करावे हे अजून समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
च
चौकटराजा गुरुवार, 02/27/2014 - 04:18 नवीन
आहेर म्हणजे प्रेमापोटी, मायेपोटी वा या दोन्हीचाही दिखाव्या पोटी एकमेकानी एकमेकांच्या अर्थ व्यवस्थेत केलेली लुडबुड. आपल्याला काय हवे काय हे प्रत्येकाला सर्वात जास्त कळते. सबब बायकोला " सरप्राईज" म्हणून मी माझ्या मते झक्कास असलेली साडी आणायची व तिने ती पाच वर्षातून कधीतरी नेसल्यासारखे करायचे. हा प्रकारच मला भयंकर वाटतो. मी रंग संगति , पोत वगैरे बाबत तिला सल्ला देणे वेगळे व तिच्या नकळत तिला " प्रेमापोटी" काही आणणे वेगळे. तेच सर्व प्रकारच्या आहेरांचे आहे. कोणतेही कार्य हे आहेरानेच शोभून दिसते का? एका वर्षश्राद्धाला गेलो होतो.( कोणत्या ब्राह्मण पोटजातीच्या ते गुपित आहे ) हे श्राद्ध आहे की लग्न असा आहेर ( देणे घेणे) चालू होते. मला शास्त्रीय संगीत आवडते म्हणून गेल्या चाळीस वर्षात मला एकाही मित्राने व नातेवाईकाने एकादी कॅसेट भेट दिलेली नाही. व मला कपड्यांची फारशी आवड नसताना पॅन्ट पिसेसचे गट्ठे पडून रहात. मला नंतर उमगले की मला मिळालेले हे पिसेस "फिरवलेले" असायचे. आता मी ही पक्का निर्लज्ज बनलो आहे मी ही " फिरविण्याचे" तंत्र शिकलो आहे. बाकी तुम्ही आहेर घेउ नका येथपर्यंत ठीक आहे पंण देणग्यांची कल्पना ऐच्छैक स्वरूपाची असली तरी मला ती मान्य नाही. ती एकप्रकारची प्रेमळ अटच ठरेल. पेक्षा निखळपणे विवाहाचा आनंद सर्वानी घ्यावा हे उत्तम !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/27/2014 - 09:53 नवीन
एक्दम बरोबर एकदम बरोबर आहे तुमचा विचार. उत्तम. मी सहमत आहे. अहेर नावाची गोष्ट, देणं घेणं, हे प्रकार वाढत जाणारे आहेत. याची कक्षा ठरवणं कठीण जातं, आणि मग घोळ होतात. ऑन अ लायटर नोट... कॅश गिफ्ट इज द बेस्ट गिफ्ट! ऐसा मेरेको लगता है.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/27/2014 - 16:31 नवीन
अहेर या वस्तू आणि पैशाच्या अपव्ययातून काही सामाजिक उपक्रम यशस्वी होत असतील तर या उपक्रमाचं स्वागत व्हायला पाहिजे, आणि हा विचार पुढे न्यायला हवा. डॉ.साहेब चांगला विषय मांडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 02/27/2014 - 17:10 नवीन
१००% सहमत. खरे साहेबांना धन्यवाद, नवीन दिशा दाखवल्याबद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माधुरी विनायक Fri, 02/28/2014 - 13:44 नवीन
एखाद्या संस्थेला मदत दिल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा मदत देण्याची विनंती करणाऱ्या पत्रव्यवहाराच्या भडिमाराबद्दल वाचले.पण सगळ्या संस्था अशा नसतात. माझा अनुभव थोडा वेगळा आहे. लेकीच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी अनेक नातेवाईकांकडून वाढदिवस समारंभाबाबत विचारणा झाली. माझ्या मनात मात्र समारंभाऐवजी थोडी वेगळी कल्पना होती. लेकीच्या वाढदिवशी दादर भागातल्याच एका बालिकाश्रमातल्या मुलींच्या जेवणाचा खर्च उचलायचा आणि तिथेच केक कापायचा, असा विचार नवऱ्यासमोर मांडला. नवऱ्याने आनंदाने दुजोरा दिला. नुकताच लेकीचा पाचवा वाढदिवस झाला. गेली चार वर्षे तिच्या वाढदिवशी आम्ही त्या बालिकाश्रमात जातो. तिथल्या मुलींसोबत केक कापतो. थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवून, संस्थेत त्या मुलींच्या रात्रीच्या जेवणाचे पैसे भरून घरी परततो. मुलींचा वयोगट 5 ते 15 वर्षे. त्यावरील वयाच्या मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या आश्रमात पाठवले जाते. संस्थेकडून एकदाही पाठपुरावा अथवा विनंत्यांचा भडीमार झाला नाही. लेक साधारण दोन वर्षांची झाली, तिला समज आली तेव्हाच या मागचा विचार तिला समजेल अशा शब्दात समजावून सांगितला. आता ती सुद्धा मनापासून रमते यात. या वर्षी एका अपरिहार्य कारणामुळे प्रत्यक्ष जाता आले नाही. मात्र आश्रमात दूरध्वनीवरून मुलींची संख्या विचारून त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या रकमेचा धनादेश पाठवून दिला. तिसऱ्याच दिवशी त्यांच्याकडून पोच-पावती मिळाली. संस्थेतर्फे दिलेल्या रकमेची रीतसर पावती दिली जाते. अनेक जण आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसाला अथवा स्मृतीदिनी या मुलींच्या जेवणाचा खर्च उचलला... केक कापणे ही आपली संस्कृती नाही, हे मान्य. औक्षण करतेच लेकीला प्रेमाने. मात्र केक कापण्याचा आनंद तिच्या लेखी मोलाचा आहे.. त्यामुळे तो आम्ही वाटून घेतो... इतकंच...
  • Log in or register to post comments
म
मैत्र Sat, 03/01/2014 - 07:54 नवीन
जर मी हे प्रत्यक्षात घडलेलं पाहिलं नसतं तर कदाचित मला पटलं नसतं की असं करता येऊ शकेल आणि मित्रपरिवार नातेवाईकही त्यात सहभागी होतील. माझ्या अतिशय जवळच्या मित्राचं लग्न पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये झालं. त्यांनी हा विचार प्रत्यक्षात आणला. मुख्यतः मेळघाट मधल्या आदिवासी आणि कुपोषित बालकांसाठी काम करणार्‍या संस्थांचे प्रतिनिधी बोलावले. आणि सर्व आहेर पैशाच्या स्वरुपात - ऐच्छिक रक्कम थेट देणगी देण्याची सगळ्यांना विनंती केली. स्वतःही अपेक्षित खर्चाला फाटा देऊन काही रक्कम या देणगीत भर म्हणून घातली. नवल वाटेल की सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये एका दिवसात जमा झाले. मुख्यतः समविचारी मित्रपरिवारामुळे आणि अतिशय जेन्युईन अशा जोडीबद्दल विश्वास असल्याने. योग्य ठिकाणी मदत पोचावी म्हणून ज्या संस्थांबरोबर स्वतः काही काम केले आहे अशांना बोलावले होते. दोघेही जण मास्टर्स आणि पीएच डी आहेत आय आय टी / अमेरिकेतील अत्यंत नामवंत विद्यापीठातून. लग्न झालं तेव्हाच मिळालेल्या नेमणू़कपत्रानुसार लगेचच आय आय टी गुवाहाटी मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे. अशा उच्चशिक्षित आणि अत्यंत साध्या पद्धतीने राहणार्‍या जोडीने हे करून दाखवलं आहे. त्यामुळे डॉक्टर जरूर असा उपक्रम करा. पण अर्थात मुलांच्या आवडी / पसंती नुसार.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/01/2014 - 08:04 नवीन
फारच उत्तम उदाहरण आहे ! नविन वाट चोखाळायला अंगात दम लागतो, तो या दोघांनी दाखवला ! अशी माणसे नहमीच विरळ असतात. बाकी सर्वसामान्य जनतेला आपल्या परिघाबाहेरचे काहिही करायला जरा धास्ती वाटते आणि ती लपवायला अनेक खुसपटे काढली जातात, ही जगरहाटी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
प
पैसा Mon, 03/10/2014 - 10:17 नवीन
अतिशय उत्तम कल्पना आहे. इतर काहीजणांचे विचारही आवडले.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 03/10/2014 - 10:35 नवीन
एक सुचना करू का? या संस्था नावाजलेल्या आहेतच, पण त्यांना निधीची कमतरता असेल असे वाटत नाही. त्यापेक्षा अखाद्या अल्पपरिचित परंतु चांगले कार्य करणार्‍या संस्थेला ही देणगी देता आल्यास त्यांना अधिक हुरूप देणारे ठरावे. बाकी उद्देश, विचार आणि प्रत्यक्ष कृती आराखडा बघुन तुमच्याबद्दलचा आदर दुणावला आहेच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/10/2014 - 10:57 नवीन
साहेब, ज्याला जे पटेल त्या संस्थेला दान द्यावे. मुळ हे दान आपणच नव्हे तर इतर लोकही देणार आहेत म्हणून लोकांना शंका येणार नाही अशाच संस्था असाव्यात आणि मी लिहिलेल्या संस्था या अशाच आहेत.याचा अर्थ असा मुळीच नव्हे कि इतर संस्था त्या पातळीच्या नाहीत. किंबहुन असे पण असू शकते कि त्या संस्था जास्त गरजवंत असतील. मी दिलेल्या संस्था या प्रातिनिधिक आहेत. शेवटी कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
आ
आयुर्हित Wed, 08/27/2014 - 00:40 नवीन
अमेरिकेतील रिचमंड व्हर्जिनिया येथील मोनिका व बॅरी गॅंबल या नवदांपत्याने लग्नभेट म्हणुन आलेल्या अतिथींना रक्तदान करावयास सांगुन अज्ञात गरजू लोकांचेही आशिर्वाद मिळवले. अहेराचे एक अतिशय सुंदर उदाहरण! Meet the Couple Who Asked Their Wedding Guests for Their Blood
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Wed, 08/27/2014 - 06:22 नवीन
मलाही नेमके हेच वाटत होते फक्त संस्था वेगळी.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Wed, 09/30/2015 - 13:15 नवीन
बर्याच लग्न समारंभात अन्नाची खुप नासाडी केली जाते. पाणी-पुरी स्टाॅल, चायनिज स्टाॅल, आईस्किम स्टाॅल ठेवले जाते. आलेले लोक पाणी-पुरी, चायनीज, आईस्किम खाल्ल्यावर जेवण काय करणार. बुफे सिस्टिम मुळे लोक प्लेट मध्ये पदार्थ भरून घेतात व त्यातील काही गोष्टी टाकून देतात. 7-12 वर्षाच्या मुलाला आया आपल्याच ताटात जेऊ न देता स्वतंत्र ताट घेतात, मुले बरेच अन्न टाकूण देतात. अशा प्रकारे बरेच अन्न डस्टबीन मध्ये टाकले जाते. त्यापेक्षा पंगत पद्धतीप्रमाणेे पोळी,भाजी,वरण,भात,चटणी,कोशिंबिर,लोणचे,भजी,लाडू असे जेवण करून जर टेबल वर विचारून वाढले तर अन्नाची नासाडी होणार नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा