Welcome to misalpav.com
लेखक: जयनीत | प्रसिद्ध:
पावसाचे अजूनही काही लक्षण दिसत नव्हते. लागोपाठ तिस-या वर्षी दिसणा-या दुष्काळच्या सावटाने लोक चिंताक्रांत होते. " आज संध्याकाळी सगळी संगत पावसासाठी प्रार्थना करायला गुरुद्वारात जमणार आहे " सरदार सोहन सिंग शौकत अलींना सांगत होते. " हो तेवढंच उरलंय आपल्या हातात, प्रार्थनाच करू शकतो आपण, जर ह्या वर्षीही पाउस आला नाही तर कठीणच दिसतंय सगळं " शौकत अली म्हणाले. " आम्ही पण येऊ प्रार्थना करायला? शौकत अलींचा नातू रेहान मधेच म्हणाला. शौकत अलींचे तोंड आश्चर्याने क्षणभर उघडेच राहिले, सरदार सोहन सिंगही गोंधळले. " आमच्या मास्टरजींनी पण सांगितलं आहे सर्वांना पावसासाठी प्रार्थना करायला " रेहान म्हणाला. " हो, हो " शौकत अली रेहानला म्हणाले " आपणही जाणार आहोत ना मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी आपणही अल्ला कडे प्रार्थना करणार आहोत पावसासाठी " शौकत आली आपल्या नातवाला म्हणाले. " तिथे पण जाऊ ना! पण आज आपण गुरुद्वारात जाऊन येऊ " रेहान म्हणाला. काय उत्तर द्यावे हे शौकत अलींना कळेना. " आज नको आत्ता आपल्याला घरी जायचय ना " ते नातवाला म्हणाले. " घराच्या रस्त्यावरच तर आहे गुरुद्वारा, आज आपण तिथे जाउ " रेहान म्हणाला. " रेहान उगाच हट्ट नाही करायचा एकदा सांगितलं आपण मशिदीत जाउ म्हणून!" शौकत अली किंचित अस्वस्थ झाले होते. " तिथे तर नेहमीच जातो आपण, एकदा तरी गुरुद्वारात पण जाऊया ना! " रेहान म्हणाला. आता त्याला काय उत्तर द्यावे कुणालाच कळेना. सोहन सिंगांना शौकत अलींच्या चेह-या वरची अस्वथता दिसत होती. त्यांची अडचण ओळखून ते मधे पडले, " आजोबांच ऐकायचं बेटा तू! आत्ता त्यांच्या सोबत जा आणि काळजी नको करूस आम्ही तुझ्या नावानेही प्रार्थना करू " परस्थिती ओळखुन सोहन सिंग समजावणीच्या सुरात म्हणाले. " का? मी नाही येऊ शकणार तिथे?" रेहान हिरमुसला, त्याचे प्रश्न काही केल्या संपत नव्हते. रेहानचा पश्न सोहन सिंगांना खोलवर कुठेतरी हलवून गेला. मनुष्याने निर्माण केलेल्या कर्मकांडात देव ही कसा जखडुन गेला आहे हे त्या क्षणी त्यांना जाणवले पण त्या निष्पाप पोराने विचारलेल्या साध्याशा प्रश्नाचे उत्तर त्यांच्यापाशी नव्हते. त्यांनी सरळ विषय बदलण्याचा सोपा मार्ग चोखाळला. " फारच गोड नातू आहे हो तुमचा " ते शौकत अलींना म्हणाले. " ह्याच्या भोळ्या चेह-यावर जाऊ नका हं! अतिशय खोडकर आहे तो, नुसता धुमाकूळ चालतो ह्याचा दिवसभर, सारं घर डोक्यावर घेऊन असतो " शौकत अलींनी प्रेमानी रेहानच्या डोक्यावर एक टपली मारलॆ. " ह्या वयात अजून कसं वागणार तो? जाऊ दे रे! आजोबांच काहीही ऐकायच नाही, अन ते रागावले की मला सांगायचं! मग मी बघील कसे रागावतात ते, थांब ह्म! बस मी तुला मस्त खाऊ देतो बेटा " सोहनसिंग आत जायला निघाले. रेहानच्या तोंडून कोणत्या क्षणी कुठला प्रश्न बाहेर पडेल ह्याच काहीही नेम नव्हता, त्याच्या आजोबाना तीच एक भीती वाटत होती. " नको खाऊ बिऊ पुन्हा कधी तरी, सध्या तुम्हीही गडबडीत आहात, निघतो आम्ही " असं म्हणून शौकत अली रेहानला घेऊन बाहेर पडले. रेहानचे गाल फुगले होते. त्याला आजोबांच्या वागणुकीचा अर्थच कळत नव्हता. आज तर त्याने कुठलीही खोडी केली नव्हती, मग आजोबांनी त्याला का बरं ओढून आणलं? खाऊ पण नाही खाऊ दिला. ( समाप्त )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

उत्तम कथा! म्हणतात ना बेशक मंदिर मस्जिद तोडो, बुलेशाह ये कहता| मगर किसी का दिल न तोडो, उसमे रब रहता||

कथा फार कठीण विषया वर होती त्यामुळे कितपत जमेल ह्या बद्दल शंका होतीच. @ आदुबाळ, स्नेहांकिता आत्मशून्य प्रतिसादा साठी सर्वांना धन्यवाद. @ aparna akshay, तुम्हाला कथा आवडलेली नाही हे स्पष्ट आहे, पण तुमचे प्रतिसाद नेहमीच उत्स्फूर्त आणि म्हणूनच महत्वाचे असतात. धन्यवाद. @ आयुर्हित, बुल्हेशाह ह्यांच्या ओळी शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

तसा मी कथा कादंबर्‍यांचा शौकीन नाही कधी समोर आलीच तर शेवट आधी वाचतो आणि नंतर वाचावी की नाही ठरवतो प्रत्येक ओळ क्वचीतच वाचली जाते. त्याच शीरस्त्यानी आधी शेवट वाचला मग सुरवात पाहिली आणि जवळ पास प्रत्येक वाक्य वाचले. कथेचा हाच आकार आणि हीच शैली बरी वाटली. तुमच इतर लेखन पाहण्या करताही वेळ देण्याचा विचार करतो आहे.

लहान मुलं निरागस असतात. पण तीच मोठी झाली की शिकवणुकीप्रमाणे, कधी सहिष्णु होतात, तर कधी अतिरेकी.