गोळा भात
Primary tabs
मिपाच्या पाककृती विभागात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील पाककृती नेहमीच सादर होत असतात. असाच एक विदर्भात केला जाणारा पदार्थ म्हणजे गोळा भात. विशेषतः वर्धा-नागपूर या बाजूला केला जाणारा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा सगळे नातलग एकत्र येतात तेव्हा गोळा भात हमखास केला जातो. आज खास मिपाकर खवय्यांसाठी ही पाकृ.
साहित्य:
१ वाटी हरभरा डाळ (चणा डाळ)
१ वाटी तूर डाळ
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
१ चमचा धणेपूड
१ चमचा जिरेपूड
४-६ कढीपत्त्याची पाने
१ चमचा साखर
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
२ वाट्या तांदूळ भातासाठी
फोडणीसाठी:
१ वाटी तेल
२ चमचे मोहरी
३-४ लसूण पाकळ्या (आवडत असल्यास)
३-४ सुक्या लाल मिरच्या
अर्थातच आवडीनुसार लसूण आणि मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
कृती:
तूर डाळ आणि हरभरा डाळ ६-८ तास भिजवून ठेवावी. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सर मधून भरडसर वाटून घ्याव्या. या वाटलेल्या मिश्रणात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, किंचित साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने सगळे एकत्र करावे.
या मिश्रणाचे छोटे गोळे करावे. या साहित्यात १४-१६ गोळे होतात.
हे गोळे ढोकळा वाफवतो तसे वाफवून घ्यावे. वाफवण्यासाठी इडली पात्र, स्टीमर किंवा कुकरला शिट्टी न लावता अशा कुठल्याही प्रकारे वाफवले तरी चालतात. साधारण १०-१२ मिनिटे वाफवण्यासाठी पुरेसे आहेत. मायक्रोवेव्हचे इडली पात्र असेल तर त्यातही वाफवू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये ४-५ मिनिटे लागतात.
बासमती शिवाय कुठल्याही तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा.
तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि लसूण घालून फोडणी करावी.
आता भात, त्यावर हे गोळे कुस्करून आणि त्यावर फोडणी घालावी. गोळा भात तयार आहे.
सोबत ताजे लोणचे असेल तर अधिकच रंगत येते. यासोबत नेहमी ताक अथवा मठ्ठा केला जातो. आज मी सोलकढी केली होती. हे कॉम्बिनेशन पण चांगले लागत होते.
वा! मस्तच दिसतोय गोळाभात.
यप्प.. मस्तच एकदम. माझी आजी बनवायची. अमरावतीच्या घरी सगळे असे एकदम बसायचो पंगतीला :)
खल्लास पाकृ आणि फोटू. एक शंका, भात शिजत आला की त्यावर हे गोळे ठेवतात असे ऐकले होते. या भाताच्याही अनेक रेशिप्या आहेत काय? काहीही असो, मी लवकरच हा प्रकार करून बघणार.
धन्स गं. तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझी आजी अशा पद्धतीने करायची की भात शिजत असतानाच त्यावर गोळे वाफवायचे. पण त्यात वेळेचे गणित चुकून गडबड होऊ शकते. म्हणून मग वेगळे वाफवलेले मला सोपे वाटतात.
ओके.
मानाहायीमला यावे म्हणते. देखणी पाककृती . :P :D
चवीबद्दल अनुभव घेऊन अभिप्राय देण्यात येयील . *beee* ;)
नविनच अन मस्ताड पाकृ.
ही पाककृती वाचून अनेक वर्षांपूर्वीच्या स्मृती जाग्या झाल्या.
उत्तम सादरीकरण व तपशीलवार वर्णन.
सुरेख फोटो आणि पा. कृ.!
मी भात शिजत असताना (हाफ) गोळे करुन टाकले होते, तुम्ही म्ह्णता तसे काहीतरी चुकले असेल कारण चागला झाला नव्ह्ता. आता या पध्तीने करुन बघेन.
मधुरा,
अग मला पण खूप दिवसांपासून हा भात बनवायचा होता ,बरे झाले पाककृती दिलीस, मस्त दिसतोय हा.
बनवून बघते मग तुला कळवते कसा झाला ते ..
विदर्भात वडा भात करतात असे ऐकले आहे. पण अजून हा पदार्थ चाखला नाही. गोळा भात आणि वडा भात यातील फरक कोणी सांगू शकेल का ?
वडा भात करताना तळलेले वडे वापरतात. माझ्याकडे मी केलेल्या वडा भाताची पा कृ आहे. सवडीने व्य नि करेन किंवा धागा टाकेन
-जयंती
पाककृती आणि सादरीकरण सुंदर झाले आहे.
(गोळा भातासोबत सोलकढी बघून विदर्भ महाराष्ट्रापासून दूर जाणारा नाही याची खात्री पटली.)
रामदास काका, कंसाशी सहमत. असेच व्हावे ही खूप मनापासून इच्छा आहे.
नाहीतर मुद्दाम सावजी मटण आणि वडा भात, गोळा भात खायला, इतर महाराष्ट्र वेडा कशाला होईल?
वेगळ्या विदर्भाची मागणी राजकारणी लोकांची आहे.जांबूवंत राव धोकटे,खोब्रागडे इ. माणसांनाच वेगळा विदर्भ हवा आहे.वैदर्भीय जनतेला तमाम महाराष्ट्रातील जनतेने कधीच वार्यावर सोडलेले नाही.
जावु दे,
मस्त संत्री खावू,सावजी मटणाचा बेत करू आणि गोळाभात भावून पडले राहू.ते वाळ्याचे पडदे काय उगाच नाही आणले?
पहिल्यांदाच पाहिला हा प्रकार थोडा फार डाळ वड्याचाच प्रकार फक्त तळण्या ऐवजी उडलेले.
करुन पहायला हवा हा प्रकार.
बाकी रामदासकाकांच्या कंसाशी सहमत. :)
सोलकढी बघुन तोंडाला पाणी सुटले , रंग पण छान आलाय वड्यांना
मस्त रेसेपी.. आणि सोप्पी सुद्धा.. नक्की करुन पाहीन.. नागपुरी वडा भात म्हणजे हेच का? नसेल तर त्याची सुद्धा पाकक्रुती येऊ देत!!
आता हे करून पाहिलंच पाहिजे … वडा भाताची तळा तळी टाळून त्याच्या सारखंच काहीतरी छान खाता येईल :)
कोरडं कोरडं नाही का लागत हे फार ?
आमच्या कडे ह्या भाता सोबत, रस्सा भाजी किंवा ढेमश्याची भाजी केल्या जाते.
नाही. कोरडे होत नाही. त्यासाठी सढळ हस्ते तेलाचा वापर करायचा. :)
आणि ताक किंवा मठ्ठा असतोच यासोबत.
नागपूरी वडा-भाताबद्दल माहित आहे, त्यात विविध डाळींचे वडे तळतात. शिजवलेल्या भातावर वडे कुस्करून त्यावर तयार फोडणी घालतात. हा गोळाभात पण तसाच दिसतोय फक्त ह्यात वडे वाफवलेले आहेत. ( ह्याला वडाभात पण म्हणतात का? )
वडा-भाताबरोबर कढी करायची पद्धत आहे असे ऐकले आहे.
बाकी मधुरा तुझी पाकृ आवडली हे वे सां न :)
सादरीकरण +११११११
सानिका, जेवढे केले त्यासाठी तू आणि मिपावरच्या सुगरणी आणि बल्लवाचार्य (मृणालिनी, पेठकर काका, गणपा इ.) हे सगळे माझे गुरु आहेत. त्यामुळे याचे श्रेय तुम्हा सगळ्यांना. :)
म्हणजे असे, की ह्याचे नांव ऐकल्यावर / वाचल्यावर , खावाच लागतो.त्याशिवाय जीवाला स्वस्थता लाभत नाही.
चला आता परत आईच्या मागे भुणभुण करायला हवी.
पाकृ आवडल्याबद्दल सगळ्यांचे आभार!
@त्रिवेनि, गोळे भातासोबत वाफवायचे असतील तर वेळेचा अंदाज अगदी अचूक लागतो. त्यामुळे हे असे केले की बिघडत नाहीत.
वडा भात आणि गोळा भात वेगळा. वडा भात म्हणजे कुलाचार किंवा महालक्ष्म्या या स्वयंपाकात जे वडे करतात ते शेवटच्या भातावर असे कुस्करून, त्यात फोडणी किंवा कच्चे तेल घेऊन खातात. पहिले वरण तूप भात आणि शेवटचा वडा भात. हे वडे करण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. पाकृ देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
सानिका म्हणतेय तसे वडा भातासोबत कढी असतेच.
उत्तम पाकृ आणि सादरीकरण...
एका मित्राकडुन ह्याबद्दल ऐकले होते पण अजुन तरी कधी खाण्याचा योग आला नाही... करावयास हवी लवकरच.
फोटो पण छान आलेत गं!
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
माझा आणि माझ्या आईचा जन्म डोंबिवली पण आईचे काका
अकोल्याचे
त्यामुळे कोणाची मुंज ,लग्न कार्ये , शेगाव व माहूरगड दर्शन ह्या कारणास्तव वर्षाआड तेथे जाणे व्हायचे होते. तेव्हा अनकेदा गोळा भात खायचा योग यायचा.
आज सचित्र पाककृती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
पाकृ आणि फोटो अगदी छान आले आहेत. शिवाय तळकट नसल्याने विशेष करून आवडले!
बरेच दिवसात पाकक्रुती शोधत होते गोळाभाताची...आता करुन बघते..
पाकृ आवडली!