Welcome to misalpav.com
लेखक: सूड | प्रसिद्ध:
आज गजर दोनदोनदा रिसेट केला, अंथरुणातनं उठायचा अगदी कंटाळा आला होता. सवापाच झाले तसं डोळे उघडले आता उठलो नाही तर पुढच्या प्रवासाचे तीन तेरा वाजणार एवढं नक्की होतं. होय नाही करता पटापट आवरुन निघालो, कधी नव्हे ती रिक्षासुद्धा घराबाहेर पडल्या पडल्या मिळाली. लोकलने कर्जत गाठलं. इंद्रायणीच्या डब्यांच्या स्थितीबद्दल स्पीकर कलकलत होता. बरेचसे हुंबैकर पेंगुळलेल्या डोळ्यांनी इंद्रायणीची वाट बघत होते. गाडी आली, माझ्या जागेवर आधीच एकजण बसला होता. रिझर्वेशन आहे म्हणताना तो उठला आणि मला जागा मिळाली. अर्थात ती मिळणारच होती. सगळं नेहमीप्रमाणेच किंबहुना नेहमीच्या प्रवासापेक्षा मस्त चाललं होतं तोच लोणावळा गेल्यानंतर 'डॉक्टर आहे का कोणी इथे' म्हणून एक इसम मोठ्याने विचारु लागला. काही कळत नव्हतं नक्की काय चाल्लंय. उठून बघेपर्यंत तो माणूस तोच प्रश्न विचारत दुसर्‍या बोगीत पोचला पण !! मी बसलो होतो त्याच्या अगदी एक सीट सोडून समोरच्या सीटवर एक मुलगी पोट गच्च धरुन बसली होती. पोटात दुखत असावं बहुधा !! सोबत तिघी मैत्रिणी होत्या, त्यातल्या एकीने आपली शाल काढून तिला पांघरायला दिली. बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं. पण ते पोट धरुन बसणं बसणं परिचित होतं. भारती...कर्रेक्ट भारतीच !! नववी दहावीला असताना दोन तीन महिन्यात एकदा तरी ती असंच पोट धरुन बसायची. वर्गावर कोणी सर असतील तर वर्गशिक्षिका यायच्या आमच्या आणि तिला बाहेर घेऊन जायच्या, घेऊन जायच्या म्हणजे अगदी हाताला धरुन!! आता लक्षात आलं!! आणखी ज्यांना हे लक्षात आलं ते मधल्या पॅसेज मध्ये उभे असलेले लोक आधीच बाजूला झाले होते जेणेकरुन त्या मुलीला कम्फर्टेबल वाटेल. डॉक्टर शोधायला गेलेला माणूस रित्या हाती परत आला. फोन करुन स्टेशनवर उतरल्या उतरल्या डॉक्टर मिळतील का वैगरे चौकशी सुरु होतीच. त्या मुलीचा पोटावरचा हात काही हलत नव्हता प्रचंड कळवळत होती. खडकी ओलांडलं आणि शिवाजीनगरला उतरायला बहुतेक जण तयारी करु लागले. मघाशी डॉक्टर शोधायला गेलेल्या माणसाने तिची बॅग घेतली. पेशंट आहे, पेशंट आहे ओरडत पुढे जाऊन त्या चौघींना जागा करुन देत होता. सोबतच्या तिघींपैकी एकीने उरलेल्या दोन बॅगा घेतल्या आणि पुढे निघाली. उरलेल्या दोघी तिला हाताला धरुन उभं राह्यला मदत करत होत्या. तिचा पोटावर ठेवलेला डावा हात अजूनही तसाच होता. जागा सोडायला काही ती तयार नव्हती. कशीबशी उभी राह्यली आणि दोन पावलं चालून अगदी समोरच्याच रिकाम्या सीटवर मटकन बसली. सोबतच्या एकीने तिचे डोळे पुसल्याचं आजूबाजूच्यांच्या लक्षात आल्यावाचून राह्यलं नाही. मग काहीजण आपण होऊन बाजूला होत जागा देत होते तिला बसावंसं वाटलं की!! ही स्टेशनला उतरायची कशी हा प्रश्न बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. पाचेक मिनीटं झाली हा प्रकार चालला होता शिवाजीनगरला गाडी पोचायच्या सेकंदभर आधी अगदी एकेक पाऊल पुढे टाकत ती गेटपर्यंत पोचली असेल तोच तिघेचौघेजण आम्हाला उतरु उतरु द्या म्हणून तिला आणि तिच्या मैत्रिणीला अक्षरश: ढकलून पुढे गेले. तो निव्वळ खोटेपणा होता हे लक्षात येऊन सुद्धा कोणी बोललं नाही. कारण झालेला प्रकारच प्रचंड तणाव निर्माण करुन गेला होता, तो तणाव बहुतेकांच्या आणि बहुतेकींच्या चेहर्‍यावर दिसत होता. बोलायच्या मनःस्थितीत कोणीच नव्हतं. राहून राहून प्रश्न पडत होता की तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सिरीयसनेस 'त्या' तिघाचौघांमध्ये कधी येणार? ती गाडीतनं कशीबशी उतरली खरी, पण ती आणि तिची ती अवस्था डोक्यातून जायला तयार नव्हती.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

जगातील ५% अतिशय वाईट लोकांमुळे इतर ९५% लोकांना त्रास होतो. असाच एक रोजचा त्रास म्हणजे, लोकलमध्ये असलेल्या अपंगांच्या डब्यात बसणारी धड-धाकट माणसे, बघीतली की होतो.

त्यातल्या एकान जरी बखोट धरुन त्यांना ओढल तरी बरीच समज येइल लोकांना.

समाजाच्या ह्याच मानसीकतेवर आधारीत एक कथा वाचली होती. तिचा साधारण मतितार्थ हाच होता. एकाने आवाज उठवला की, इतर लोक पण साथ देतात.

प्रत्यक्षात एकाने आवाज उठवला की त्याचा केजरीवाल करण्यावर भर असतो. विषेशतः आवाज कंपु विरोधात उठवला असेल तर ही तुलनेने थोडी कमी वाइट ९५% माणसे अगदी १००% चांगले असल्याचा सामुहीक अभिनय इतक्या झोकात करायला लागतात की ज्याचे नाव ते.

तरीही तुमचे अनुभव सार्वत्रिक असते तर तुम्हाला माझा विधानाशी असहमती प्रकट करावी लागलीच नसती. पण जसे की तुम्ही जांता मी सर्वज्ञ नाही , तुमचा स्वानुभव शेअर केलात तर बरे वाटेल.

लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो. एकदा लोकल्ने प्रवास करत असतांना गाण्याचा आवाज आला.शोधले तर, एका माणसाने मोबाइलवर गाणी लावलेली.त्याला म्हणालो, की गाणी ऐकायची असतील तर कॉर्ड लाव आणि ऐक.स्पीकर फोनचा वापर करू नकोस.थोडी वादा वादी झाली. त्याला म्हणालो, "सार्वजनिक ठिकाणी. स्पीकर फोन लावून,कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे.मी केस करू शकतो आणि तुम्ही माझे अजिबात काही वाकडे करू शकत नाही.तुम्ही फक्त नाही म्हणा, पुढचे मी बघतो." इतक्यात ज्यांना त्रास होत होता, ती पण माणसे ओरडायला लागली आणि त्या व्यक्तीने गाणी ऐकणे बंद केले. ================================================ ६ डिसेंबरचा दिवस.लोकलला पुर्ण गर्दी.मी पण कल्याण पासून उभाच होतो.बसलेल्या माणसांपैकी बरेच जण विदर्भातून आलेली.त्यामुळे त्यांच्या बरोबर मस्त गप्पा मरत होतो.एकाने मला बसणार का? म्हणून विचारले.मी म्हणालो, तुम्हीच बसा.रात्रभर गाडीत उभ्यानेच प्रवास केला असेल.मला एक दिवस उभ्याने प्रवास केला तरी चालेल. घाटकोपर स्टेशन गेले आणि काही माणसे बसलेल्या प्रवाशांना उठवायला लागली.ती बिचारी अडाणी माणसे घाबरली. मी म्हणालो, अजिबात उठू नका.काही गरज नाही.शीव गेले की, मग उठा.थोडी वादा-वादी झाली.पण इतर माणसे परत म्हणाली, बसलेल्या माणसांना जबरदस्ती उठवू नका. ================================================= म्हणून म्हणालो, की माझे अनुभव वेगळे आहेत.प्रवासात बर्‍याच वेळा असे होतेच.विशेषतः मोबाईलच्या बाबतीत.माझ्या आजूबाजूच्या कुणालाच मी मोबाइलच्या स्पीकर फोनवर गाणी वाजवू देत नाही. बिंधास्त रहनेका और नडनेका. कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.

लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो.
प्रॅक्टीकल वाटत आहे.
बिंधास्त रहनेका और नडनेका.
होय. कोणाच्या बापालाहि घाबरु नये. विशेषतः जमाव आपल्या बाजुनेच असेल तर.
कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.
आपण फँड्री थेट्रात बघितलेला नाही. आणी अशा ठिकाणी अर्थातच जमावा विरुध्द आवाज उठवीलेला नाही. कायदा सोडा निव्वळ थिएटरमधील काही जमाव विरोधात असताना आपण आवाज द्यावा व अनुभव घ्यावा.

मला तुमचे लोकल प्रवासाचे अनुभव आवडले. परंतु तिथे मोबाइलचा त्रास सर्वांनाच होत होता... त्यामुळे जमाव आपल्या बाजुला करणे फार अवघड न्हवते. तिच गोश्ट बसलेल्या माणसांना जबरदस्तीने उठवण्याबाबत कारण तिथे समदुखि: (बसलेले) बरेच होते. त्यामुळे अन्यायाचा प्रतिकार चटकन सामुदायिक बनत होता. परंतु जेंव्हा कोणी समदुखी नसते जी विषेश परिस्थीती त्या दुर्दैवी मुलीच्या वाट्याला आली अशा प्रसंगात दुख्हा:बद्दल कणव असलेले बरेच असतात. पण त्या समदुखि:पणाचे प्रत्यक्ष चटके बसत नसल्याने एखाद्या ताकतवान कंपुला विरोध करायची वेळ येते तेंव्हा लोक हतबल पडतात, एखाद दुसरा समोर येउ पाहिला तर कंपुच बिंधास्त नडतो हे बघुन कोणीही जास्त मधे पडत नाही... लोकल सोडा अगदी इथे पुण्यात या आणी बस मधे शाळेत/ज्यू कॉलेजला जाणारी चिल्लि-पिल्ली पोरं काय अखंड बडबड/उद्योग करतात ते रोज उघड्या डोळ्यांनी बघा. लगेच कळेल कोण कसला किती विरोध करतो, आवाज उठावतो ते :(

मघाशी आम्ही तुम्हाला लोकलचे अनूभव सांगीतले तर तुम्ही आम्हाला आधी थियेटर आणि मग पुण्याला नेलेत. जावू दे... आम्ही डोंबिवलीतच ठीक आहोत. बादवे , असेच एक गहनविचारी पण होते, ते पण असेच इकडे तिकडे भटकायचे.पण आज काल ते कुठे गेले आहेत कुणास ठावूक?

संयत लिहिलं आहेस. वाचून त्रास झाला. त्या तिघा चौघांना जाब विचारायचं काम कोणीच कसं केलं नाही? भरलेला डबा असून काय उपयोग?

मनातली तळमळ संयत शब्दात मांडलीय खरी, परंतु मनापासुन वाटतयं तुम्हि आवाज उठवायला हवा होता, शेवटी समाज म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसुन आपणच आहोत.. हे मान्य अचानक प्रसंग समोर आल्यास काहि सुचत नाही बर्याचदा, पण अशा काहि प्रसंगाला सामोरी जायच्या द्रुष्टीने मानसीक तयारी करायला हवीच..

पण बर्‍याचे वेळा , आपण भांबावून जातो आणि जे घडायचे ते घडून पण जाते. शिवाय आपल्या घरातील संस्कार पण कधी कधी आडवे येतात. सुदैवाने, माझा बाप अशावेळी धावून जायचा, त्यामुळे कळत न कळत मला पण तीच सवय लागली. अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो, हे महत्वाचे वाक्य आपण विसरूनच गेलो आहोत.

अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो नाय, नाय ! अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्‍या इतकाच दोषी असतो... आणि तो अन्याय मूकपणे बघत राहून दुर्लक्ष करणारा किंवा केवळ हळहळ करणारा त्यापेक्षा जास्त दोषी असतो.

अशा वेळी कोणी आजारी माणसाला ढकलून देऊ शकेल असं कधी मनातही येत नाही त्यामुळे असं काही घडून गेल्यानंतर सुरुवातीला आपण थक्क होतो आणि मग भानावर येईपर्यंत ते ढकलून देणारे सुरक्षित गर्दीत मिसळून गेलेले असतात. मात्र वेळप्रसंगी स्वतः दुसर्‍याला ढकलून उतरणारा माणूस त्याच्यावर वेळ आली की लोकांकडून मात्र चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतो असंही खूपदा बघायला मिळतं.

इथेही बरेच जण अशावेळेला मदत करायला तयार असतील. पण होते काय की, कधी वेळ नसतो, आपण बरेच मागे उभे असतो, आपल्या हातातील सामन किंवा पाठीवरील बोजे आपल्यालाच अडथळा ठरू शकते. आणि माझ्या अंदाजाने, कदाचीत सूड , तिथे नसावा.त्याने कथा नायकाच्या जागी स्वतःला , टाकून कथा सांगीतली असावी. ह्या कथेतून "अन्यायाला वाचा फोडा." हाच बोध मिळतो. त्यामुळे वैयक्तिक न घेणेच इष्ट, असे मला वाटते.

त्या मुलीला मदत करणार्‍या आणखी ३/४ मुली आणि लोकही होते. जास्त लोकांनी धावून कधी कधी विनाकारण गोंधळ उडतो. त्याने लिहिलं आहे ते तशाही अवस्थेत तिला ढकलून उतरणार्‍यांबद्दल.

सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात. कधी कधी असे होवून जाते. तेंव्हा बिंधास्त रहा.

सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात.
=)) =))

जेपीजी तुमच्या व्यनिला उत्तर दिलंच आहे. इथेही तेच म्हणेन की काही लिहीलं म्हणजे लोक त्यावर त्यांची मतं मांडणारच!! जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. सो नो वरीज. :)

बघीतलत.... आमचा माणसांच्या बाबतीत अंदाज सहसा चूकत नाही... सूड अतिशय उमदा मनुष्य आहे...

जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. हांगं आश्शी !

दुर्दैवी आहे खरेच, पण चौदात चार अशी माणसे असणारच. त्यांना नेहमी आयुष्यात गृहीतच पकडायचे. आपण एखाद्याला मदत करताना मात्र आपल्या परीने जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी, अमुकतमुक मदत केली कि आपल्या वाट्याची मदत झाली असे समजू नये हाच याना कॉम्पेनसेट करायचा उपाय..

आणखी कन्फ्युजन व्हायच्या आत माझे चार शब्द. शिवाजीनगर यायच्या आधीची पंधरा-वीस मिनीटं त्या मुलीची ती अवस्था बघून, ती उतरणार कशी हे टेन्शन सगळ्यांच्याच चेहर्‍यावर होतं. सगळेच सुन्न होते. प्रत्येकाला दिसत होतं आणि समजत होतं की नक्की तिचा प्रॉब्लेम काय आहे. त्यामुळे सगळे सहकार्यही करत होते आणि तिची ती अवस्था बघून तरी कोणी असं वागेल असं ध्यानी मनीसुद्धा नव्हतं. तेवढ्यात हे घडलं, गाडी बर्‍यापैकी स्लो झालेली असल्याने ते लोक निघून उतरुन गर्दीत मिसळलेसुद्धा!! प्रश्न हा होता की, डोळ्यांनी दिसतंय तिला काय होतंय ते तरी मुद्दाम हा खोटेपणा का करावा? बखोटं धरायचं म्हणाल, तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का? त्यांना बडवून काढल्याचं समाधान पब्लिकला मिळालं असतं, नक्कीच!! पण पुढे काय? परदु:ख शीतळ असतं, पण एवढं? यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही. सकाळचाच प्रकार होता त्यामुळे काही केल्या डोक्यातून जात नव्हता. बरं गोष्ट अशी होती की कुणाला सांगितली तर कोण काय अर्थ काढेल देव जाणे. कुठेतरी डोकं रिकामं करायचं होतं, सो मी मिपा वापरलं, thats it !!

तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का?
मागचा अनुभव वाइट आला असेल तर परतं असे वागताना ४ वेळा विचार केला असता. निदान गंभीर परिस्थीतीमधे तर हमखास. खरे तर हा हरामखोरपणा कंपुगीरीचा आहे. आपल्या सोबत चार शाणे शेंगदाणे आहेत वाटलं की मस्ती करायचा मोह अशा लोकांना हमखास आवरत नाही. त्यांना आपण कवचकुंडल धारक आहोत असे वाटु लागते, आणी त्यात आजुअबाजुचे सुन्न झाले की अशा प्रसंगातुन त्यांची पुढे पुढे भिडही चांगलीच चेपत जाते :(
परदु:ख शीतळ असतं, पण एवढं?
परदुखः अस्तित्वातच नसतं...!
यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही.
हेच फार आवडलं... आपण जे हवं तेच लिहावं, आणि फक्त व्यक्त व्हावं. दुनिया गेली #$%%^^ !

परदुखः अस्तित्वातच नसतं...!>>> हे थोडस पटलं . प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतेच . आजकाल तर रोजचा दिवस हाच संघर्षपूर्ण असतो . बघा आठवून उठल्या पासून ते रात्री सुखरूप घरी येण्यापर्यंत . पण म्हणून लगेच कोणी इतक टोकच वागू नये खरतर . कोणाला समजवायला गेल तर आले मोठे शहाणे असाही अनुभव येतो . आपण आपल्या परीने मदत करावी फार कोणाला काही समजवायला जाऊ नये . बरेचदा स्त्रियांना तर वाईट अनुभव येतात जर अस समजवायला गेल तर . बाकी तुमचा अनुभव / लेख पटला . मदत केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान मिळते मला तरी . एकदा हॉस्पिटलमध्ये मी लिफ्टने खाली येत होते आणि एका पेशंटला घेऊन एक मामा ( हॉस्पिटलात काम करणारे) चालेले होते . पेशंट होते व्हीलचेअरवर वयस्कर आजोबा . त्या लिफ्टला ग्रिल चे जे दार होते ते सरकवून बाजूला केले तर ते धरून ठेवावे लागायचे . मी ते बाजूला करून ठेवले त्या दोघांना व्यवस्थित लिफ्टमध्ये जाऊ दिले तर ते दोघेही हसून थान्क्स म्हणाले .मला त्यांना थोडी मदत केली महणून बर वाटल . :) अवांतर : मी लिफ्ट का वापरली असल्या प्रश्नांना उत्तर मिळणार नाही कृपयाच .

संवेदनाशून्यता नि संवेदनशीलता ह्यातील फरक अधोरेखित करणारा अनुभव. लैंगिक शिक्षण शालेय शिक्षणामध्ये अंतर्भूत करावं अशी सूचना मांडू इच्छितो. न जाणो लोकांच्या मानसिकतेत कदाचित काही फरक पडेल.