Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
अथ: वांगे पुराण ७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत ‘थालीचे बैंगन ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही. वांगे ही एकाच भाजी आहे जिच्या डोक्यावर छत्र अर्थात मुकुट असते म्हणून वांग्यांना वांग्यांना भाजीचा राजा ही म्हणतात. वांगे विकत घेताना: वांगे काळसर, जांभळे, हिरवे आणि विदर्भात पांढऱ्या रंगाचे ही मिळतात. वांगे मोटे-ताजे गोल-मटोल, लहान-लहान किंवा लांब आणि पातळ स्वरूपात मिळतात. वांग्यात बिया जास्त असेल तर वांगे स्वादिष्ट लागणार नाही. शिवाय ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच त्या मुळे मी ढाब्यात वांग्याची भाजी खायचो टाळतोच. वांगे विकत घेणे ही एक कला असते. आमची सौ. या बाबतीत तरबेज आहे. तिने सर्वांनाच भाज्या कश्या निवडाव्या ह्याचे उत्तम प्रशिक्षण अर्थात मलाच दिले आहे. प्रथम वांगे ताजे दिसत आहे कि नाही पाहावे. वांग्यांना चमक देण्यासाठी तेल तर नाही लावले हे ही पाहावे लागते. मग छिद्र तर नाहीना हे बघावे. जास्ती वजन म्हणजे जास्त बिया. त्या साठी दोन वांग्यांना वेगवेळ्या हातात घ्यावे. हलके वांगे निवडावे. बाजारात जर वांग्यांना २० रु आणि २५ रु. भाव असेल पण एका किलोत चार एवजी सहा वांगे मिळत असेल तर २५ रु. मोजणे फायद्याचाच सौदा ठरेल. सर्व प्रकारचे वांगे याच पद्धतीने निवडावे. तशी ही पद्धत बिया असलेल्या सर्व भाज्या विकत घेताना सोयीची ठरते. ढोबळी मिरची तशीच महाग असते. ह्या पद्धतीने निवडल्यास जास्त मिरच्या हाती येतील. अर्थात दुकानदार तुमच्या कडे वाकड्या नजरेने पाहिल हे ठरलेलेच. सौ. वांग्याची भाजी चिरत असतात, आमची स्वारी जर घरी असेल अर्थात या ना त्या (?) कारणाने स्वैपाकघरात डोकवणारच. एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून त्यात चाट-मसाला नाजूक हाताने भरविल्यास हा! हा! हा! काय स्वादिष्ट लागतात, सांगणे न वेगळे. आमची आई ही वांग्याच्या रायता मस्त बनवायची. शेगडीवर वांग्याला तेल लाऊन मस्त भाजायची. गोड दही (दिल्लीत दही गोडच मिळते) किंवा गोड न मिळाल्यास थोडी साखर टाकून, फेटून घायचे. मग आई भाजलेले वांगे सोलून चार भाग करायची. मध्ये असलेल्या बिया मोठ्या सफाईने चमच्याने अलगद काढायची. असे बिया नसलेले वांग कुस्करून आधीच फेटून ठेवलेल्या दह्यात घालायची. त्यात कांदे- टामोटो बारीक चिरून भरपूर कोथिंबीर सहित टाकायची. मग मोहरी, हिंग व हिर्व्यामिर्चीची फोडणी त्यात घालायची. मस्त आणि स्वादिष्ट असा रायता आम्ही मिटक्या मारून खायचो. वांग्यान वरून आठवले, लहान असतात आम्ही सुट्टीत नागपूरला जात असो, तेंव्हा आजी एक गोष्ट नेहमीच सांगायची, आता पूर्ण आठवत नाही तरीही एका राजाला चार बोबड्या राजकन्या होत्या. एकदा त्याने प्रधानाला घरी जेवायला बोलविले. राजकन्यांना सक्त ताकीद दिली. कुणीही तोंड उघडायचे नाही. जेवताना प्रधानाच्या लक्षात आले, सर राजकन्या चिडीचूप आहे. त्याला वाटले या मागे काहीतरी काळबेर नक्की असावं. बायकांना त्यांची स्तुती आवडते. प्रधानाने वांग्याच्या भाजीची स्तुती करत म्हंटले आमच्या हिला तर वांग्याची भाजी करताच येत नाही अहाहा एवढी स्वादिष्ट भाजी कशी केली. एका राजकन्येला राहवले नाही तिने म्हंटले ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’ राजकन्यांचे बिंग फुटले. (पूर्ण गोष्ट लक्षात नाही आहे. कुणाला माहित असेल तर पूर्ण गोष्ट पुन्हा वाचायला मजाच येईल. [कदाचित! ही लोककथा विदर्भातील असावी]). पण एक मात्र खरं, वांग्याच्या भाजीला काही ही लागत नाही. भरपूर तेल, हिंग, गुळ, हिरवी मिरची आणि गोडामसाला किंवा गरम मसाला टाकले तरी स्वादिष्ट भाजी तैयार होते. बाकी भरलेले वांगे बहुतेक सर्वांनाच आवडतात. कुठल्या ही पदार्थाची शोभा वांग्या मुळे वाढतेच. तसं सर्वांनाच अनुभव असेल नेहमी बनविताना वांग्याच्या भाजीत बटाटे बायका टाकतातच. अर्थात बटाटे पोर खातात आणि वांगे मोठ्यांच्या नशिबी येतात. विदर्भात वांगे भात हा प्रकार ही प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात,संभार मध्ये केवळ वान्गेच आढळण्याची शक्यता जास्त. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच. काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. यात जास्त करून मुंबई- पुण्यातले नखरेल पोर असतात. अशीच एक मुंबईकर चिमुकली उन्हाळ्यात घरी आली होती. वांगे पाहतात म्हणाली, मावशी मला वांगे आवडत नाही. आमची सौ. काही कमी नाही. सकाळी पाहटे नाश्त्यात वांग्याचे धिरडे बनविले. वांग्याचे साल काढून वांग किसून बेसन व कणकीच्या पिठात (२:१) मिसळले त्यात बारीक कापलेले, - कांदे- टामाटो, हिरवी मिरची व नेहमी प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकली. पतंजलीच्या टमाटो सॅास बरोबर तिने मिटक्या मारत धिरडे खाल्ले. (वांग्याला भाजून ही धीरड्याच्या पिठात मिसळता येत) अर्थातच पुढे वांग्याची भाजी खायला ही ती शिकली. शेवटी आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मिसळपाव वर कृष्ण खोर्यातल्या वांग्याची एखादी कृती टाका, वाचून खाण्याचा आनंद घेऊन कृतार्थ होईल. किंवा वांग्यांचे पार्सिल घरी पोचते करा,करून बघेन. निषेध दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

तीन राजकन्येंची गोष्ट मला पण आठवतेय. धपकन पयी त मी काय कयी ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’ त्या दोघी बोया पण मी नाइ बोयी.

भाजीत भाजी , वांग्याची. ह्या भाजीत तेल्,तिखट आणि मसाले थोडे सढळ हातानेच घालावेत.

वांग्याचे भरीत खा, बाजरीची तीळ लावलेली भाकरी खा. मग त्याचे फोटो काढा अन मग इथे टाका.

ढाबे वाले रात्री उरलेली सुरलेली भाजी स्वस्तात विकत घेतात. वांग्यात किडे असले तरी काहीही फरक पडत नाही. भरपूर मसाले टाकल्यावर भाजी स्वादिष्ट बनेलच. बाकी ढाब्यांवर वांगे चिरताना बघा....

बहुतेक वेळेस वांग्याच्या आत बारीक अळ्या वगैरे असतात. त्यामुळे असेल बहुतेक
ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच
पण मेस मध्ये किंवा ढाब्यावर भाजी खाताना एकदा man vs wild चा कोनताही भाग आठवायचा आणि हाणायची भाजी मग "नॉनव्हेज" नि नाही फरक पडत. ;) ..

माझी आजी पण अशा बोबड्या मुलीची गोष्ट सांगायची, पण ती गोष्ट थोडी वेगळी होती.एका व्यक्तिला एक बोबडी मुलगी असते. एकदा त्या मुलीला पहायला पाहूणे येतात.तिला सक्त ताकीद दिलेली असते कि तोंड उघडायचे नाही. पाह्ण्याचा कार्यक्रम होतो पण मुलगी काहीच बोलत नाही, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पण परस्पर आई-बाबाच देत असतात तेव्हा त्या पाहुण्याना थोडी शन्का येते पण जेवणाचा आग्रह झाल्यावर ते जेवायला बसतात. जेवणात कढी केलेली असते, ती कढी पीताना मुलीला राहावत नाही आणि पट्कण ती शेजारी बसलेल्या तिच्या आईला म्हणते ‘हिंग जिडे मिडे, कडी मुडि गोड लागे.." आणि तिचे बिंग फुटते.

मंगला गोडबोलेंनी कुठल्याश्या कार्यक्रमात नारळाच्या दुधातलं वांग्यांचं भरीत सांगितलं होतं. त्याची रेशिपी कोणाला माहीत असेल तर डकवा.

"ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच"--- बरीच जैन मंडळी वांग्यांच्या या लूक मुळे वांगी खात नाहीत. एरवी त्याना भाज्यांमध्ये फक्त कंदमुळेच वर्ज्य असतात. मी बेंगाल मध्ये कामाला गेलो असताना एक दोन ठिकाणी स्थानिक लोकांकडे जेवावयास बोलवले होते. दोन्ही ठिकाणी वांग्याचे उभे आणि लांब काप भाजी साठी वापरले गेले. बंगाल्यांच्या मत्स्य आहाराच्या प्रेमामुळे आणि ही एकच भाजी तत्सम दिसत असल्यामुळे आलेल्या शाकाहारी पाहुण्यांसाठी यजमानीण बाईंनी खास बनवली असेल असे भाजी खाताना वाटले होते.

वांगपुराण आवडले. वांग्याचा रायता कधी खाण्यात आला नाही, करुन बघायला पाहीजे. यानिमित्ताने वाग्यांच्या काही हटके पाकृ मिळतील अशी आशा - दक्षिण भारतातील वांगेभातपण मस्त लागतो, महाराष्ट्रीय वांगेभातापेक्षा बराच वेगळा आणि तिखट, मसालेदार असतो. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच --- फक्त हे पटेलस वाटत नाही.

व्यावसायिकतेच्या चुकीच्या कल्पनेतून भाजीचे आणि फायद्याचे 'आकारमान' वाढविण्यासाठी कांही उपहारगृह चालक्/मालक पावभाजीत स्वस्तातले वांगे वापरतात. पण ते चुकीचे आहे. त्याने पावभाजीची चव बिघडते. वांगं हा प्रकार ज्याला आवडतो त्याला भयंकर आवडतो ज्याला आवडत नाही त्याला अजिब्बात आवडत नाही. आवडतो त्याला कशातही वांगं चालतं. त्यात वाईट कांहीच नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. ज्यांना आवडत असेल त्यांनी पावभाजीत वांगे वापरावे. पण, व्यावसायिक पातळीवर वांगे वापरू नये. परवा, पॅरीसला 'वांगी-पित्झा' खाल्ला.

मला वांग्याची भाजी आवडत नसल्याने आई नेहेमी म्हणायची बाहेर बघ तुला वांगं खायची वेळ नक्की येईल. आणि असा प्रसंग अनेक वेळा गुदरला. शाकाहारी पिझ्झ्यामधे चीज पिझ्झाला पर्याय म्हणजे असलेल्या व्हेजी पिझ्झा मधे एगप्लांट हटकून असायचं. त्यावेळी आईची आठवण काढत काढत पिझ्झा खात असे. ही गोष्ट आईला सांगितल्यावर तिलाही 'जे जे कथिले तैसेची जाहले' अशा ब्रम्होक्तीची उद्गाती झाल्यामुळे आनंद झाला तो निराळाचा.

अमेरिकेत ईटालिअन रेस्टोरन्ट मध्ये एग्प्लान्ट पर्मेसन नावाचा एक पदार्थ मिळतो. त्यात वांग्याचे लांब काप करून त्या वर वितळलेले पर्मेसन नावाचे चीज ओतून हा प्रकार करतात. शाकाहार्यांना पोटभरीच्या दृष्टीने हा एक बरा प्रकार आहे.

वांग्याची भाजी आवडत असल्याने लेखही आवडला. @सूड, नारळाचे दूध, गूळ, चिंचकोळ थोडा असे भा़जलेल्या वांग्यात घालून वरून फोडणी. चवीसाठी मीठ व मिरच्या वाटून घालणे. कच्चे पोहे जरा कोरडेच परतून त्यात घालावेत. त्याला वांग्याचे कोळाचे भरीत म्हणतात. एकदाच खाल्ले होते. छान लागते चवीत बदल म्हणून!

जमला आहे, पहीला प्यारेग्राफ वाचल्यानंतर फोटोंसाठी स्क्रोलवून पाहीला, अन् मग नाईलाजास्तवे पूर्ण वाचला :D . मजा आली. आपली आवडती वांगी जळगावाकडची, त्या बरोबर कळणीची भाकरी म्हणजे स्वर्गच हो!!

प्रकाशचित्रे असती तर आणखीन मजा आली असती. वांग्याची भाजी दाण्याचे कूट घालूनही बरेच प्रकारे केली जाते. @ रमेश आठवले: माझा बंगाली रूममेट होता, त्याच्याकडून कळलं की वांग्याचे उभे पातळ काप मसाला भुरभुरून 'शॅलो फ्राय' करून मधलं खाणं/ तोंडी लावणं म्हणून बंगालात बरेचदा केलं जातं. तो हे कायम करायचा आणि मस्त लागायचं.

पुराणांतील वांगी पुराणात राहू द्या---- या वाक्य प्रचारात एखदी गोष्ट किंवा वस्तू यांच्या साठी वांगी हाच शब्द का आणि कसा आला हे कोणी सांगू शकेल काय ?

तो शब्द 'वांगी' असा नसून 'वानगी' असा आहे. 'वानगी' म्हणजे उदाहरण. पुराणातील एखाद्या घटनेचा 'उदाहरण' म्हणून वापर आजच्या युगात अप्रस्तुत असतो तेंव्हा 'पुराणातील वानगी (उदाहरण) पुराणातच राहू द्या' असे म्हणतात. उच्चार साधर्म्यामुळे 'वानगी' चे 'वांगी' असे झाले आहे.

सहमत. मलाही अगोदर तेच वाटायचे, पण नंतर उलगडा झाला.

एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून
काल संकष्टीचा उपवास असल्यामुळे रात्री जेवायला मस्त वांग्याच्या खरपूस काचर्‍या केल्या होत्या. माझा मुलगा बाकीच्या भाज्या खात नाही पण बटाटा/वांगी च्या काचर्‍या मात्र आवडीने खातो.

वरती उल्लेख आलाच आहे .. कृष्णाकाठच्या वांग्याचे सर कश्शा कश्शाला नाही. जणू स्वर्ग ताटात उतरतो. मळीच्या वांग्याला अंगभूत तेल सुटते .. मस्तच ! नरसोबाच्या वाडीची वांगीही विशेष प्रसिद्ध आहेत. मी गेलो की न चुकता आणतो.तिथे मसाल्याचा माज नाही वांग्याची स्वतःची चवच अफलातून असते. पच्चिम माराष्ट्रात नोन्-वेज फिस्ट असेल तर " न खाणार्‍यांसाठी'हटकून वांग्याची भाजी असते. दक्षिणेत मिळ्तात ती वांगी भाजीचा चिखल करतात . बंगळूरात कामत / पै मध्ये ( नॉर्थ कॅनरा ष्टाईल) नक्की हा चिखल शेंगदाण्याच्या कुटात मिसळून वाढतात. तिथे फक्त ज्वारीचे ( जोल्डा) फुलके खायला जावे. बंगळूरात मिळतात ती वांग्याची भजी.. ती अफलातून लागतात. इंटेरियर तामिळ्नाडू ( बहुधा- दिंडिकल) मध्ये ही वांग्याची भजी खाल्ली आहेत.

हे वांगमय आणि प्रतिसादांचे भरते पाहून मी असा ठराव मांडतो की पुढील कट्टा जळगावला व्हावा आणि येणाऱ्या प्रत्येकाने वांग्याचा एक पदार्थ आणावा .

१)पोतृगिजांनी बटाटा ,मिरची ,रताळे ,फ्लावर ,कोबी ,गाजर टामेटा आणले .वांगीपण आणली का ? २)नद्या पावसाळ्यात दुथडी वाहातात आणि दिवाळीनंतर पाणी ओसरल्यावर गाळात वांगी ,कलिंगड लावतात त्यांना गर जास्ती धरतो आणि चविष्ट लागतात .म्हणून कृष्णाकाठची वांगी . परंतु कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही .(गदिमा) . ३)पावभाजीचं जाउदे पण वांगी केवळ ज्यासाठी वाढवतात त्या उंधियोला कसं विसरणार ? ४)फ्रेंच आणि जपानी पाकू तीत मोठ्या तुकड्यांना ऑलिव ऑईल लावून अवनमध्ये भाजतांना दाखवतात । ५)कोणी हैदराबादकराने तिळ शेंगदाणे कुटाच्या रश्शाची भलामण केली कशी नाही ?

>> काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. मला लहानपणीपासून वांग्यांच्या भाजीतली वांगी खायला आवडत नाहीत. पण त्याच भाजीतला रस्सा मात्र चवीने खातो. ती चव इतर रश्श्याच्या भाज्यांमध्ये मिळत नाहीत. वांग्यांचे भरीत मात्र जीव की प्राण आहे. खायलाही आवडते व बनवायलाही. आजकाल बहुतांश वेळा भरताच्या वांग्यांत खूप बिया निघतात अन माझा पुन्हा पुन्हा हिरमोड होतो. लेख मनापासून आवडला. थोडी चित्रे हवी होती. अवांतर - मी लहान असताना घरच्या बागेत पांढर्‍या वांग्यांचे रोप होते. बहुतांश वेळी त्याची वांगी शेजार्‍यांना व घरी कामाला येणार्‍या मोलकरिणींनाच वाटली जायची.