Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकशाहीचा सांगावा

ग — गंगाधर मुटे, Fri, 03/28/2014 - 04:19
लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥

धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥

पाच वर्ष जनतेची । करू शकेल का सेवा ।
पात्रता नी योग्यतेचा । नीट अदमास घ्यावा ॥

कुणी आला शुभ्रधारी । ढग पांघरुनी नवा ।
आत कलंक नाही ना । गतकाळ आठवावा ॥

कधी गाळला का घाम । त्याने मातीत राबून ।
स्वावलंबी की हरामी । थोडे घ्यावे विचारून ॥

पूर्ती केलेली नसेल । पूर्वी दिल्या वचनांची ।
द्यावे हाकलुनी त्यास । वाट दावा बाहेरची ॥

नको मिथ्या आश्वासने । बोला गंभीर म्हणावं ।
कशी संपेल गरिबी । याचं उत्तर मागावं ॥

कृषिप्रधान देशात । नाही शेतीचे ’धोरण’ ।
कच्च्या मालाच्या लुटीने । होते शेतीचे मरण ॥

शेती रक्षणाकरिता । नाही एकही कायदा ।
फुलतात घामावरी । ऐदी-बांडगुळे सदा ॥


शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो ।
अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥

सत्ता लोभापायी होतो । हायकमांडचा नंदी ।
प्रश्न शेतीचे मांडेना । करा त्यास गावबंदी ॥

पाचावर्षातुनी येते । संधी एकदा चालुनी ।
करा मताचा वापर । अस्त्र-शस्त्र समजुनी ॥

स्थिर मनाला करून । 'अभय' व्हा निग्रहाने ।
मग नोंदवावे मत । सारासार निश्चयाने ॥

                                     - गंगाधर मुटे 'अभय'
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==

प्रतिक्रिया द्या
1307 वाचन

💬 प्रतिसाद (1)
व
विवेकपटाईत Sat, 03/29/2014 - 06:17 नवीन
छान कविता आवडली. भिक आणि मोफत देण्याचे आश्वासन देणार्यांचा विरोध करणे योग्य. अन्यथा शेती वाळून जाईल आणि प्रजा उपाशी मारेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा