Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

क
कौशिक लेले
Tue, 04/01/2014 - 18:53
🗣 123 प्रतिसाद
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील. साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा. १) दुकानांवरच्या पाट्या २) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस्‌ करते" ई. ३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई. ४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड ५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !! तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे ! https://www.facebook.com/groups/494409877351095/ आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील. http://navin-marathi-shabda.blogspot.in/ म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!

प्रतिक्रिया द्या
93212 वाचन

💬 प्रतिसाद (123)
म
मारकुटे गुरुवार, 04/03/2014 - 15:20 नवीन
>>>भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. भाषाभिमान आणि बदल ( ते सुद्धा म्हणे टुकार..ब्वार) यांची गल्लत होत आहे, पतंजली २००० वर्षांपूर्वी म्हणाला होता जसे कुंभाराकडे जाऊन हवे तसे मडके मागतो, बनवुन घेतो तसे कुणीही वैयाकरण्याकडे जाऊन शब्द पाडून घेऊन वापरत नाही, तर त्याचा वापर सुरु करतो. वैयाकरणी केवळ त्याची नोंद घेत व्याकरण बनवतो (जे दर काही वर्षांनी बदलत असते.) बाकी चालू द्या ... आम्ही मुर्ख आहोत हे मान्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 15:22 नवीन
पतंजलींचा उल्लेख बाकी एकदम सयुक्तिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
र
राजो गुरुवार, 04/03/2014 - 10:45 नवीन
नागपुरी मराठी अशीच हिंदाळलेली आहे.. मी आली/गेली/बोल्ली, तो चाल्ला गेला, काहीही काय बोलून राहिला?? वगैरे.. अलीकडे मराठी टीव्ही जाहिरातींत सुद्धा डोक्यात जाणारे शब्दप्रयोग असतात.. उदा. "काय आपल्या टूथपेस्टमधे मीठ आहे?" (कुठ्ल्या मराठी मधे असे वाक्य असते??)
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 04/03/2014 - 13:19 नवीन
केलेल्या जाहीराती आणि चित्रपट हे "रेम्या" डोक्याचे असतात त्यामुळे व्याकरणाचे "शिकरण" झालेले आसतेच आसते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/03/2014 - 13:24 नवीन
मिस करणे =तु नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय . इक्सपायर झाले =वारले . तुमच्या लुकला सुट होईल =तुम्हाला खुलुन दिसेल .तुम्ही या कपड्यात चमकाल . ट्रेंडी =चलाख चटपटीत तरतरीत . फ्रेश होऊन आलोच =आवरून आलोच . टेंशन घेऊ नका =एवढा ताण देऊ नका . डाइअट करा =पथ्य पाळा . हेल्थी फुड =पौष्टिक खाणं . मेन डिश =पक्वान्न ,स्वीट =गोड पदार्थ . बेसिकली =मुळातच . क्लायमैक्स =टोकच गाठलं अपडेटस =नवीन कळवा . रेंटल अपाटमेंट =महिना भाड्याने . फाटली =फजिती झाली ,वाजंत्री वाजली ,आडवाच झालो ,फरफट झाली . बोअर झालो =अगदी कंटाळलो . ऑफ झालो =सुन्न झालो . टेक इट ऑर लीव इट मिपाशटाईल आइ मिन =मला असं म्हणायचं होतं मिप्पाछाप पटलं तर घ्या हेवेसांन .
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 04/03/2014 - 14:02 नवीन
लूट, ठग, जंगल, गुरु, अवतार,योगा, डे़कॉईट, चटनी, चड्डी, आलू, देसी, गोरा, यार,अछा, अंग्रेज, बदमाश, धोती सारखे शब्द त्यांनी घेतले. ते लोक पण असाच विचार करतात काय हो ???
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 04/03/2014 - 14:04 नवीन
शेजारच्या घरी मत्स्यपेटिका आणली होती. व्यवस्था ठेवण्यात काहीतरी गडबड झाली आणि काही मासे मेले. तर घरातली छोटी (वय वर्षे पाच) मुलगी दु;खाने सांगू लागली, 'ममा, ते सगळे फिश सँड मध्येच बसलेत. ते वरच येत नाहीयेत. ते सगळे मेले झालेत का?(आर दे डेड?)' सोसायटीमध्ये मांजरांच्या पिल्लांची संख्या खूप झालीय. एकदा त्यातले एक पिल्लू मेले. तर एक चिमखडा धावत येऊन सांगू लागला, 'ती कॅट मेरली. ती पाठीवर पडली, वॉमिट केरली आणि मग ती मेरली' मेली, केली ही मुलांच्या दृष्टीने अनियमित रूपेच आहेत. पडली, बसली, उठली प्रमाणे मरली, करली असे व्हायला पाहिजे. पण आपण मोठी माणसे तर मेली, केली म्हणतो. मग मुलांनी आपल्या मतीने मेली केलीतला 'ए'कार आणि त्यांच्या दृष्टीने योग्य मरली, करली ही रूपे यांचा मेळ घालून मेरली, केरली ही नवी रूपे निर्माण केली!
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 04/03/2014 - 14:29 नवीन
'स्वीकारार्ह' नाही, 'वर्ज्य' असावे हे काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. म्हणजे असे प्रयोग वापरणार्‍यांना आपण मराठीच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण देऊन शिक्षा करू शकतो. पण फार मोठ्या प्रमाणातल्या मौखिक मराठीचे काय? तिथे निर्बंध कसे काय आणि कोणाकोणावर घालणार? नवनव्या शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा खूप मोठा आणि ताकदवान लोंढा मराठीच्या पात्रात घुसतो आहे. तेव्हा मूळ नदी आपले पात्र बदलणारच. हे पात्र विस्तारणे नव्हे तर एका वेगळ्याच दिशेने वाहू लागणे आहे. ह्याला व्याकरणनियमरूपी धरणांनी किंवा बांधांनी आवरता येण्याजोगे नाही. इफ यु कान्ट रेज़िस्ट, एन्ड्युअर, असे वचन आहे; त्याची आठवण होते. तसे तर नपुंसक लिंगही मराठीतून नामशेष होऊ घातले आहे. 'सर्वांचे धाबे दणाणले आहेत' किंवा 'हे ऋण फेडता येण्याजोगे नाहीत' हे सररास ऐकू येते. बदल हे व्हायचेच. ज्ञानेश्वरी, गाथा, गुरुचरित्र त्यातल्या भाषेमुळे आज दुर्बोध आहे. अगदी निबंधमाला सुद्धा वाचताना मध्ये मध्ये ठेच लागते. पण ती भाषा 'मराठी'च आहे आणि सध्याची आणि भविष्यात बदलणारीसुद्धा 'मराठी'च असेल. तेव्हा काळजीचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 14:31 नवीन
सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रदीप गुरुवार, 04/03/2014 - 15:10 नवीन
होत रहातात हे खरे,पण त्याला काही विधीविशेष असावा, नाही? मराठीतील रूढ अर्थाचे शब्द (विनाकारण) नव्या अर्थाने येऊ का लागावेत? उदा. 'प्रभावित', 'संपन्न'. ८० च्या दशकापासून 'शासकीय' मराठी, आमच्या भाषेत अगम्य बदल करू लागली. आता तर, माध्यमांच्या परिणामामुळे काही धरबंदच राहिलेला नाही. (जाता जाता, पूर्वी - म्हणजे अगदी सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर तरी नक्कीच- 'सरकार' हा शब्द खुद्द सरकारच वापरायचे. मग कधीतरी त्याचे 'शासन' झाले). आता मुंबई-पुण्याकडे जी लिहीली व बोलली जाते, ती भाषा मराठी नसून 'हिंदीठी' आहे. येथील मिपावरीलच लेखन पाहिले तर प्रत्यय यावा! भाषा प्रवाही असावी, हे ठीक. पण ह्याचा अर्थ निव्वळ दहा- वीस वर्षात, तिचे रूपडे ओळखू येऊ नये इतकी ती प्रवाही असेल, तर तिच्या प्रवाहाचे स्त्रोत तपासून पहावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही गुरुवार, 04/03/2014 - 15:19 नवीन
वेगवेगळ्या स्रोतांमधून 'जीवन' मिळू लागले तर त्यात वावगे काय? बदल सोपे वाटले, सर्वमान्य झाले तर टिकतील, नाही तर उडून जातील. मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
म
मारकुटे Sat, 04/05/2014 - 09:39 नवीन
>>>मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार? सहमत आहे. गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे. हे सत्य स्विकारणे अनेकांना जड जाते त्यामधुन आम्ही बोलतो तीच मराठी बाकी भुक्कड ही प्रवृत्ती गेल्या पन्नास वर्षांत पुण्यामुंबईतील विशिष्ट वर्गातील लोकांमधे उदयास आलेली आहे. त्याचाच वापर करुन बोलण्यावरुन जात शोधुन त्याच्याशी व्यवहार करण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रदीप Sat, 04/05/2014 - 11:08 नवीन
गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे..... हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे Sat, 04/05/2014 - 15:31 नवीन
सोईस्कर पलायन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Sat, 04/05/2014 - 16:18 नवीन
संवयीचे ट्रोलायन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे Sun, 04/06/2014 - 06:03 नवीन
आपलेच आशिर्वाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुबोध खरे गुरुवार, 04/03/2014 - 15:30 नवीन
एक प्रमाण भाषा असणे आवश्यक आहे. जसे कायदेशीर इंग्रजी हि अगदी इंग्लंड मध्ये जन्माला आलेल्या माणसाला सुद्धा कठीण जाते म्हणून ती सोडून द्यावी असे कोणी म्हणणार नाही. पण एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ असण्यासाठी किंवा दुसर्याला सांगण्यासाठी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. सर्वसामान्य माणसाला ती अवघड होते हि वस्तुस्थिती आहे. जर आपण law ,act आणि statute याचे भाषांतर कार्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला कायदा हा एकाच अर्थ कळतो म्हणूनच अधिनियम, कायदा आणि विधी असे शब्द वापरावे लागतात. मुळात कोणतीही भाषा प्रमाण असो वा बोलीभाषा असो हि शुद्ध स्वरुपातच बोलली जावी. मालवणी भाषा आपल्या मूळ ढंगात जितकी गोड लागते तितकी संकरीत / अर्धवट हिंग्लिश मालवणी कानाला खटकते. हीच गोष्ट कोकणी किंवा वर्हाडी व खानदेशी भाषे बद्दल किंवा हिंदी किंवा कोणत्याही हिंदीच्या बोलीभाषे बाबत( मगधी, मैथिली वा भोजपुरी बद्दलहि) म्हणता येईल. थोडेसे च्या ऐवजी वाईच म्हणले तर कानाला गोड लागते पण "जरासी" हा हिंदी शब्द खटकतो. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 04/04/2014 - 05:37 नवीन
बास बास. माझा आक्षेप ज्याला होता ती गोष्ट डॉक्टरांनी अचूक हेरली. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारकुटे Sat, 04/05/2014 - 09:41 नवीन
>>>आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही भाषाशास्त्रानुसार जी काही जशी काही बोलली जाते ती भाषा चांगलीच असते. त्यामधे शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट असं काही नसतं. अशी वर्गवारी कृत्रिम असून गेल्या दोनशे वर्षांत स्वत:चे स्थान डळमळीत झालेल्या वर्गाने इतरांवर कुरघोडी करण्याच्या हव्यासाचा परिपाक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 04/08/2014 - 06:39 नवीन
मारकुटे साहेब, भाषेतील किंवा बोलीभाषेतील कोणताही शब्द वापर करण्यास हरकत नसावी पण परभाषेतील दोन शब्द प्रत्येक वाक्यात आणून हीच बोलीभाषा म्हणणार्या बद्दल काय म्हणावे. मला वेळ नाही च्या ऐवजी "टायम" नाही. किंवा वय विचारले तर "ट्वेंटी एट कम्प्लीट" होतील, अद्रक घालून चं पिली असे म्हणणे याला काय म्हणावे. माझे म्हणणे इतकेच कि आपण जी भाषा बोलत असाल तिच्यात सरमिसळ होऊ नये इतकेच. मग अहिराणी असेल तर अहिराणी असावी. हिंदी असेल तर हिंदी असावी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी स्वच्छ असावी. दुर्दैवाने कोणतीही भाषा शुद्धच असते या आग्रहा पायी आपल्यातील काही लोक कोणतीच भाषा धड बोलू शकत नाहीत. आणि याने जेंव्हा आपण मुलाखतीसाठी जाता किंवा लेखी अर्ज करत तेंव्हा आपले अपरिमित नुकसान होते हे आपल्याला( मराठी माणसाना) लक्षात येत नाही. प्रमाण भाषे बद्दल असे आहे कि आपण एखादा प्रश्न माहितीच्या अधीकारात विचारला आणि कोणी आपल्याला अशा सरमिसळ भाषेत उत्तर दिले तर त्याचे नक्की अर्थ काढणे कठीण होते आणि नंतर अशी माणसे कायद्याचा कीस पडून आपल्या मुळ हेतूला हरताळ फासू शकतात. यासाठीच सरकार दरबारी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. दुचाकी वाहन चालवताना आपल्याकडे परवाना नसेल तर लोचा होईल /लफडा हो जायेगा असे आपल्याला कळवले तर कसे वाटेल. आपल्याला आपल्या जमिनीचा/ घराचा सात बाराचा उतारा अशा अर्धवट भाषेत मिळाला तर त्यावर येणारे कायदेशीर हक्क किंवा अधिकार आपल्याला सिद्ध करणे फार कठीण होईल आणि आपला लांबचा मावस चुलत भाऊ आपल्या हक्कावर "लोचा" करू शकेल. कोणत्याही भाषेला अधिकृत दर्जा देताना हा विचार करावा लागतो. सरकारी अधिकार्याला विचारलेल्या प्रश्नाला अधिकृत भाषेतच उत्तर देणे बंधनकारक ठरते . मग या प्रमाण भाषेला आपल्याला शुध्द म्हणायचे नसेल तर नसो. जर आपण वादासाठी वाद घालत असाल तर बोलणेच खुंटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
स
सुहासदवन Tue, 04/08/2014 - 07:58 नवीन
अत्यंत "सु + बोध + खरे" बोललात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Tue, 04/08/2014 - 12:03 नवीन
सर्कारदर्बारची भाषा अन बोलीभाषा यात फरक नाही काय? मारकुटे यांचे अर्ग्युमेंट बरोबर आहे. शुद्ध-अशुद्ध याचा संबंध तुम्ही कायदेशीर अन कार्यालयीन भाषेशी लावताहात तर मारकुटे भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलताहेत इतकंच. प्रमाणभाषेची गरज कोणीही नाकारत नाहीये, पण कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही. मी बोलतोय तो तुम्हांला संज्ञांचा फजूलपणे काढलेला कीस वाटत असेल तर त्याला इलाज नाही पण तुम्हां दोघांच्या अर्ग्युमेंटची संदर्भचौकट अंमळ वेगळी असून त्या त्या चौकटीत ते ते अर्ग्युमेंट बरोबर आहे इतकेच सांगायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बाळ सप्रे Tue, 04/08/2014 - 12:30 नवीन
कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही
नक्की शुद्धताच का?? की प्रमाणता.. यावर किती किस पाडु तेवढा कमी आहे.. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण-प्रमाणेतर, चांगले-वाईट या सगळ्या संज्ञा सापेक्ष (मराठीत - relative terms) आहेत एवढच म्हणू शकतो .. इथे जरा "भावना पोचल्या की झालं" हा नियम लावून पहा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 04/08/2014 - 12:39 नवीन
होय शुद्धताच. कायदेशीर मान्यता असलेल्या एका बोलीत काही वेगळे शब्द असतील, पण मान्यता नसलेल्या दुसर्‍या बोलीत व्याकरणाचे नियम प्रमाणबोलीतल्यासारखेच पाळले जाऊ शकतात. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Tue, 04/08/2014 - 14:18 नवीन
म्हणजे व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध ?? मान्यता नसलेली बोली अशुद्ध?? मागचे काही प्रतिसाद पाहता 'अशुद्ध' शब्द भाषेच्याबाबतीत तुम्हाला निषिद्ध वाटतोय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 04/08/2014 - 14:22 नवीन
मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 04/09/2014 - 07:10 नवीन
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध
वरील दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.. मला दुसरे विधान पटते.. त्याप्रमाणे.. 'त्याची मदत केली' - अशुद्ध 'त्याला मदत केली' - शुद्ध का इथे बोलीभाषेचा संदर्भ लावून प्रमाणेतर म्हणणार?? व्याकरणाप्रमाणे अशुद्ध म्हटल्यास व्याकरणाचे 'अज्ञान' हे कारण स्वीकारण्यास हरकत नसावी.. इथे 'सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे' ही पळवाट आहे.. काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 04/09/2014 - 09:29 नवीन
अंमळ गफलत झाली वाट्टे. पण
काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
हे असलं तरी वेगळ्या बोलींना रेकग्निशन देणे हे कधी होणारच नाही. प्रमाणभाषेपुरते ठीक आहे, बाकी वेगळ्या बोलीचं असू नये असं. व्याकरण ही गोष्ट फक्त प्रमाणबोलीपुरती मर्यादित नाही. थोड्या फरकांसहित पाहिले तर साधारणपणे व्याकरणाचा एकच नियम बर्‍याच बोलींना लागू पडतो म्हणून तो शुद्धतेचा मुद्दा काढला इतकेच. ऑब्जेक्टिव्हलि शुद्ध म्हणून जे काही अस्तित्वात असते अथवा असू शकते ते एका प्रमाण बोलीशी निगडित नसते अथवा नसावे इतकाच मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
र
राही गुरुवार, 04/03/2014 - 15:13 नवीन
प्रचलित नियमांनुसार काही ठिकाणी द्वितीयेचे प्रत्यय 'स', 'ला' हे न लावणे अशुद्ध ठरते. पण तृतीयेचे 'एं','शीं', 'ईं' 'हीं' हे प्रत्यय कालौघात गळून पडले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. रायगड जिल्ह्यात बोलीभाषेत अजूनही ते वापरले जातात पण आपण ते बोलणे अशुद्ध समजतो! 'त्यांईं मला हे घड्याळ दिले' किंवा 'तिएं ओवाळले' किंवा 'काकाहीं वाटणी मागितली' ही वाक्ये कानाला कशी वाटतात? शुद्ध असूनही अशुद्ध वाटतात ना? दक्षिण कोंकणात ताणे, तेणा अशी रूपे आहेत. ही संस्कृत 'तेन' ला अधिक जवळची आहेत. पण ही रूपे अशुद्ध आणि 'त्याने' मात्र शुद्ध. जाता जाता : तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 15:15 नवीन
पुनरेकवार अतिशयच सहमत. तदुपरि
तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.
एक छोटीशी दुरुस्ती: 'ने' हा प्रत्यय प्रत्यक्ष बोलण्यात कधीच नव्हता, फक्त लेखनात होता. अन नी ऐवजी नं हा जास्त ऐकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 04/04/2014 - 05:54 नवीन
प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच घ्यायचाच नसेल तर ठीक आहे. मुद्दा कोणते प्रत्यय गळून पडले नाही पडले हा नाही तर हिंदीच्या अतिरेकामुळे आपण मराठीतील प्रत्यय गाळतो आहे हा आहे. आणि समजा एखाद्याने ते लक्षात आणून दिले तर प्रवाहीपणा, स्त्रोत, वर्गवारी असली फुसकी कारणे देतो हे आहे. म्हणूनच डॉक्टर खरेंशी सहमती दर्शवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 04/04/2014 - 08:37 नवीन
ही कारणे अजिबात फुसकी नाहीत. तशी ती मानणे म्हणजे आत्मवंचना करून घेणे आहे. मुद्दा प्रत्ययांचा नाहीच. मराठीच्या स्वरूपात वेगाने होत असलेल्या बदलांचा आहे. हे बदल होतच नाहीयेत असे तर कोणी म्हणत नसावे. हे बदल होऊच नयेत, झालेच तर ते 'वर्ज्य' मानावेत, 'स्वीकारार्ह' नसावेत असे मत दिसते; ज्याचे नियमांत रूपांतर होऊन अंमलबजावणी होणे कठीण वाटते. जे फीज़िबल नाही, त्याच्यामागे आपली शक्ती का दवडावी? त्याऐवजी मराठीच्या विकासाचे अन्य मार्ग का हाताळू नयेत? समजा, सध्या हिंदीच्या प्रभावामुळे मराठी नको इतकी बदलतेय, मग आतापर्यंत जे बदल झाले, ते तेव्हा हिंदीचा प्रभाव नसताना(च) झाले(च) ना? म्हणजे हिंदीचा प्रभाव असो वा नसो, मराठीत बदल हे होतच आहेत. यातून एक अर्थ असाही निघू शकतो, की बिगरहिंदी प्रभावांनी बदल झाले तर चालतील, पण हिंदीमुळे मात्र नको. असो. वाढत्या शिक्षणामुळे आणि अभिसरणामुळे होत असलेले बदल खुल्या मनाने स्वीकारणे हा एकच पर्याय दिसतो आणि तो योग्यही आहे, आपद्धर्म नव्हे, असेही मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मारकुटे Sat, 04/05/2014 - 09:44 नवीन
सहमत आहे. अशाच वृत्तीमुळे संस्कृत लयास गेली. पाणिनी नंतर पतंजली झालेले बदल नोंदवतो पण आम्ही अष्टाध्याचीच घोकत बसलो, महाभाष्य उघडून पण पाहिले नाही. हीच अशीच हेच असेच उच्चार आणि प्रत्यय आणि शब्द असल्या वृत्तीमुळे संस्कृत संपली. बरे आहे मराठीबाबत असली अरेरावी इथला समाज फाट्यावर मारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 08:30 नवीन
भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द सामावुन घेतल्याने समृद्ध होते वगैरे मान्य. म्हणून लिहिण्या, बोलण्यातील सर्वच अशुद्धता सामावून घ्यावी आणि तोच नियम व्हावा हे अमान्यच.. आणि जास्त लोक तसे बोलतात म्हणून तो नियम व्हावा हे ही अमान्य.. असे असते तर चायनीज्/इतर लोकांमुळे इंग्लिश भाषा कितीतरी बदलली असती!! बर्‍याच वेळा हे चूक, हे बरोबर हे सांगायला कोणी जात नाही म्हणून काय बरोबर काय चूक हे न समजता ते बोलणे लिहिणे पुढे चालत रहाते.. हे कोणी सांगितल्यास अज्ञान मान्य करून सुधारण्यास काय हरकत आहे.. प्रत्येक चुकीला सामावून घ्यायचे असेल तर व्याकरण तरी कशाला शिकवावे शाळेत.. "भावना समजल्या की झाले" याचाही अतिरेक नको.. भावना कधीकधी भाषेशिवायही पोहोचु शकतात! प्रमाण भाषा ही सर्व बोलीभाषांमधील दुवा असते.. भाषेत बदल सामावून घेताना अपरिहार्यता लक्षात घेणेही गरजेचे आहे.. बदल समृद्ध होण्याइतका असावा .. अस्तित्व/ओळख हरवण्याइतका नसावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 04/04/2014 - 09:34 नवीन
प्रमाण भाषा हवीच पण प्रमाण भाषेचे स्वरूप सर्वकाळ तेच हवे हा आग्रह योग्य नाही. भाषा बदलते आहे याचा अर्थ प्रमाण भाषाच बदलते आहे. सर्वच प्रमाणे बदलली. वाल, रती, गुंज जाऊन तोळा, मासा छटाक,शेर आले. तेही जाऊन ग्राम मिलिग्रॅम आले. प्रहर, घटिका पळे, निमिष जाउन सेकंद् ,मिनिटे आली, टीच-वीत-तसू गेले, योजन-क्रोश गेले, फर्लॉग-माइल गेले, यार्ड-फुट-इंच गेले, मीटर-किलोमीटर आले. हे सर्व बदलले आणि हे बदल व्यक्त करणारी 'प्रमाण'भाषा मात्र तशीच राहिली, असे घडेल काय? चिनी भाषेच्या इंग्लिशवरील प्रभावाचे उदाहरण तितकेसे समर्पक नाही. चिनी भूभागावर जिथे जिथे कोपर्‍या-खबदाडीतून (पॉकेट्स) इंग्लिश बोलली जाते तिथे त्या इंग्लिशवर चिनी भाषेचा प्रभाव पडेलच पडेल. पण जोपर्यंत इंग्लिश मेन लँड म्हणजे यू.के.,अमेरिका वगैरे मध्ये चिनी लोक 'साय्ज़ेबल' प्रमाणात नाहीत तो पर्यंत तिथे चिनी भाषेचा प्रभाव पडणार नाही. घरातले उदाहरण द्यायचे झाले तर पूर्व आणि पश्चिम बंगालमधले बांग्लाभाषक मराठीभाषकांपेक्षा संख्येने अधिक आहेत पण ते मराठी मेन्लँड्मध्ये नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या माध्यमांवरही त्यांचा प्रभाव नाही त्यामुळे बांग्ला भाषेचा प्रभाव मराठीवर नाही. बृहन्मुंबई भागात मनोरंजन-वाहिन्या आणि बॉलिवुडमुळे हिंदीचा प्रभाव आहे. बाकी वृत्तावाहिन्यांची मुख्य कार्यालये दिल्लीतच आहेत. हां, आपण एक गोष्ट करू शकतो. बॉलिवुड मुंबईत नको अशी चळवळ उभारू शकतो. किंवा मराठी लोकांनी ह्या वाहिन्या-चित्रपट पाहू नयेत असा शुद्ध मराठमोळा नियमही करू शकतो. हिंदी मनोरंजनाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर सर्वत्र, अगदी चेन्नैपासून तुर्कस्तानपर्यंत आहे. चेन्नैमध्ये मुली आजकाल हाफ-साडी (पवडै दवनी) ऐवजी सल्वार-कमीज़ वापरतात हे हिंदी चित्रपटांमुळे झाले असे तेथील लोक खेदाने म्हणतात. या पोशाख-क्रांतीने कितीतरी नवे शब्द तमिळमध्ये घुसवले असतील आणि कितीतरी जुन्या शब्दांना डच्चू दिला असेल. आपल्याकडेसुद्धा लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'. भाजी, कांदे विळीवर चिरायचे असत, आज सुरीने 'कापतात' किंवा प्रोसेसरमध्ये 'फिरवतात'. 'तू टाक चिरुनी ही मान' हे आता अतिजुने झाले. ही एक प्रकारची समृद्धीच नव्हे तर दुसरे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 10:09 नवीन
लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'
इथे सामाजिक बदलांना अनुसरुन भाषा बदल अपेक्षितच आहे.. पण म्हणून साडी 'घातली' हे अशुद्धच!! तेवढच म्हणायचय मला.. प्रत्येक भाषिक अशुद्धतेची प्रवाहीपणा/समृद्धी याकारणासाठी पाठराखण होउ नये इतकच!! 'त्याला मदत करणे ' हे सुट्सुटित वाक्यरचनेचे रूप माहित नाही म्हणून जास्त हिंदी कानावर पडण्यामुळे 'त्याची मदत करणे' असे केले जाते. इथे सामजिक बदल अथवा कुठल्याही प्रकारची अपरीहार्यता हे कारण नसून अज्ञान आहे हे कारण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 04/04/2014 - 12:55 नवीन
आता 'घालणे' हेच जर कपड्यांच्या संदर्भातले योग्य क्रियापद ठरले तर नेसणे आणि घालणे हा भेद रहाणारच नाही. कारण 'नेसण्या'ची कृती करण्याची वेळच येणार नाही किंवा कमीत कमी वेळा येईल.(लुगडी धोतरे वापरातून गेल्यामुळे.) त्यामुळे तो शब्द स्मृतीतून जाईल. आणखी वीस वर्षांनी सारी-ड्रेपिंग हा शब्द रूढ झालेला असेल. आता ड्रेप म्हणजे वस्त्रांनी सजवणे, (भरजरी राजवस्त्रे वगैरे) अंगावर व्यवस्थित चढवणे. साडी हा नित्य वापरातला प्रकार राहिला नसून खास सणासुदींचा पोशाख बनल्यामुळे तो काळजीपूर्वक 'ड्रेप'च करावा लागतो. जुन्या मराठीतली 'लेणे', 'माळणे' ही क्रियापदे हद्दपार झाली कारण त्या क्रियांमागच्या कृती बदलल्या. आज कोणी 'मी शर्ट ल्या(य)लो' किंवा 'मी परकर ल्यायले' असे म्हणत नाहीत. आज कोणी फुले 'माळीत' नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 13:00 नवीन
साड्या वापरातून जायच्या तेव्हा जातील पण तोवर 'साडी घालणे' हे खटकणारच!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 04/04/2014 - 13:14 नवीन
खरे तर साड्या वापरातून जात चालल्या आहेत म्हणूनच 'नेसणे' हा शब्दसुद्धा वापरातून जात चालला आहे. भाषेच्या बाबतीत 'डेड-लाइन' 'डिमार्केशन' वगैरे असे काही नसते की शेवटची साडी शेवटच्या वेळी नेसली जाईल तेव्हाच अमुक एक शब्द बाद होईल. ही हळू हळू चालणारी आणि 'ओवरलॅपिंग' अशी प्रक्रिया असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
प्यारे१ Sat, 04/05/2014 - 09:51 नवीन
>>> खरे तर साड्या वापरातून जात चालल्या आहेत कुठं म्हणे? सरसकटीकरण झालंय म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Sat, 04/05/2014 - 10:52 नवीन
"साड्या वापरातून जात चालल्या आहेत" असे म्हटले आहे. 'वापरातून गेल्या आहेत' असे नाही म्हटलेले. अर्थ असा की साड्या वापरण्याचा कल कमी होतो आहे. लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे म्हणजे लोकसंख्या कमी होते आहे असे नव्हे; अ‍ॅक्सिलरेशन कमी होते आहे म्हणजे स्पीड कमी होतो आहे असे नव्हे. मुंबईत तरी हा कल स्पष्ट दिसतो. साड्यांची दुकाने जाऊन त्या जागी पंजाबी कपड्यांची (किंवा त्याहूनही पुढे म्हणजे वेस्टर्न आउट्फिट्सची) दुकाने दिसू लागली आहेत. पोलक्याच्या कापडाची अनेक दुकाने बंद झाली आहेत. रेल वे फलाटावर विशेषतः कचेर्‍यांच्या वेळात बायकांच्या डब्याशेजारी उभे राहून निरीक्षण केले (आपापल्या रिस्कवर) तर साडीवाल्या बायका कमी दिसतात. ग्रामीण भागातही कित्येक ठिकाणी नवतरुणी आता पंजाबीसूट किंवा मॅक्सी (खरे तर गाउन, हाउस-कोट) घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
र
राही Fri, 04/04/2014 - 11:42 नवीन
सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे. भिन्न संस्कृतीशी आदानप्रदान (किंवा आपण संघर्ष म्हणू या हवे तर ) होताना मूळ संस्कृतीला समांतर किंवा तिचीच एक शाखा अशी एक संस्कृती जन्म घेत असते आणि ती दोन्ही जनक संस्कृतींना समृद्ध करते. गांधारकला हे एक उत्तम उदाहरण ठरेल. सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. आज हिंदीवर मराठीचा प्रभाव गुजरातीपेक्षाही जास्त आहे तो बॉलिवुडमुळेच. खरे तर जुनी गुजरातीभाखा ही मुळापासूनच राजस्थानीशी आणि पर्यायाने हिंदीशी साधर्म्य राखते. पण आज मात्र हिंदीवरचा मराठी प्रभाव जाणवण्याजोगा आहे. मुंबईमध्ये हिंदी चित्रपट-उद्योग भरभराटीस येणे ही घटना आर्थिक, भाषिक आणि सामाजिक अंगांनी तपासता येण्याजोगी आहे. भाषेवर या सर्व बलांचे कार्य चालते. यात भाषा कधी या अंगाने झुकते तर कधी त्या. अशी मुरडत, वळसे घेत चाललेली भाषा स्वतःचा एक वेव्ह फॉर्म किंवा पॅटर्न स्थापन करीत पुढे वाटचाल करीत असते. ही गति सरासरीने एकदिक् मानता येईल पण काळाच्या एखाद्या छोट्या तुकड्यात ती हेलकावे खाताना दिसू शकते. असो. मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 11:56 नवीन
१००००००००००००% सहमत. नवीन प्रवाहाची संगती लावण्यात लोकांची चूक होतेय नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Fri, 04/04/2014 - 12:33 नवीन
केव्हढी ही शून्ये! मोजताना दमछाक झाली की हो! (अर्थातच) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 12:03 नवीन
मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की
हे मान्य.. पण बरेच शब्दप्रयोग डोक्यात जातात हे मात्र खरं.. पण शुद्ध आणि अशुद्ध हा फरक राहाणारच.. प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसेच बोलणार .. पण त्यात चूक दाखवल्यास वाईट वाटून घेउ नये.. 'शुद्ध आणि अशुद्ध असं काहिच भाषेत नसतं' असं म्हणणं हे देखिल आत्मवंचना करणेच ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 12:08 नवीन
शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण-प्रमाणेतर हे शास्त्रीयदृष्ट्या जास्त योग्य ठरावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 12:26 नवीन
भाषेबाबत जास्त आग्रही असणार्‍यांना "शुद्ध आणि अशुद्ध" जास्त योग्य वाटेल.. पण "प्रमाण-प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 12:33 नवीन
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे. त्यामुळे प्रमाण आणि प्रमाणेतर हे वर्गीकरण बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 12:53 नवीन
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते (कारण प्रमाण काय आणि प्रमाणेतर काय यावरदेखिल वाद होउ शकतात) .. मुद्दा एवढाच.. अशुद्ध भाषा म्हटल्यावर राग येउ शकतो.. प्रमाणेतर म्हटल्यास ती शक्यता कमी.. म्हणूनच म्हटलं "प्रमाण - प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. पण हे डावंउजवं राहायचचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 13:04 नवीन
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते
पिशी अबोलीबै, ऐकताहात का ;) एनीवेज, हे विधान चूक आहे. ऑब्जेक्टिव्ह कंटेंट भाषाशास्त्रात खच्चून भरला आहे. ते न पाहता प्रमाण भाषेलाच शुद्ध म्हणण्याचा आग्रह रोचक वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा