पाककृती

जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा

Primary tabs

.

साहित्यः

१ वाटी कणीक
१ टीस्पून भाजून, भरडसर वाटलेले / कूटलेले जीरे
१ टीस्पून कूटलेली काळीमिरी
मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून तेल

.

पाकृ:

कणकेत जीरे, मिरी, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी.
झाकून १५-२० मिनिटे ठेवावी.
कणकेचा छोटा गोळा घेऊन जमेल तितके पातळ लाटावे.
मी मिनी खाकरे बनवलेत , एकसारखे दिसावेत म्हणून डब्याच्या झाकणाने कातून घेतले.

.

तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
त्यावर कातलेला खाकरा टाकून दोन्हीबाजूने जेमतेम भाजून घ्यावा व लगेज ताटात काढावा.
थोडे तेल / तूप ब्रश करावे व १० -१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
अश्याप्रकारे सर्व पुर्‍या / पोळ्या जेमतेम भाजून घ्यावे व थोडे तेलाने ब्रश करुन बाजूला ठेवावे.

तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
आता तेल लावलेली पुरी / पोळी तव्यावर टाकावी व लाकडी साच्याने (वुडन प्रेस) दाबत सर्व बाजूने चांगली भाजून घ्यावी. उलटवून पुन्हा सर्व बाजूने भाजावी.
आच मंदच हवी, खाकरा चांगला खुसखुशीत भाजला गेला पाहिजे.
अशा पद्धतीने सर्व खाकरे भाजून घ्यावे.

.

पूर्ण गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
हे खाकरे तुम्ही लोणचं, तुप, चाट मसाला भुरभुरून किंवा नुसतेच चहाबरोबर सर्व करु शकता.
कणकेत थोडी कसूरीमेथी, थोडी ताजी, चिरलेली मेथी, हळद, मिरची घालून मेथी खाकरा बनवता येतो.
पानीपूरी मसाला घालून ही बनवता येतो.
हवे तितके व्हेरीएश्न्स करु शकता.

.

आरोही

मस्त ग ...खाकरा खूप आवडतो ..नक्की करून बघणार ......पण या साठी सपाट तवा च हवा न ??

मितान

सुंदर फोटो !!!!!
रेसिपी आजच करून बघते.

प्यारे१

आता इकडे डब्याचं झाकण शोधणं आलं!

-**प्रीतिकथेतील गुलमोहर**-

गणपा

खाकरे फक्त दुकानातुनच मिळतात असा भ्रम होता.
तो दुर केल्याबद्दल धन्यवाद.
फोटो जीवघेणे आहेत.

मदनबाण

मस्त ! :)
खाकरो खावानु अने छास पिवानु... मज्जानी लाईफ. ;)

सखी

नेहमीप्रमाणे जबरदस्त.... फोटो तर लाजवाब!

बाकी तुला काय काय पदार्थ करता येतात हा संशोधनाचा विषय ठरावा, सलाम तुझ्या उत्साहाला!

चिगो

आता बनवावाच लागेल खाकरा..

michmadhura

खूप आवडता खाऊ आहे हा माझा.

चित्रगुप्त

अगदी सोपे दिसते आहे हे खाकरे बनवणे. फोटो एकदम सुरेख.
खाकरे जास्तीतजास्त किती दिवस टिकतात? फ्रिज मधे ठेवावे का? पावसाळ्यात लवकर खराब होतात का? हवाबंद डब्यात साठवताना कागदात, फॉईलमधे वा कापडात गुंडाळावेत का?

हवाबंद डब्यात व्यवस्थित स्टोअर केले तर बरेच दिवस टिकतात, फक्त खाकरा नीट शेकला गेला पाहिजे.
मी तरी कागद, फॉईल किंवा कापडात गुंडाळून ठेवले नाही, तुम्ही रीक्लोझेबल बॅग्समध्ये ठेवून हवाबंद डब्यात स्टोअर करु शकता.

पावसाळ्यात लवकर खराब होतात का?

काही सांगु शकत नाही, इथे वातावरण तसे थंड, पाऊस, ऊन असे असते त्यामुळे मलातरी काही प्रॉब्लेम आला नाही पदार्थ स्टोअर करायला रादर तो तितके दिवस उरलाच नाही :)

खेडूत

अशेच मन्तो !
मुळात शिल्लक राहतीलच कसे एव्हढे मस्त खाकरे!

पाकृ झकास!
कोलाज मध्ये फोटो टाकण्याची आयडीया नोटली आहे, वापरण्यात येईल!

झकासराव

मिपावरच्या काही आयडींचे पाकृ धागे पारच आगडोम्ब उसळवतात पोटात.
बघुनच भुक लागली.

सूड

मस्त!! पण आधी जेमतेम भाजून मग अगदी नीट भाजण्यामागचं कारण कळलं नाही.

पण आधी जेमतेम भाजून मग अगदी नीट भाजण्यामागचं कारण कळलं नाही.

असे केल्याने खाकरा खुसखुशीत होतो, चांगला कुरकुरीत होतो, टिकतो.

टक्कू

नक्की करून बघेन. पावभाजी मसाला पण घालू शकतो नाही का?

मनिष

मस्त आहे एकदम! खाकरा आवडतो, पण कधी घरी ट्राय केला नाही!

मनुराणी

छानच दिसतोय खाकरा. वेगवेगळे पदार्थ करून बघण्याच्या तुझ्या उत्साहाला सलाम…

रेवती

वाह! काय ते सादरीकरण! चव मात्र समजली नाही. त्यासाठी पार्सल करावे. ;)

सस्नेह

आणि ते पैल्या फोटोतले खाकरे सानिकातैला घाबरून कसे एका रांगेत कवायत करत आहेत बघा !

झक्कास...

(आजच घरी खबूसचा खाकरा केला होता. त्यामुळे जळजळ झाली नाही. "खबूस" म्हणजे आखाती देशातली पोळी वजा भाकरी.)

यशोधरा

अगागा! फोटो, कृती सगळेच भन्नाट. पार्सल कधी करतेस? ;)

पैसा

हा दुष्टे! आम्हाला गिल्टी कॉम्प्लेक्स देतेस रोज उठून!

ढंप्या

सोप्पा वाटतोय करायला........

रच्याकने, हा खाकरा करताना ओव्हान कसा वापरायचा...???

इशा१२३

आवडता प्रकार आहे...आता घरीच करून बघते..

इरसाल

मय गुजरात्मेच हय.
जेव्हा पायजे तेव्हा, पानीपुरी खाकरा, मसाला खाकरा, मन्चुरीयन खाकरा, पिझ्झा खाकरा, मिक्स खाकरा काय पायजे ते आणायचे नी मस्त हादडायचे. म्हणुन जास्त वाईट वाटले नाही.
तुम्ही बाकी भारीच बनवलेत हों !

रमेश आठवले

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे मिळतात पण त्यांचे इतके सुरेख फोटो कधीच पाहिले नाहीत. शेवटच्या फोटोत गुजराती छुन्दा (कैरीच्या कीसाचे उन्हात वाळवलेले आंबट गोड लोणचे) वाढलेला दिसतो आहे -फार छान.

शेवटच्या फोटोत गुजराती छुन्दा (कैरीच्या कीसाचे उन्हात वाळवलेले आंबट गोड लोणचे) वाढलेला दिसतो आहे -फार छान.

छूंदा नाही मेथांबा आहे :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

स न वि वि

मी नविन आहे मि.पा वर..खास पाक्रु विभागाकरता मझि धावपल चालु होति इथे यायचि.. कालच बनवुन पहिला हा खकरा..माझा विश्वासच बसत नव्हता कि मी इत्का चविस्थ खाकरा बन्वला... *ok* *OK*

Anvita

मस्त रेसिपी आणि फोटो !

सुहास..

आवडेशच !!!

मितान

सानिका, तुझ्या रेसिपीने कसूरी मेथी घालून केलेला खाकरा मस्त झालाय. :)

सानिकादि खूप दिवसांनी मिसळपाव वर येण्यासाठी वेळ मिळाल. आल्याबरोबर प्रथम तुमची नवीन पाककृती आली आहे का हे पाहत होते. मस्त वाटले तुमची खाकराची पाककृती पाहून. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर पाककृती आणि सादरीकरण जे मला नेहमीच भावते.

पहिला फोटो तर अगदी वॉलपेपर !
बाकी खाकरा तसा आवडतो पण एकावेळी जास्त खाल्ला जात नाही. नुसता खायचा के चहाबरोबर हे समजत नाही.
मात्र कधी कधी मसाला पापड सारखा प्रकार खाकर्‍यावरोबर करतो, म्हणजे कांदा - टॉमेटो -बारीक चिरलेली काकडी वगैरे, ते भारी लागते.