मतदान न करने हा एक सामाजिक गुन्हा वा अपराध आहे का?
आज शेवटच्या टप्प्यातले मतदान झाल्यावर नेहमीप्रमाणेच कमी मतदान असा आरडाओरडा सुरू झाला. ज्यात भारताची आर्थिक राजधानी आमची मुंबई सुद्धा होती. खरे तर मुंबईत गेल्यावेळी पेक्षा जास्त मतदान झाले. प्रत्येक विभागात ५० टक्के पेक्षा जास्त आणि सरासरी ५३ टक्के. (आकडे कमीजास्त असू शकतात, प्रमाण मानू नका) तरीही इतर राज्यांशी तुलना करत असमाधान आहेच. याचे एक कारण म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनमाणसात असलेला प्रचंड असंतोष, मोदी सरकारची आलेली लाट, आपसारख्या नवख्या पक्षाने दाखवलेली आशा, सोशलसाईटवर युवा पिढीने दाखवलेला अवेरनेस पाहता लोकांच्या अपेक्षा देखील यंदा किमान ६०-६५ टक्के मतदान होईल अश्या होत्या. त्यामुळे त्यांना हे मतदान आणखी कमी वाटले.
असो,
तर आता या कमी मतदानाची कारणे कोणी मतदारांमधील उदासीनता देत आहे तर कोणी वोटींग लिस्टमधील नावांची गडबड. तर कोणी निसर्गाला दोष देत प्रचंड गरमीचे कारण पुढे करत आहे. कारण काहीही असले तरी सर्वत्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जणू काही मतदान न करणे हा एक प्रचंड गुन्हा आहे जो काही समाजकंटकांनी केला आहे. इतर वेळी वाहतुकीचे शिस्तीचे नियम तोडणारा, सार्वजनिक जागेत गैरवर्तन करणारा, परीसरात अस्वच्छता वाढवणारा, छोटीमोठी लाचलुचपत देऊन घेऊन भ्रष्टाचारास हातभार लावणारा वगैरे वगैरे फार मोठी लिस्ट होईल, पण हे सारे करताना कुठेही जागरुकता दाखवत नसलेला भारतीय नागरीक आज मात्र हा मतदानाचा हक्क बजावल्याने कॉलर टाइट करून इतर मतदान न करणार्यांना चार खडे शब्द सुनवायची संधी सोडत नाहीये.
(यातही काही जणांचा सूर असा की सरकार पलटायचे आहे आणि तुम्ही मतदान न करता घरात बसून आहात. म्हणजे यातही अमुकतमुक पक्षालाच वोट द्या किंवा अमुकतमुक पक्षाला वोट देऊ नका असे आपले मत लादणे)
अर्थात हे ही चालायचेच, चूक की बरोबर ते नंतर बघू,
पण मला प्रश्न पडला आहे की मतदान न करणे हा एखादा प्रचंड गुन्हा किंवा सामाजिक अपराध आहे का? किंबहुना एवढे मोठाले शब्द न वापरताही ते चुकीचे वर्तन आहे का?
कोणालाही मत न देणे हे देखील एक मतच नाही झाले का?
किंबहुना ‘मला कोणीही चालेल, इथून तिथून सारेच सारखे’ असे एखाद्याचे मत असू शकत नाही का?
आणि लोकशाहीत आपण प्रत्येकाच्या मताचा आदर करायला हवा ना.
कुठलेही सरकार आले तरी माझी परिस्थिती काही बदलत नाही असे जर एखाद्याला वाटत असेल तर त्याने मतदानाच्या बाबत उदासीनता दाखवण्यात गैर ते काय?
तसेच याउपर असते ती एक प्रायोरीटी. एखाद्याला ऑफिसला सुट्टी मिळतेय म्हणून तो आरामात मत देऊ शकतो, पण तेच ऑफिसमध्ये एखादे महत्वाचे काम असेल वा किंवा एखादे काम आजच केले नाही तर धंद्यामध्ये आर्थिका फटका बसू शकतो तर मी ते आधी बघणार नाही का. माझ्या एका मताने काय तो फरक पडणार आहे असा विचार करणे, थोडक्यात आपली प्रायोरिटी काय आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला नसावा का? हे त्याचे मतच झाले नाही का?
माझे स्वताबद्दल सांगायचे झाल्यास मी मात्र आज मतदान केले. फेसबूकावर छानपैकी फोटोही अपलोड करून झाले. तसेच आजवर एक वेळ सोडून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावला आहेच. पण ती एक वेळ जेव्हा मी मतदान बजावले नाही तेव्हा मी अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा फायदा उचलत मैत्रीणीबरोबर फिरणे पसंद केले. त्या वयात, त्या क्षणाला, मला ती संधी मोलाची वाटली. त्यावेळी माझी प्रायोरीटी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मौजमजेला दिली आणि आजही मला त्यात काही चूक वाटत नाही, कारण तेव्हा माझी १८ वर्षे पुर्ण झाली असली तरी मला राजकारणाशी फारसे काही घेणेदेणे नव्हते.
असो, इतरांची मते जाणून घेण्यास उत्सुक.
आमच्या पुण्यात गरमी ला उकाडा म्हणतातआमच्या मुंबईत उकाड्याला उकाडाच बोलतात आणि गरमीला गरमीच बोलतात ;)उकाड्याला उकाडाच बोलतातआमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात. ;)आमच्या पुण्यात 'बोलतात'ला 'म्हणतात' म्हणतात. आणी 'म्हणतात'ला 'म्हणतात'च म्हणतात.थोडक्यात पुणेकरांच्या शब्दकोशात "बोलतात" हा शब्दच नाहीये तर .. ;)त्याहीपेक्षा मोठा गुन्हा म्ह. मद्दान न करूनही मोदी-केजरीवाल-गांधी-करप्शन इ.इ. बद्दल मते ठोकणे हा आहे.हे नाही पटले. जर त्या राज्यकर्त्यांनी केलेला चुकीचा कारभार कोणाला त्रासदायक वाटत असेल वा एखाद्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत असेल तर तो त्यावर मत व्यक्त करू शकतो. मतच नाही तर रीतसर तक्रार नोंदवणे वा कायदेशीर कारवाई देखील करू शकतो. त्यासाठी त्याने मत दिले होते की नाही हे मॅटर करू नये. अन्यथा एखाद्या सत्ताधार्यावर आरोप करताना आधी आपण गेल्या निवडणूक प्रक्रीयेत एक मतदार म्हणून भाग घेतला होता का याचा पुरावा कोर्टात हजर करावा लागेल.