Welcome to misalpav.com
लेखक: बोबो | प्रसिद्ध:
--------------------------------------------------------------------------------- रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे. आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, जतीन आहे. मी तुला नंतर फोन करेन." असे म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत तिने फोन ठेवला. "जतीन!!" मी काहीसं चिडूनच फोन खाली ठेवला. आजकाल जवळ जवळ सारा वेळ रिचा जतीनबरोबर घालवू लागली होती. रिचा आणि माझ्यामध्ये जतीन कडमडला होता. पूर्वी आतुरतेने आणि तत्परतेने उचलले जाणारे माझे फोन कॉल्स आता मिस्ड कॉल्स मध्ये जमा होऊ लागलं होतं. रिचाचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे याची मला एके काळ खात्री होती. पण आता त्या प्रेम कहाणीचं रुपांतर लव्ह ट्रायंगल मध्ये रुपांतर झाल्याची चिन्हे दिसू लागली होती. रिचाचं आणि माझं बोलणं बरेचसे जुजबी होऊ लागलं होतं.थोडं फार बोलणं होई त्यात ती जतीन बद्दल जास्त बोलू लागली होती.इतके दिवस ती कायम माझे कौतुक करत असे. पण आता जतीनचे कौतुक होऊ लागलं होतं.रिचाचं माझ्याकडे होणारे दुर्लक्ष मला बरेच जाणवू लागलं होतं. कालचाच प्रसंग. आज (म्हणजे काल रात्री १२ वाजल्यापासुन) माझा वाढदिवस. आमची ओळख झाल्यापासून रिचाने कधी माझा वाढदिवस चुकवला नव्हता. सर्वात आधी शुभेच्छा, ते सुद्धा आदल्या रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला रिचा देत असे.आणि दुसर्‍या दिवशी जंगी पार्टीचं प्लानिंग सुद्धा तीच करत असे. पण काल रात्री मात्र रिचाकडून शुभेच्छा मिळाल्या नाही. कदाचित ती बिझी असल्याने विसरली असेल अशी मी मनाची समजूत घातली.कदाचित तिला सकाळी आठवेल आणि ती सकाळी मला शुभेछा देण्यासाठी ऑफिसमध्ये फोन करेल आणि काल रात्री शुभेच्छा द्यायला विसरल्याबद्दल माझी माफी मागेल, असं मी स्वतःला समजावलं. पण सकाळ संपली दुपार होऊन गेली, संध्याकाळची चाहुल लागली तरी तिचा ऑफिसमध्ये फोन काही आला नाही. आता मात्र मी पुरता वैतागलो. मनाशी चरफडलो. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. पाहतो तर की, चक्क रिचाचा फोन. एका क्षणात माझा सारा राग,वैताग नाहीसा झाला. रिचाबद्दल आतापर्यंत मी काय काय विचार केले ते आठवून स्वतःची लाज वाटली. "बोल", मी माझी उत्सुकता माझ्या आवाजात दिसू न देण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या मधुर आवाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी माझे कान पुरते आतुरले होते. "राजेश, वाढदिवसाचा काय प्लान?", मला आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी रिचाने सरळ मुद्द्याला हात घातला हे पाहुन मी चक्रावलो. "काय म्हणजे? जाऊ की मंत्रामध्ये नेहमीप्रमाणे.” मी माझ्या आवडत्या हॉटेलचं नाव सुचवलं. "हॉटेल मध्ये कशाला? काही तरी वेगळं प्लान करू. हा वाढदिवस जतीनसाठी स्पेशल आहे!!" माझ्या कानाला काही तरी खटकलं. "वाढदिवस जतीनसाठी स्पेशल? तू नक्की माझ्या वाढदिवसाबद्दल म्हणतेयस की… ?" पटकन माझ्या तोंडून निघालं. "अरे मी तुझ्या नाही, जतीनच्या वाढदिवसा बद्दल बोलते आहे " रिचा हे बोलली खरी आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात १०० वॅट्सचा उजेड पडला. "ओ माय गॉड , राजेश आज तुझा वाढदिवस आहे आणि मी चक्क विसरले. आय एम सो सॉरी." रिचा आणखी बराच काही पुढे बोलली, पण मी ते ऐकत नव्हतो. ती माझा वाढदिवस विसरली हे जाणवून मी दुखावला गेलो होतो. रिचाचं माझ्याकडे दुर्लक्ष होत होतं हे मला कळत होतं, पण आज त्याचा कळस झाला होता. तिच्याशी बोलायचं म्हणून काहीतरी बोलून मी फोन ठेवला.रिचाच्या आयुष्यात माझं महत्व आता कमी झालं होतं हे आता मला ढळढळीतपणे जाणवलं होतं. यातून कसा मार्ग काढायचा त्याचा विचार मी करू लागलो. लव्ह ट्रायांगल्स चित्रपटातच बरे, आयुष्यात ते परवडत नाही, हेच खरं. माझं डोकं पुरतं भणाणून गेलं, पण काय करावं ते सुचेना. दूर कुणाच्या तरी कॉम्प्युटरवर गाणं लागलं होतं .. क्या हुवा तेरा वादा.. माझं कामात लक्ष लागेना. कॉम्प्युटर लॉक केला. कंपनी समोरच्या टपरी वर जाऊन सिगारेट घेतली. हवेत धूर सोडला. पण धुराची वलयं सुद्धा त्रिकोणी दिसू लागली. मनातच चरफडत सिगारेट पायाखाली चिरडली. ऑफिसमध्ये परतलो. कसं बसं कामात गुंतवून घ्यायचा प्रयत्न केला. ७ वाजले. डेस्क आवरलं. कॉम्प्युटर बंद केला आणि ऑफिस्मधून बाहेर पडलो. ऑफिसच्या समोरच बस थांबा होता. तिथे आलो. नेहमीची बस पकडली. नेहमीप्रमाणे तासभर ट्राफिकमध्ये काढून ८ वाजता इमारतीच्या समोरच्या बस थांब्यावर उतरलो. विषण्ण मनाने जिन्याच्या पायऱ्या चढलो. बेल वाजवली. थोडा वेळ वाट पहिली, पण दार काही उघडलं नाही. ह्या वेळेला घरातले कुठे बाहेर गेले म्हणून चरफडत माझ्याकडची चावी शोधली आणि त्या चावीने दार उघडलं. संध्याकाळ झाल्यामुळे आत काळोख होता. दरवाज्याच्या बाजूच्या भिंतीवरचं दिव्याचं बटण शोधू लागलो. दिवा लावणार तेवढ्यात आपोआप घरातले सारे दिवे लागलं. आणि पाहतो तर काय घरात कोण जत्रा.. घरात माझे मित्र आणि माझे सारे नातेवाईक जमलेले. आणि साऱ्यांच्या पुढे माझी लाडकी पत्नी "रिचा" जी कधी नव्हे तो आज माझा वाढदिवस विसरली होती (असा माझा समज झाला होता) आणि तिच्या कडेवर आमच्या आगळ्या प्रेम त्रिकोणातला तिसरा कोन म्हणजे आमचा चिमुकला "जतीन". रिचाच्या माझ्यावरील प्रेमातला नवा भागीदार. पुढच्या आठवड्यात पठ्ठ्याचा पहिला वाढदिवस. त्याच्यासाठी, खरं तर आम्हा सर्वांसाठीच स्पेशल. मला पाहताच त्याच्या ओठांवर मिश्कील हसू आलं आणि तो माझ्या कडे झेपावला. सगळेच लव्ह ट्रायांगल्स काही वाईट नसतात, हेच खरं. साऱ्यांनी एका सुरात "हॅप्पी बर्थडे - राजेश" चा घोष केला. दूरवर कुठे तरी रेडिओवर प्रशांत दामले गात होतं "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?" ======================== समाप्त ======================== पुर्वप्रसिद्धी - माझी वहिनी - मे २०१३.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

असे त्रयनग्ल परवद्तात राव, पन ते लफ्द्याचे ट्रिकोन लय दोक्यात जातात. बायमानउस म्हनुन काइ पोरिना अपन मरु बि शक्त नै. मरला तर अप्लयावरच केस थोक्नर. बेबो, मि पन तुमाचयासरखा त्रयन्ग्नल पय्जे म्हन्तो. तुमचया मुलच नावच्कुहुप चान जतिन.

जेनी तीन टिंबे यांना "ओह मै ग्वाड" म्हणायला लावणारा/री कोणतरी आयडी पैदा झालाच तर शेवटी!

जेनी तीन टिंबे आणि ओह मै ग्वाड पैसा तै फॉर्मात.. (ती लोळणारी स्मायली अजूनही येत नाही राव )

त्यानं उत्कंठा वाढली. मग कथेला न्याय द्यावा म्हणून इमानदारीत, वरुन खाली वाचली, मग पुन्हा खालून वर वाचली. स्वतःच्या मुलाचं नांव विसरुन, जीवाची इतकी घालमेल होणारी, ट्रँगलची कथा पटली नाही.

कथन आहे म्हणुनच,
मग पुन्हा खालून वर वाचली. स्वतःच्या मुलाचं नांव विसरुन, जीवाची इतकी घालमेल होणारी, ट्रँगलची कथा पटली नाही.
याला अनर्थ म्हणतात.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार :) बालगंधर्व - जतिन हे कथानायकाच्या मुलाचे नाव. माझ्या नाही :) संजय क्षीरसागर - कथानायक कुठेही स्वतःच्या मुलाचं नाव विसरल्याचं मी सुचित केलेलं नाही. प्रशांत आवले - तुमच्या मताचा आदर आहे. कुसुमावती - मला ही कमेंट आणखी एका वाचकांकडून मिळाली होती. त्यांनी My Oedipus Complex इंग्रजी कथेची लिंकसुद्धा पाठवली. छान आहे ती कथा. अनिता ठाकूर - सूचना पटली. नवीन योग्य शब्दाच्या शोधात. तुम्हाला सुचल्यास जरूर कळवा :)

रिचा आणि माझ्यामध्ये जतीन कडमडला होता
याचा अर्थ इतकाच असावा की बहुदा अवांछीत संतती असावी. मे बी कॅप इशु अथवा आणखी काही... तत्सम पर्फॉमन्स स्ट्फ, नॉट सो अनकॉमन वन ऑटॉफ टेन मे बी...? ऑर ही वाज नॉट रेडी टु बी अ फादर ऑफ्टरओल् ? लेख फारच जमलाय, नायकाची वेदना तळापर्यंत पोचतीय लेखकाचे हे यशच गणले पाहीजे, विषेशतः शेवटची ओळ "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?" तर लेखकाची वेदना चिरंतन बनवुन गेला...

@अनिता ठाकूर -धन्यवाद :) @आत्मशून्य - 'कडमडला' या शब्दामुळे तुमचा गैरसमज झालेला दिसतो. दोन नात्यांमधली किंचित मत्सर हा याचा साधासा विषय आहे. सुखांतिका आहे ही :) @लीमाउजेट - हो, दुसऱ्याही एका संस्थळावर आहे ही कथा. :)

अलट कडमडला हा शब्द वापरुन तुम्ही ही कथा न्हवे शोकांतीका चक्क पराकोटीच्या उच्च आणी कुट पातळीवर न्हेउन ठेवली आहे, शेक्सपीअरच आठवला. अवांतर :- मी उगाच गंमत करतोय. लिहलेली कथा पोचली, आवडली.