जनातलं, मनातलं

नशीब

Primary tabs

"ओ काका, काही काम देता का?"
बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता.
"स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता.
"नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले. "कुठून आलास?"
"नागपूर हून आलो" त्या मुलाने उत्तर दिलं.
"कसा आलास?" मालक.
"रेल्वे नी..." मुलगा.
"अन् टिकीट ?"
"नाहीये....त्यांनी पन विचारलं टिकीट." तो टी.सी. बद्दल बोलत असावा.
"मग ?"
"नाहीये म्हणालो...पुन्हा नाही विचारलं". बहुतेक त्याच्याकडे बघून त्या टी.सी. ने दंड वगैरेची आशा केली नसेल.
एक आठ वर्षाचा मुलगा नागपूरहून जेजूरीला येतो आणि काम मागतो आहे...सगळं माझ्या कल्पने पलीकडचं होतं. चित्रपटांमध्ये शोभेल असं काहीतरी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो.
"घरी न सांगता आलास ना..." मालकानं जरा दरडावून विचारले.
"घरी कोणी नाही." कोवळ्या पण गंभीर आवाजात तो बोलला.
त्याच्या या उत्तराने मी जरा चमकलो. कोणी नाही म्हणजे नक्की काय असेल?
"आई बाप कुठयत तुझे?" आता जरा मालकाचा आवाज सौम्य झाला होता.
दोन मिनीट तो तसाच उभा राहिला. काहीतरी त्याच्या मनात चाललं होतं. काय ते त्यालाच ठाऊक. आणि त्या खंडेरायाला...
"आरे....आई बाप कुठयत ?" पुन्हा विचारलेल्या प्रश्नाने तो भानावर आला.
"आई....." सेकंदभर थांबला. तो काय बोलतोय याच्याकडे माझे कान लागून होते. आणि त्या मालकाचे देखील.
"आई.....मरून पडली." माझा माझ्या कानावर विश्वास बसेना. तो बोलत होता.
"बापानं तिला जाळून मारली. खूप दारू पितो. त्यानं एक बाई ठेवलीय."

त्यानं मान खाली घालून सांगितले. माझ्या डोळ्यासमोर पूर्ण प्रसंग उभा राहिला. त्या निरागस जिवाला जाळून मारणं काय किंवा बाई ठेवणं काय याची कितीशी कल्पना असेल? तो बोलत असलेले शब्द तरी त्याचे असावेत का? लोकांच्या तोंडून ऐकलेली वाक्य त्याच्या मनावर बिंबली होती. या गोष्टींचा अर्थ समजायला कदाचित तो फारच लहान होता. त्या मालकाला काही बोलवेना. त्याचे ते खाली मान घालणं मनाला सलत होतं. त्यांचं एकंदरीत तिथलं अस्तित्वच मनाला काट्यासारखं रुतत होतं. जणु काही तो त्याच्या बापाने केलेल्या कृत्याचं प्रायश्चित्त करायला निघाला होता.

आता मात्र तिथं थांबण माझ्यासाठी अशक्य झालं होतं. त्या लहानग्यावर काय ओढवलयं याचा मी आणखी विचारही करू शकत नव्हतो. किंबहुना माझ्यात तेव्हडी हिंमत नव्हती. गडाच्या पाय-या उतरताना एकच विचार येत होता.
"खंडेरायाच्या दारी येवून तळी भरत अन् भंडारा-खोब-याची उधळण करत, अनेकांनी त्या खंडेरायाचं ओझं उतरवलं असेल.... पण नशीबानं या मुलाच्या खांद्यावर टाकलेलं ओझं कोणी उतरवू शकेल काय? .... निदान प्रत्यक्ष खंडेराय तरी? "

यशोधरा

छोटुल्याचं लहानपण करपून गेलं की.... :(
त्याला मिळाली का नोकरी त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे? काय झालं असेल पुढे त्या मुलाचं? :(

टचिंग... अश्या वेळी आपल्या काहीतरी मर्यादांमुळे आपल्याला काहिच करता येत नाही. खूप खातं मनाला.

बिपिन.

सुन्न झाले वाचून..
काय लिहिणार,बोलणार यापुढे?अशा वेळी हेल्पलेस वाटतं फार..
स्वाती

विसोबा खेचर

चांगलं लिहिलं आहेस रे डोमकावळ्या! खंडेराया त्या मुलाचं भलं करो...

दुसरं काय म्हणू?

तात्या.

सहज

डोम लेख सुन्न करणारा आहे.

काल तो अर्धप्रकाशित लेख वाचुनच काय बोलाव कळत नव्हते.

हं, कोणाला आई-वडील असुन नसल्यासारखे व कित्येक जण घरी सर्व ऐश्वर्य, प्रेम ओसांडून वहात असतानाही निपुत्रीक..

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

सहमत.

हेच म्हणतो आहे !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मदनबाण

डोमभाऊ छान लिहल आहे..

मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अरुण मनोहर

असं काही बघीतल्यावर डोळ्यांत पाणी आणून त्या अभागी जीवाचे शूभ चिंतणे येवढेच कधी कधी आपल्या हातात असते. उत्तम लिखाण.

मनस्वी

खंडेराया त्या मुलाचं भलं करो...

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सखाराम_गटणे™

चांगले लिहीले आहे, असले अनुभव डोळ्यातुन पाणी काढतात.

CRY नावाची संस्था अश्या मुलांना मदत करते.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

डोमकावळा

माझ्या या पहिल्याच प्रयत्नाला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

आपलाच
- डोमकावळा

शितल

मला वाटते तुम्हाला त्याची मदत करता आली असती.