Welcome to misalpav.com
लेखक: चिन्मय श्री जोशी | प्रसिद्ध:
बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो… पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना … अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता … लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … ) असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं …. म्हणून शेवटी ब्लॉग खरडायला घेतला … माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो… एकच खोलि… हल्लीच्या FLAT मधलं स्वयंपाक घर असत ना, तेवढीच … उभ राहील आणि हात वर केला कि हात (खोलीच्या) आभाळाला टेकायचे (माझे नाही, मोठ्यांचे)… पण ते घर अजून स्वप्नात येतं … तिथेच पहिले सवंगडी जमले…एक तीन चाकी सायकल आणि एक जुना डालडयाचा डब्बा आणि एखादी झिपरी बाहुली एवढ्या साहित्यावर सगळ्या चाळीतली तमाम प्रजा खुशीत खेळत असे… भांडण आणि मैत्री शब्द सुद्धा माहित नव्हते तेव्हा … भूक लागली कि घरी येउन खायचं, पाणी प्यायचं आणि परत खेळायला पळायचं …. तेव्हाचे किती तरी सवंगडी आता आठवत पण नहित … काहीतरी हरवल्याची जाणीव मात्र होत असते… नंतर मग आम्ही एका २ रूम च्या स्वताच्या FLAT मध्ये गेलो… इथे तर खूप सारे समवयस्क मिळाले होते …आई-वडिलांची मुलांच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी गच्ची होतिच… दिवस दिवस भर उन्हातान्हात गच्चीवर, मैदानात खेळताना कधी सावळा होण्याची भीती नव्हती आणि कधी गोरा होण्याची इच्छा पण नव्हति… दिवसभर गच्चीत खेळायचं , वाटेल तेव्हा घरी येउन पाणी प्यायचं … संध्याकाळी शेजारच्या मैदानात मोठ्या दादा लोकांमध्ये क्रिकेट खेळायच… batting चा चान्स मिळावा म्हणून २-२ तास कीपिंग करायची … घरी आल कि राजेशाही थाटात हादडायला बसण … ते पोह्याचे बकाणे भरणं … ऐटीत चालू होत सगळं…. मग अचानक एक दिवस शाळा नावाच्या एका गोष्टीशी ओळख झाली … सगळीच लहान लहान मुल… आणि एकसारखेच कपडे घातलेली…. मी पहिल्याच दिवशी रडून इतका गोंधळ घातला कि बाईंना आईला तिथेच बसवून ठेवावं लागला (यालाच बाळाचे पाय पाळण्यात दिसणे म्हणतात का ??) … नंतर मात्र शाळेची मज्जा वाटायची … रंगांची नवे, मातीचे आकार, भाज्यांची नावे, अंक, बाराखडी आणि पाढे (मला अजूनही १३ च्या पुढचे पाढे येत नहित… ) हे सगळ खूप खूप आठवतंय आता … त्याच शाळेतली एक गम्मत आठवते … अ आ इ ई शिकताना "फ" पाशी आमची गाडी अडली… कारण घरी काही आगाऊ पणा केला कि आई ओरडायची … "फ - फ फटक्यातला देऊ का …??"काकांचं सुद्धा तेच वाक्य …. आणि बाई (तेव्हा त्यांच्या madam नव्हत्या झाल्या ) शाळेत शिकवताना "फ रे फणसाचा " शिकवायच्या … मी मात्र जोरात "फटका च " म्हणायचो … बाईंनी ओरडून, मार देऊन सुद्धा मी मात्र "फ" रे फटक्याचा म्हणायच सोडलं नाही आणि उलट शेजारच्या मुलांना आपलंच म्हणणं पटवून द्यायला लागलो …. शेवटी माझ्या बरोबरची सगळी मुलं "फ - फ फटक्यातला" म्हणायला शिकली आणि माझ्या पालकांना शालेय जीवनातील पहिले पान-सुपारीचे आमंत्रण गेले…(एकुणात जर आमंत्रणांचा हिशेब काढला तर माझ्या इतकीच हजेरी माझ्या आई-बाबांनी लावली असावी माझ्या शाळेमध्ये … ) तेव्हा आईच घरी अभ्यास घ्यायची … शिकवणी हा प्रकार मला तरी ६ वी पर्यंत माहितच नव्हता … आणि अभ्यास सुद्धा १ तासात संपत असे… संध्याकाळी मात्र सभ्य मुलासारखं शुभंकरोती, पर्वचा आणि पाढे (१७, २३, २७ आणि २९ चा अडखळतच) म्हणावे लागायचे … तसे माझे बाबा काही मारकुटे किंवा तापट नहियेत… पण तरी त्यांची घरी यायची वेळ झाली कि पावले आपोआप घराकडे वळायची …. मला आठवतंय तस माझ्या बाबांनी (मी अजूनही बाबाच म्हणतो - आणि कधी कधी आदरानी "पिताश्री" किंवा "कुटुंब प्रमुख" ) मला एकदाच मारलं आहे… (आईचा रतीब मात्र न चुकता चालूच होता )… झाल असं होतं कि, मला सायकल शिकवायची ठरलं … आमच्या धाकट्या बहिणाबाईंनी धडपडत स्वतःच सायकल शिकून घेतली, आणि आमचा उत्साह मात्र कुठेच दिसेन… सायकल पेक्षा "आक्क्या-टोक्क्या" आणि "डब्बा ऐस-पैस " मधेच मला मज्जा वाटायची .... मग मात्र पिताश्रींची "सायकल प्रशिक्षण" मोहिमेवर नेमणूक झाली आणि रोज संध्याकाळी आम्ही हर्क्युलीस चे २४ इंची धूड अंगावर घेऊन धडपडू लागलो… सिटला पकडून पळताना बाबांचं पोट हलकं झालं आणि सोफ़्रामायसिन च्या ट्युब आणून खिसा हलका व्हायला लागला …पुढे पुढे लडखडत आमची सायकल चालायला लागली ... एक दिवस मात्र मी त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरच सायकल आणून उभी केली, आणि तिरमिरीत त्यांनी दिली एक थोतरीत ठेउन (कुठे तो एकलव्य ज्याने आपला अंगठा कापून दिला आणि कुठे आम्ही; सायकल शिकवणाऱ्याच्याच अंगठ्याचा अचूक वेध घेतला)… पुढचे २ दिवस गालगुंड झालाय असं खोटंच सांगत शाळेत जाव लागलं… एकदाची सायकल जमायला लागली आणि आम्ही घरातून लान्स आर्मस्ट्रोंग च्या थाटात सायकल वर शाळेत जाऊ लागलो … सायकल वरचाच एक किस्सा आठवला … लहानपणी पाप आणि पुण्याचे हिशोब खूप जपले जातात … गाई च्या पोटात ३३ कोटी देव असतात असे मला सांगितलेले होते … त्यामुळे जिथे गाय दिसेल तेथे तिच्या पोटाला हात लावून नमस्कार करणे हा एक नित्याचाच भाग झाला होता … एकदा अस्मादिक शाळेला निघालेले असताना रस्त्यातल्या एका कचराकुंडीपाशी एक गो-माता क्षुधा शांती करत असताना दिसली … सायकल चालवायचा आता बऱ्यापैकी (खरं तर अति ) आत्मविश्वास आलेला असल्याने खाली न उतरता गाई च्या जवळून सायकल नेउन तिच्या पोटाला हात लावून (जाता जाता) पुण्य कमावण्याच्या प्रयत्नात मी होतो … मी जवळ आल्या बरोबर तिने आपल्या शेपटीचा गोंडा (ज्याला शेण लागून ते वाळलेले होते) माझ्या गालावरून अंमळ प्रेमाने फिरविला …. इतका अकस्मात कृपा प्रसाद मिळाल्याने पुढच्या सेकंदाला मी गो-मातेचे आशीर्वाद घेत तिच्या पायाशी (तिच्याच शेणाच्या पो मध्ये) लोळण घेतली आणि माझी सायकल कचराकुंडी मध्ये अंतर्धान पावली …. पुढचे किती तरी दिवस लग्न, मुंज, वाढदिवस, घरी आलेले पाहुणे ई. प्रसंगी चार टाळकी एकत्र जमली कि माझा हा किस्सा नक्कीच सांगितला जाई …. असो … आमच्या शाळेबद्दल थोडंसं … माझ शिक्षण मराठी मधून ७ व्या इयत्ते पर्यंत (न गचकता ) आणि नंतर semi इंग्लीश मध्ये(तिथेहि न गचकता) …. माझी शाळा चिंचवड मधली तशी खूप प्रसिद्ध शाळा … पण त्याला मैदान नव्हत … त्याची कसर आम्ही शाळे समोरच्या बागेत खेळून भरून काढायचो … सगळ्यात जास्त मजा यायची ती क्रिकेट मैच असेल तेव्हा … आमच्या शाळेच्या शेजारी एक चाळ होती … त्याच्या एका घराची खिडकी बरोब्बर आमच्या वर्गाच्या खिडकी समोर यायची … आणि तिथल्या काकू मैच असेल तेव्हा खिडकीत पाटीवर स्कोअर लिहून ठेवायच्या …. त्या काकुंच नाव सुद्धा माहित नव्हत … पण मुलांचा दंगा ऐकू आला कि त्या स्कोअरबोर्ड अपडेट करून ठेवायच्या … तो स्कोअरबोर्ड आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच आहे…. परवा शाळेकडे गेलो होतो तेव्हा कळलं कि ती चाळ पाडली आहे … कदाचित त्यामुळे सुद्धा असेल किंवा तेंडूलकर रिटायर झाला म्हणून असेल, यंदाच्या IPL मधल्या मैच मध्ये मनच रमत नाहीये … शाळेच्या सहलीला जायचं म्हणजे तर जत्रे इतकीच धमाल मज्जा … पहिली सहल मला आठवतीये ती म्हणजे सारसबाग आणि पेशवे पार्क … पण खरी धमाल यायची गड किल्ल्यांच्या सहलीला …पहाटे ५ ला शाळेपाशी जमायचं… स्वेटर घातलेले सगळे मित्र-मैत्रिणी … बस मध्ये खिडकीची जागा पकडण्यासाठीची भांडणं … प्रत्येक स्टॉप नंतर होणारी हजेरी …. सिंहगडावर आमच्याच सरांनी दही वाल्याच्या सुरात सूर मिसळून मारलेली "दहीsssय्य" अशी आरोळी …. आईने दिलेले २० रुपये, त्यात घरी काहीतरी आठवण म्हणून घेऊन जाणं … आणि शाळेकडून काढल्या जाणारया ग्रुप फोटो मध्ये आपण दिसू का याची उत्सुकता …. खरच किती मिस करतोय हे सगळ … शाळेत असताना सुट्टी म्हणजे तर पर्वणीच वाटायची … उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामा, काकांकडे जाणं … तिथे शेतात भटकायचं … बैलगाडी मधून लिफ्ट घ्यायची … कारखान्याला जाणार्या गाडीतली उसाची कांडकी काढून सोलून खायची … झाडावरच्या कैऱ्या पाडून खायच्या … दर वर्षी १ महिन्या पुरते भेटणारे नवे सोबती … आणि परत येतानाचा तो ६-७ तासांचा कंटाळवाणा प्रवास … दिवाळीच्या सुट्टी मध्ये छान पैकी उटन लावून अंघोळ… नवीन कपडे, फराळ आणि फटाके … सकाळी पहिला बॉम्ब कोण फोडणार आणि कोणी किती पिशव्या भरून फटाके आणले याचीच स्पर्धा…. भाऊबिजेला बहिणीला ओवाळणी देताना बाबांनी दिलेले १० रु सुद्धा तिला किती मोलाचे वाटायचे … असो … तर आज सगळ आठवून खूप छान वाटलं … काहीतरी पुन्हा नवीन सापडलंय आणि बरच काही कायमचं हरवलंय …. पण एक मात्र खर … बालपणीचा काळ सुखाचा हेच खर … सुख म्हणजे अजून काय असत ?? http://kahitariasech.blogspot.com/2014/05/blog-post_7818.html
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

माझेही बालपण मुंबईतल्या चाळीतच गेले, बालपणच नव्हे तर वयातही मी तिथेच आलो, मला आजही वाटते की दक्षिण-मध्य मुंबईमधील मराठमोळ्या वातावरणातील चाळीत बालपण जाणे यापेक्षा दुसरी जन्नत नसावी. इतका बालपणीच्या आठवणींचा खजाना जो कैक म्हातारपणांना पुरेल.

आयला खरंच रे, मी तर लहानपणी घरी पाहुणे आले कि ते जाताना, उंबऱ्यापाशी ठेवलेल्या चपला घालत असतानाच, आईकडे खौसाठी पैसे मागायचो. आई मला रागावू शकत नव्हती हे चांगलाच माहिती असायचे, त्यात मग पाहुणे खिशातून नाण काढून ठेवायचे, त्यात कहर म्हणजे ४ आणे पेक्षा २० पैश्याचं नाण मिळालं कि जास्त आनंद व्हायचा, का तर ते चार आण्यापेक्षा आकाराने मोठं असायचं, अजून कहर म्हणजे २० पैश्याच्या नाण्यावर माग ऐशियाड चे चिन्ह असेल तर अजून ख़ुशी. पुढे शाळेच्या वयात मधल्या सुट्टीत चण्या-मन्या-बोर नामक टाइमपास, लाल तिखट मीठ लावून कापलेले पेरू, १ रु मिळणारा हिरवी चटणी टाकलेला वडापाव अश्या गोष्ठी खुणावायच्या. त्यामुळे २ रु ची लाल किर्राड नोट मिळाली कि मग काय … लहानपणी चाळीत काचेच्या गोटीपेक्षा मोठ्या, जवळ जवळ आवळ्याच्या आकाराच्या दगडाच्या गोट्या, कि ज्याला हाड्क्या म्हणायचो त्यांनी ऑक्या टोक्या खेळायचो. रविवारी मात्र टिवि पायजे असायचा बर्रका, अप्पू और पप्पू ची सेरिअल (त्याचं टायटल सांग असा काहीसा होत, अप्पू और पप्पूकि देखो यारी, कितनी सुंदर कितनी न्यारी … ) अप्पू म्हणजे छोटा, हत्तीच पिल्लू , पप्पू म्हणजे फ़ोरेस्ट ऑफिसरच कार्ट बरका त्यांची गोष्ठ , नंतर रामायण, महाभारत, मोगली वैगरे … काही दिवसांनी चंद्रकांता . . (टायटल सांग चंद्रकांता कि कहानी, है माना, ये पुरानी, नवगढ विजयगढ का राजकुमार, चंद्रकांता से करता था प्यार …) वैगरे. ८ विला असताना बहुतेक बा भ बोरकरांची कवितेला आम्ही माधुरी-संजय च्या तम्मा तम्मा गाण्याची चाल लावून बोब्म्लाय्चो , बघा तुम्हालाही आज ती जमते का … जेवढी आठवते तेवढी कविता लीखितो ( लव लव हिरवी गार पालवी , काट्यांची त्यावर मनमोहक जाली, रिमझिम करती लोलक पिवळे, फांद्याची वळणे वळणे)

बालपणीच्या आठवणी नेहमीच गोड असतात त्या आज आठवल्या की मनाला खूप बरे वाटते. त्याच आठवणी आठवण करून देतात सुख म्हणजे काय याची. www.mitraho.wordpress.com

छान लिहिलंय. बालपणीच्या सुखाच्या काळात घेऊन जाणारं एक मस्तं लेखन. माझ्या लहानपणीचा काळ तर ह्याही कितीतरी आधीचा. एका ग्लुकोजच्या पुड्याचे ही स्वप्न पाहावे लागायचे. आजारपणात तोंडाची चव गेली असताना वडिलांनी आख्खा, बरं का आख्खा, ग्लुकोजचा पुडा माझ्यासाठी आणला होता. आठवणीने आजही डोळे भरुन येतात. खुप गोष्टी आहेत. प्रत्येक सद्स्याने आपापल्या बालपणात डोकावले तर प्रत्येकाचा एकेक स्वतंत्र धागा होईल.