विकास--एक लोकचळवळ
दि.१६ मेच्या सायंकाळी बडोद्यातल्या विजयसभेत मोदींचे भाषण झाले. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा वाटला. विकास हा फक्त सरकारी योजनांच्या आराखड्यात न रहाता ती एक लोकचळवळ (जनअभियान) व्हावी. प्रत्येक भारतीयाला विकासात सहभागी होता यावे आणि आपण राष्ट्राच्या विकासाला हातभार लावतो आहोत याचा अभिमान त्याच्यात रुजावा, असा काहीसा तो मुद्दा होता. प्रत्येक नागरिक कशाप्रकारे विकासात भाग घेऊ शकेल याची त्यांनी दोन उदाहरणे दिली. एक म्हणजे रस्त्यांवर कचरा न फेकणे आणि दुसरे, चुकीच्या मार्गिकेतून वाहन न घुसवणे. मोदींनी पुढे म्हटले की प्रत्येक नागरिकाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर त्याने विकासास हातभार लावल्यासारखे आहे.
वर वर हे मुद्दे क्षुल्लक दिसतील पण हीच तर स्वयंशिस्त भारतीयांकडून अपेक्षित आहे. यामुळे व्यवस्थेची, सरकारची दृश्यमानता वाढेल, शिवाय प्रत्येक भारतीयाला एक टास्क, एक कार्यक्रम मिळेल. तळागाळात होणारे बदलच सरकारच्या अस्तित्वाची दृश्यमानता वाढवतात आणि सरकारबद्दल विश्वास निर्माण करतात.
केवळ लोकांसाठीच नव्हे तर सरकारसाठीसुद्धा असा एखादा सोपा कार्यक्रम आखता येईल. इंदिरा गांधींनी एक वीसकलमी कार्यक्रम राबवला होता. त्याची हेटाळणी झाली तरी काही चांगले कामही झाले. राजीव गांधींनीही स्वच्छ पाणी, शौचालये या गोष्टींवर भर दिला होता.
तर लोकांसाठी आणि सरकारासाठी असे वीस (किंवा कितीही) कलमी कार्यक्रम प्राथमिक पातळीवर आखायचे झाले तर त्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करता येईल हे पहाणे रंजक ठरू शकेल. यात परराष्ट्रनीती, संरक्षण, अणुकरार, सब्सिड्या, आरक्षण असे मुद्दे आपण तज्ञ राजकारणी आणि योजनाकारांसाठी बाजूला ठेवूया आणि अगदी सोपे आणि दृश्यमान बदल कुठे घडू शकतील याचाच विचार करूया. उदाहरणादाखल काही मुद्दे खाली मांडले आहेत. मिपाकरांनी त्यात भर घालावी.
आम जनतेसाठी :- १)सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे २) सार्वजनिक मालमत्तेची नासधूस न करणे (रेल्वेतली आसने फाडणे, कूपन मशीनवर बुक्के हाणणे, रेल्वेतल्या खिडक्या उघडत नसतील तर त्यावरही गुद्दे मारणे वगैरे, आणि पंखे-दिवे इ.च्या चोर्या) ३) वाहतुकीची शिस्त काटेकोरपणे पाळणे, ४)रांग लावणे आणि ती शिस्तबद्ध आणि एकेरी लावणे.५) आपापल्या इमारती-सोसाय्ट्यांतले दिवे उगीचच जळू न देणे, ६) पाण्याची नासाडी न करणे, ७)सार्वजनिक जागी सापडलेली वस्तू योग्य त्या ठिकाणी जमा करणे वगैरे.
सरकारची दृश्यमानता वाढवणारे काही प्राथमिक कार्यक्रम:- १)सर्व सरकारी कचेर्या, आस्थापने स्वच्छ आणि रंगरंगोटी केलेली राखणे. २) त्यातल्या मुतार्या तासातासाने स्वच्छ करून दुर्गंधीमुक्त राखणे ३)स्ट्रीट-लाइट्स वेळच्यावेळी चालू आणि बंद करणे ४)सरकारी जालसंस्थळे अद्ययावत राखणे, जलद करणे. ५)छोट्यात छोट्या रेल स्थानकालासुद्धा पुरेश्या उंचीचा फलाट मिळणे. ६)रस्त्यावर काही कारणाने कोंडी झाली तर पाच किलोमीटर अलीकडे इलेक्ट्रॉनिक सूचनाफळ्यावर तशी सूचना आणि वळणमार्गासंबंधी मार्गदर्शन झळकवणे, ७)बेशिस्त वाहनमालक आणि चालक यांना जबर शिक्षा करणे. ८) रस्ते किंवा कुठल्याही अपघातात त्वरित मदत मिळणे ९)सरकारी कर्मचार्यांनी (खरे तर सर्वांनीच) नम्रपणे आणि तत्परतेने वागणे.
मिपाकरांना आणखी बरेच मुद्दे सुचू शकतील. किंबहुना सूचनांचा एक म.सा.वि. काढून तो स्थानिक पक्षाधिकार्यांना किंवा नेत्यांना देता येईल. त्यासाठी दबावगट निर्माण करता येईल. ती अर्थात पुढची पायरी आहे. सुरुवात तर करूया.
http://www.misalpav.com/node/25779 ( विकासाची भारतीय संकल्पना )