भटकंती

सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ

Primary tabs

सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ
===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

...पुढची सफरीत आपण अल् कतीफ नावाच्या दुसऱ्या एका वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधरंगी मरुवनात जाणार आहोत.

अल् कतीफ

अल् कतीफ हे पूर्व प्रांतातले अजून एक मोठे मरुवन आहे. कतीफ नावाच्या शहरासह आजूबाजूची छोटी शहरे आणि गावे मिळून कतीफ प्रभाग (गव्हर्नरेट) बनला आहे.

कतीफ पूर्व अरबस्तानातील एक फार जुनी वसाहत आहे. इथे सापडलेल्या प्राचीन अवशेषांवरून तिचा इतिहास अगदी इ स पूर्वी ३५०० वर्षांपर्यंत मागे जातो. पूर्वी या जागेचे नाव "खत्त" असे होते. येथील कारागीर उत्तम भाले बनवण्यात वाकबगार होते. या जागेच्या नावावरून त्यांच्या भाल्यांना "खत्ती" असे ब्रँडनेम होते. इथल्या पारंपरिक कथा-कवितांमध्ये या खत्ती भाल्यांचा उल्लेख आहे. इथल्या काही जमातींचे आडनाव (फॅमिली नेम) खत्ती असे आहे.

प्राचीन काळात कतीफ हे अरबी आखातातले महत्त्वाचे शहर आणि बंदर होते. ग्रीक त्याचा उल्लेख कॅटिअस (Cateus) असा करत. काही जुन्या युरोपियन नकाश्यात अरबी आखाताचे नाव कतीफचा समुद्र (Sea of El Catif or Katif) असे लिहिलेले आहे. यावरून त्या काळातले कतीफचे महत्व अधोरेखीत होते.

कतीफ प्राचीन अल् बहरेन या सौदी अरेबियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांताचा भाग होता. त्यामुळे त्याचा इतिहास आपण मागच्या भागात अल् अहसाच्या इतिहासाबरोबर पाहिला आहेच.

कतीफ हे एक मोठे मरुवन असल्याने, अर्थातच, येथे मोठ्या प्रमाणात खजुराची झाडे आणि हिरवळ आहे. पूर्वी येथे व्यापार, शेती आणि मासेमारी हे मुख्य उद्योगधंदे होते. मात्र जुबेल या तेल उद्योगासाठी खास वसवलेल्या आधुनीक शहराच्या जवळ असल्याने आता तेथील लोक मोठ्या प्रमाणात तेल उद्योग, सरकारी नोकरी, शिक्षणसंस्था आणि आरोग्यसेवा या व्यवसायांत काम करतात.

कतीफला या ना त्या निमित्ताने चार पाच फेर्‍या झाल्या आणि या मरूवनाची अनेक वैशिष्ट्ये बघायला मिळाली. चला त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी एक एक करत बघूया...

आठवड्याचा बाजार

कतीफला दर गुरुवारी आठवड्याचा बाजार भरतो. आजूबाजूच्या गावांतूनच नव्हे तर दम्माम-खोबार-दाहरान मधूनही लोक तेथे जातात. स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी जाणार्‍या लोकांबरोबरच त्या गर्दीत आमच्यासारखे बाजाराची मजा बघायला जाणारे पर्यटकही असतात. चला तर या बाजाराची वैशिष्ट्ये त्यात फेरफटका मारत बघूया...

आठवड्याचा बाजार म्हटले म्हणजे भाजीपाला, फळे हे नेहमीचेच आहे. यात कतीफ आणि आजूबाजूच्या भागांत तयार होणार्‍या भाजीपाल्याबरोबरच परदेशातून आयात केलेला भाजीपाला आणि फळेही असतात...


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०१

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०२

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०३

.

कतीफच्या आठवड्याच्या बाजाराचे खास वैशिष्ट्य मात्र तेथला पक्षी आणि प्राणी बाजार आहे. सगळ्या सौदी अरेबियात तरी असा बाजार इतर ठिकाणी नाही...


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०४

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०५

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०६

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०७

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०८

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०९

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : १०

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : ११

.


कतीफचा आठवड्याचा बाजार : १२

.

अर्थात या सर्व गोष्टींबरोबर आठवड्याचा बाजार जुन्या बाजाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही म्हणा...


कतीफचा आठवड्याचा बाजार : १३

मासळी बाजार

कतीफ त्याच्या मासळीबाजारासाठीही प्रसिद्ध आहे. येथील कोळी आजही पारंपरिक डोव्ह (मध्यम आकाराच्या मासेमारी बोटी) वापरून मासेमारी करतात व ते मासे घेऊन रोज पहाटे परततात. पहाटे ४ ते ६ या काळात कतीफ मधल्या एका राखीव जागेवर त्या माश्यांचा लिलाव होतो. हा लिलाव येथे गेल्या १५० वर्षांपासून भरतो आहे. मासेमारी व्यवसायात येथील ४,५०० लोक काम करतात आणि दररोज १००० ते १२०० टन मासे विकले जातात. या बाजाराची दरवर्षीची उलाढाल साधारण US$ १० कोटीची ( साधारणपणे रु ६०० कोटी) आहे. या लिलावातले मासे केवळ सौदी अरेबियातच नव्हे तर सर्व आखाती देशात जातात. सद्याची जागा कमी पडत असल्याने लवकरच या लिलावाची जागा किनार्‍याजवळ US$ २० लाख खर्चून बनविलेल्या एका कृत्रिम बेटावरच्या १,१०,६०० चौ मीटर आकाराच्या खास संकुलात हलविण्यात येणार आहे.

आठवड्याच्या सुट्टीच्या आणि इतर सुट्टीच्या दिवसांना स्वस्त दरात ताजे मासे खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतल्या नोकरदार लोकांची आणि पर्यट्कांची येथे झुंबड उडालेली असते...


कतीफचा मासळी बाजार : ०१ (जालावरून साभार)

.

कमी धाडसी किंवा सकाळी उशीरा उठणार्‍यांसाठी एका बाजूला भारतीय मासळीबाजाराप्रमाणे दिसणारी व्यवस्थाही आहे...


कतीफचा मासळी बाजार : ०२

कतीफ शहराचा फेरफटका

कतीफ प्राचीन काळापासून अरबी आखातातले महत्त्वाचे बंदर राहिले आहे. या बंदरात एका वेळेस ५०० पारंपरिक बोटी (डोव्ह) उभा राहू शकतात. यातल्या बहुतेक पारंपरिक बोटी कतीफ येथेच बांधल्या जातात. कतीफच्या समुद्रकिनार्‍यावर ३५,००० चौ मीटरवर हिरवळ आणि मुलांना खेळायची व्यवस्था केली आहे (कतीफ कॉर्निश)...


कतीफचा फेरफटका : ०१ : कतीफ कॉर्निश

.

शहरातल्या सर्व मोठ्या रास्त्यांना खजूराची झाडे, इतर प्रकारची झाडे झुडूपे आणि फुलझाडांनी शोभिवंत केले आहे...


कतीफचा फेरफटका : ०२

.


कतीफचा फेरफटका : ०३

.


कतीफचा फेरफटका : ०४

.


कतीफचा फेरफटका : ०५

.


कतीफचा फेरफटका : ०६

.


कतीफचा फेरफटका : ०७ : कतीफ सिटी मॉल

.

शहराच्या एका भागात एक जुनी गढी संरक्षीत करून ठेवली आहे. तिचे आताचे रूप काही दशके जुने असले तरी तेथे सापडलेल्या उत्खननात तेथे ३,५०० वर्षापूर्वीपासून वस्ती असण्याचे पुरावे सापडले असल्याचे समजते...


कतीफचा फेरफटका : ०७

.

आता सौदी अरेबियाबद्दलच्या सर्वसाधारण कल्पनेला छोटासा धक्का ! येथे एक खाजगी स्पोर्ट्स एरीना आहे. त्यात बोलिंग अ‍ॅली, टेबल टेनिस, इ बरेच खेळ खेळण्याची व्यवस्था आहे...


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०१

.


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०२

.


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०३

.


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०४

कतीफ फेस्टिवल

कतीफ प्रभाग दरवर्षी "कतीफ फेस्टिवल" साजरी करतो. या समारंभात फक्त पेहराव वगळता भारतातील एखाद्या जत्रेचे वातावरण असते...


कतीफ फेस्टिवल : ०१ (जालावरून साभार)

.


कतीफ फेस्टिवल : ०२ (जालावरून साभार)

.


कतीफ फेस्टिवल : ०३

.


कतीफ फेस्टिवल : ०४

.


कतीफ फेस्टिवल : ०५

.

या समारंभाचे एक खास आकर्षण म्हणजे इथल्या दुचाकी-चारचाकीच्या संग्राहकांनी जमवलेल्या गाड्यांचे प्रदर्शन. इथले विशेष म्हणजे या भागात एकही संरक्षक दिसला नाही आणि प्रेक्षकांना हात लावून, बसून गाड्या पाहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते !...


कतीफ फेस्टिवल : ०६

.


कतीफ फेस्टिवल : ०७

.

जत्रा म्हटली म्हणजे खाण्यापिण्याच्या आणि आकर्षक वस्तूंच्या दुकानांची गर्दी आलीच. त्यापैकी काही...


कतीफ फेस्टिवल : ०८ : भेटवस्तूंचे दुकान

.


कतीफ फेस्टिवल : ०९ : कपड्यांचे दुकान

.


कतीफ फेस्टिवल : १० : मसाल्यांचे दुकान

.

कतीफच्या जत्रेत मला सापडलेली पाकिस्तानातून आलेली एक खास लाकडी कलाकुसरीची वस्तू...


ही पूर्ण बंद असताना केवळ कलाकुसर असलेली तबकडी वाटते. पण हँडल पकडून उघडली की होते...

.


टेबलावर फुले, फळे अथवा तत्सम वस्तू ठेवण्यासाठीची शैलीदार कोरीव परडी

.

या जत्रेत मजा करणारी पारंपरिक पोषाखातली काही मुले (जालावरून साभार)...

.

 ...

.

आपली पुढची सफर आहे सौदी अरेबियातील आधुनिक औद्योगिक शहर जुबेलची.

क्रमशः

.

(अंधुक प्रकाशामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे काही प्रकाशचित्रे खराब आली आहेत. क्षमस्व)

===================================================================

सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...

===================================================================

@कतीफ फेस्टिवल : ०५ >>> स्मायली गुब्बारे!!! *yahoo* सुप्पर लाइक!

बाकि नेहमी प्रमाणे मस्तच! *i-m_so_happy*

सुबोध खरे

डॉक्टर साहेब,
आपले सर्वच लिखाण अतिशय उत्तम आणि ओघवत्या शैलीत आहे. वाचायला फार छान आहे.(सर्वच भागांवर तोच प्रतिसाद काय द्यायचा म्हणून आळस केला)
फक्त एक प्रश्न हे प्राणी बाजारातील पशु किंवा पक्षी तेथील प्रचंड उन्हाळ्यात कसे तग धरतात. ( ते तेथील स्थानीय नसावेत असा अंदाज आहे). कारण प्राणी संग्रहालयात त्यांच्या साठी विविध खास सेवा असतात तशा खाजगी माणसाला परवडतात काय?

सौदी अरेबियामध्ये सर्व आधुनिक (सिमेंटची) घरे वातानुकुलीत आहेत. तेथे ती चैन नसून आवश्यकताच आहे. खूप दूरच्या खेड्यातल्या घरांना मातीच्या जाड भिंती असतात त्यामुळे बाहेरच्या उन्हाचा प्रभाव आतल्या हवेवर कमी होतो व तापमान सुसह्य राहते. दिमाखदार रंगीबेरंगी पक्षी पाळण्याचा शौक मुख्यतः वातानुकुलीत घरात राहणारे लोकच करत असल्याने त्यांचासाठी काही खास वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडत नाही.

प्रचेतस

मस्त भाग झालाय हा. अगदी रंगीबेरंगी.
सौदी अरेबियातील जीवन अगदीच रूक्ष असावेसे वाटत होते. येथे मात्र तसे दिसत नाहीच.

सस्नेह

फोटो तर सगळे हिरवेगार दिसताहेत !

मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, वल्ली आणि स्नेहांकिता : सहलितील सहभागासाठी धन्यवाद !

@ वल्ली आणि स्नेहांकिता :

आपली राहती जागा आपल्या कुवतीप्रमाणे सुंदर बनवणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. तेथे तर पेट्रोडॉलर्समुळे मोठी समृद्धी आलेली आहे, तिचा प्रभाव पडणारच. आता २०% सौंदर्याची मजा घ्यायची की ८०% वाळवंटाची काळजी करायची (विशेषतः त्याचा आपल्याला त्रास होत नसेल तर) हे आपापल्यावर प्रवृत्तीवर अवलंबून आहे. :)

वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण एक मजा असते. तीही सलग तीन आठवडे रब अल् खाली (एम्प्टी क्वार्टर) मध्ये राहून अनुभवली आहे. अर्थात, ते एक दोन वेळा मजा म्हणूनच ठीक आहे म्हणा ! :)

प्रचेतस

वाहत्या वाळूच्या वाळवंटाची पण एक मजा असते. तीही सलग तीन आठवडे रब अल् खाली (एम्प्टी क्वार्टर) मध्ये राहून अनुभवली आहे.

ह्याच्यावरही लिखाण अवश्य येऊ द्यात.
शिवाय वाळवंटातल्या वाळूच्या दलदली (क्विकसॅण्ड) किंवा वाळूच्या पोकळ्या (ड्राय क्विकसॅण्ड) अशी काही चमत्कृतीजन्य स्थळे तुम्ही तिथे पाहिली असतील तर त्यावरही लिहा अशी विनंती.

तो अनुभव सौदी अरेबियाचा नाही, दुसर्‍या देशाचा आहे. तिथले खूप अनुभव आहेत पण तेथे होतो तेव्हा डिजीटल कॅमेरे नव्हते. आता तिथले कागदी फोटो आता भुरकट-पिवळे-तपकिरी झाले आहेत. त्यामुळे त्या आठवणी लिखाणात मागे पडल्या आहेत. पण कधितरी ते लिहायचे आहेतच !

भाते

बाजारहाट आणि फेस्टिवल ची माहिती आणि फोटो आवडले.
मासळीबाजारातला फोटो अगदी मुंबईत काढल्यासारखा वाटतो आहे. :)

सुहास झेले

सुंदर सफर सुरु आहे.. आज सगळे भाग एकत्र वाचले. धम्माल एकदम.... :)

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)

शेवटचा पारंपारीक पोशाखातील मुलींचा फोटो खूप आवडला. खासच.

रेवती

हा फेरफटकाही आवडला.......पिंजर्‍यातले पक्षी तेवढे बिचारे वाटतायत.
मुली खेळ खेळतायत म्हणून सुटकेचा निश्वास टाकला कारण मुलींना (स्त्रीयांना) काही म्हणजे काही मनासारखे करता येत नाही असे ऐकले आहे ते फारसे खरे नाही किंवा बदलले आहे. पारंपारिक वेषातल्या मुली आवडल्या.

तेथे स्त्रियांवर बरीच बंधने आहेत यात शंका नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अगदीच बांधून कोंडून ठेवले आहे. चारचाकी चालवायला मनाई आहे पण मग नोकरीला, बाजारात जाताना घरातील मोठ्या पूरुषांपैकी एक घेऊन जातो किंवा ड्रायव्हर ठेवावा लागतो. त्यामुळे बहुतेक स्त्रियांना शोफर ड्रिव्हन गाडी आवडते असे दिसते. अ‍ॅक्टिव्हिस्ट बाईने गाडी चालवून तो व्हिडीओ युट्युबवर टाकल्याचे प्रकार तुरळक प्रकारही झालेले आहेत. पण कायद्यात अश्या गुन्ह्याला शिक्षा लिहीलेली नाही म्हणून चौकी दोन तास बसवून सोडून दिले आहे ! पेहरावात आबाया वगैरे अंगवळणी पडलेले आहेत, पण हॉस्पीटलमध्ये आबाया उतरवून शर्टपँटवर पांढरा कोट घातला जातो.

रेवती

त्यामुळे बहुतेक स्त्रियांना शोफर ड्रिव्हन गाडी आवडते असे दिसते.
हे मात्र भारी. :)

मग काय ! आरामात मागच्या सिटवर (ड्रायव्हर नवरा असला तर पुढच्या सिटवर) बसून मजेत हवे तिथे फिरायला मिळाले तर आवडणार नाही तर काय ?

पैसा

पण त्या प्राण्यांच्या बाजारात भर उन्हात कोंबड्या आणि मांजरे पिंजर्‍यात पाहून कसेतरीच वाटले!

बॅटमॅन

हाही भाग मस्तच!!! बाकी त्या स्पोर्ट्स अरीनामध्ये बायका विथौट बुरखा कशा काय?

त्या बिनबुरखावाल्या स्त्रिया आमच्या हॉस्पीटलमधल्या परदेशी नर्सेस आणि सेक्रेटरीज होत्या. त्या अर्ध्या दिवसासाठी ती सगळी एरीना आमच्या रिक्रिएशन डिपार्ट्मेंटने केवळ आमच्यासाठी राखून ठेवली होती. त्यामुळे सगळ्यांना मनमोकळेपणाने मजा घेता आली.

शिद

हा ही भाग मस्तच... पु. भा. प्र.