Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस. जे झाले ते झाले आयुष्यात असे प्रसंग येत राहतात.मुळात त्याने आयुष्यात काय करावे हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.आईबाप काही आयुष्याला पुरत नाहीत आणि तुम्ही फारतर मुलाला थोडे फार मार्गदर्शन करू शकता. गमतिची गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुरस आणि चमत्कारिक होत्या की मला आश्चर्यच वाटले. १) तुम्ही दोघे डॉक्टर असून मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले?. २) आता मुलाचे कसे होणार? ३) त्याला इंजिनियरिंग झेपणार नाही त्याला बी एस सी ला टाका ४) तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. भरपूर डोनेशन भरून प्रवेश घ्या. ५) त्याला परत बारावीला बसावा गमतीची गोष्ट हीच आहे कि लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. हा सल्ला दिल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा जरासुद्धा विचार न करता ते बोलत होते. जे जवळचे मित्र होते त्यांनी फार मोलाचे सल्ले दिले. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझ्या वडिलांनी दिला.जेंव्हा मी त्यांना म्हटले कि लोक सांगत आहेत कि त्याला अभियांत्रिकी झेपेल का ते पहा. त्यांनी एकच सांगितले कि तो इंजिनियर झाल्यावर त्या विषयातच काम करेल असे आज कसे सांगता येईल? जर त्याने उद्या व्यवस्थापन विषय घेतला ( एम बी ए किंवा तत्सम केले) किंवा एखाद्या व्यवसायात शिरला तर त्याला बारावीत किंवा अभियांत्रिकीत किती गुण आहेत त्याचा तो पुढे काय करणार आहे याच्याशी काय संबंध असेल. त्याला अभियांत्रिकीत किती गुण आहेत या पेक्षा त्याला अभियांत्रिकीचे मुलभूत ज्ञान आहे एवढे बस आहे. जर तो सॉफ्टवेअर मध्ये गेला तरीही तो मेकानिकल अभियांत्रिकीच्या ज्ञानच शून्य वापर करेल आणि जर त्याने एम टेक वाहन( ऑटोमोबाइल) किंवा वैमान शास्त्र (एरोनौटीक्स) या विषयात केले तर त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे? एका परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही. आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज येथून व्यवस्थापनाची पदविका घेतलेली आहेत. हे वाचून मला खूप हुरूप आला. मी इतके दिवस जो विचार करीत होतो त्याला वडिलांचाचआधार मिळतो आहे हे पाहून मला बरे वाटले.माझे एक मत मी पुष्कळ वेळा व्यक्त केले आहे कि शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते. मी जेंव्हा इतर बर्याच लोकांशी बोललो तेंव्हा अशी बरीच पोळलेली माणसे मला भेटली ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांना उज्ज्वल यश मिळालेले नव्हते आणि त्या सर्वांनी मला हेच सांगितले. मुळात माझ्या मुलाने जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे केलेले नव्हते हे मला स्वतःला माहित होते. त्याला आम्ही एक वर्ष अगोदर शाळेत टाकले असल्याने त्याला आपण अभ्यास करावा असा परिपक्व पणा( maturity ) आलेलाच नाही. हे अर्थात समर्थन होऊ शकत नाही हे मलाही माहित आहे कारण काही मुले त्याच्याच सारखी कमी वयाची आहेत आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवले. पण प्रत्येक मुल वेगळे असते हे मला माहित आहे. माझ्या मुलाच्या मित्रांपैकी काही खरच हुशार असलेली मुले या परीक्षात फारशी चमकू शकली नाहीत अशा काही मुलांच्या घरात एखादा मृत्यू झाला असावा अशी अवकळा पसरली होती. एक मुलगा भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. या मुलाच्या बापाचे वजन कमी झाले म्हणून त्याच्या बायकोने त्याला माझ्याकडे पाठविले तेंव्हा मला असे लक्षात आले कि बाप सुद्धा अत्यंत तणावाखाली आहे. त्याला पाहते ४ वाजता जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही. हे दोघे आईबाप स्वतः अभियंते आहेत. एका आईने सांगितले कि BITS( बिर्ला इन्स्टीट्युट) ची परीक्षा होई पर्यंत मी थांबले आहे. ती झाल्यावर मुलीच्या दोन मुस्कटात मारणार आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी देऊनही परीक्षेत हा निकाल कसा मिळू शकतो हेच मला कळत नाही? या बाई स्वतः आर्किटेक्ट आहेत.या बाईना मी एकच सांगितले कि तुमची मुलगी एखाद्या पान्वाल्याचा हात धरून पळून गेली असती तर? तिला एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर एवढे अकांड तांडव कशासाठी? जर सुख सोयी किंवा सुविधा दिल्या तर गुण मिळत असते तर अंबानींची मुले आय आय टी मध्ये पहिल्या दहात आली असती. या दोन्ही आईबापाना मी विश्लेषण करून सांगितले कि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे कि आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. हे त्यांना पचवणे फार जड गेले. हि गोष्ट मी मुळात मान्य केली असल्याने (माझी प्रतिष्ठा माझ्या मुलांच्या शैक्षणिक यशावर मुळीच अवलंबून नाही हे मी मुलांना पहिल्यापासून सांगत आलो आहे) तूमच्या मुलाला कमी गुण कसे मिळाले यावर मी शांतपणे त्यांना सांगितले कि अहो तो ढ आहे काय करणार? अशा कितीतरी घरात मी सुतकी वातावरण बघत आहे जेथे मुलाला चांगले गुण मिळालेले नाहीत. किंवा मुलाने काहीतरी गंभीर गुन्हा केला असल्यासारखे आई बाप त्यांना वागवत आहेत. मुळात आय आय टी मध्ये १४ लाख मुलांपैकी केवळ २००० मुलांना आपल्या आवडीचा विषय मिळतो बाकी दोन ते तीन हजार मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी आय आय टीच्या शिक्क्यासाठी तेथे मिळेल तो विषय शिकत असतात. मग आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही तर आयुष्य फुकट गेले असे लोकांना का वाटत राहते? आज प्रत्त्येक बस, रेल्वे गाडी, ट्रक वर आय आय टी किंवा वैद्यकीय परीक्षेच्या क्लास ची जाहिरात दिसत आहे. हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे ? कोटा येथे किंवा नारायण इन्स्टीटयुट हैद्राबाद किंवा फिट जी किंवा टाईम अकादमी येथे मुलांना आठवीपासून सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत पूर्ण वेळ आय आय टी च्या क्लास साठी जुंपले जाते. ( आता हेच क्लास सहावी पासून चालू होणार अशी जाहिरात पाहिली) म्हणजे मुलांना तेराव्या वर्षापासून आईबाप या चक्रात ढकलत असतात पाच वर्षे ढोर मेहनत करून शेवटी हातात एक डिग्री पडेल किंवा न पडेल पण त्यात मुलांचे कोवळे वय मात्र नक्कीच नसून चालले आहे. मी माझ्या मुलाला सांगितले होते किया अभियांत्रिकीत तुला प्रवेश नक्की मिळेल पण तुला नक्की काय व्हायचे आहे हे तुला ठरवावे लागेल.पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल. एकदा नोकरीला लागला कि माणूस त्या चरकात पिळून निघतो मग थोडे थांबून सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला उसंत मिळत नाही. ( मी सहा महिने सुट्टी ( चार महिने भरपगारी आणि दोन महिने अर्ध पगारी) घेऊन कोणताही आजार नसताना नुसते घरी बसून काढले आहेत त्यामुळे त्याची किंमत किती अमुल्य आहे हे मला पूर्ण माहिती आहे. जाता जाता -- माझी पत्नी पुण्यातील एका प्रथितयश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया काय आहे ते जाणण्यासाठी जाऊन आली होती तेथे तिला एक कागद भरून दिला. आणि तेथे आम्ही दोघे डॉक्टर आहेत हे पाहून त्यांनी सतरा लाख रुपये रोख असा दर सांगितला यातील अर्धे पुढच्या चार दिवसात आणून द्या. गम्मत म्हणजे बारावीचा निकाल अजून लागलेलाच नाही. यावर तिने त्यांना विचारले कि तुमच्याकडे अभियांत्रिकी केल्यावर "प्लेसमेंट" कितीची मिळते त्यावर ते म्हणाले कि चार लाख वार्षिक. यावर मी शांतपणे पत्नीला म्हटले कि मुलाला जेथे मिळेल तेथे प्रवेश घेऊ. चार वर्षे मुलगा घरी बसला तरी चालेल एक लाख रुपये तरीही वाचतील(व्याज वेगळे). विस्तारभयास्तव येथेच थांबतो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सर्वप्रथम तुमच्या मुलाला शुभेच्छा! भारतीय पध्दतीत आईवडीलांना काही प्रमाणात मुलांच्या शिक्षणावरून ताण येतो हे काही अंशी(च) चांगले आहे. तो (चांगला) अंश म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था. त्यासाठी आपण सर्वांनीच आपापल्या पालकांचे आभार मानावेत. पण तेव्हढेच! दुर्दैवाने आता शिक्षणापेक्षा स्टेटसला जास्त महत्व असते. वपुंच्या भाषेत, माणसे तीन शब्दांसाठी जगतातः "लोक काय म्हणतील?" आता जरी समाजात त्यात अनेक संदर्भात बदल होत गेला असला तरी या संदर्भात अजून झालेला नाही. आय आय टी मधल्या मुलांबद्दल मला कौतुक आहे, आदर देखील आहे. पण आय आय टीअन्स नी जेव्हढे महत्व दिले जाते, जेव्हढे (खरेच) वेगळे शिकवले जाते त्याचा विचार करता खूप काही नॉन आय आय टीअन्सच्या तुलनेत इंपॅक्ट घडेल असे केलेले दिसत नाही असे देखील वाटते. परत सांगतो याचा अर्थ आय आय टी कमी आहे असा नाही, पण ३ इडीयट्समधल्या चतुरच्या भुमिकेतच आपण कमी अधिक प्रमाणात अडकून पडतो आणि आपापल्या पाल्यांना देखील त्यात अडकवून ठेवतो... वास्तवीक ९०च्या दशकातील सुरवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर पोटापाण्याचे काय होणार... पण आता खरेच असे आहे का? मुलांना नक्की काय आवडते ह्याचा आपण (म्हणजे आपण सर्वच) विचार करतो का? ह्याचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. जितका मुलगा/गी स्वतंत्र विचार करू शकतील तितके चांगले असे वाटते. कुठल्यातरी पुढार्‍याच्या बोडक्यावर कॅपिटेशन फी घालून वर अजून काही लाख रुपये केवळ डिग्रीसाठी घालवण्याची जर सुदैवाने आर्थिक परीस्थिती असली तर, त्या परीस्थितीचा चांगला फायदा घेऊन मुलाला जे आवडते ते शिकून काही (कॅल्क्युलेटेड) रिस्क घेण्यास शिकवावे. त्यातून तो अधिक तरबेज आणि जीवनात यशस्वी होईल. सरते शेवटी आय आय टी असो अथवा हार्वर्ड - आज तिथली मुले (आणि आपण सगळेच) जे काही संगणक आणि समाजमाध्यमांचा वापर करत आहेत, तो ज्यांनी हार्वर्ड शिक्षण पूर्ण न करताच सोडले अथवा पायरीपण चढली नाही अशा गेट्स, जॉब्स आणि झुकेरबर्गमुळे दाखवलेल्या innovation मुळे हे लक्षात ठेवावे... :)

शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते. अगदी सहमत ! सहमत यासाठी कारण या सर्व गोष्टींचा मी आत्ता पर्यंत पूर्ण अनुभव घेतला आहे. कोणत्याही मुलाला इतके अपयश येउ नये तितके अपयश मी माझ्या शैक्षणिक कालखंडात पाहिले,अनुभवले आणि भोगले आहे.तरी सुद्धा आज जिथे मी आहे, तिथे पोहचल्यावर लक्षात येते की शिक्षणाच्या एकंदर टक्केवारीचा जितका बभ्रा आपल्या इथे केला जातो त्याचा काहीच उपयोग नाही. समाजात तर अशी अनेक उदा. सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयात झाले आहे आणि ते व्यवसाय वेगळाच करत आहेत. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रात सुद्धा दिसतील ! ;) यात मी सुद्धा आहे, कारण ज्याच्या मी अभ्यास केला आणि आत्ता मी जे काम करतो त्याचा काडीचाही संबंध नाही ! थोडक्यात सांगायचे झाले तर :- तुम्ही रॅट रेस मधले रॅट होउ नका ! जाता जाता :- या विषयावरच एक सुंदर पिक्चरचा ट्रेलर ! जाता जाता :- डॉक तुमच्या या लेखाने मला कधी काळी इथेच लिहलेल्या माझी धडपड या लेखमालेची आठवण झाली.

आम्हाला दहावीला एक धडा होता, बहुतेक कुणी विदेशी कवी/संगीतकाराने आपल्या वडिलांबद्दल लिहिलेला लेख होता. त्यात शेवटी एक वाक्य होतं. " How much he has learned". सारांशाने लेखक असं म्हणत होता की 'आजपर्यंत मुल आणि वडिलांच्या नात्याबद्दल माझे वडिल किती शिकले होते ते बघून मी थक्क झालो!'त्या वयात या वाक्याचा अर्थच कळला नाही. माझ्या दृष्टीने तेव्हा (..आणि खरंतर अजूनही) माझे किंवा कुणाचेही वडील म्हणजे सर्वज्ञ! ते काय नवीन शिकणार? एका मुलाच्या भविष्याचे इतके महत्त्वाचे निर्णय घेणे ही किती मोठी जबाबदारी आहे साहेब....आपल्याला शुभेच्छा!!! सुंदर चिंतन....अजून कितीही लिहिलं असतं तरी चांगलंच झालं असतं.....

परफेक्ट लिहिलय सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या , थोडे निर्णय स्वातंत्र्य त्यालाही असुद्या.

सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या हे वाक्य कधी कधी फार घोळ करते. मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ? म्हणुन मग ते मेंढ्याच्या कळपासारखे होते, व सगळे बावरुन एकाच दिशेला जातात.. मुले खरच बावरतात, असे सरळ तुझे तु ठरव सांगितले की.. खुपदा हे निर्णय त्यांना घेताच येत नाही.. अश्या वेळेस योग्य मार्गदर्शन नक्की हवे..

मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ?
का नाही? पालकांचं प्रेशर असेल तर मे बी नाही... पण नसेल तर काय प्रॉब्लेम असतो? दहावीपर्यंत काय, सातवी-आठवीपर्यंतच आपला कल कुठे आहे ते तरी निश्चित कळतं...

मुळात मी प्रत्येक मुल म्हटंलय.. सातवी - आठवीत मुलाचा कल पालकाला कळेल, असे म्हणू शकता ... अहो आज नायक बघुन प्रधानमंत्री,व उद्या बार्डर बघुन कमांडो होण्याचे दिवस असतात ते, या वयात त्यांच्याकडुन तुम्ही एक जवाबदार निर्णय अपेक्षित करता ? काही अपवाद असतील, पण सगळ्यांना निश्चित कळतं असे वाटत नाही.. पालकांचे प्रेशर अती तर नक्कीच नसावे, पण काहीच नसेल, तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या पाल्याला इलेक्टानिक्स मध्ये गती आहे, हे दिसतय, पण त्याला वाटते म्हणून त्याने त्यात ITI केलेले चालेल का ? का त्याला IIT ची स्पर्धा समजावी लागणार ? मग यासाठी आई ने हातात अभ्यास करण्यासाठी छडी घेतली तर त्याला पालकांच प्रेशर म्हणावे का ?

कदाचित तुम्ही म्हणता ते योग्यही असेल... मला फक्त असं वाटतं, की मुलं थोडीतरी प्रॅक्टिकल असतात. माझ्या वर्गातल्या जवळपास सर्वांनाच चांगलीच कल्पना होती की आपल्याला कुठच्या बाजूने जायचंय. आणि जवळपास सगळ्यांनीच तेच केलं पुढे हेही महत्वाचं.. आणि मी 'कल' म्हटलं. एक सर्वसामान्य कॅटॅगरी लक्षात येते तोपर्यंत. अगदी कोणतं प्रोफेशन वगैरे दहावीपर्यंत निश्चित करायची गरज असते का? पालकांचे प्रेशर असे स्पेसिफिक शब्द न वापरता इन जनरल प्रेशर असं म्हणायला हवं होतं मी.. एखादा वेगळा निर्णय असेल तर जग टोचत बसतं सतत. तेव्हा खरं तर पालकांचा सपोर्ट कामी येतो. तो नाही मिळाला तर मात्र ढासळायला होतं. मला दहावीनंतर आर्ट्स ला जायचं होतं तर लोकांनी काय काय ऐकवलंय ते अजून आठवतंय. अगदी जिथे अ‍ॅडमिशन घ्यायला गेले त्या कॉलेजमधेही मला सांगितलं गेलं की तू आमच्या सायन्स स्ट्रीमला प्रवेश घे, आर्ट्स ला जाऊ नकोस. त्यातही मी 'पुढे कोण होणार' याला काही ठाम उत्तर देत नव्हते. ह्युमॅनिटीज क्षेत्र आवडतं म्हणून जातेय एवढंच उत्तर ऐकून लोक दयाभावाने बघायचे.. 'तिला एक कळत नाही, पण आई-बाबांनाही कळू नये?' हा डायलॉग कितीजणांनी मारला. तेव्हा आई-बाबा खूप ठामपणे उभे राहिले माझ्या पाठीशी.. याउलट माझ्या एका अत्यंत हुशार मैत्रिणीला आधीपासूनच सायकॉलॉजी करायचं होतं. पण तिला सायन्सला जायला लावलं घरच्यांनी. बारावीत तिने स्पष्ट सांगितलं, मला झेपणार नाही. तिचा अभ्यासातला रस एकदम कमी व्हायला लागला तेव्हा कुठे त्यांनी ऐकलं आणि बीए ला प्रवेश घेऊ दिला. मुलांचा कल पालकांना नक्कीच कळत असावा. आयआयटीची स्पर्धा झेपवण्याची कुवत आपल्या मुलात नक्की आहे ना, हा विचार करुनच हातात छडी घ्यावी.. त्याला अन्य क्षेत्रांत उत्कृष्ट करियर करता येणार असेल, तर केवळ आपली इच्छा म्हणून त्याच्या वर आयआयटीला जाण्याचा दबाव आणणे चुकीचे नाही का?

बजरबट्टूंशी सहमत. ह्या करीता, अचानक एक दिवस नाही तर, वरचेवर अनेकदा मुलाशी चर्चाकरून त्याचा कल जाणून घ्यावा. नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं, भविष्यावर - बदलत्या युगाबद्दल चर्चा करावी. आणि त्याला मार्ग निवडू द्यावा. नुसतेच तुझे तू ठरव सांगितल्यास मित्रांचा कल पाहून मुलं काय करायचं ठरवतात. कांही मुलं असतीलही हुशार आणि परिपक्व पण सामान्यतः ती परिपक्वता, ज्ञान आणि विचारक्षमता त्या वयात सर्वांमध्ये नसते असे अनुभवले आहे.

निर्णय मुलावर सोडण्यापेक्षा तुमच्या निर्णयात मुलाच्या आवडीला स्थान द्या.
सहमत. पेठकर काका: +१११

नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं. अगदी सहमत काका.. आणि म्हणूनच आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. :) +१११ आनन्दा.....

>>>>आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. डोळे आणि कान उघडे असतील तर टिव्ही, वर्तमानपत्र, मित्रांच्या बरोबरच्या चर्चा, जाहिराती ह्यातून अशी अनेक क्षेत्र आपल्या समोर येत असतात. आपल्याला वाटतं, च्यायला, हल्लीच्या पिढीचं बरं आहे. आमच्या वेळेला असे इतर सोयिस्कर, व्यवहार्य मार्गही आहेत ज्यात उत्तम करियर करता येईल हे माहितच नव्हतं. आपल्याला आता त्याचा फायदा नाही पण आपल्या मुलाला/मुलीला होऊ शकतो. हि क्रिया दैनंदिन आयुष्यात सहज घडत असते. मुद्दाम कांही करावे लागत नाही. हं, एखादा चांगला पर्याय वाटला तर त्याची सखोल माहिती काढता येतेच.

पेठकर साहेब कालच मी माझ्या मित्राला सांगत होतो कि माझा मुलगा अभ्यास सोडून सारखी पुस्तके वाचत असे म्हणून मी पुस्तके वडिलांच्या घरी माळ्यावर ठेवली होती आता परीक्षा झाली म्हणून ती परत आणली कि आता त्याने वाचायला हरकत नाही. त्यावर माझा मित्र म्हणाला कि अरे तू नशीबवान आहेस तुझी मुले पुस्तके वाचतात. माझ्या मुलाला शाळेत गणितात मार्क कमी पडले म्हणून मी त्याच्या अभ्यासाचा आढावा घेत असताना मला असे जाणवले कि त्याला गणित येत आहे पण वाचन आणि शब्द संपत्ती( vocabulary) कमी असल्याने त्याल गणिताचा प्रश्न कळलेच नाहीत. जेंव्हा ते प्रश्न त्याला फोडून सांगितले तेंव्हा त्याने पटकन ते सोडवले म्हणजे त्याल गणिताचा प्रश्न नाही. हे चिरंजीव सध्या सातवीत आहेत आणि अगदी लहान असल्यापासून मोबाईल आणि ipad शीच खेळताना दिसलेले आहेत. घरी आई वडिलांनी जेंव्हा जेंव्हा कटकट करतो तेंव्हा हि इलेक्ट्रोनिक उपकरणे पुढे केली. हाच प्रकार माझ्या दवाखान्यात मला सर्रास दिसतो मुल कटकट करीत असेल तर लगेच आई नाहीतर बाप त्यांना मोठा मोबाईल किंवा टैबलेट काढून देतात. मग मुलाला सवय होते कि किरकिर केली कि मोबाईल किंवा टैबलेट मिळतो मग याची पुनरावृत्ती होत राहते. पण त्याचा होणारा दूरगामी परिणाम काय असू शकेल याची एक झलक मिळाली. एस एम एस भाषा आणि whats aap मुले कॉलेजातील मुलांची भाषा बिघडली आहेच पण त्याच्या पुढच्या पिढीचे काय होणार हि चिंता वाटते. म्हणूनच म्हणतो पालक म्हणून आपल्याला सुध्धा अपडेटेड राहावे लागेल.

विलक्षण नाही पण. हेच अनुभव अलिकडे घरीदारी येत आहेत. आणखी काही मुद्दे १) अभियांत्रिकी म्हणजेच उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी का ? इतर कितीतरी चॅलेंजिंग क्षेत्रे आहेत जसे की, अर्किटेक्चर, बँकिंग, पॅथॉलॉजी, व्यवस्थापन, शैक्षणिक क्षेत्र. इथले जॉब अधिक सुखाचे आहेत असे वाटते. २) मुलाचा कल आणि क्षमता ओळखली पाहिजे. ३) निकाल स्वीकारून मुलांना पर्याय सुचवत रहावे. ४) हजारो अभियंते आज विनानोकरी फिरत आहेत. तेव्हा स्वतःचा व्यवसाय करता येईल असा काही शैक्षणिक मार्ग शोधावा.

स्नेहांकिता ताई अभियांत्रिकी हि उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी नक्कीच नाही, मी माझी बायको किंवा मुलगी त्या क्षेत्रात नाही. मुल मुद्द्दा हा आहे कि साधारण आठवी पासून मुलाचा कल कोठे आहे याचा आम्ही शोध घेत गेलो. पहिली ते दहावी त्याला गणितात आणी शास्त्रात सर्वात जास्त गुण मिळत आले आहेत. भाषेत त्याला रस नाही तसाच जीवशास्त्रात त्याला रस नाही. आम्ही त्याला ICT मुंबईतील रसायनशास्त्रातील विविध शाखा(औषध, पोलीमर,पेट्रोलियम, रंग, सूक्ष्म रसायन इ इ) किंवा एम एस सी गणित किंवा भौतिकशास्त्र याबद्दल माहिती दिली.TIFR आणी BARC येथे होणार्या मुलभूत संशोधनाचे पर्याय दाखवले. गणितात पुढे काय करता येईल किंवा IISc (INDIAN INSTITUTE ऑफ SCIENCE) येथील शुद्ध शास्त्रीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. परंतु त्याला मेकानिकल किंवा सिव्हील अभियान्त्रीकीतच जायचे आहे. संगणक विद्युत किंवा टेले कॉम यात रस नाही। मग यावर आता आम्ही का त्याच्या मनाविरुद्ध दुसरा विषय निवडण्याचा आग्रह धरावा हजारो अभियंते आज नोकरी विना आहेत याचे कारण मी एकदा लिहिले होते कि एका विख्यात अभ्यान्त्रिकी तज्ञाच्या सर्वेक्षणाप्रमाणे फक्त २६ टक्के अभियंते नोकरीला पात्र किंवा लायक आहेत. आणी पन्नास टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयात असा अभ्यासक्रम शिकवला जातो जो तिथेले शिक्षक शिकवू शकतात. पण उद्योग्धन्द्यासाठी लायक असे ज्ञान नाही. हे सर्वेक्षण बर्यापैकी खात्रीलायक मानले गेले आहे, अशा कारणांसाठी चागल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी करणे आवश्यक झाले आहे. राहिली गोष्ट कौशल्य(SKILL) बद्दल. आपले कौशल्य एक तर उत्तम दर्जाचे असायला पाहिजे किंवा आपला मित्रपरिवार आणी संबंध(CONTACTS) असे पाहिजेत कि आपण आपल्या मुलाला लागणारी एक सुरुवात आपण देऊ शकलो पाहिजे. माझ्या मित्राच्या मुलाची चित्रकला उत्कृष्ट आहे तय्च्या बोलताना मी त्याला एकाच गोष्ट सांगितली तुझा मुलग चित्रकलेत करियर करायचे म्हणतो आहे त्याला लागणारी सुरुवात तू दिली पाहिजे. कारण चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात. मुलाचे करियर होण्यासाठी जी काही गोष्ट करावी लागेल ती करण्याची प्रत्येक बापाची तयारी असतेच. पण बर्याच बापाना/ मुलांना नक्की मार्ग सापडायला वेळ लागतो आणी तोवर त्यांना धक्के खायला लागतात. यासाठी मुलाबरोबर बापाने सुद्धा अभ्यास वाढवणे गरजेचे आहे.

अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही असे लक्षात आल्यावर कश्यासाठी तर पोटासाठी ह्या न्यायानुसार जे उच्च शिक्षण घेतले जाते त्यात व्यवस्थापनाचा क्रमांक वरचा आहे , आत तेच करायचे होते तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला नसता का मध्यमवर्गात स्वातंत्र्या नंतर कला शाखेत जाण्याकडे कल होता , साहित्या बद्दल आस्था आणि सरकारी नोकरीत शिरण्याचा राजमार्ग होता, पुढच्या पिढीत बेन्केत नोकरी व खाजगी कंपनीत शिरकाव करण्यासाठी वाणिज्य शाखेला महत्व आले , पुढे मंडळ आयोग व आर्थिक उदारीकरण एकाच काळात घडल्याने विज्ञान शाखेतून खाजगी शेत्रात वाव व परदेश गमानाला संधी म्हणून मध्यम वर्गाचा कल वाढला, मध्यम वर्गाच्या स्टेटस च्या अवास्तव कल्पनांची पूर्ती करण्यासाठी अनेक सहकार महर्षीं हे शिक्षण सम्राट होण्यास प्रवूत झाले. व शिक्षणाचा बाजार मांडला गेला, भारतीय चलनाच्या पेक्ष्या जास्त अवमूल्यन भारतीय शिक्षण पदव्यांचे झाले. शिक्षण सम्राटांना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास काहीही स्वारस्य नव्हते व ह्यात त्यांचा पूर्ण दोष नाही , अनेक पालक अभियांत्रिक हि पदवी पाल्यास मिळते ह्या आनंदात आत्ममग्न असतात. कसेही करून अभियांत्रिक झाले की एक तर आयटी मध्ये वर्णी लावून घ्यायची व आयटी मध्ये आहोत असे ऐटीत सांगण्यास मोकळे , किंवा मग व्यवस्थापनाची पदवी घेण्यास भरीस पाडले जाते. परदेशात पाल्यास आपल्या आवडीनुसार शिक्षण हे प्रमुख तत्व आहे. ह्याचे कारण तेथे लहन वयापासून मुलांना स्वावलंबी बनवणे व स्वतःचे निर्णय स्वतः घेणे उपजत शिकवले जाते, म्हणूनच भारतात ८ वी ते ९ वीच्या मुलांना काय कळते असे बाळबोध प्रश्न निर्माण होतात.

उत्तम संतुलित लेख नि विचार! ह्या विषयातला दुसर्‍याला बोलण्याबाबत अनधिकारी मात्र रीसिव्हींग एन्डकडून अधिकारी ;) असल्यानं सांगावंसं वाटतंय. इन्जिनिअरींगला विषय सुटत नसताना लोकांच्या प्रतिक्रिया हे पोरगं काहीही करु शकणार नाही. नंतर दुबै ला नोकरी ला जायला निघालो तेव्हा त्यातलेच एक जेवायला घरी घेऊन गेले. लोकांच्या प्रतिक्रिया हा एक करमणुकीचा विषय आहे. सो टेक अ चिल पिल! आपलं काम व्यवस्थित करावं. (हे मी केलं नव्हतं, आता देखील कधीकधी करत नाही, त्या मुळं स्वतःचंच नुकसान होतं हे कळतंय, आधी कळत नाही हेच कळत नव्हतं. ;) ) नि जगाला योग्य वेळी फाट्यावर मारायला शिकावं. बाकी कुणीतरी थोर माणूस म्हणून गेलंय. तीन वर्षं झटून मेहनत केली की आपण एखाद्या गोष्टीवर कमांड मिळवू शकतो. त्यामुळं ती तीन वर्षं नेमकी कुठली असावीत ते जेवढं लवकर ठरवू तेवढं लवकर रिझल्ट मिळतात. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत जाण्यासाठीच गुरुत्वाकर्षण बलाविरुद्ध लढावं लागतं. ते एकदा झालं की तो आपसुक त्यात जाऊन बसतो. आपलं सुद्धा तसंच असावं. आपण सुरुवातीला मेहनत घेऊन त्या ऑरबिट मध्ये जाऊन बसावं नि पुढचं त्यातल्या त्यात बरं होतं. ह्या उप्पर पैसा/ प्रसिद्धी/ माहिती/कीर्ती कितपत मिळाला/ली/ले की समाधान मानावं हा ज्याचा त्याचा विषय. इथंही प्रतिक्रियांबाबत फाटाच उपयुक्त!

सुंदर विचारी लेख ! तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात. याला मुख्यतः सद्याची शिक्षण व्यवस्था आणि डिग्री व त्यातले गुण यांना अवास्तव महत्व देणारी समाजव्यवस्था आहे. सर्वसामान्य पालकांना या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे बळ अथवा धीर नसतो. ही प्रवृत्ती सिस्टिम बनवते आणि सिस्टिम प्रवृत्ती बळकट करते... असे व्हिशस सायकल आहे... जितक्या लवकर ते खंडीत होईल तितके बरे.

जशी गरज भासेल तसा शिकत गेलो. ७३ मध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीत कॉस्ट ऑडिट खात्यात क्लेरिकल असिस्टंट्ची नोकरी मिळाली. क्लार्क होण्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी आवश्यक होती. क्लार्क होण्यासाठीही 'महत्वाकांक्षा' असावी लागते हे तेंव्हा अनुभवलं. नोकरी करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. पण ह्या प्रक्रियेदरम्यान संगणक युग सुरू होऊन तिथे आकर्षित झालो. कोबोल प्रोग्रॅमिंग केलं. डेटा प्रोसेसिंग खात्यात ट्रेनि प्रोग्रॅमर आणि आखातात क्लार्कची नोकरी अशा दोन्ही ऑफर एकत्रच आल्या. आणि आखातात आलो (१९८१). इथे आल्यावर समजलं आपल्या आधीचे कोणीही नोकरी सोडत नाही त्यामुळे पदोन्नती अवघड आहे. कोबोल प्रोग्रॅमिंगचा फायदा नाही झाला. तेंव्हा PC आले कंपनीत. त्यामुळे ते शिकण्यासाठी कंपनीने क्लासला पाठवलं. तिथे PC ची तोंडओळख झाली. बाकी कौशल्य स्वतःच पुस्तके वाचून मिळविले. अपेक्षा होती कंपनी आपल्याला पदोन्नतीसाठी विचारात घेईल. पण दाक्षिणात्यांच्या प्रभावाखाली ज्याला संगणकातील 'सं' ही माहित नव्हता त्याला पदोन्नती मिळाली. मन खचलं, पण हरलं नाही. स्वयंरोजगाराचे विचार डोक्यात छळू लागले. झालं. नोकरीवर लाथ मारुन दुकान टाकलं. कुवेतचं युद्ध झालं आणि मस्कतच्या बाजाराची अवस्था रुग्णशय्येवरील अत्यवस्थ रुग्णासारखी झाली. धंदा बुडाला. मन डळमळीत झालं. मन पुन्हा नोकरीत जाऊ इच्छित नव्हतं. तेंव्हा एक अनुभवी गुजराथी गृहस्थ भेटले. त्यांनी कान कानमंत्र दिला. ज्या विषयात रस आहे त्या क्षेत्रात व्यवसाय कर. झालं. शांतपणे आणि रिकाम्या खिशाने विचार केला. मला जास्त रस होता खाण्यापिण्यात (त्या पिण्यात नाही, हो!), तेंव्हा, उपहारगृह व्यवसायावर विचार करू लागलो. पण त्याला भांडवल जबरदस्त लागत होतं. ते नव्हतं. अनुभव शून्य. तेंव्हा लहान प्रमाणात सुरुवात करायची हा विचार करून कॅफेटेरिया हा पर्याय निवडला. त्यालाही जवळचं भांडवल पुरणारं नव्हतं तेंव्हा इथूनतिथून मित्रांकडून उधार उसनवारी करत कॅफेटेरिया सुरु तर केला पण फिरत्या भांडवलाच्या अभावाने माझा गळा आवळला जाऊ लागला. गिर्‍हाईकांकडून चांगला फिडबॅक मिळत होता. ब्रेक इव्हन नजिकच्या भविष्यात दिसत होता पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दिवस काढायचे अत्यंत कठीण होतं. बहुतेक ओळखिच्यांनी आर्थिक मदत केली होती. त्याची परतफेड होईपर्यंत नविन मदत मागायला तोंड नव्हतं. कसेबसे दिवस काढले. एकदा दुकान मालकाने भाडं मिळालं नाही म्हणून पोलीस स्टेशनही दाखवलं. पण सुदैवाने सर्वातून सहिसलामत बाहेर पडलो. आणि कॅफेटेरीया सुरु केल्यापासून सहा-सात महिन्यात ब्रेक इव्हनला पोहोचलो. तो पर्यंत घरभाडं, दुकानाचं भाडं, स्टाफचा पगार, घरची आणि दुकानाची विज-पाण्याची बिलं इ.इ.इ. कसं भरत होतो माझं मलाच माहित. पण हळूहळू सर्व समस्या मिटत गेल्या, धंदा वाढत गेला, उत्पन्न वाढत गेलं. तरी, आधिची कर्जे फिटायलाच ४ वर्षे लागली. सांगायचा उद्देश. गरज भासेल तसे शिकत गेलो. शैक्षणिक क्षेत्रातही आणि प्रत्यक्ष आयुष्यातही.

+१ औपचारीक शिक्षण जीवनाचा / व्यवसायाचा पाया बनवायला उपयोगी पडते पण तेच केवळ मजबूत पाया बनवू शकत नाही हेच तुम्ही तुमच्या उदाहरणाने अधोरेखीत केले आहे. आपले ध्येय पक्के करणे आणि ते मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करणे याशिवाय अंतिम यश मिळणे शक्य नाही. तुमच्या चिकाटीला सलाम !

चला जरा १०वा माणूस हा नियम लावतो. सर्वप्रथम तुम्हाला लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर सांगतो हे चालूच असते. माझ्या परिचितांमध्ये एक॑दा एका मुलाला बारावीला कमी मार्क मिळाले, तर त्याच्या ओळखीतल्या एका म्हातारीने त्याला भर रस्त्यात झापले होते. मी तेव्हा तिच्यावर जाम उखडलो होतो. बाकी नंतर लिहितो.

ते १७ लाख रुपये वाचूनच मी खुर्चीतल्या खुर्चीतच अडखळून पडले! ज्यांची आईवडील हे असे खर्च करत असतील, त्या मुलांना आभ्यासाच्या ओझ्याबरोबरच या फीचेपण ओझे होत असेल का? बिच्चारी मुलं. मागे एका मुलाची इन्जिनीअरिन्गच्या पहिल्या वर्षच्या maths, physics ची ट्युशन घेत होते. त्या काळात सगळ्या टेन्शन्मुळे त्याचे बीपी ५०-७० झाले होतं, हे आठवलं. :( त्यातून त्याची आई सांगायची, त्यानी अभ्यास केला नाही तर त्याला मार!? ...... पुढे मीच फ्रस्ट्रेट होउन ट्युशन्स घेणं सोडून दिलं. बरं झालं तुम्ही निवांत आहात ते. मुलगा लकी आहे.

आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. यातील गंभीरता खरेच वाढत आहे. दुर्दैवाने हल्ली तर हि शैक्षणिक प्रतिष्ठा नर्सरी अन बालवाडीपासून दिसू लागलीय. लहान वयातच मुलाला मोबाईल आणि लॅपटॉपशी खेळायला मिळत असल्याने उद्या तो मोठा होऊन नक्कीच आयटी वा कॉम्युटर क्षेत्रात नाव काढेल अश्याही सुशिक्षित पालकांच्या भाबड्या अपेक्षा दिसून येतात. स्मार्ट जनरेशन, आपला मुलगा कमी पडू नये या स्पर्धेत म्हणून नर्सरीमध्येच ६० हजार घाला जेवढे आपल्या वेळी इंजिनरींगला नव्हते घातले. आणि एकदा का हे पैसे घातले की मग त्याने ते वसूल करून द्यावेत हि अपेक्षा आलीच. तसेच आपला "एवढे करून प्लेसमेंट ४ लाखाची" हा मुद्दाही योग्य. माझाही या आधी एका मैत्रीणीशी चर्चून झालेला. एवढे पैसे शिक्षणाला घालूनही जर साधारण याच रेंजमधील इंजिनीअर होणार असेल तर त्या दृष्टीने विचार करताही मग आपल्याच जनरेशनमध्ये ईंजिनीअर झालेले आपणच सरस जे आईवडिलांच्या तुटपुंज्या गुंतवणूकीवर एवढे कमावू लागलो की मुलांच्या नर्सरीसाठी ६० हजार फीज भरायची ऐपत ठेऊ लागलो. थोडक्यात पैसे गुंतवून कॉलेजातील सीट घेता येते पण टॅलेंट विकत घेता येत नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असूनही आपण हि चूक करतो. किंबहुना या मागेही मग असते ती प्रतिष्ठाच ! अवांतर - मराठी लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसते. मराठी माणसे धंदा करू शकत नाही वा व्यवसायात अपयशी का ठरतात याचेही कारण थोडेफार इथेच. आपण पैसे गुंतवतो ते प्रतिष्ठा कमवायला, पैसे चार कमी कमावले तरी मग चालतात.

माझ्या भाऊ ८ वी पासून घरूनच शिक्षण करतोय दहावीचा अभ्यास त्याने घरीच केला , फ़क्त गणितसाठी क्लास लावला होता बाकी सगळे विषय त्याने स्वतः पुस्तकं वाचून केले ७५% मिळाले दहावीला आमच्या दृष्टीने ते पुरेसे होते बारावीचा अभ्यास सुद्धा त्याने घरीच केला ,पुस्तक सतत वाचली ,गाइड्स वाचली आणि प्रश्नपत्रिका सोडवल्या ,त्याला चांगले मार्क मिळण्याची खात्री आहे

सर्वप्रथम डॉक्टरसाहेब तुमच्या डेरिंगला सलाम. मुलाला अपेक्षित यश न मिळणे हे जणू घरातील कुणी मेल्यासारखे असल्यागत लोक समजतात. तुम्ही विचार योग्य तोच करताहात. तुमचा मुलगा लै भाग्यवान आहे.

सर्व प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद. मुळात माझ्या मुलाला काय करायचे आहे हे त्यानेच ठरविले आहे. ( रच्याक्ने माझी मुलगी सुद्धा कॉमर्स ला गेली आहे) त्यामुळे दोघेही वैद्यकिय मार्गाकडे वळले नाहीत याने मला कोणताही फरक पडलेला नाही. त्यांचा निर्णय त्यांनीच घेतलेला आहे. यात त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शनही घेतलेले आहे. दोन्ही मुलांना जर उद्या व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी भांडवलाची तरतूद करण्याच्या मार्गावर मी आहे.मुळात मी दोन्ही मुलांना दहावीत असताना लोकमान्य टिळकांचे विचार सांगितले त्यांनी आपल्या मुलाला हे सांगितले कि तू चांभार झालास तरी चालेल पण पुण्यातील उत्कृष्ट चांभार हो( चांभार हि जातीवाचक शिवी नसून व्यवसायाचे वर्णन आहे). मी माझ्या पत्नीशी बोलताना तिला एक गोष्ट सांगितली कि एम बी बी एस करत असताना अभ्यास करताना मला खूप मजा आली होती. त्यातील सर्व विषय शिकताना मी रस घेऊन शिकलो असल्याने आजही मी वैद्यकाची पुस्तके खूप इंटरेस्टने वाचतो. माझ्या मुलांनी असेच आपले शिक्षण "एन्जॉय" करावे असे मला वाटते. मग ते करीत असताना त्यांचा CGPA ५-६ च्या मध्ये आला तरी चालेल. पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे. राहिली गोष्ट शिक्षणाच्या बाजाराची त्याबद्दल सविस्तर नंतर

सुबोध, तुम्ही तुमच्या मुलाला आपला विषय निवडू दिलात, याबद्दल मनापासून अभिनंदन. त्याहून जास्त कौतुक तुमच्या मुलाचे आहे, ज्याला त्याचा मार्ग ठरवता आला आहे. सगळ्यांनाच इतक्या कमी वयात ठामपणे आयुष्यात काय करायचे हे ठरविता येत नाही. काही तर आयुष्यभर हा प्रयत्न करत असतात. म्हणूनच मुख्य शिक्षण एकीकडे आणि व्यवसाय दुसर्याच विषयांत अशी उदाहरणे आपण कितीतरी पाहतोच. बरेच पालकही, त्यांचेच म्हणणे खरे करून मुलांना पालकांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घ्यायला लावतात. काही वेळा मुलांना कुठे जायचे आहे हेच कळत नसते. मग आई-बाप तरी काय करणार ? ते मुलांना धोपट मार्गावरून जायला सांगतात. कमीतकमी पोटापुरते कमवून खाईल. पालकच या धावपळीला जबाबदार आहेत बर्याच अंशी. कारण आपला मुलगा/मुलगी यांना सगळ्यात जास्त गुण हवेत असे त्यांनीच ठरवले आहे. पण काही मुले छान चित्रे काढतात, खेळ खेळतात, काहींत सभाधीटपणा, नेतृत्व हे गुण असतात. हे पालकांना महत्वाचे वाटत नाहीत याचे वाईट वाटते. पुढे नोकरीत, व्यवसायांत हेच गुण कामी येतात असा माझा अनुभव आहे. soft skills वर भर देणे हे आता फार आवश्यक झाले आहे. प्रतिष्ठेचा मुद्दा तर खासंच. मराठी लोकांचा अत्यंत वाईट गुण. माझा पाल्य कुठ्ल्या क्लासला, शाळेत जातो हे, तो तिथे काय शिकतो, या पेक्षा जास्त महत्वाचे आहे. शुभेच्छा ! - शेखर काळे

तुमच्या मुलाचे अभिनंदन ! लेख पण उत्कृष्ट झाला आहे, माझ्या अभियांत्रिकीचे दिवस आठवले. काही विषय राहिले लोक, मी सिरीयल किलर असल्या सारखा लुक द्यायचे. काही भाग मी माझ्या लेखात लिहिला आहे. "फ्री फ्रोम स्कूल" राहुल अल्वारीस चे (गोवा मधला निसर्गतज्ञ ) उत्तम एक पुस्तक आहे, १०वी झाल्यावर त्याला त्याच्या बाबांनी जग जगायला सोडून दिले, त्याने एक वर्ष खूप वेगळ्या वेगळ्या विषयावर काम केले आणि शेवटी दिशा ठरवली. इकडची काही माहिती लागली तर सांगा, सध्या मी अजून शिकत असल्यामुळे युनिवर्सिटी मधून काही पण माहिती काढून देऊ शकतो. chemical.ojas @ जीमेल.

दोघेही भाग्यवान... त्रिवार सलाम. देव मलाही अशीच "सुबुद्धी" देवो

डॉक्टर तुमच्या डोनेशन न देण्याच्या भूमिकेचे मी समर्थन करतो, तुमच्या एकंदरीत प्रतिक्रियेवरून वरून, ऐक पिता म्हणून मला विश्वास वाटतो, कि तुमचा मुलगा नक्कीच जीवनात यशस्वी होईल (तुम्हा दोघांच्या पालकांच्या मार्गदर्शनामुळे)

डोनेशन देणार नाही असे मी म्हटलेले नाही. आज बिट्स(BIRLA) सारख्या कॉलेजात मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पैसा लागतो आणी सरकारी मदतीशिवाय अशा कोलेजची फी जास्त असल्याशिवाय त्यांना ते कोलेज चालविणे शक्य नाही. जर एखाद्या उत्तम अभियांत्रिकी विद्यालयात जर फी जास्त असेल तर ती चेकने भरण्याची तयारी आहे. पण माझे पांढरे पैसे काळे करून देण्याची तयारी नाही. माझ्या मुलाला मी स्पष्ट शब्दात सांगितले कि अशा एखाद्या उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात जास्त फी असेल तर ती भरण्याची माझी तयारी आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव पैसे भरून तुला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल पण तेथे तू जर आपले कौशल्य यथातथा ठेवलेस तर नोकरी मिळवण्यासाठी बापाचा पैसा कामाला येणार नाही.चिखलाचे कुल्ले फार वेळ टिकत नाहीत.

तुमचे आणि तुमच्या बाबांचे विचार आवडले. मुलगा नशीबवान आहेच. त्याला पुढील निर्णयासाठी शुभेच्छा! या अनुभवातून गेल्या वर्षीच गेले आहे त्यामुळे सगळे अगदी ताजे अनुभव आहेत. माझ्या मुलाचे आणखीच दुर्दैव. त्याला जे ई ई मधे गोवा एन आय टीला पाहिजे त्या स्ट्रीमला प्रवेश मिळेल इतके मार्क्स होते. आणखीही काही एन आय टी मधे प्रवेश मिळू शकला असता जर जे ई ई चे मार्क्स फक्त विचारात घेतले असते तर. पण सिब्बल यांच्या डोक्यात आपले शैक्षणिक स्मारक करायची योजना आली आणि त्यानी आयत्या वेळी, म्हणजे जे ई ई ची परीक्षा होऊन गेल्यानंतर बोर्डाच्या मार्काना वेटेज द्यायचे ठरवेले. सर्व तज्ञानी विरोध केला तरीही हा निर्णय घेतला गेला होता. (यावर्षी तो निर्णय परत फिरवण्यात आला आहे, पण गेल्या वर्षीच्या बॅचचे नुकसान व्हायचे ते झालेच.) आता हे वेटेज कसे दिले गेले? सोप्या शब्दात सांगते. तो जे ई ई ला पहिल्या ५% मुलात होता आणि त्याच्याखाली ९५% मुले होती. मात्र भाषांमधे कमकुवत असल्याने बोर्डात त्याला ७०% मार्क्स होते. बोर्डात त्याचा नंबर २५% मुलात होता. त्याच्याखाली ७५% मुले होती. या लोकानी वेटेज देताना बोर्डात जे मार्क्स असतील ते जे ई ई च्या परीक्षेला धरायचे ठरवले. आता जे ई ई च्या परीक्षेत २५% मार्काच्या लेव्हलच्या मुलाचे ९५ मार्क्स त्याच्या १२८ ऐवजी धरले. त्यामुळे जे ई ई ला गोव्यात पहिल्या ४० मधे असलेला त्याचा नंबर १५० झाला. याउलट गोवा बोर्डात ९०-९२% मार्क्स असलेले पण जे ई ई ला ९५-१०० मार्क्स असलेल्या मुलांना गोवा एन आय टी ला अ‍ॅडमिशन मिळून गेली. आता महत्त्वाचे, आम्ही सुरुवातीला निराश झालो होतो. पण त्याला सी ई टी ला उत्तम मार्क्स असल्याने इथल्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजात आरामात बी ई मेक. ला प्रवेश मिळाला. डोनेशन भरून प्रवेश घेणार नाही हे त्याला आधीपासून सांगितलेले होते. नंतर त्याला म्हटले, तुला जर सी ई टी ला चांगले मार्क्स पडले नसते तर तू काय केलं असतंस? त्यावर तो म्हणाला, मी मॅथ्स घेऊन बी एस सी ला गेली असतो! त्या क्षणी माझ्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटला. त्याचवेळी एका नातेवाईकाने त्याच्या मुलाला ९ लाख डोनेशन भरून बी ई मेक ला अ‍ॅडमिशन घेऊन दिली होती. (त्या मुलाची डिग्री सरळ पास होत गेला तर १४ लाखाला पडणार आहे.) त्यामुळे तर मुलाच्या बाबतीत मी किती नशीबवान आहे हे अजूनच ठळकपणे समजलं!

अत्तिशय खरं आणि सुरेख लिहिलंयत... माझीही अशीच मतं असल्याने मी तुमच्या प्रत्येक म्हणण्याशी सहमत तर आहेच; पण मांडणी सुरेख झालीय. आणि अनुभवकथन सुद्धा. अधिकाधिक पालकांचं असं प्रबोधन होवो हीच प्रार्थना. तुमच्या मुलाला शुभेच्छा ! :)

बारावीत ४५% वर पास झाला, तेंव्हा आमच्या सासरेबुवांनी पेढे वाटले होते.हेच आमच्या सौभाग्यवती ९४% पास झाल्या व मेरीट वर डॉक्टर झाल्या तरी त्यांच्या पप्पांना त्याचे फारसे काही वाटले नव्हते...असो तर हा माझा ४५% वाला हुंडा आज पुन्यात एक यशस्वी फिजिओथेरपिस्ट आहे.पुन्यातील प्रतिथयश आर्थोपेडीक त्यांच्या क्रिटीकल केसेस याच्याकडे पाठवतात.बेल्स पाल्सीमध्ये एका स्टीमुलेटरच्या सहायाने हा प्राणी १० ते १५ दिवसात जे काही रिझल्ट ते खरच अप्रतिम आहेत.त्यामुळे या मेरीटचा आणी तुमच्या गुणवत्तेचा खुप काही संबध येतो असे वाटत नाही.

अगदी योग्य निर्णय. ज्याना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासापेक्षा पैशातच जास्त रस आहे तिथे न गेलेलेच बरे.

मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शकेल ते घ्यावे. आवड असो वा नसो, नसल्यास आवड निर्माण करावी. मुलांचा कल ओळखा / जाणा असे सर्व जण लिहीता आहेत, पण काहीही झाले, कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वताच्या पायावर त्यांना उभे रहायचे आहे हे विसरुन चालणार नाही. १. कीतीजणांच्या मुलांना नीट काय करायचे आहे ते १२ वी मधे कळले आहे? आणि जी मुले माझा xxx कल आहे असे म्हणत आहेत ते त्यांना कीती कळले आहे? २. मुलाचा कल xxx क्षेत्रात असेल ( असे तो म्हणतो ) त्या क्षेत्रात स्वताच्या पायावर उभे रहाण्याची संधी कीती? कोणी म्हणत असेल मी गाणार, चित्र काढणार, पण अश्या क्षेत्रात फकत वरची ५-१० लोक यशस्वी होतात. त्यापेक्षा जी साधी BE, MCA अशी क्षेत्रे आहेत त्यात बर्‍याच टक्के लोकांना चांगल्या पगार देणार्‍या नोकर्‍या मिळतात. महत्वाचे म्हणजे जर आवडीचे क्षेत्र असेल तर ज्ञान घ्यायला कोणी आडवले नाहीये. तुम्ही BE MCA होताना मॅथ्स मधे प्राविण्य मिळवू शकता, गाण्यात, चित्र काढण्यात किंवा अगदी CA सुद्धा होऊ शकता.