वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत
नुकतीच "तुझे आहे तुजपाशी" या सदाहरीत नाटकाची जाहीरात वाचली. श्यामच्या भूमिकेत एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर, डॉ. सतीशच्या भूमिकेत ग्रेसफूल डॉ. गिरीश ओक, काकाजींच्या अजरामर भूमिकेत रवि पटवर्धन, आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर इ. नामावळी होती.
मी हे नाटक १२ वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यावेळी डॉ. सतीशची भूमिका कोणतरी दुसराच अभिनेता करीत होता. बाकी सर्व अभिनेते तेच होते (अभिनेत्र्या वेगळ्या होत्या. गीताचे काम साधना राजपाठक यांनी केले होते व उषाच्या भूमिकेत किशोरी अंबिये होती). आज १२ वर्षानंतर तेच अभिनेते त्याच भूमिका करत आहेत. माझी खात्री आहे की आजपासून १२ वर्षांनी २०२६ मध्ये या नाटकात हेच अभिनेते याच भूमिका करत असतील.
या नाटकातील श्याम ही व्यकिरेखा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आहे. ही भूमिका गेली अनेक वर्षे खर्शीकर करत आहेत. त्यांचे वय सध्या ६० च्या आसपास असावे (चूभूदेघे). इतक्या वयस्कर व्यक्तीला ही भूमिका अजिबात शोभत नाही. तरीसुद्धा नाटकाच्या निर्मात्यांना या तरूण भूमिकेसाठी दुसरा तरूण अभिनेता सापडला नाही याचे आश्चर्य वाटते. या नाटकातील डॉ. सतीश हा देखील ३० च्या आसपास वय असलेला तरूण आहे. पण याची भूमिका देखील साठी जवळ आलेले डॉ. गिरीश ओक करत आहेत. अविनाश खर्शीकर व डॉ. गिरीश ओक यांच्या अभिनयाबद्दल तक्रार नाही, परंतु निदान आपल्या वयाला साजेशी भूमिका त्यांनी करावी अशी अपेक्षा आहे. निदान नाटकातील व्यक्तिरेखेच्या वयाला आपण शोभू का हा विचार त्यांनी करावा असे वाटते. नाटकाच्या निर्माता-दिग्दर्शकांना इतक्या वर्षात इतर तरूण अभिनेते सापडले नसावेत हे दुर्दैव.
बालगंधर्व उतरत्या वयात रूक्मिणी, सुभद्रा इ. भूमिका करत होते व त्यामुळे त्यांच्यावर कठोर टीका झाली होती असे वाचले होते. अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती. 'दुनियादारी' मध्ये अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी इ. प्रौढ अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत. पण सध्याच्या काळातील वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिका करत असताना कोणीच टीका करताना आढळत नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }