पाककृती

मार्बल केक: प्रकार २

Primary tabs

आमच्या त्सेंटा आजीची एक मैत्रिण आहे, बिर्गिटं तिचे नाव.. भयंकर उत्साही! सत्तरीच्या पुढची ही तरुणी, अजूनही कुठेकुठे पाककलास्पर्धां मध्ये भाग घेऊन जिंकत असते.. मागच्याच महिन्यात भेटली तेव्हा तिने शेअर केलेली ही केकृ-

.

साहित्य-
२५० ग्राम बटर/मार्गारिन
२०० ग्राम साखर
४ अंडी
२०० ग्राम मैदा + १०० ग्राम स्पाइझंस्टेर्क (कॉर्नस्टार्च)
३ टीस्पून बेकिंग पावडर
१.५ टीस्पून वॅनिला इसेन्स /१ पाकिट वॅनिलाशुगर
१ टीस्पून किसलेली लिंबाची साल
४ टेबलस्पून कोको पावडर (डार्क)
१ टीस्पून रम/रम इसेन्स (ऑप्शनल)
साधारण कपभर दूध
चिमूटभर मीठ

कृती-
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे.
त्यात एक एक अंडे घालून फेटणे.
वॅनिला अर्क व लिंबाची किसलेली साल घालून फेटणे.
मैदा+ स्पाइझंस्टेर्क(कॉर्नस्टार्च) एकत्र करणे, त्यात बेकिंगपावडर व चिमूटभर मीठ घालणे.
मैदा+ स्पाइझंस्टेर्क(कॉर्नस्टार्च) २-३ टेबलस्पून व एखादा टीस्पून दूध असे वरील मिश्रणात घालत फेटत रहाणे.
सर्व मैदा नीट एकत्र झाला की परत एकदा चांगले फेटून घेणे.
अवन १८० अंश से. वर प्रिहिट करणे.
केक मोल्डला ग्रिझिंग करुन घेणे.
वरील केकच्या मिश्रणातील अर्ध्याहून थोडा जास्त भाग केक मोल्डमध्ये ओतणे व उरलेला भाग बाजूला ठेवणे.
२-३ टेबलस्पून दूध कोमट करणे ,त्यात कोको पावडर मिसळणे व मिश्रणाच्या उरलेल्या भागात हे ओतणे.
हवे असल्यास रम/रम इसेन्स घालणे. चांगले मिक्स करणे.
हा कोकोयुक्त भाग केकमोल्डमध्ये ओतणे.
एक काटा (फोर्क) घेऊन कोकोचे मिश्रण व वॅनिलाचे मिश्रण वरखाली करणे.
असे केल्याने मार्बल इफेक्ट येईल.
फोर्कने मिश्रण वरखाली करण्याची भीती वाटत असेल तर सरळ दोन्ही मिश्रणे २-३ चमचे अशी एकेक करुन केक मोल्डमध्ये घाला. नंतर मोल्ड हलवून मिश्रण एकसारखे करा. त्यानेही मार्बल इफेक्ट येईल.
१८० अंश से वर साधारण ५०-५५ मिनिटे बेक करणे.
नेहमीसारखेच केक झाला की नाही ते (त्याच्या) पोटात सुरी/ विणायची सुई खुपसून पाहणे.
केक झाला तरी ५-६ मिनिटे अवन मध्येच राहू देणे.
साधारण कोमट झाला की मोल्ड मधून जाळीवर काढणे, व गार झाला की कापणे.
कॉफीबरोबर आस्वाद घेणे. :)

.

मार्बल केक: प्रकार १ येथे पाहता येईल.

सूड

निर्वाण पावल्या गेले आहे.

रेवती

मार्बल इफेक्ट मस्त दिसतोय. चवही छान असणारच!

ऋषिकेश

एवढ्यासाठी जर्मनी आलो होतो हो! छ्या!
हे असे फटु टाकून काही बरं नाही करताहात तुम्ही ;)

बाकी, फटं टाका बरं का.. नैतर या प्रतिसादाचा हवाला देऊन बंद कराल नी मला मिपावर मिपाकर येऊ दुद्धा देणार नैत :)

Mrunalini

मस्तच दिसतोय मार्बल केक. आत्ताच जेवण खालेय. काहितरी गोड खायचेच आहे, तर पाठवुन दे एक slice इथे.

प्यारे१

छळछावणीतलं एक दिग्गज नाव.... केकवाली बाई.

इशा१२३

आधी साधा केक शिकू द्या ना..मग अशा रेसेपी टाका हो..फोटो बघून त्रास होतो ना!कसला मस्त दिसतोय..

दिपक.कुवेत

त्यातुन मार्बल ईफेक्ट वाला???? कुठाय???? आपल्याला काय दिसला नाय बुवा.....चला तेवढच जळजळ व्हायचं प्रमाण कमी झालं.

नंदन

शेवटच्या फोटोत मार्बल इफेक्ट काय झकास जमून आलाय!
परवाच कोको पावडरीसोबतच किंचित कॉफी/एस्प्रेसो घालून केलेली अमेरिकन आवृत्ती हादडल्याने इनोची गरज अंमळ कमी भासली :)

सुंदर मार्बल परिणाम साधला आहे. चवीलाही अप्रतिम असणार ह्यात वाद नाही. थंडीत किंवा धुवांधार पाऊस पडत असताना, मस्त पैकी वाफाळणारा चहा आणि असा केक असेल तर, व्हरांड्यात किंवा गॅलरीत बसून चैन करता येईल.

रुमानी

केक मस्तच...!
मार्बल इफेक्ट लै भारी.....! :)