जीवन विमा/आरोग्य विमा माहिती हवी
येथे सध्या विम्यामध्ये होणार्या फसवणुकीविषयी चर्चा चालली आहे.
पण विमा म्हणजे केवळ कंपनीचा फायदा/एजंटचा फायदा, असं नाही. तर विचारपुर्वक गरजेनुसार घेतलेला विमा नक्कीच 'आपल्या' फायद्याचा ठरू शकतो.
मला थोडी माहिती: योग्य/अयोग्यः आहे, आणि थोड्या शंकाही आहेत, त्यावर चर्चा व्हावी असे वाटते. सर्वांच्या अनुभवातून (व वादविवादातून ...... ऊप्स! चर्चेतून!! ;) ) हा धागा नक्कीच माहितीपुर्ण होईल.
१. जीवन-विमा व गुंतवणुक या वेगळ्या गोष्टी आहेत. टर्म इन्श्युरन्स सोडून इतर सर्व पॉलिसीज या फक्त आणि फक्त विमा कंपनी व एजंट यांच्या आर्थिक फायद्यासाठी असतात. टर्म इन्श्युरन्स साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २०-३० पट असावा. टर्म इन्श्युरन्स हा प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा असावा. टर्म इन्श्युरन्स म्हणजे कमावत्या व्यक्तिच्या मॄत्युनंतर त्याच्या परिवारातील लोकांसाठी आर्थिक उत्पन्नाची रिप्लेसमेंट असते.
(त्यामुळे कमावत्या नसलेल्या व्यक्तिचा(मुले-निवृत्त झालेली व्यक्ती-गृहिणी इ.) टर्म इन्श्युरन्स काढणे म्हणजे, त्याच्या मृत्युनंतर मोबदला मिळेल/आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा ठेवणे आहे-असे माझे 'वैयक्तिक' मत आहे)
(**माझा मॅक्सलाईफचा टर्म इन्श्युरन्स आहे)
२. आरोग्य विमा: आजकाल १ रात्रजरी अॅडमिट व्हावं लागलं तरी किमान ३-४ हजार बिल होतं.(मध्यम दर्जाच्या रुग्णालयात). त्यामुळे आजारपण-शस्त्रक्रिया-अपघात अशा वेळी हा खर्च लाखांमध्ये होतो, ज्याने चांगली आर्थिक परिस्थिती अस्लेल्या कुटुंबाचंही गणित कोलमडू शकतं. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाचा आरोग्यविमा कम्पल्सरी!! आपल्याला कोणत्या दर्जाच्या रुग्णालयात उप्चार घ्यायचे आहेत, कुटुंबात किती व्यक्ती आहेत, त्यांचं वय, आजारांचा पुर्वेतिहास, या सर्वांचा विचार करून आरोग्यविम्याची रक्कम ठरवावी. (माझा भारतीअॅक्साचा फॅमिलीफ्लोटर आरोग्यविमा आहे+कंपनीतर्फे आयसीआयसी लोंबार्ड आहे)
३. वाहन विमा: शक्यतो थर्ड पार्टी न करता पुर्ण वाहनविमा करावा. (किमान थर्ड-पार्टी) कारण अपघातात आपल्या गाडीचं होणारं नुकसानदेखील कित्येक हजारात असू शकतं. शिवाय आपली गाडी चोरीला गेली, तर आपल्याला विम्याचे पैसे मिळून आर्थिक दिलासा मिळतो.
मी हे ३ विमा/विमे काढलेले आहेत. इतर प्रकारच्या विम्यांचा(मालमत्ता, इमारत, फायर, इ) मला अनुभव नसल्याने, त्याविषयी काही बोलत नाही. इतरांनी कृपया भर घालावी.
माझे स्वत:चे काही प्रश्न आहेत.
१. अजूनपर्यंत मला आरोग्यविमा क्लेम करायची वेळ आलेली नाही. कंपनीतील लोक गरज पडल्यावर लोंबार्डचा क्लेम करतात, आणि कॉर्पोरेट ग्राहक असल्याने ते सहज होतात. पण वैयक्तिक आरोग्य विमा क्लेम करताना अडचणी येतात का? कोणत्या? त्या टाळण्यासाठी काय करता येऊ शकते? कोणाला चांगले/वाईट अनुभव आहेत का?
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.
३. वाहनविमा: समोरच्या पार्टीला कोणत्या परिस्थितीत नुकसानभरपाई मिळते? (उदा. माझ्या मोटारसायकलने जर एका कारला धडक दिलत, कारचा स्वतःचा विमा असेल, तर कारची नुकसानभरपाई माझ्या गाडीच्या विम्यातून जाईल का त्या कारच्या विम्यातून?) अशी नुकसानभरपाई मिळण्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात ?
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.यावरील चर्चेच्या प्रतीक्षेत.