लय भारी !
लय भारी !

....
वर्तमानपत्रातल्या चर्चेमुळे उत्सुकता वाढली होती म्हणून लय भारी पाहीला.
हा चित्रपट पाहताना एक गोष्ट सतत जाणवत राहते. येताना प्रेक्षक फार गंभीर असतो. काहीतरी छान पहायला मिळणार ही अपेक्षा असते. तितके निर्माते दिग्दर्शक गंभीर वाटत नाहीत. स्टोरी यथातथाच. डायलॉगदेखील जाता जाता लिहील्यासारखे. जेवणाची ताटं लावली आहेत. जेवण लागलेलं दिसतय. असे परभाषिक संवाद ऐकायला मिळतात. कोणत्याही प्रकारे क्वालिटीची काळजी घेतलेली दिसत नाही. एक छोटा मुलगा मोठ मोठ्या पहिलवानांना एका चुटकीसरशी हवेत भिरकवताना दिसतो. जमिनीवर आपटले जाताना हे पहीलवान पेप्सी, कोकची चूळ टाकतात. त्याला रक्त समजावे हे प्रेक्षकांकडून अपेक्षा. पुढे पुढे या दृष्यांचा कंटाळा येतो. इतक्या वेळा ही दृष्ये दाखवली आहेत.
कुणीतरी खूप चांगला, कुणीतरी खूप वाइट. त्यातून मारामार्या अशी सगळी हिंदी स्टाइल. पण नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते.
इथे एकाच नाहीतर अनेक चित्रपटांची नक्कल करण्याचा प्रयत्न झाला आहे.
अमिताभचा अँथनी गोन्सालविस आहे, त्याचं कन्फेशन आहे. अग्निपथमधला गरीबांच्या जमिनी लाटणं आहे. खाकीमधलं मालकाकडून नोकराची सेवा किंवा नोकराकडून मालकाला थोबाडीत(मालक किंवा नोकरीतला बॉस). थोडा परींदा, गाण्यामधे ओह माय गॉडची नक्कल आहे.
या सगळ्या मारामार्यांमधे विठ्ठलाचा काय संबंध ? असा प्रश्न पडतो. वारीनिमित्त विठ्ठलावरचा चित्रपट असंही वर्णन करता येत नाही.
मागे 'मात्र रात्र' नावाच्या नाटकात देशमुख नावाच्याच एका अभिनेत्याबरोबर राधिका आपटेचा लाइव्ह अभिनय पाहीला होता. सई ताम्हणकर, बिपाशा यांच्या मार्गावरचा तिचा प्रवास फार पूर्वीच चालू झाला होता. पण अद्याप... असो....
तिचा अभिनय सतत दिसत राहतो...
सध्या 1/cos C पणासाठी स्त्री पात्रांच्या तोंडी पुरुषी शिव्या टाकण्याच्या मार्गाचा अवलंब केला जातोय. तो इथेही आहे...
आपण पाहू तो प्रत्येक चित्रपट उत्तम असे नाही. शोध घेत रहावा. कधीतरी काहीतरी चांगलं हाती लागल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास आहे...
आणखी एक नक्कल कहो ना प्यार है... हृतिकचा पुनर्जन्म आणि त्याचे लहान मुलाबरोबरचे नाते...