Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्य आणि अनुभव.....

उ
उडन खटोला
Mon, 08/11/2014 - 19:05
🗣 5 प्रतिसाद
नव्वदीच्या दशकातील एक साल. ऐन विशीतला एक तरुण. त्याने मुंबईमधील मोकळे रस्ते पाहिले होते, बसायला जागा सहज मिळणाऱ्या बस आणि रेल्वेतून प्रवास केला होता, नऊवारी नेसणाऱ्या आज्या आणि धोतर नेसणाऱ्या आजोबांची माया अनुभवली होती, सकाळी रेडियोवर लागणाऱ्या सुधा नरवणे ह्यांच्या बातम्या ऐकल्या होत्या, सिंगल स्क्रीन सिनेमागृहात ब्ल्याकमध्ये २० रुपये देऊन सिनेमा पाहिला होता, सामान्य पगारात असामान्य आनंदाने जगणाऱ्या अनेक कुटुंबांसमवेत बालपण घालवले होते, तिसऱ्या वर्षी वडिलांचा हात सुटून हरवल्यावर त्याला घरी आणून सोडणाऱ्या अनोळखी इसमाचा आणि त्या काळात सुरक्षित तसेच बहुतांश सुसंस्कृत असलेल्या समाजाचा अनुभव घेतला होता, त्याला खेळायला कुठे जायचे हा प्रश्न लहानपणापासून कधीच पडला नव्हता, चाळीतील २५ ते ३० मुलांबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळताना संध्याकाळ संपून जायची, त्याच्या आई वडिलांना मुलांना फिरायला कुठे न्यायचं असा प्रश्न कधीच पडला नव्हता, त्याचे वडील त्यांच्या तरुण बायको आणि लहान मुलांना घेऊन चौपाटीला सहजपणे फिरू शकत होते, भेळ खाऊन घरी परतण्यात परमानंद होता! लोकांना एकमेकांसाठी मोकळा वेळ सहज मिळत होता आणि तो कसा घालवायचा ह्याची चिंता नव्हती. मातृ भाषेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम होता. शाळेत शेजारच्या बाकावर बसणारा मुलगा सुसंस्कारित असेल हे अध्यारुत असे कारण एकंदरीत समाज उच्चाशिक्षितांच प्रमाण कमी असलं तरी सुसंस्कृत होता. अक्षर ओळख नसलेले अनेक आजी आजोबा पुढच्या पिढीला संस्कार आणि नीतीमत्तेच शिक्षण घरातच देत असत! अर्थात भ्रष्टाचार, राजकारण, सामाजिक दुही, चोऱ्या, गुन्हेगारी, सरकारी दफ्तरातील लाल फितीची दिरंगाई, न्यायालयीन विलंब, जागतिक मंदी, आंतरराष्ट्रीय बेबनाव, युद्ध, हे सर्व देखिल होतं. पण त्याचं समाजातील अस्तित्व शरीराला होणार्या एखाद्या जखमेसारख होतं. संपूर्ण शरीर पोखरणाऱ्या कॅन्सर किंवा एच आय व्ही सारखं ते पसरलं नव्हतं! एकंदरीत समाजच शिक्षण, आधुनिकता, पैसा, आर्थिक सुबत्ता, जागतिक एक्स्पोजर, ग्लोबल अवेअरनेस आणि लोकसंख्या ह्या सर्व गोष्टीत मागे होता. पण माणुसकी, नैतिकता, सामाजिक जबाबदारी ह्या सर्वात खूप अग्रेसर होता, माणूस फक्त माणसासारखा वागत होता त्यामुळे जगणं सुसह्य आणि प्रचंड आनंददायी होतं. त्या तरुणाच मन तिथेच अडकलं. मनाने तो काळाच्या मागे राहिला. त्याचा जगण्याचा आनंद तिथेच गोठून गेला. त्याच्या नकळत!!! “त्याच्यासाठी त्यानंतर जे होतं ते अनुभवणं होतं जगणं नाही!!!” काळ फारच वेगाने बदलला. काचेच्या इमारती, आय टी पार्क, एस इ झेड, मेट्रो, मोनो, एक्सप्रेस वे, फ्लायओव्हर, रेसिडेन्शियल मेगा प्रोजेक्ट्स, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, अद्यावत गाड्या, विमान प्रवास, वातानुकुलीत ऑफिसेस, खिशात मावणारा आणि जवळ जवळ सर्व कामे करू शकणारा मोबाईल नावाचा हक्काचा नोकर, फेसबुक, ओर्कुट, ट्विटर ह्यातून निर्माण झालेल्या समांतर जगात निर्माण केलेले अनेक मित्र आणि शत्रू, व्हॉटस् अप् मधून सतत कोसळणारा मनोरंजन आणि माहितीचा महापूर ह्या “प्रगती” बरोबरच लोकसंख्येचा कडेलोट, प्रचंड वाढलेली सामाजिक विषमता, आर्थिक सुबत्तेच आणि ऐहिक सुखाचं धनिकांनी मांडलेलं किळसवाण प्रदर्शन आणि त्यातून धनहीनांच्या मनात खदखदणारा असंतोष आणि वाढीस लागलेली ओरबाडून घेण्याची वृत्ती, स्वार्थ ह्या एकाच विचाराने करण्यात येणारी प्रत्येक कृती....अगदी देवाच्या भक्तीच्या प्रदर्शनासकट ह्या गोष्टी वाढीस लागल्या! बोथट झालेली कायदा आणि त्याच्या पायिकांची जरब, पळवाटा आणि उशीर पांघरून सुस्तावलेली न्याय व्यवस्था आणि तिच्या अंगाखांद्यावरून फिरून तिला पोखरणारे काळे डगले, गळ्यात स्टेथस्कोप अडकवून कपाळावर मोठ्या किमतीचा प्राईज ट्याग मिरवणारे संवेदना शून्य पांढरे डगले, नीतीमत्ता व माणुसकी ह्यांच्यावर रोज बलात्कार करणारे आणि स्वार्थासाठी देश विकायला निघालेले खादिचे डगले, बेशिस्त आणि गलिच्छ लोकांनी भरलेले रस्ते, उपटसुंभ उपर्यांनी शहरातील मोकळ्या जमिनिबरोबरच गिळंकृत केलेले फुटपाथ! गलिच्छ, आसुसलेल्या, निर्लज्ज आणि फुकट्या लोकांनी काबीज केलेली सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि फिरायला जायची ठिकाणे, आपल्या शेजारच्या घरापर्यंत पोहोचलेली गुन्हेगारी आणि गुन्हेगार, खूप पैसे असून देखिल “सुखाच्या शोधात ” नाईलाजाने फक्त मॉल, मल्टीप्लेक्स आणि महागडी हॉटेल्स ह्या वातानुकुलीत चौकटीत स्वत:ला अडकवून घेतलेला “पांढरपेशा” समाज, हपापाचा माल गपापा करण्याची विकृत वृत्ती आणि तिला मिळणारे पाठबळ, माणूस बाहेर पडला की घरी परत येईल की नाही ह्याची वाटू लागलेली चिंता आणि काही वर्षांनी त्या चिंतेची झालेली सवय, लहान वयात तरुणांना लागणारे बीपी आणि मधुमेहासारखे रोग, औषध असल्याने वाढलेले पण रोगट आयुष्यमान, बाहेर खाण्याच्या सवयी आणि प्लास्टीकच्या पिशव्यातून विकली जाणारी तेलकट विषारी प्रलोभने, “चलता है आणि अपुन को क्या करना है” ही समाजाची मानसिकता, मुलांचं लहानपण हिरावून घेणारे टॅब, टी व्ही आणि गेम्स, स्वार्थ आणि फक्त स्वार्थाने लडबडलेली माणसे हे चित्र सर्वत्र दिसू लागले!!! ह्या सर्वाचा “अनुभव” घेत तो तरुण मोठा झाला. “जगणं” नव्वदीच्या दशकात सोडून. तो बुद्धिमान होता म्हणून त्याला एखाद्या प्रत्येक “कसं” च्या मागे असलेलं “का” दिसायचं, तो निर्भीड होता म्हणून तो “अरे” ला “कारे” ने उत्तर द्यायचा, तो सडेतोड होता म्हणून ढोंगी, खोटं, दुटप्पी वागणाऱ्याना तोंडावर बोलायचा, नियम तोडणारे, बेशिस्त, विकृत लोकांची त्याला चीड यायची, शक्य झाल्यास त्यांना तो त्याच्या परीने ताडन पण करायचा. जगण नव्वदीच्या दशकात सोडल्याने अगदी कालपर्यंत तो फक्त अनुभवत होता! त्या अनुभवांचा त्रास करून घेत होता, त्याच्या जवळच्यांना पण त्यामुळे त्रास होत होता. परिस्थितीशी जुळवून घेऊन सध्याच्या अनुभवला जगण मानून त्यात आनंद शोधायला तो तयार नव्हता. “आयुष्य हे चांगलंच असतं” हे पाहिलेल्या त्याला सभोवताली उगवलेल्या वाईटातून उरलसुरल चांगलं हुडकून काढून त्यालाच आयुष्य मानण मान्य नव्हत आणि “चांगलं आयुष्य” ह्याची बदललेली व्याख्या स्वीकारायला तो तयार नव्हता. “चेंज इज द ओन्ली कॉन्स्तंत इन लाईफ” हे मनापासून पटणारा तो सभोवतालच्या बदलांना आयुष्यात सामावून घ्यायला तयार नव्हता. पण कालची रात्र आली. डिनर करताना त्याच्या उच्चशिक्षित, विचारी, प्रगल्भ, काळाबरोबर होणारे बदल सहज स्वीकारणाऱ्या, समतोल विचार करू शकणाऱ्या, सकारात्मक विचाराचा महामेरू असलेल्या आणि आयुष्य खूप आनंदाने एन्जॉय करणाऱ्या पत्नीबरोबर त्याची परत एकदा, हजाराव्यांदा चर्चा झाली. आपण परिस्थितीती बदलू शकत नाही मग आपणच बदलायला हवे, वाईटात चांगले शोधून ते एन्जॉय करावे ह्या आणि अश्या विचारांची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे ह्या सर्वाचा अजूनतरी उत्तम असलेल्या आरोग्यावर परिणाम होईल ह्या विचाराने डोळे खाडकन उघडले!!! काल रात्री तो तरुण टाईम मशीन मध्ये बसून अनेक वर्ष पुढे आलाय. नव्वदिच्या दशकापर्यंतच्या “आयुष्याला छान अनुभव” समजून तिथेच सोडून त्यानंतरच्या “अनुभवांना आयुष्य” म्हणून स्वीकारण्यासाठी! बदल हेच आयुष्यातील एकमेव शाश्वत आहे ह्याचा अंगीकार करण्यासाठी! बघू जमतंय का ??????????? source:-Mandar Jog Re-posted with author's permission

प्रतिक्रिया द्या
7413 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मुक्त विहारि Mon, 08/11/2014 - 19:24 नवीन
"बदल हेच आयुष्यातील एकमेव शाश्वत आहे ह्याचा अंगीकार करण्यासाठी!" +१
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/12/2014 - 05:09 नवीन
बदल 'डोळस' असावा, म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 08/12/2014 - 15:23 नवीन
अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक इतकं चानचान होतं हे माहीत नव्हतं मला. त्यावेळची वर्तमानपत्रं वाचून पहा. किंवा त्याकाळी येणारे 'आमच्या विशीतलं जग कित्ती कित्ती सुंदर होतं म्हणून सांगू!' टाइपचे लेख वाचून पहा. नव्वदीच्या दशकात विशीत असणाऱ्या या तरुणाचे आईवडील बहुधा साठ-सत्तरीच्या दशकात विशीत असावेत. त्यांच्या पिढीने अनुभवलेली महाप्रचंड भाववाढ आणि त्याचबरोबरची महाप्रचंड बेकारी, तुटपुंजं अन्न, रेशनसाठीच्या लायनी, आसपास पसरलेली पोलियो, देवीसारखी रोगराई वगैरे ज्या भयाण गोष्टी अनुभवल्या त्यांचा या तरुणाला सामना करावा लागला नाही. त्याच आईवडिलांच्या पिढीने कष्ट करून या तरुणाच्या पिढीला निष्ठेने शिकवलं, चांगलं आयुष्य जगायला मिळेल असे प्रयत्न केले. आणि याला गेलेल्या नऊवाऱ्या साड्या, धोतरं यांची पडलेली आहे. चकचकीत मॉलमध्ये स्वतः खरेद्या करायच्या आणि तो जुना समाज कसा लयाला गेला याबद्दलचे गळे काढणारा हा तरुण (आता मध्यमवयीन...) दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 08/18/2014 - 08:43 नवीन
लेख नव्वदीच्या द्शकाबद्द्लचा आहे. बाकी दुसर्‍याला कशाबद्दल आस्था वाटावी हे तोच ठरवणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2014 - 22:28 नवीन
दशकं म्हटली, की आम्हाला फक्त हिंदी सिने-संगीतच आठवतं, आणि पन्नास-साठच्या दशकानंतर त्याला लागलेलं ग्रहण. बाकी सगळं चालवून घेता आलंय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा