Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

स
संदीप डांगे
गुरुवार, 09/18/2014 - 14:27
🗣 130 प्रतिसाद
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही. प्रत्येकाची स्वताची अडचण आहेच आणि पैश्याचे सोंग नाही आणता येत. तो जिथे लागतो तिथे लागतो. पैसे येण्याचे सर्व पारंपारिक मार्ग बंद आहेत. जसे बँक लोन, मित्र, इ. मी अजून निराश नाही. दोन मुले आहेत एक चार वर्षाचा आणि एक ३ महिन्याचा. या नव्या बाळाच्या आगमनावेळी जो काही भयंकर वैद्यकीय खर्च झाला त्यामुळे सगळे बजेट कोलमडले. आता खरच काय करावे असा प्रश्न आहे. चोरी करावी, कुटुंबासकट आत्महत्या कि सरळ निर्लज्ज व्हावे? आत्महत्या केल्यावर सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील ते माहिती आहेत. पैश्यासाठी जीव का दिला वैगेरे वैगेरे. पण जीव गेल्याशिवाय संबंधिताना घटनेचे गांभीर्य कळत नाही. तोपर्यंत त्यांना वाटेल मी खोटे बोलत आहे. माझेकडे पैसे असून द्यायची इच्छा नाही. पण खरेच असे काहीही नाही. मिपावर बरेच बुजुर्ग आणि जाणते आहेत. काही प्रक्टीकॅल सल्ला द्य. तत्वज्ञान नको. उपाशी पोटाला तत्वज्ञान म्हणजे आंधळ्या माणसाला आरसा. कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा करू नये. -------------------
इशारा १. लेखकाच्या भावना पोचल्या. मात्र सदस्यांनी कृपया सल्ले देताना आपल्या जबाबदारीवर द्यावेत, तसेच लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर अंमलात आणावेत. २. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि मिपा अशा कोणत्याही सल्ल्याला उत्तेजन देत नाही किंवा जबाबदार नाही. ३. या लिखाणावर अवलंबून राहून कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्यास मिपा संस्थळ/चालक/मालक त्याला कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
  • आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १

Book traversal links for चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

  • आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १ ›

प्रतिक्रिया द्या
70389 वाचन

💬 प्रतिसाद (130)
म
माधुरी विनायक Fri, 09/19/2014 - 09:38 नवीन
मिपा करांनी खूप मोलाचे सल्ले दिले आहेत. आपल्यातल्या बहुतेकांना कधी ना कधी अशा अनुभवातून जावंच लागतं. स्वत:वरचा विश्वास कायम ठेवा. आत्महत्या आणि चोरी या दोन्ही प्रकारांचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. बायको आणि मुलांबरोबरचा संवाद जपा. हे दिवस नक्की बदलतील. ईश्वर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप बळ देवो... सर्वच प्रतिक्रिया वाचल्यानंतर, मन मोकळं करण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्ग चोखाळला आहे, हे जाणवलं आणि आवर्जून नमूद करावंसं वाटलं. शुभेच्छा!!!
भ
भिंगरी Fri, 09/19/2014 - 09:53 नवीन
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे. मी प्रचंड सहमत आहे या विधानाशी.
प
पोटे Fri, 09/19/2014 - 10:39 नवीन
फ्रीलान्सर काम घरी बसुनच होते ना? मग त्यासाठी नोकरी का सोडली ? आधी पटकन नोकरी बघा. मुंबई किंवा कुठेही
भ
भावना कल्लोळ Fri, 09/19/2014 - 10:43 नवीन
संदीप साहेब, समदुखी म्हणायला हरकत नाही, आता ज्या परिस्थितुन जात आहात त्या पेक्षा काही वेगळी नाही माझी परिस्थिती. तरी पण आत्महत्या करणे हा मार्ग नाही. एवढी मेहनत करून हि जेव्हा गणिताचे उत्तर वजाबाकी मध्ये येते तेव्हा मनात असे विचार येतातच. चिडचिड, नैराश्य आणि खूप काही. आयुष्याचे समीकरण खुप वेगळे होऊन जाते. एरवी ठीक पण एकटे असल्यावर हे समीकरण डोळ्यासमोर नाचत बसते अन मग असे विचार येतात. पण अश्या वेळी हे असले विचार न करता काय नक्की केले तर हा प्रोब्लेम सुटेल, आयुष्याची घडी नीट बसेल याचा आराखडा घेत रहावा. कित्येक वेळेला ठरवुन, हातपाय मारून हि नाही सुटत कोडे उलटे गुंता वाढतो अश्यावेळी शांत राहावे. वेळेवर सगळे सोडुन द्यावे. जे करून मनाला आनंद मिळेल ते करावे. व्यसनापासुन कटाक्षाने दुर राहा त्याने समस्या अजून वाढतील. कुटुंबांबरोबर जास्त वेळ घालवा. या घडीला फक्त एवढेच बोलू शकते बाकी तो शिवशंकर तुमच्या समस्या लवकर सोडवो हीच प्राथर्ना आणि कठीण प्रसंगी, द्विधा अवस्था मध्ये मिपा मध्ये मारलेल्या हाकेला मिपाकर तेवढ्याच आपुलकीने साद देतात हा अनुभव मी अनाहिता मध्ये घेतला आहे म्हणून तर एक दुसरे हक्काचे माहेरघर आहे हे आमचे.
A
arunjoshi123 Fri, 09/19/2014 - 15:25 नवीन
आवडले (प्रतिसादामागचे व्यक्तित्व).
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ
स
सस्नेह Fri, 09/19/2014 - 14:04 नवीन
आज एक मिपाकर झाल्याचा अभिमान वाटला. तुम्हीही तो बाळगा अन जिद्दीने उठून दुसरे काम शोधायचा प्रयत्न करा. आणि अनुभव शेअर करा.
आ
आदिजोशी Fri, 09/19/2014 - 14:42 नवीन
मुळात आज जरी तुझ्या कडे १ पैसाही नसला तरी शांतपणे विचार केलास तर ७-८ लाख ही काही फार मोठी रक्कम नव्हे. १. सगळ्यात पहिलं म्हणजे तुझ्या व्यवसायासाठी नाशीक हे कितपत योग्य ठिकाण आहे हे ठरव. २. मुंबई अथवा पुण्याला शिफ्ट हो, तिथे ह्या लाईनमधे नक्कीच जास्त संधी आहेत. ३. बहुसंख्य लोकांनी आधी सांगितल्या प्रमाणे लोकांना तू पैसे परत करणार आहेस ह्याची खात्री पटव. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ४. जसा ह्या लोकांनी तुझ्या कडे तगादा लावला आहे तसाच तू सुद्धा तुझे पैसे येणे असणार्‍यांकडे लाव. वाटल्यास एक पत्र आणि त्याची प्रत सगळ्यांना पाठव. कुणा कुणाला पाठवतो आहेस ते सुद्धा पत्रात नमूद कर. ढोबळ मायना: मी xxxxxx हे पत्र ह्यासाठी लिहित आहे की श्री xxxxxx, श्री xxxxxx ह्यांना मी xxxxxx रुपये देणं लागतो. सद्ध्याच्या घडीला मला श्री xxxxxx आणि श्री xxxxxx ह्यांच्याकडून xxxxxx रुपये येणं आहे. माझे पैसे ह्या लोकांनी वेळेवर न दिल्याने मला देणेकर्‍यांना पैसे देणं कठीण जात आहे, वगैरे वगैरे सदर पत्राची पत एखाद्या सन्माननीय व्यक्तीलाही पाठव.
य
यसवायजी Fri, 09/19/2014 - 16:32 नवीन
संदीपभाऊ,तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही या परिस्थीतीवर लवकरच मात कराल. आज सगळे प्रतिसाद शांतपणे वाचले. मिपाकर असल्याचा अभिमान वाटला.
च
चतुरंग Fri, 09/19/2014 - 16:42 नवीन
तुमच्यावर आलेली परिस्थिती नक्कीच कठिण आहे परंतु अशक्यप्राय नाही याची खात्री बाळगा. बर्‍याचवेळा आपण धंदा सुरु केला की आता नोकरीत पुन्हा कसे जायचे या विचाराने कमीपणा वाटू शकतो तसे काही वाटत असल्यास आधी ते बाजूला ठेवा. घर चालण्यापुरता पैसा दरमहा यायलाच हवा हे नक्की, तो कसा येतो धंद्यातून का नोकरीतून हे गौण आहे. कॉमेंट्स करणारे 'मित्र', नातेवाईक यांना कटाक्षाने दुर्लक्षित ठेवा, दूर ठेवा. ते फक्त कॉमेंट्स करणार असतात घर तुम्हाला चालवायचं असतं! चार वर्षाच्या मुलाला जवळ बसवून समजावून सांगा की सध्या परिस्थिती अवघड आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मिळून यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले प्रचंड हुषार आणि समजूतदार असतात, त्यालाही आयुष्यभरासाठी शिकायला मिळेल की आपण आई-बाबांबरोबर अवघड स्थितीतून कसा मार्ग काढला. तो तुम्हाला त्याच्यापरीने कशी साथ देतो ते बघण्यासारखे असेल याचा विश्वास बाळगा! थोडा स्वानुभव - काही काळ असा होता की खिशात फक्त ५०० रुपये आहेत संपूर्ण महिना रेटायचा आहे. त्यातच लग्न, मुंजी, बारशी असले आहेर, किराणा, भाज्या, दूध, फोनची बिले, विजेची बिले, धंद्यासाठी लागणारे भांडवल कसं आणि किती बसवायचं. काय टाळायचं, काय नाही? पत्नीने अशक्य साथ दिली. माझ्या जिवाभावाच्या मित्रानेही मला कामं देऊन मोलाची मदत केली. पुण्यात मी रोज २५-२५ किलोमीटर सायकलवर हिंडून कंसल्टिंगची कामं केलीत. धंदाच करत होतो. परंतु अपेक्षेप्रमाणे यश येत नव्हते. शेवटी मोठी नोकरी मिळवण्यासाठी एक कोर्स करत होतो. अतिताणामुळे भयंकर आजारी पडलो. कोर्सला स्वतः वाहनावरुन जाणे शक्य नव्हते. पत्नी रोज तिच्या चुलत बहिणीच्या लूनावरुन घेऊन जाई आणि परत घेऊन येई. तशाच आजारी अवस्थेत कोर्स पूर्ण केला, आमची टीम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली! अर्धग्लानी अवस्थेत तो प्रवास मी रोज कसा करायचो हे मला आज आठवत नाही! अतिशय जवळच्या डॉक्टरकाकांकडून उपचार घेतले कारण खर्चाला पैसेच नव्हते. पण जिद्द सोडली नाही. वेळ निभावली. शक्यतो फार कर्जे होऊ दिली नाहीत. नोकरी लागताच देणी फेडून टाकली. परिस्थितीने खूप काही शिकवले, खरेखरे आपले, परके समजले! पत्नी आणि मी मनाने फार जवळ आलो. आज सगळे व्यवस्थित आहे. कोणत्याही परिस्थितीत यश डोक्यात जात नाही कारण कठिण दिवस कसे असतात ते अनुभवले आहे. मिपाकरांनी वरती तुम्हाला मोलाची मदत देऊ केलीच आहे त्यामुळे आणखी लिहीत नाही. तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा! :) चतुरंग
द
दशानन Fri, 09/19/2014 - 17:09 नवीन
भरपूर मित्रांनी आधीच सल्ले दिले आहेत. अश्या परिस्थितीतून मी स्वतः गेलो आहे, अनेक मिपाकरांनी मला वेळोवेळी आर्थिक - मानसिक मदत केली आहे, त्याची अजून मी परतफेड करतो आहे ही गोष्ट वेगळी पण खचू नका.. धीर सोडू नका! प्रत्येक दिवस तसाच राहत नाही. आम्ही नवरा-बायको दोघे दिवसभर जवळ पास १५-१६ तास सतत काम करत आहोत, मिळेल ते काम घेणे, पुस्तक विक्रीची जाहिरात करणे, डिटीपी पासून कव्हर डीझाईन पर्यत सर्व कामे आम्ही स्वत: करत आहोत. तुम्ही सुध्दा प्रयत्न सोडू नका, धीर धरा फक्त व घरी तुमची पत्नी काही व्यवसाय करु शकते का याचा देखील विचार करा. सध्या तरी हाच मार्ग योग्य आहे.
अ
अनन्या वर्तक Fri, 09/19/2014 - 17:21 नवीन
मी सल्ला नाही देवू शकत. पण तरीही.. काल सहज मिसळपाव वाचत होते तेव्हा तुमचा धागा वाचनात आला. काल पर्यंत अवघे दहा बारा प्रतिसाद असणारया ह्या धाग्यावर आज एक उत्सुकता म्हणून पुन्हा पहिला तुमचा धागा आणि पहिले तर खूप चांगले प्रतिसाद दिले आहेत सगळ्यांनी मिळून. प्रत्येक प्रतिसाद अगदी नीट वाचवा आणि मनात साठवून ठेवावा असा आहे. सगळ्यांनी कित्ती मनापासून आणि योग्य सल्ला दिला आहे. इस्पीकचा एक्का ह्यांचा प्रतिसाद आणि त्यांचे शेवटचे वाक्य (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) हे जास्त महत्वाचे आहे. arunjoshi123 ह्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप वास्तववादी आहे. मला सुद्धा वाटत होते Financial & Managerial Accounting च्या knowledge चा उपयोग करून तुम्हाला प्रतिसाद द्यावा पण arunjoshi123 ह्यांनी अगदी सोप्प्या आणि सरळ शब्दात खूप चांगले मार्गदर्शन केले आहे जे मला जमले नसते. मला वाटते मिसळपाव इथे एका सायकॅट्रीस्ट ची भूमिका पार पडते आहे. फरक इतकाच आहे हे सगळे virtual communication आहे पण सगळ्यांच्या भावना आणि विचार एकदम प्रामाणिक आहेत. इथे येणारा प्रत्येक जन तुमची मदत करू पाहत आहे. कुणी तुम्हाला इतरांना मदत करुन मानसिक समाधान मिळविण्याचा मार्ग दाखवत आहे, कुणी तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी मदत करू पाहतो आहे, तर कित्तेक जणांनी स्वतःचे त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांचे अनुभव तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा अगदी मनापासून यत्न केला आहे. प्रभाकर पेठकर, धर्मराजमुटके, श्रीरंग_जोशी, बाबा पाटील, विजुभाऊ, लीमाउजेट, अविनाशकुलकर्णी, विलासराव, प्यारे१, आजानुकर्ण, मुक्त विहारि, नाव आडनाव, चतुरंग....... कित्ती नावे घ्यावी आदराने. कित्तीतरी महत्वाचा, अनुभवाचा, विश्वासाचा सल्ला देणारे मिपाकर. आज मिसळपावची सदस्या असल्याबद्दल मनपासून आनंद झाला. दुसर्यांच्या अनुभवावरून आपण सुद्धा काही चांगले शिकता आले तर शिकावे ह्याचे अतिशय चांगले उदाहरण आहे हा धागा. संदीप तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून खूप मेहनतीने आणि आत्मविश्वासाने बाहेर याल (जो विश्वास मिसळपाव वर तुम्हाला सल्ला देणार्या प्रत्येकालाच वाटतो आहे) तेव्हा तुमच्या सारख्या कठीण परिस्थितीत असलेल्यांना मिपाकारासारखे मार्गदशन करायला आणि तुमचे यशःस्वी आयुष्याचे अनुभव मिसळपाववर सांगायला विसरू नका. तुमच्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेछा.
ध
धर्मराजमुटके Fri, 09/19/2014 - 17:49 नवीन
धाग्यावर अवांतर होईल पण सांगण्याचा मोह आवरत नाही. पडत्या काळात मला दोन वाक्यांनी प्रेरणा दिली. ही वाक्ये माझ्या अडचणींच्या दिवसात वारंवार म्हणत असे. १. कोणीही विचारले की अरे बाबा एवढे कर्ज झाले, आता नोकरी करतोयस. परत धंदा करु नकोस. तेव्हा मी दत्ताजी शिंदेंचे पानीपतावरील वाक्य त्यांना सांगत असे " बचेंगे तो और भी लडेंगे !" २. जेव्हा जवळचा मित्र / देणेकरी पैसे देणे मागायचा तेव्हा मी त्याला नेहमी म्हणायचो, "काय राव पैसे पैसे करता ? मी कुणाचे बुडविलेत तेव्हा तुमचे देणारय ?" वरील वाक्यांनी मला लढायची आणि कठीण प्रसंग हसत हसत झेलायची प्रेरणा दिली.
स
सुबोध खरे Fri, 09/19/2014 - 17:59 नवीन
धर्मराजमुटके आपले प्रतिसाद उत्कृष्ट आहेत __^ __
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
द
दशानन Fri, 09/19/2014 - 18:08 नवीन
व्यवसाय करु नको, नोकरी कर! असे म्हणाले कोणी मला तर त्या व्यक्तीची मला किव येते! " बचेंगे तो और भी लडेंगे !" यातील जिद्द समजून घेण्यासाठी तेवढेच कष्ट उपसावे लागतात :)
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/19/2014 - 18:11 नवीन
"बचेंगे तो और भी लडेंगे !" +१०^१०
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सानिकास्वप्निल Fri, 09/19/2014 - 18:36 नवीन
संदिपजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धीर सोडू नका, परिस्थिती नक्की बदलेल व चांगले दिवस लवकरच येतील. सर्व मिपाकरांचे प्रतिसाद व अश्या कठिण वेळी मिपाकरांनी दिलेला मदतीचा / मैत्रीचा हात बघून मिपाकर म्हणून खूप अभिमान वाटत आहे.
द
दशानन Fri, 09/19/2014 - 19:31 नवीन
आत्मघात खूप त्रासदायक प्रकार असतो, आपल्याला वाटतं तेवढे सोपं काम हे नक्की नाही आहे. आणि चुकून जगला-वाचला, नशिबाने पोलीस केस इत्यादी झाली नाही तरी... मानसिक त्रास जो होतो त्यानंतर.. तो पाहता ८-९ लाख कर्जाचा आकडा फार मोठा नाही आहे. *माझा आयडी दशानन का? असे मध्यंतरी कोणीतरी विचारले होते.. त्याचे उत्तर आज हा धागा समोर आला आहे म्हणून देतो आहे. मी जवळपास मृत्यूचे दार १० वेळापेक्षा जास्तवेळा ठोठावले आहे.. यातील तीन अपघात होते व बाकीचे माझे त्या क्षणी परिस्थितीजन्य अवस्थेमुळे घेतलेले निर्णय! म्हणून नाव दशानन. यातील २ घटना येथे मिपावर मी खूप आधी लिहिल्या आहेतच. माझ्या जुन्या मिपा मित्रांना ते माहिती देखील आहे. त्यामुळे स्व: अनुभव म्हणून सांगतो, प्रयत्न करत रहा, आपल्यात फरक एवढाच आहे, कि तुम्ही त्या तीरावर आहात व मी दुसऱ्या तीरावर पोचण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे. तेथेच अडकून राहायचे की प्रयत्न करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय. (अनुभवी)
प
प्रफुल्ल पा Fri, 09/19/2014 - 20:21 नवीन
वा मिपा क् र बन्धु नो तुम्हा ला सलाम
अ
अर्धवटराव Sat, 09/20/2014 - 00:20 नवीन
एकदा आपलं म्हटलं कि हा मिपा दोस्त अगदी जय-विरु ला पण मागे टाकतो :) भाऊ... इतकं उत्तम दिमाग कि बात दिल से केली आहे मिपा ने.. आणखी काय सांगावं... पण एक सांगतो. अगदी तुमच्या सारखी नाहि पण टोकाची आर्थीक तंगी, प्रेमभंग, कौटुंबीक आणि इतर समस्यांनी अतिप्रचंड हैराण झालेली मंडळी आयुष्यात आलि माझ्या (तशी सर्वांच्याच येतात) मी सुद्धा इतरांप्रमाणे अत्यंत बिकट पर्सिस्थितीतुन गेलो आहे बरेचदा, त्यामुळे तुमची मनस्थिती समजु शकतो. अशा सगळ्या प्रसंगी प्रत्येकाने आपापला मार्ग काढलाच. पण एक गोष्ट कॉमन होती सर्वांच्यात. शेवटी अशी परिस्थिती मनात का उद्भवते? तर मनाची उमेद, इच्छाशक्ती कुंठीत होते म्हणुन. पण आपल्या सर्वांकडे एक एखादी अशी गोष्ट असते कि ज्यामुळे काहि काळापुरतं तरी मन निवळतं. माझ्या पहाण्यातल्या प्रत्येक समदु:खी व्यक्तीने हा उपाय जाणते-अजाणतेपणी अवष्य केला होता. एक देवदास मित्र पार म्हणजे पारच कोलमडला होता. पण त्याला मासळीचं जेवण आणि त्यानंतर दोन सिग्रेट असा खुराक घ्यायचा भयंकर शौक होता. इतर वेळी ते बेणं पार हताश दिसायचं, पण मासळी चेपताना हळुहळु नॉर्मल व्हायचं आणि त्यानंतर सिग्रेट पिताना एकदम फ्रेश-कॉन्फीडंट वाटायचं. या एका धाग्यावरुन त्याने स्वतःला सावरलं. नियमाने मासळी जेवण आणि सिग्रेट घेत राहिला व त्यानंतरचे काहि मिनीट आयुष्याचा सिरीयसली प्रॅक्टीकल विचार करायला लागला. शेवटी तो त्यातनं बाहेर आलाच. वारंवार इंजीनीयरींगमधे गचके खाणार्‍या दोन मित्रांना अनुक्रमे गोविंदाचे पडिक सिनीमे आणि बॅचलर लाईफमधे फुकट उपलब्ध अशा शरीर-सुखाच्या ऑप्शनने साथ दिली व त्यांना कमालीच्या नैराश्यातुन वाचवलं. असे बरेच अनुभव आहेत. थोडक्यात काय, तर तुम्हाला समस्या सोडवायला जी मनाची निवांत अवस्था हवी आहे ति तुमच्याच एखाद्या सवयीने म्हणा आवडीने म्हणा तुम्हाला मिळवता येईल. ति सवय प्रयत्नपुर्वक नियमाने अमलात आणा. काहि काळानंतर तुमचं शरीर पाण्याबाहेर आलं नाहि तरी तुमचं नाक-तोंड नक्की येईल व तुम्हालाच तुमचा मार्ग दिसेल. मिपा आहेच सोबतीला :)
त
तुषार काळभोर Sat, 09/20/2014 - 05:03 नवीन
इथे कदाचित अनावधानाने राहून गेलेला एक मुद्दा.. Pleeeeaaase!!!! एक कुटुंबाचा आरोग्यविमा व एक तुमचा आयुर्विमा लगेच काढा. मुलाच्या आजारपणात झालेल्या खर्चाने आर्थिक परिस्थिती आणखी नाजूक झाली, असं तुम्ही लिहिलंय. शक्यता कितीही कमी असली, तरी मोठे आजारपण व अकाली मृत्यूमुळे एखाद्या घराचा आर्थिक डोलारा डगमगु शकतो. त्यामुळे कदाचित आताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये १०-१५ हजाराचे २ विमे खूप जास्त वा चैनीचे वा अनावश्यक वाटू शकतात. किंवा कदाचित आता तुम्हाला ते शक्यही होणार नाही. पण as soon as possible, थोडा मोकळा श्वास घेता आला की लगेच विमा काढा. (@संपादकः हा प्रतिसाद अवांतर/अनावश्यक असल्यास कृपया काढून टाकावा)
स
सुबोध खरे Sat, 09/20/2014 - 07:16 नवीन
डांगे साहेब, मिपावरील लोकांचे एक एक अनुभव वाचून आला आश्चर्य वाटते आहे. लोक किती गंभीर प्रसंगातून जात असतात. त्यांच्या मानाने माझे आयुष्य फार सुखात आणि सुरळीत गेले असे वाटते. त्यामुळे आपल्याला सल्ला द्यायचा मला कोणताही अधिकार नाही. परंतु एक नौदलातील वैद्यकीय अधिकारी म्हणून मी काही आत्महत्येच्या प्रकरणा मध्ये चौकशी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. आत्महत्या करणारा माणूस सुटून जातो पण मागे राहणाऱ्या कुटुंबाची अक्षरशः वाताहत होते. त्यांना आयुर्विम्याचे पैसे मिळत नाहीत.( नैराश्यातून केलेली आत्महत्या हा मानसिक रोग आहे म्हणून त्या रुग्णाच्या कुटुंबाला सर्व फायदे, विमा, इ इ मिळावेत म्हणून मी केलेले सर्व प्रयत्न सरकार दरबारी निष्फळ ठरले आहेत). जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते. बाकी बर्याच लोकांनी स्वानुभवाने बरेच काही लिहिले आहे. त्या ताज महालाला माझी वीट लावण्यात काहीच अर्थ नाही.अशा लढाऊ लोकांना साष्टांग प्रणाम. आणि त्यांच्या अशा लढ्यातून स्फूर्ती घेऊन आपणही अशा कठीण परिस्थितीतून लवकरच बाहेर पडाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
व
विलासराव Sat, 09/20/2014 - 07:42 नवीन
जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते. बरीचशी भरलीत, काही अजुनही भरतोय. बाकी जाता जाता अजुन एकः मी या परिस्थितीतुन पार झाल्यावर मला तशाच परिस्थीतीतुन जाणार्याची भलतीच कणव यायला लागली. मग मी जमेल तशी मदतही करायला लागलो. बरेचसे लोक बरेच बरे निघाले. पण माझ्या अगदी जवळच्या काही लोकांनी धुर्तपणे माझ्याकडुन पैसे घेतले आनी मला कायमची शेंडी लावली. परीणाम आणखी दोनेक लाखाला चुना लागला. दान्/मदत सत्पात्री करावं ते यासाठीच!!!!!!!!!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण Sat, 09/20/2014 - 07:42 नवीन
Image removed. रणांगणातुन पळायचे की लढायचे हे सर्वस्वी आपल्या हाती असते... लढणार्‍यांना विजय देखील प्राप्त करता येतो, पळणार्‍यांना ? Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }
आ
आयुर्हित Sat, 09/20/2014 - 09:03 नवीन
आपल्या आयुष्यावरच्या या मोठ्ठ्या वळणावर मिपावर आपले मन मो़कळे केल्याबद्दल धन्यवाद. याचाच अर्थ आपल्याला समस्येचे पूर्ण समाधान हवे आहे. व यावरुनच आपला जगण्याचा व त्यासाठी संघर्ष करण्याचाच विचार प्रकट झाला आहे. बर्‍याच वेळेला मनुष्याची गत "कस्तुरीमॄगा"सारखीच झालेली असते. आपल्या आत असणारे सद्गुण हे आपल्याला कधिच दिसत नाही. ते जाणण्यासाठी एक जोहरी किंवा सद्गुरु भेटावाच लागतो. तद्नंतरच आपले कल्याण होत असते. असो! कठीण प्रसंग कोणाच्या आयुष्यात आला नाही? प्रभुरामांना देखिल १४ वर्षे वनवास भोगावा लागला होताच की! भगवान कृष्णावर ही न केलेल्या चोरिचा आळ आला होता. सोन्याला सुद्दा आपले शुध्दत्व प्रमाणित करण्यासाठी आगीतुन जावेच लागते. तशीच आता ही सुध्दा आपली सत्वपरिक्षा आहे असे समजुन प्रत्येक पाऊल समजून उमजुन व जपूनच उचलाल अशी अपेक्षा आहे. भगवान श्रीकॄष्णाने गीतेत सांगितले आहेच अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनां पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ स्थूल रूपात याचा अर्थ आहे- ‘माझ्या भक्तांची सर्व प्रकारची काळजी मी घेतो. त्यांच्या सर्व गरजा-अपेक्षा मी स्वतः वाहून नेतो. त्यांच्या सर्व चिंतांची जबाबदारी मी आपल्या खांद्यांवर घेतो’. किंवा साध्या मराठीत श्री स्वामी समर्थ सांगतात "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे!" तेव्हा देवावर व देवाने दाखविलेल्या मार्गावर म्हणजेच "आपल्या स्वतःच्या कर्मयोगावर" श्रद्धा ठेवावी, हि विनंती. इतर कोणतेही प्रश्न असतील तर बिनधास्त व्यनी करावा. आम्ही सदैव आपली मदतच करू.
ल
लव उ Sat, 09/20/2014 - 12:36 नवीन
काहीही विचार करताना जरा बायको (बाळंतीण) आणी २ सोनुल्यांना आठवा. बाकि व्य. नि. केलाय. काळजी घ्या. तुमची आणि कुटुंबाचिही.
स
सखी Sun, 09/21/2014 - 05:21 नवीन
ही कविता काल प्रतिसाद देताना सापडत नव्हती तुम्हाला किंवा कोणीही निराश झालेल्या व्यक्तीला बळ देण्यासाठी इथे देत आहे. (मला आणि परिचितांना याचा खूप उपयोग झाला.) मुठभर हृदया पांढरे निशाण उभारण्याची घाई करू नकोस, मुठभर हृदया, प्रयत्न कर, तगण्याचा, तरण्याचा, अवकाश भोवंडून टाकणार्‍या, या प्रलयंकारी वादळाचाही, एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत रहा, तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी. वादळे यासाठीच वापरायची असतात आपण काय आहोत हे तपासण्यासाठी नव्हे, आपण काय होऊ शकतो, हे आजमावण्यासाठी.. - पद्मा गोळे
आ
आयुर्हित Sun, 09/21/2014 - 15:37 नवीन
Image removed. Image removed.
प
पियू परी Mon, 09/22/2014 - 10:48 नवीन
तुम्ही सुद्धा घेणेकरी आहात हे विसरु नका. :शक्य त्या सर्व प्रकारे तुम्हीही ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणे आहे त्यांच्यामागे तगादा लावा. :कागदोपत्री व्यवहार झाला असल्यास कायद्याचा बडगा दाखवा. :स्वस्तात एखादा वकील मिळाला तर नोटिस वै. पाठवा. :पोलिस कंप्लेंट करायची धमकी द्या. :शक्यतो हा तगादा लिखित स्वरुपात करा. इमेल सुद्धा लिखित पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. :क्लाएंट्सना मेल पाठवतांना रिमाइंडर १, रिमाइंडर २ असं लिहित चला म्हणजे त्यांनाही गांभिर्य येईल. :एखाद्या कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंट दाद देत नसेल तर त्यांच्या वरिष्ठांना किंवा वेळ पडल्यास डायरेक्टर्स ना भेटून तुमची परीस्थिती विषद करा. आणि पेमेंट लवकर देण्याची विनंती करा. :जे जे क्लाएंट कामाचे पैसे देत नाहीत त्यांची काही ओरिजनल कागदपत्रे/ कामांच्या सॉफ्ट कॉपीज इ. जे काही तुमच्याकडे आहे ते पैसे मिळाल्याशिवाय परत देऊ नका. अगदी सॉफ्ट कॉपी सुद्धा नाही. :तशीच वेळ आली तर क्लाएंट्साठी केलेले काम (डिझाईन/ लोगो वै.) दुसर्‍या कोणाला विकुन टाकायची धमकी द्या. : एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या. यापुढे जे काम घ्याल त्यात सगळे व्यवहार कागदोपत्री तर कराच पण निदान ५०-७५% आधी घ्या. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. तुमचे पैसे अडकवुन/ हडपुन/ न देऊन लोकांनी तंगड्या पसरून आयुष्य एंजॉय करायचे आणि तुम्ही बायको आणि बाळाला वार्‍यावर सोडून जीव द्यायचा हा कोणता न्याय?
म
माहितगार Mon, 09/22/2014 - 11:28 नवीन
एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या.
आपले पैसे मिळवण्याची टेक्निक म्हणून या सल्ल्याच्या सुयोग्यते बद्दल साशंक आहे. मला वाटते टाळलेले बरे. पैसे अगदी दोन तीन वर्षापेक्षा अधिक थकले आणि बाकी सर्व मार्ग संपले तर वकिला मार्फत नोटीस काही वेळा चांगले काम करून जाते. पैसे मागण्याच्या टेक्निक्स बद्दल स्वडीने कधीतरी सविस्तर लेख लिहावा असा जुना मानस आहे.
↩ प्रतिसाद: पियू परी
स
संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 12:04 नवीन
शुभस्य शीघ्रम, तुमचा लेख लवकर वाचावयास मिळो अशी अपेक्षा आहे.
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा