Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुक-२०१४: विश्लेषण

क
क्लिंटन
Mon, 10/20/2014 - 07:26
🗣 68 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली. या लेखाचा उद्देश या निवडणुक निकालांचे विश्लेषण करणे आणि त्याचा या राज्यांच्या आणि देशाच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होईल यावर भाष्य करणे हा आहे. सर्वप्रथम या दोन राज्यांमध्ये लागलेले निकाल पुढीलप्रमाणे: महाराष्ट्र
  
महाराष्ट्र  
 जागामते%
भाजप१२३२७.८%
शिवसेना६३१९.३%
कॉंग्रेस४२१८.०%
राष्ट्रवादी४११७.२%
बहुजन विकास आघाडी३०.६%
शेकाप३१.०%
एम.आय.एम२०.९%
मनसे१३.१%
समाजवादी पक्ष१०.२%
अपक्ष आणि इतर९११.०%
नोटा ०.९%
एकूण२८८१००.०%
हरियाणा
  
हरियाणा   
 जागामते%
भाजप४७३३.२%
आय.एन.एल.डी१९२४.१%
कॉंग्रेस१५२०.६%
हरियाणा जनहित कॉंग्रेस२३.६%
अकाली दल१०.६%
बहुजन समाज पक्ष१४.४%
अपक्ष आणि इतर५१३.१%
नोटा ०.४%
एकूण९०१००.०%
मला वाटते की देशाच्या राजकारणाचे स्वातंत्र्योत्तर काळात दोन स्पष्ट कालखंड करता येतील. पहिला कालखंड होता स्वातंत्र्यापासून राजीव गांधींच्या कारिकिर्दीच्या पूर्वार्धापर्यंत आणि दुसरा कालखंड सुरू झाला राजीव गांधींच्या कारिकिर्दीच्या उत्तरार्धापासून.पहिल्या कालखंडात कॉंग्रेस पक्ष सामर्थ्यशाली होता.तर राजीव गांधींच्या कारिकिर्दीच्या उत्तरार्धापासून कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आणि कॉंग्रेस पक्षाची जागा बऱ्याच अंशी भाजपने तर अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी भरून काढली.देशाच्या राजकारणातील या दोन कालखंडांमध्ये नक्की कोणता फरक होता याविषयी मागच्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तिसगड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सुरू होण्याआधी काही मिनिटे निवडणुक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एक अत्यंत मार्मिक भाष्य केले होते.ते म्हणाले की १९८० च्या दशकापर्यंत आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा असल्यास मतदार जसे मतदान करतील तसे मतदान ते राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये करत होते.पण १९९० च्या दशकाच्या सुरवातीपासून आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री निवडायचा असल्यास मतदार जसे मतदान करतील तसे मतदान ते लोकसभा निवडणुकांमध्ये करू लागले. पहिल्या कालखंडातील विधानसभा निवडणुकांच्या (अर्थातच १९६७ मधील अपवाद वगळता) निकालांचे आणि दुसऱ्या कालखंडातील लोकसभा निवडणुकांच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण केल्यास यादव यांचे भाष्य किती चपखल होते हे समजून येईल. मी स्वत: भारतीय राजकारणात रस घेऊ लागलो या दुसऱ्या कालखंडाच्या सुरवातीपासून.पहिल्या कालखंडात पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींचे सशक्त नेतृत्व होते तर दुसऱ्या काळात नरसिंह राव, वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांचे त्यामानाने कमकुवत नेतृत्व होते. पहिल्या कालखंडात विधानसभा निवडणुकांचे निकाल राष्ट्रीय कलाशी मिळतेजुळते लागले तर दुसऱ्या कालखंडात लोकसभा निवडणुकांमध्येही निकाल राष्ट्रीय पातळीवर लागण्याऐवजी बऱ्याच अंशी राज्यपातळीवर लागले (उदा. १९९८ मध्ये भाजपचा महाराष्ट्र आणि राजस्थान या शेजारी राज्यांमध्ये जोरदार पराभव झाला तरी गुजरातमध्ये मात्र विजय झाला. असे इतर अनेक राज्यांविषयी लिहिता येईल).तेव्हा दुसऱ्या काळात कुठल्याही निवडणुकांमध्ये यश मिळवायला राज्य पातळीवर सक्षम नेतृत्व पक्षाकडे असणे गरजेचे झाले होते. महाराष्ट्रातील निकालांचे अधिक विश्लेषण याच लेखात पुढे करणार आहे.तरीही हरियाणातील निकालांविषयीही थोडे लिहितो. हरियाणात भाजप हा महत्वाचा पक्ष कधीच नव्हता.शेजारी उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये भाजपने चांगलेच बस्तान बसविले होते पण हरियाणात मात्र भाजपचे सामर्थ्य कधीच नव्हते.१९८७ मध्ये कॉंग्रेसचा हरियाणात ऐतिहासिक पराभव झाला.त्या निवडणुकांमध्ये देवीलालांशी युती करून भाजपने १५ जागा जिंकल्या होत्या.पक्षाची ती आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.पक्षाकडे स्थानिक पातळीवरचा नाव घ्यावा असा नेताही नाही.तरीही भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे हा नक्कीच मोठा महत्वाचा विजय आहे हे नक्कीच. आज पक्षाकडे स्थानिक पातळीवर नेता नसतानाही निर्विवाद बहुमत मिळत असेल तर अर्थातच लोकांनी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला असे म्हणायला पाहिजे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासूनच भारतीय राजकारणातले तिसरा कालखंड सुरू होत आहे का या प्रश्नाला बळकटी मिळावी असे या राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत.अर्थातच या प्रश्नाचे उत्तर निसंदिग्धपणे "हो" असे देण्यापूर्वी इतर काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांची वाट बघावी लागेल आणि अर्थातच त्यासाठी आणखी काही काळ थांबावे लागेल. महाराष्ट्रातील निकालांचे विश्लेषण भाजप गेल्या अनेक वर्षांपासून एक पक्ष म्हणून भाजप केवळ उत्तर महाराष्ट्र-खानदेश आणि विदर्भ या भागांमध्ये प्रबळ होता तर मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात शिवसेना भाजपपेक्षा प्रबळ होती.तरीही आजच्या निकालांमध्ये असे दिसते की भाजपने आपले विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र हे बालेकिल्ले राखतच मुंबई आणि मराठवाडा या भाजपच्या पूर्वीपासून बालेकिल्ला नसलेल्या भागांमध्येही भाजपने शिवसेनेपेक्षा काकणभर जास्त यश मिळविले आहे.विधानसभा निवडणुकांमध्ये आजपर्यंत भाजपची सर्वोत्तम कामगिरी होती १९९५ मध्ये ६५ जागा.तर २०१४ मध्ये भाजपने १२३ जागा जिंकल्या आहेत. १९९० पासून २००९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने एकदाही १२३ जागांवर निवडणुकही लढवली नव्हती. सुमारे १५० जागांवर भाजपने गेल्या २५ वर्षात कधीच निवडणुक लढवली नव्हती. असे असतानाही १२३ जागा जिंकणे हे भाजपचे नक्कीच मोठे यश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवरचा मोठा नेता नसणे ही भाजपची पडती बाजू होती आणि अजूनही आहे.त्यातल्या त्यात भाजपचे मोठे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे.ते मोठे नेते असले तरी गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला-केशुभाई पटेल किंवा राजस्थानात भैरोसिंग शेखावत यासारख्या पक्षाच्या इतर नेत्यांप्रमाणे पूर्ण राज्यात मते फिरवू शकतील इतके सामर्थ्य मुंड्यांकडेही नव्हते. एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेन्द्र फडणवीस हे तर मुंडे यांच्याइतकीही मते स्वबळावर फिरवू शकतील असे नाही. गेली २५ वर्षे शिवसेनेबरोबर युती असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याचा भाजपला नक्कीच उपयोग होत होता.एका अर्थी शिवसेनेबरोबर युती तोडून पक्षाने एका प्रकारे जोखीमच घेतली होती. तरीही आज भाजपने राज्याच्या अनेक जागांमध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. हे यश पक्षाने नक्की कशाच्या जोरावर मिळविले?कारण तितक्या प्रमाणावर मते खेचेल असा स्थानिक नेता पक्षाकडे नाही.तेव्हा विधानसभेच्या निवडणुकांमध्येही लोकांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊनच मते दिली आहेत यापेक्षा अन्य काही अनुमान काढणे जड जाईल.यातूनच या निवडणुका म्हणजे भारतीय राजकारणातील दुसऱ्या कालखंडाच्या शेवटाची नांदी ठरणार की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. शिवसेना शिवसेनेला अपेक्षित यश या निवडणुकांमध्ये मिळालेले नाही.तरीही पक्ष संपला नाही हे मात्र या निवडणुकांनी नक्कीच दाखवून दिले आहे.बाळासाहेबांच्या पश्चात उध्दव ठाकरे पक्ष कसा चालविणार, बाळासाहेबांच्या आक्रमक शैलीपुढे उध्दव बरेच फिके आहेत त्यापेक्षा राज ठाकरे अधिक आक्रमक आहेत तेव्हा एकेक करून पक्षातील नेते एकतर मनसेत जातील नाहीतर भाजपमध्ये जातील अशा शंका उध्दव ठाकरे यांचे टिकाकार उपस्थित करत होते.शिवसेनेची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती १९९५ मध्ये ७३ जागा.अगदी तितक्या नाही तरी २००९ पेक्षा बऱ्यापैकी जास्त जागा जिंकून निदान असे प्रश्न यापुढे विचारले जाणार नाहीत हे उध्दव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. शिवसेनेची साथ तुटणे हे भाजपसाठी धक्कादायक होते तसेच भाजपची साथ तुटणे हे शिवसेनेसाठीही धक्कादायक होतेच.तरीही निदान भाजपकडे नरेंद्र मोदी हा जबरदस्त वलय असलेला नेता (भले महाराष्ट्राबाहेरचा का असेना) आणि पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळविलेल्या जबरदस्त विजयाची पार्श्वभूमी होती.शिवसेनेकडे ते ही नव्हते.उध्दव ठाकरे यांनी एकहाती प्रचाराची जबाबदारी सांभाळली. अशा परिस्थितीतही २००९ पेक्षा १९ जागा जास्त जिंकणे हे निश्चितपणे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे यश आहे यात शंका नाही. तरीही उध्दव ठाकरे यांनी काही चुका नक्कीच केल्या आणि त्याचे परिणाम शिवसेनेला भविष्यात भोगावे लागणार आहेत.इतकी वर्षे महाराष्ट्रात शिवसेना हा थोरला भाऊ आणि भाजप हा धाकटा भाऊ असे समीकरण होते.एकूण लढविलेल्या जागांपैकी विजय मिळालेल्या जागांची टक्केवारी भाजपने अधिक चांगली राखली होती.तसेच शिवसेनेचा राज्यात एकमेव आमदार असताना (१९८५ मध्ये छगन भुजबळ) भाजपचे १६ आमदार होते.तरीही इतकी वर्षे भाजपने पडती बाजू घेऊन शिवसेनेला अधिक जागा लढू दिल्या होत्या.नरेंद्र मोदींनी पूर्ण देशात (आणि महाराष्ट्रातही) एकहाती विजय मिळवून दिल्यामुळे भाजपने जास्त जागांची मागणी केली ती उध्दव ठाकरे यांनी मान्य करायला हवी होती.अर्ध्या-अर्ध्या नाही तरी १३० च्या आसपास जागा लढवायला भाजप नेत्यांनी तयारी दाखवली होती.ती मान्य करून उध्दव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणायला नको होते.अशा परिस्थितीत जास्त जागा लढायला मिळून शिवसेनेची थोरल्या भावाची भूमिका कायम राहिली असती आणि शिवसेना आणि भाजप यांच्यात नक्की कोणाचे सामर्थ्य जास्त ही झाकली मूठच राहिली असती.पण स्वबळावर लढवायला गेल्यामुळे भाजपचे सामर्थ जास्त हे उघडच झाले आहे.त्यामुळे आता शिवसेना-भाजप एकत्र आले तरी थोरल्या भावाचे स्थान शिवसेना गमावेल ते कायमचेच. कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षाला मात्र या निवडणुकांनी अगदी जोरदार धक्का दिला आहे.यापूर्वी कॉंग्रेस पक्षाची सर्वात वाईट कामगिरी होती २००४ मध्ये ६९ जागा.त्यापेक्षाही कमी जागा पक्षाला मिळाल्या आहेत.नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, राजेन्द्र दर्डा यांच्यासारख्या नेत्यांचे पराभव पक्षाला नक्कीच धक्का देणारे आहेत.त्यातून जर शिवसेना-भाजप परत एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदही शिवसेनेकडे जाईल.सत्तेतही नाही आणि मुख्य विरोधी पक्षही नाही अशी दयनीय अवस्था कॉंग्रेसची यापूर्वी कधीच झाली नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणेच राज्य विधानसभा निवडणुकांमध्येही कॉंग्रेस पक्षाने लढत दिली आहे असे चित्र नक्कीच नव्हते.निवडणुकांच्या तारखांची घोषणा व्हायच्या आधीपासूनच आपण हरलो आहोत हे पक्षाने मान्य केले होते अशा प्रकारची हतबलता कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसत होती.यापूर्वी पक्षाकडे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार असे राज्यात बऱ्यापैकी जनाधार असलेले नेते होते.आज तसा नेता कोण हा प्रश्नच आहे.पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे नेते असले तरी त्यांना तितक्या प्रमाणावर जनाधार नाही ही सत्य परिस्थिती आहेच. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष २०% मते या महत्वाच्या टप्प्याखाली गेला आहे.उत्तर प्रदेशात १९९१ मध्ये आणि बिहारमध्ये १९९५ मध्ये कॉंग्रेस पक्ष २०% पेक्षा खाली गेला आणि आजपर्यंत या राज्यांमध्ये पक्ष सावरू शकलेला नाही.हा इतिहास लक्षात घेता २०% पेक्षा कमी मते मिळविणे हे कॉंग्रेस पक्षासाठी नक्कीच चांगले संकेत नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी पक्षाचे काही बालेकिल्ले (बारामती, तासगाव, भुजबळांचे नाशिक, सातारा, सोलापूर इत्यादी) ढासळलेले नाहीत. तरीही २००४ मधील पहिल्या क्रमांकावरून राष्ट्रवादी आज चौथ्या क्रमांकावर गेला आहे. अर्थातच राष्ट्रवादीचे सामर्थ्य बरेच कमी झाले आहे. त्यातच शरद पवार यापुढे वाढत्या वयामुळे राजकारणात किती सक्रीय राहतील ही शंका आहेच. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचे राष्ट्रवादीने मान्य केले आहे.अर्थातच असा पाठिंबा घेणे भाजपला परवडणार नाही आणि तसा पाठिंबा भाजप घेईल याची शक्यता कमीच.तरीही भाजपबरोबर का होईना सत्ता मिळाली तर ठिक अन्यथा राष्ट्रवादीसुध्दा मरगळलेल्या अवस्थेत जाईल हीच शक्यता जास्त.अशा परिस्थितीत स्वगृही कॉंग्रेस पक्षात परत जाणे हाच त्यातल्या त्यात चांगला पर्याय राष्ट्रवादीपुढे राहिल. मनसे २००९ मध्ये मनसेने लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली मते घेतली आणि ९ मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांचा पराभव केला.त्यानंतर "एकही मारा लेकीन क्या सॉलिड मारा" अशा स्वरूपाची प्रतिक्रिया मनसेकडून आली होती.त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये १३ जागा जिंकून मनसे हा एक राज्यातील महत्वाचा पक्ष भविष्यात ठरेल असे वाटायला लागले.पण नंतर महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेत तर पक्षाची वाताहतच झाली.नंतर राज ठाकरे यांनी स्वत: निवडणुक लढवायची घोषणा केली पण नेहमीप्रमाणे त्याचे काहीच झाले नाही. नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्याच्या विकासाची बहुचर्चित ब्लू-प्रिंट मनसेने आणली.पण जनतेचा विश्वास मनसे जिंकू शकली नाही. नरेंद्र मोदींच्या प्रभावाचा परत एकदा फटका मनसेला बसला हे नक्कीच.तसेच २००९ मधला अनुभव लक्षात घेता आणि यावेळी शिवसेना-भाजप युती तुटली असल्यामुळे मनसे समर्थकांनीही शिवसेनेलाच मते दिली आहेत असे वरकरणी दिसत आहे.त्यातूनच बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे इत्यादी मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. मनसेची यापुढील वाटचाल अत्यंत खडतर असणार आहे. नऊ वर्षे पक्षात असूनही कार्यकर्त्यांना फारसे काही मिळाले असे चित्र नाही.लोकसभेची एकही जागा मनसे जिंकू शकलेला नाही.काही नगरसेवक पदे वगळता एक आमदार पद एवढेच मनसेकडे आज शिल्लक राहिले आहे. जो प्रश्न पूर्वी उध्दव ठाकरेंना विचारला जात होता तोच प्रश्न--"आता पक्ष कसा चालविणार" राज ठाकरेंना विचारला जाईल.अशा वेळीच राज ठाकरेंच्या नेतृत्वाची खरी कसोटी आहे.त्यांनी आपले नेतृत्वकौशल्य दाखवून पक्ष सावरला तर ठिक नाहीतर या पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल हीच शक्यता जास्त. निवडणुक निकालांचे राष्ट्रीय राजकारणावर अपेक्षित परिणाम सर्वप्रथम या निवडणुकांमुळे नरेंद्र मोदींचे साम्राज्य अधिक बळकट झाले आहे यात शंकाच नाही.इंदिरा गांधींनंतर देशात, संसदेत आणि पक्षातही एकहाती वर्चस्व असलेला पंतप्रधान झालेला नाही.या विजयामुळे नरेंद्र मोदी त्या 'लीगमध्ये' सामील झाले आहेत असे म्हणणे बरेच घाईचे ठरेल.तरीही त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला अनुकूल असा हा विजय आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष या दोन्ही राज्यांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे.त्यातून केंद्रात राहूनही राज्यातील निकालांवर परिणाम करू शकणारा नरेंद्र मोदींसारखा बलदंड नेता भाजपकडे आहे.लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यापासून कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय नेतृत्व मरगळलेल्या अवस्थेतच गेले आहे असे दिसते. १९९९ मध्ये पराभव होऊनही सोनिया गांधी ज्या हिरीरीने वाजपेयी सरकारविरूध्द लढा देत होत्या ती तडफ आज राहुल गांधींकडे नक्कीच नाही आणि स्वत: सोनिया गांधीही प्रकृतीच्या कारणांवरून तितक्या सक्रीय नाहीत.ही परिस्थिती काँग्रेस पक्षाच्या भवितव्यासाठी नक्कीच धोकादायक आहे.पूर्वी काँग्रेस पक्षाची झालेली पिछेहाट आणि पक्षाने मोकळी केलेली जागा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे पक्ष भरून काढत होते.पण आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवसंजीवनी मिळालेला भाजप ती जागा भरून काढेल अशी चिन्हे आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून विविध राज्यांमध्ये युतीचे राजकारण हा स्थायीभाव झाला होता.देशाचे राजकारण परत एकदा राष्ट्रीय पक्षांकडे झुकत असल्याचे संकेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनी दिले होते तोच कल पुढे चालू आहे हे निकाल दर्शवत आहेत हे नक्कीच.आता डिसेंबरमध्ये झारखंड, जम्मू आणि काश्मीर आणि कदाचित दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये हा कल तसाच पुढे चालू राहतो की त्यात खंड पडतो हे अधिक स्पष्ट होईल .

प्रतिक्रिया द्या
25390 वाचन

💬 प्रतिसाद (68)
ऋ
ऋषिकेश Tue, 10/21/2014 - 09:36 नवीन
छान विश्लेषण या निवडणूकीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे NOTA या पर्यायाची उपलब्धता. काही ठिकाणी त्याचा वापर अतिशय सढळ आहेच. पण NOTA पेक्षा मत न दिलेले बरे म्हणणार्‍यांना NOTA काय करू शकतो याची चुणूक "पिंपरी" मतदारसंघाने दिली आहे पिंपरीमध्ये विजयी उमेदवाराचे "मार्जिन" अर्थात फरकाचा आकडा NOTA ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. तेथील विजयी उमेदवाराला 51096 मते मिळाली तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला 48761. अर्थात मार्जिन २३३५ मतांची झाली, मात्र NOTA या पर्यायाला ४४३५ मते आहेत. कन्नड मतदार संघातही मार्जिन १५६१ची तर नोटाला २०९४ मते आहेत. तीच गत गंगाखेडची मार्जिन 2289 तर नोटाला मते 2024 (गडचिरोलीमध्ये 17510 मतांसह नोटा तिसर्‍या स्थानावर आहे - दुसर्‍या स्थानावरील उमेदवाराला 18280!) इतरही अनेक मतदारसंघात नोटाने निकाल बदलण्याची शक्यता निर्माण केली आहे. हा पर्याय नसताना या लोकांनी उपलब्ध पर्यायांमध्येच मतदान करावे लागले असते किंवा मग त्यांनी मतदानच केले नसते. दोन्ही गोष्टीं होण्यापेक्षा सद्य रचना अधिक चांगली आहे. तेव्हा नोटा हा फस्ट पास्ट द पोस्ट या प्रकारात "पोस्ट" चे स्थान हलवण्याचे महत्त्वाचे कार्य करतो हे मी मागे म्हटले होते त्याला हा विदा पुष्टीच देतो आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 10/21/2014 - 09:40 नवीन
नोटा पर्याय कैक लोकांनी अवलंबला म्हणून निकाल बदलला हे कसे काय? ते स्पष्ट होत नाहीये. उमेदवार अ जिंकला असता, पण नोटा मुळे उमेदवार ब जिंकेल असं थोडीच होतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Tue, 10/21/2014 - 09:46 नवीन
जर नोटा पर्याय नसता तर त्याला मत दिलेल्यांनी एका पक्षाल मत देण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर अशी लोक विनिंग मार्जिनपेक्षा अधिक आहेत. तेव्हा अ ऐवजी ब जिंकू शकला असता उदा. वर पिंपरी विधानसभाक्षेत्रात ४०००+ लोकांनी नोटा निवडलाय, त्यापैकी अर्ध्यांनी जरी क्र. दोनच्या उमेदवाराला मत दिले असते तर तो जिंकला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/21/2014 - 09:52 नवीन
अच्छा, आले लक्षात. पण नोटा नसता तर नोटावाल्यांची मते कशी विभागली गेली असती हे सांगायचा काही मार्ग थोडीच उपलब्ध आहे? आणि, तुमचे म्हणणे मान्य करूनही, जे कोणी उपलब्ध उमेदवार (गणंग & ऑल) आहेत त्यांपैकीच एक (गणंग अगेन) निवडून येणार...मग नोटाने काय मोठा तीर मारला? लोकांच्या तोंडाला पुसलेली पाने आहेत ही निव्वळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Tue, 10/21/2014 - 10:32 नवीन
अच्छा, आले लक्षात. पण नोटा नसता तर नोटावाल्यांची मते कशी विभागली गेली असती हे सांगायचा काही मार्ग थोडीच उपलब्ध आहे?
मान्य. तो मार्ग उपलब्ध नाहीच, शिवाय त्या सार्‍यांनी नोटा नसताना मतदान केलेच असते का याचीही खात्री नाही. पण ते केले आहे आणि त्याने एक "शक्यता" निर्माण झाली आहे.
आणि, तुमचे म्हणणे मान्य करूनही....मग नोटाने काय मोठा तीर मारला? लोकांच्या तोंडाला पुसलेली पाने आहेत ही निव्वळ.
ओके. मताचा आदर आहे. माझ्यासाठी नवा पर्याय मिळणे तसा पर्याय नसण्यापेक्षा किंवा दुष्कर असण्यापेक्षा अधिक स्वागतार्ह आहे. आणि आता त्या पर्यायाची उपलब्धता आणि त्यामुळे निकालांवर फरक पडण्याची शक्यता निर्माण होणे तर अधिकच महत्त्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Tue, 10/21/2014 - 11:25 नवीन
ऋच्या मताशी सहमत. पिंपरी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला नोटाचा नक्कीच फायदा झालेला आहे. कमळ चिन्ह नसल्याने नोटाला मत देऊन आलेले दोन सदस्य आमच्या घरातच आहेत (मी सोडून).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रसाद१९७१ Tue, 10/21/2014 - 10:39 नवीन
नोटा नसता तर नोटा देणारा माणुस कष्ट करुन मतदान करायला कशाला जाईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ऋ
ऋषिकेश Tue, 10/21/2014 - 11:14 नवीन
निव्वळ एक कर्तव्य म्हणून (किमान मी तरी मतदानाच कर्तव्य भारतात असताना बजावायचे टाळत नाही. माझ्यासारखे बरेच असतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 10/21/2014 - 10:05 नवीन
अप्रतिम लेख नेहेमीप्रमाणे :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/21/2014 - 10:38 नवीन
समजा नोटा पर्यायाला सर्वाधीक मते मिळाली तरीही दुसर्‍या क्रमांकावरचा उमेदवार हा जिंकुन आलेला उमेदवार ठरतो त्याचे काय?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 10/21/2014 - 10:58 नवीन
+१ ही तृटी आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुधीर Tue, 10/21/2014 - 14:47 नवीन
तृटी तर आहेतच आणि कालानुरुप त्यात बदल घडवून आणता येतीलच. पण जसजशी या पर्यायाची आणि स्वछ चारित्र्य असणार्‍या उमेदवाराच्या मागणीसाठीची जागरुकता वाढत जाईल तस तशी अगदी पक्षनिष्ठ मतदार सुद्धा आपापल्या राजकिय पक्षांना आपल्या विभागासाठी चांगला उमेदवार देणे भाग पाडतील अशी आशा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विवेकपटाईत Tue, 10/21/2014 - 16:26 नवीन
लेख आवडला. अचूक विश्लेषण.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/22/2014 - 17:24 नवीन
खास वाट बघावी असा लेख आणि त्यावर उत्तम चर्चा! मस्त!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/03/2014 - 10:20 नवीन
मस्त विश्लेषण.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 11/03/2014 - 10:30 नवीन
सुंदर विश्लेषण. वाचायला उशीर झाला जरा.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 11/05/2014 - 10:26 नवीन
निवडणूकीनंतर निकालाचे पोस्टमॉर्टेम करून स्वतःच्या मेंदूचा भुगा करून घेण्यापेक्षा क्लिंटनच्या लेखाची वाट बघायचा जो निर्णय घेतला होता तो फळला. क्लिंटनचा लेख येईल अशी आशा नव्हे खात्रीच होती. आमच्याकडून एक मिसळ लागू :)
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 11/08/2014 - 08:05 नवीन
या वेळची निवडणूक कोणतीही विचारधारा नसलेली, सभ्यता आणि सुसंस्कृतता, पक्षातून सत्तेकडे जाण्याचा प्रचलित मार्ग नसलेली असा प्रघात ठरणारी होती. त्याही पलीकडे आजही सर्वच पक्षांचे चित्र धुसर असेच आहे. काही विजयाचा उन्माद असणारे, काही पराभव न पचवु शकणारे तर काही पक्ष पराभूत मानसिकतेच अजूनही अडूकन पडलेले असे विचित्र असे चित्र आहे. डोक्याचा भूगा बहुधा सदैव चालू राहिल अशी भिती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा